सोमवार, आँगस्ट 19, 2019
   
Text Size

उदार आनंतराव

वामन वडिलांकडे बघत राहिला. पलंगावर मऊ गाद्यांवर  निजणारे आनंदराव, हजारोंना आधार देणारे आनंदराव, गरिबांचा दुवा घेणारे आनंदराव आज तेथे भणंग भिका-यांप्रमाणे अनाथप्रमाणे मरुन पडले होते. शेवटी का जगदंबेच्या पायाजवळ त्यांनी क्षमा मागितली? पुढचा जन्म चांगला दे’, असे का म्हटले? वामनचे डोळे भरुन आले.

‘बाबा, तुम्हीही गेलात?’ असा टाहो फोडून त्याने पित्याला मिठी मारली. परंतु त्याने अश्रू पुसले. त्याचे वेड गेले. जीवनातील नवीन दालन उघडले. तो जमलेल्या लोकांना, नर, नारींना, लहानथोरांना हात जोडून म्हणाला,

‘बंधू, भगिनींनो, माझे वेड गेले. माझी स्मृती आली. माझे हे  वडील आज येथे अनाथ दीनाप्रमाणे मरुन पडले आहेत. ज्यांनी हजारोंच्या अंगावर पूर्वी पांघरुन घातले,  ते आज उघडे राहून थंडीत मेले. आपला गाव सावध होवो. आपल्या गावातही दारुचा नवीन गुत्ता आला आहे. माझी तुम्हांला प्रार्थना आहे की गावचा गुत्ता दवडा. सुरगावात कधी दारु येऊ द्यायची नाही] असा संकल्प करा. सुरगाव म्हणजे सुरांचा गाव, देवांचा गाव. दारुचे विष येथे नको. प्रेमाचे अमृत येथे पिको. तुम्ही मला अशा प्रतिज्ञेची भीक घालीत असाल तर मी या गावात राहीन, मी जगेन. नाहीतर आईबाप गेले त्यांच्या पाठोपाठ मीही जातो. हे  आनंदराव, त्यांचे हे दु:खी मरण, दीनवाणे मरण तुम्हांला सांगत आहे, नीट जगायचे असेल तर दारुपासून दूर रहा' करा या मृतात्म्याला साक्ष ठेवून प्रतिज्ञा करा.'

सारे गंभीर होते. गावची प्रमुख पंच मंडळी म्हणाली,  आपल्या गावात दारु नको. सुरगावात कधीही दारु नको. ठरले. आनंदरावांचे उदाहरण जळजळीत निखा-याप्रमाणे सांगत आहे. केवढा मोठा पुरुष, त्यांची काय दशा झाली! या गावात दारू नाही येऊ द्यायची, ठरले ना?’ सारे हो म्हणाले.

आनंदरावांची प्रेतक्रिया झाली. वामन गावच्या त्या मरीमाईच्या देवळातच राहतो. तो दारुबंदीवर कीर्तने करतो. स्वत:च्या वडिलांची हकीगत सांगतो. कीर्तनात त्याचे डोळे भरून येतात. श्रोते सद्गदित होतात. आणि मग कीर्तनात तो विचारतो, ‘नाही ना गावात आणणार दारु? संकल्प करा. हात वर करा.’ आणि हजारो हात वर होतात.

तुम्ही सुरगावाला गेलात तर तेथे आनंदरावांची ही गोष्ट तुम्हांला ऐकू येईल. वामनही आता जिवंत नाही. त्या आठवणी आहेत. तो जुनाट पडका वाडा आहे. गावाबाहेर ते मंदिर आहे. गावाला पूर्वीची कळा नाही. परंतु काही असले तरी गावात दारू नाही आली. त्यामुळे सुरगावाला अजून मान आहे. आणि नवतरुणांनी सेवादल सैनिकांनी गावाचे पुन्हा गोकूळ करायचे ठरवले आहे. आनंदरावांच्या गोष्टीचा बोलपट करुन तेथील सेवादलाचे सैनिक गावोगाव दाखवणार आहेत. सुरगाव आदर्श करणार आहेत. त्यांना यश येवो.

 

नशा वाढत चालली; व्यसन बळावत चालले. पैसे पुरत ना.  ते सुंदर उमदे घोडे विकले गेले. शेतीवाडी जाऊ लागली. सावकाराचे अपार कर्ज झाले. घरातले दागदागिने; भांडीकुंडी जात चालले. दारुची बाटली! परंतु त्रिभुवनातील सारी संपत्ती तिच्यापुढे तुच्छ ठरते. त्या संपत्तिला ती गिळून टाकते. आनंदराव भिकारी झाले. त्यांच्या अंगावर आता चिंध्या असत. पायांत काही नसे. तो रुबाब; ते तेज; ते वैभव सारे लोपले.

त्यांच्या पत्नीने विहिरीत जीव दिला. कारण सावकार वाडयाचा ताबा घेणार होते. त्या माऊलीला ती विटबंना कशी सहन होणार? जेथे मोती वेचले; फुले वेचली; तेथे शेण वेचायची पाळी आली; आणि आईच्या आत्महत्येने मुलगा वामन वेडा झाला. तो आई आई करीत गावोगाव भटकतो.

आनंदराव कोठोतरी बसत; कोठेतरी झोपत. त्यांना घरदार उरले नाही. कधी रस्त्यातून ते अनवाणी जात असायचे. ऊन कडक असायचे. पायांना फोड यायचे. एखादी बैलगाडी जाताना दिसली तर आनंदराव हात जोडून म्हणायचे;

‘मला घे रे जरा गाडीत; पाय पोळले रे. घे रे जरा दादा. आणि गाडीवानाला दया येई. गाडीवानाच्या डोळयांत पाणी येई. हेच ते आनंदराव; उंच घोडयांची गाडी उधळीत यायचे. पैसे वाटीत यायचे. रस्त्याच्या दुतर्फा गोरगरीब उभे असायचे.  गावच्या दरवाजाजवळ तर ही गर्दी असायची! परंतु आज? आज त्याच आनंदरावांना; ‘मला घेतो रे गाडीत?;’ असे दुस-याला हात जोडून विनवावे लागत होते. ‘मला देतो रे दिडकी; दे रे एक  बिडी; अशी त्यांना दुस-याजवळ भीक मागण्याची पाळी आली होती.

दारुपायी आनंदरावांचे सारे सारे गेले; त्यांच्या सोन्यासारख्या संसाराची दैना झाली! आणि एके दिवशी मनस्वी थंडी पडली होती. पाण्याचे बर्फ व्हायची वेळ आली होती. आनंदराव कोठे आहेत? त्यांना आहे का निवारा; आहे का पांघरुण? गावाबाहेरच्या मरीमाईच्या देवळात ते होते. ना पांघरायला; ना आंथरायला. थंडीने ते गारठून गेले. आहे का धुगधुगी? आहे का प्राण?

उजाडले. हळूहळू सूर्य वर आला. त्यालाही का थंडी वाजत होती? परंतु आता ऊब आली. लोक बाहेर पडले. गायीगुरे निघाली. पाखरे उडू लागली. कोणीतरी देवळात आले; तो मरीआईच्या पायाशी आनंदराव पडलेले. तो मनुष्य धावतच गावात गेला. सगळीकडे बातमी गेली. सारा गाव देवळाजवळ जमा झाला. कोणी हळहळत होते; कोणाचे डोळे ओले झाले होते.

इतक्यात ‘आई कोठे गेली? आई? असे म्हणत वेडा वामन आला. अकस्मात आला. त्याला ती गर्दी दिसली. तो धावत आला. "माझी आई दाखवा" तो म्हणाला.

"तुझा बाप येथे मरुन पडला आहे बघ. जरा शहाणा हो. सोड वेड’ कोणी म्हणाले.

 

सुरगावचे पूर्वीचे वैभव आज उरले नव्हते. एक काळी ते लहानसे खेडे परंतु गजबजलेले असे. सुरगावचे नाव सर्वांना माहीत. कारण तेथील जमीनदार आनंदराव म्हणजे कर्णाचा अवतार. ते जमीनदार होते परंतु दिलदार होते; उदार होते. पुन्हा त्यांना नाना प्रकाराची हौस. गावात रामनवमीचा मोठा उत्सव असे; पुढे मारुतिजन्मही असे; त्या निमित्ताने कथाकीर्तन व्हायचे; कुस्त्या व्हायच्या; जत्रा भरायची. आनंदरावांच्यामुळे या सर्व गोष्टींना शोभा असे. ते खर्च करायला मागेपुढे पहात नसत. अनेकांचे आदरतिथ्य करतील; अनेकांची सोय लावतील.

आनंदरावांकडे घोडयांची एक जोडी होती. अशी जोडी आसपासच्या पाचपन्नास कोसांत नव्हती उंच, धिप्पाड, रुबाबदार घोडे; आणि आनंदराव त्या घोडयांच्या गाडीतून जायचे-यायचे. ते आपल्या गावी परत येताना दोन्ही हातांनी पैसे फेकीत यायचे. रस्त्याच्या दुतर्फा गोरगरीब माणसे त्यांच्या त्या रथाची वाट पहात बसत. सुरगावला जुनी वेस होती. केवढा उंच दरवाजा! त्याच्यावर चढून लोक वाट पहायचे. धूळ उडवीत येणारा तो रथ दूर दिसताच नगारा वाजे आणि गोरगरीब गावाबाहेर दुतर्फा जमत. दरवाजाजवळ ही गर्दी असायची आणि  आनंदराव यायचे. मुठी भरुन पैसे फेकायचे. लोक ते उचलून घेत. असे हे आनंदराव! देवाने त्यांना भरपूर दिले होते आणि  त्यांनाही सर्वांना द्यायची बुध्दी होती.

परंतु एकदा ते मुबंईला गेले होते. कोणा लक्षाधीशाकडे उतरले होते. तेथे मोठी मेजवानी होती. मेजवानीत एक पेय होते. कोणते; आहे माहित? उंची विलयती दारु! आणि आनंदरावांना तेथील बडया लोकांनी दारुचा पहिला पेला दिला. मुंबईच्या मित्राने त्यांना आणखी काही दिवस ठेवून घेतले. आनंदराव दारुचे भक्त बनले. मुबंईहून जाताना ते उंची दारु बरोबर घेऊन गेले.

आणि आता त्यांना ते व्यसन कायमचे जडले. तलफ येताच ते जिल्हयाच्या मुख्य ठिकाणी जायचे. अर्देसर शेटजींकडून दारु न्यायचे. ते घरी येताना आता शुद्धित नसत. पैसे उधळीत येणारा  तो उदारांचा राणा; तो आनंदराव आता उरला नव्हता. झिंगलेला आनंदराव चाबकाने घोडयांना रक्तबंबाळ करीत यायचा.