बुधवार, सप्टेंबर 23, 2020
   
Text Size

वेदोत्तरकाल

असे स्थित्यन्तर व्हायला काय कारण ? लहानपणीच लग्न लावले तर मुलगी सासरी जाऊ-येऊ लागते. लहानपणी झाड उपटून दुसरीकडे लावले तर नीट जगते. मोठेपणी ते नीट मुळे धरु शकत नाही. त्या वेळेस एकत्र कुटुंबपद्धती होती. ती नांदवण्यासाठी का हा प्रयोग सुरु झाला ? सासरच्या मंडळीबद्दल, तेथीर दीर, नणंदा, भावजया यांच्याबद्दल लहानपणापासून परिचयामुळे प्रेम वाटेल, असे का प्रयोग करणार्‍यांस वाटू लागले ? ते काही असो, अशी पद्धत सुरु झाली खरी.

पुराण-कीर्तन-श्रवण हेच ज्ञानाचे साधन राहिले. वेदांचा अधिकारच गेला. प्रत्यक्ष शिक्षण संपले. अप्रत्यक्ष ज्ञान कळेल तेवढेच. अपवाद म्हणून स्त्रिया पंडित होत असतील. शंकराचार्य़ व मंडनमिश्र यांच्या वादविवादाच्या वेळेस मंडनमिश्रांच्या पत्‍नी अध्यक्ष असते. तिला का मंडनमिश्रांनी शिकवले होते ? काही घराण्यांतून ज्ञानोपसाना सुरु असेल.

कालिदासाची पत्‍नी शिकलेली होती परंतु तो अज्ञानी होता. शरमेने तो निघून गेला. त्याने उपासना केली. ज्ञान मिळवून घरी परत आला. त्याने दार ठोठावले. ‘कोस्ति ? कोण आहे’ असा पत्‍नीने आतून प्रश्न केला. “अस्ति कश्चित् वाग्विलासः” वाग्देवतेजवळ क्रीडा करणारा आहे कोणीतरी, असे त्याने उत्तर दिले. आणि पुढे या चार शब्दांतील एकेक घेऊन त्याने काव्यांचा आरंभ केला, अशी दन्तकथा आहे.

संस्कृत भाषा स्त्रियांना समजे, परंतु बोलता येत नसे. कारण शिक्षणच बंद झाले. वेदांमध्ये मंत्र लिहिले. उपनिषदांतून त्या चर्चा करताना दिसतात, परंतु संस्कृत नाटकांतून स्त्रिया संस्कृत न बोलता प्राकृत बोलतात. संस्कृत ही वरिष्ठांची भाषा राहिली. जे शिकत त्यांची भाषा. वैश्य, शूद्र, स्त्रिया यांना संस्कृत शिक्षणच मिळेणासे झाले.

सर्व बाजूंनी आत्म्याचा हा असा कोंडमारा होत होता. पतिव्रत्याचे स्तोम माजले. सती जाण्याची चाल पडली. पुरुषाने अनेक विवाह केले तरी परवानगी, एवढेच नव्हे तर त्याने पत्‍नी वारल्यावर लवकरच पुन्हा विवाह करावा म्हणून धर्माज्ञा. आणि स्त्रीने काय करावे ? तिला का भुका नाहीत ? परंतु तिने व्रतस्थ जीवन कंठायचे. ती संसारातील संन्यासिनी. तिने सारे काम करायचे. ती सोज्वला, सोवळी. तिने इतरांची बाळंतपणे करावी, आजार्‍याची सेवा करावी, स्वयंपाक करावा, लहान मुलेबाळे घरात असतील त्यांना संभाळावे. मुलाबाळांची हौस तिने देवाला मूल मानून भागवून घ्यावी. तो बाळकृष्ण. त्याला कुंची घालील, साखळी घालील. तो तिचा मुलगा. देवाची ती आई होते. वरिष्ठ वर्गांतून तरी स्त्रियांना असे हे प्रखर वैराग्य शिकवण्यात आले. ती परंपराच पडली.

 

स्त्रीला स्वातंत्र्य योग्य नव्हे, असा दंडक झाला. ती अबला बनली. लहानपणी पिता रक्षक, पुढे पती रक्षक, वृद्धावस्थेत पुत्र रक्षक. ती एक रक्षणार्ह वस्तू बनली. आणि जिचे रक्षण करायला दुसरे लागतात, तिला स्वतःची काय किंमत ? स्त्री म्हणजे जणू एक इस्टेट, मालमत्ता, एक चीज, तिचा आत्मा कुठे उरला ?

‘यत्र नार्यस्तू पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’

जेथे स्त्रियांची प्रतिष्ठा ठेवण्यात येते तेथे देवता रमतात, असे जरी स्मृतीतून उल्लेख असले तरी ते फार मोठी मजल मारताहेत असे नाही. स्त्रियांची पूजा म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य नव्हे. त्यांना नीट वस्त्र द्यावे, दागदागिना द्यावा, त्यांना संतुष्ट ठेवावे, असे स्मृती सांगते. थोडक्यात, स्त्रिया म्हणजे बाहुल्या. खायला प्यायला-ल्यायला मिळाले की कृतार्थता मानणार्‍या. स्त्रियांना का याहून थोर आनंद नको होते ? वैचारिक आनंद, ज्ञानाचा आनंद, तो का त्यांना नको होता ?

‘दारिका हृदयदारिका पितुः’ मुलगी म्हणजे पाप, तिच्या लग्नाची चिंता, असे वातावरण दिसू लागते. यास्कांचे निरुक्त जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीचे. परंतु त्यातही दारिका दारिका म्हणजे मुलगी. यास्काचार्यांनी या शब्दाचे अनेक धात्वर्थ दिले आहेत. परंतु हाही दिला आहे. अजूनही तीच स्थिती आहे. मुलीचे लग्न कसे करायचे, हीच चिंता आज हजारो वर्षे भारतात आहे. मुलाप्रमाणे मुलगी मोकळेपणाने वाढली नाही, शिकली नाही. तिला विवाह करण्याचे वा न करण्याचे स्वातंत्र्य नाही, अशी ही स्थिती दिसू लागते.

 

परंतु हे काही असले, तरी त्यांचे सामाजिक स्थान कमीच मानले जाऊ लागले. धर्मराजा द्रौपदीसह पणास लावतो, याचा अर्थ काय ? परंतु तो आपल्या भावांनाही पणास लावतो. कुटुंबाचा मुख्य असल्यामुळे त्याची का सर्वांवर सत्ता ? खरा प्रश्न असा होता की, धर्माने स्वतःला आधी पणाला लावले होते. स्वतः गुलाम बनल्यावर पत्‍नीला त्याला पुन्हा पणास लावता येत होते का ? पत्‍नीला स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही ? परंतु ‘धर्मस्य सूक्ष्मा गतिः’ असे म्हणून भीष्मद्रोणही मुके बसतात. पतीच्या जीवनाहून पत्‍नीला निराळे जणू अस्तित्व नाही. पतीच्या हाताला हात लागल्याने मोक्ष मिळेल. तिला स्वतंत्र मोक्षाचा कुठला अधिकार ? म्हणून का गीतेचे बंड ? ज्याप्रमाणे वैश्य, शूद्र यांना कमीपणा आला, त्याप्रमाणे स्त्रियांनाही. ज्यांनी स्वयंपाक करावा, दळावे, कांडावे, शेण लावावे, त्यांना कोठला मोठेपणा ? परंतु राजसूय यज्ञात उष्टी काढण्याचे कर्म स्वीकारुन श्रीकृष्णाने स्त्रियांची प्रतिष्ठा स्थापिली. परंतु स्त्रियांची प्रतिष्ठा वाढली नाही. त्यांना स्वतंत्र किंमत नाही.

कालिदास, भवभूती यांच्या नाटकांतून स्त्रियांची स्थिती बरी दिसते. शाकुंतलात कण्वाच्या आश्रमात मुलांबरोबर मुलीही शिकत आहेत, असे दृश्य आहे. उत्तमरामचरितात लवकुशांबरोबर भराभर शिकता येत नाही, म्हणून एक तापसी दुस-या आश्रमात जाते. परंतु हे उल्लेख त्या त्या कविवरांच्या काळाला धरुन होते, की प्राचीन काळाचे चित्र त्यांनी रंगवले होते, हे कळत नाही.

स्मृतिग्रंथ पाहिले तर निराळे प्रकार दिसू लागतात. प्रौढविवाह लोपले असे दिसते. बालविवाहाची प्रथा रुढ झाली. मग कोठले शिक्षण नि काय ? पति हाच गुरु. त्याने शिकवावे. स्त्रियांना स्वातंत्र्य दिसत नाही. हा फरक का आला, कसा आला ? हा का बुद्धधर्माचा परिणाम होता ? बुद्धधर्म स्त्री-पुरुषांना कमी लेखी ना. पुरुषांप्रमाणे स्त्रियाही दीक्षा घेत. त्या भिक्षुणी बनत. धर्मप्रचार करीत. परंतु यांतून पुढे अनाचार माजला का ? ब्रह्मविहार हे कामविहार झाले की काय ? म्हणून का निराळी लाट आली ? वैदिक कर्मकांडाने पुन्हा उच्चल खाल्ली तेव्हा का लहानपणीच विवाह करावे असे ठरले ? काही असो. स्त्रियांच्या जीवनातील मोकळेपणा गेला.

   

वेदकालामध्ये भारतीय स्त्रियांची प्रतिष्ठा दिसते. उपनिषदांतही त्यांचा महिमा आहे. याज्ञवल्क्य आपली मालमत्ता उभय पत्‍नींना देऊन वनात जायला निघतो. तर त्याची एक पत्‍नी त्याला म्हणते “ही संपत्ती जर त्याज्य असेल, तर ती मला काय करायची ? जे सुख तुम्ही जोडू इच्छिता, तेच मलाही हवे आहे.” स्त्रिया तत्त्वज्ञानाच्या चर्चा करतात ; राजदरबारात वाद करतात, केवढे भव्य हे दृश्य ! परंतु स्त्रियांचा महिमा हळूहळू कमी होत आला असावा. गीत ‘स्त्रियोवैश्यास्तथा शूद्राः’ असा उल्लेख करते. म्हणजे स्त्रियांना स्वतंत्रपणे मोक्ष मिळणे अशक्य, अशी भावना होऊ लागली होती ? स्त्रिया म्हणजे का पापयोनी ?

जी स्त्री सर्व संसाराची आधार, ती तुच्छ का ? रामायण, महाभारतकाळी स्त्रियांचे स्वयंवर होत असे. स्वतःला पती शोधायला सावित्री जाते. स्त्रिया प्रोढ असत. स्त्रियांचे मौजीबंधनही होई. त्या गुरुगृही शिकायला राहत. सीता गोदावरीच्या तीरी संध्या करी, असे रामायणात वर्णन आहे. म्हणजे वेदविद्येचा त्यांना अधिकार होता. ‘ब्रह्मवादिनी’ अशी विशेषणे सीता, द्रौपदी यांना लावलेली आढळतात. रामाच्या मुद्रिकेवरचे नाव सीता वाचते. स्त्रिया राजकारणातही लक्ष घालीत. त्यांना युद्धकलेचेही शिक्षण असे. दशरथाबरोबर कैकयी रणांगणात जाते. सत्यभाभा नरकासुराला मारते. सुभद्रा रथ उत्तम तर्‍हेने हाकी. क्षत्रियकन्यांना हे सारे शिक्षण मिळत असे का ? इतर कलांचेही शिक्षण त्यांना मिळे. उत्तरेला नृत्य शिकवायला अर्जुन राहतो. चित्रकलाही त्या शिकत. उषा अनिरुद्धाला स्वप्नात पाहते. तिची मैत्रीण चित्रलेखा तिला जगातील सर्व तरुणांची चित्रे काढून दाखवते. तिचे नाव चित्रलेखा. क्षत्रिय मुलींना हे सारे सांस्कृतिक शिक्षण मिळत असेल. ब्राह्मण कन्या काय करीत ? त्याही गुरुगृही शिकत. गुरुगृही त्या मुलींना अनुरुप शिक्षण मिळत असावे. महाभारतात उद्योगपर्वात एक तपस्विनी म्हणतेः “मी सत्तर वर्षांची होऊन गेले. अनेक आश्रमांतून राहिले, ज्ञान मिळवले.” सत्तर वर्षे ती अविवाहित होती. सत्तरी ओलांडल्यावर ती चिरयुवती विवाह करु इच्छिते. स्त्रियाही का वाटेल तितके शिकत, इच्छेनुरुप विवाह करीत ?