रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

जबाबदारी

हिंदुस्थानात व विशेषत: सर्वच पौर्वात्य देशांत भातशेतावर राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संघटना जन्म पावली आहेत. जेथे राष्ट्रीय विचार व राष्ट्रीय जीवन उभारली गेली, जेथे सहकार्याची शक्ती अजमावता आली- असे भारतीय कार्यक्षेत्र म्हणजे शेत होय. या शेतीच्या कामात अनेक कुटुंबेच्या कुटुंबे सामील होतात व एकमेकांची कामे उरकून टाकतात. एका मुख्य माणसाच्या देखरेखीखाली म्हातारे, तरणे, बायका, पुरुष, मुले- सारी जणे कामे करतात. सशक्त वा अशक्त मनात शक्तीचा विचारही न येता कामाला लागतात. सारे समान भावनेने झटतात. ते पेरणी करतात, आवण काढतात, लावणी करतात, भात कापतात, भारे बांधतात, उडव्या रचतात. कोणालाही असे वाटत नाही की आपण मोठे. कोणालाही असे वाटत नाही की, मी जास्त काम केले, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. कोणीही म्हणणार नाही, “ही युक्ती मी शोधून काढली.” कारण आपण इकडचे काढून तिकडे लावावयाचे- यासाठी कोणी युक्ती शोधून काढली तरी त्याला बक्षिसाची आशा नाही, काही नाही. सर्वांचा श्रम सारखा, सारख्याच उद्योगाचा, एकाच प्रकारचा. म्हणून तर खेडयांतील संस्था, पंचायती, कुटुंबपध्दती, निरनिराळे धंदे, जाती सारे टिकून राहिले. हिंदुस्थान हा लोकसत्ताक देश आहे. खेडी स्वतंत्रच होती. सर्वांची समान किंमत. सारे श्रीमंत काम करीत. वरती राजा-महाराजा कोणी असो. खेड्यातील संघटनेवर त्याचा परिणाम होत नसे. या संघटनेमुळे हिंदुस्थानने टिकाव धरला, नाही तर प्रचंड हल्ल्यांनी केव्हाच कोलमडून जाता. खेड्यातील ह्या साध्या परंतु प्राणमय संघटनेचे हे फार उपकार आहेत. पश्चिमेबरोबर तुलना करताना एकाच बाबतीत हिंदुस्थान कमी ठरतो. पश्चिमेकडे सामुदायिक संगीत आहे, सामुदायिक धर्म आहे. सामुदायिक जीवन अत्यंत गुंतागुंतीचे असूनही ते अत्यंत यशस्वी रीतीने तिकडचे लोक चालवीत आहेत.

युरोपातील कोणत्याही मध्ययुगीन शहराइतकेच बनारस शहर सुंदर आहे. या वाराणशी शहराशी तुलनेसाठी उभी राहतील अशी युरोपमध्ये एक-दोनच पुररत्ने आहेत. परंतु ज्याने ज्याने म्हणून युरोपमधील प्रार्थनामंदिरे पाहिली असतील, त्याला त्याला तेथे बहुविध विविधतेत कसे ऐक्य निर्मिलेले आहे, ते दिसून आल्याशिवाय राहिले नसेल. पाश्चिमात्य देशांतील प्रार्थनामंदिर म्हणजे केवळ एक टोलेजंग हवेल नसते. दक्षिण हिंदुस्थानांतील भव्य व प्रचंड मंदिरासारखेच ते असते. त्या मंदिरांतील दगडांवर व लाकडांवर नक्षी असेल; वस्त्रांचे सुंदर नमुने तेथे असतील; प्राचीन काळातील धातुकामाचे बहुमोल नमुने तेथे असतील; सुंदर ग्रंथसंग्रह तेथे असेल; तेथे वाजविणारे, गाणारे असतील. थोडक्यात काही लेखकांनी म्हटल्याप्रमाणे सर्व धंद्यांचे व सर्व कलांचे परमेश्वरासमोर ते प्रदर्शनच असते. म्हटल्याप्रमाणे सर्व मिळविले, याची ती प्रभूसमोर दिलेली जणू हजेरी होय. एक प्रार्थनामंदिर परंतु ते उभे राहावे म्हणून सारी विविधता एकत्र येऊन श्रमत होती. एका ध्येयाभोवती, एका वस्तूभोवती प्रभावळीतल्याप्रमाणे सार्‍या कला व सार्‍या विद्या हारीने उभ्या राहिल्या होत्या. अनेक विभिन्न सुरांतून एक दिव्य संगीत तेथे निर्माण केले जात होते. युरोपातील जनतेला आपण सारे एक आहोत व स्वतंत्रही आहोत, हा जो मध्ययुगाच्या अंती एकदम साक्षात्कार झाला, आपण जोडलेले असूनही विभक्त आहोत व विभक्त असूनही जोडलेले आहोत हा जो विचार त्यांना स्फुरला, तोच या मंदिराच्या रूपाने प्रकट झाला. अंतरीचे बाहेर धावले. युरोपमधील सरदारांची सत्ता जाऊन मध्ययुगांतील स्वतंत्र मोठी शहरे ज्या वेळेस उदयाला आली, त्याच वेळेस या प्रार्थना मंदिराचाही जन्म झाला.

गलबतावरील संघटनेने प्रार्थनामंदिरे बांधावयास शिकविले व प्रार्थनामंदिरे बांधावयास शिकून कारखाने व प्रचंड उद्योगधंदे बांधावयास युरोप शिकले. एक अनुभव दुसर्‍या अनुभवाला जन्म देतो. युरोपातील आजच्या संघटनेचे व शिस्तीचे स्वरूप पाहात पाहात असे मागे गेले म्हणजे मूळच्या लहान प्रवाहाचीच ही महानदी झाली आहे हे, व महानदीच आज सागराप्रमाणे होऊन जगाला वेढून बसली आहे हे सारे लक्षात येते. जे लोक लहान लहान कामे शिरावर घेऊन प्रामाणिकपणे, चिकाटीने, निष्ठेने व एकजुटीने तो पार पाडतात, त्यांना उत्तरोत्तर आणखी मोठी कामे शिरावर घेऊन पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त होत असते. गलबते नीट चालविणारे साम्राज्ये चालवू लागतात, प्रार्थना नीट चालविणारे प्रचंड कारखाने सांभाळू शकतात. कामे करुन शक्ती येते व त्या शक्तीने आणखी मोठी कामे. ह्याप्रमाणे व्याप वाढतो व व्यापाबरोबर वैभवही वाढते.

आपण भारतवासी मोठमोठी कामे शिरावर घेणार नाही का ? परंतु मोठ्या कामास लायक होण्यासाठी छोटया छोटया कामांत प्रामाणिक राहावयास शिकले पाहिजे. एखादे चाक, एखादा स्क्रू -परंतु त्याच्यावर सर्व यंत्राचे सुरळीत चालणे अवलंबून नसते. आपण जबाबदारी पार पाडण्यास शिकू या. आपापले नेमून दिलेले काम, शिरावर घेतलेली जोखीम पार पाडू या. आपली पत वाढवू या, विश्वास वाढवू या, स्वत:ची किंमत वाढवू या. कामे करीत गेल्याने किंमत वाढेल व आपली हिंमतही वाढेल. आपला शब्द दिला हेच नैतिक बंधन. “रघुकुल रीति सदा चलि आई । प्राण जाय पर वचन न जाई ।।” श्रीरामचंद्र व हरिश्चंद्र हेच आपले आदर्श. ज्याचा हात एकदा हातात घेतला, तो मृत्यूनेच वियुक्त केला जाईल. अशा रीतीने जर आपण कामे करीत गेलो, तर प्रत्येक कामांतून नवीन शक्ती उत्पन्न होईल, पूर्णपणे पार पाडलेले प्रत्येक कर्म राष्ट्राचे बळ वाढवील, राष्ट्राचे किल्लेकोट अधिकच बळकट करील.


 

आपल्याकडे मठ आहेत, महंत आहेत. युरोपियन मठ व आपल्याकडचे मठ यांत काय फरक आहे बरे ? युरोपातील मठवासी संन्याशात संघटना आहे, कार्यपध्दती आहे, सेवेची नितांत आवड आहे; विशिष्ट जबाबदार्‍या त्यांनी स्पष्टपणे आपल्या शिरावर घेतल्या आहेत. त्यांच्या मठात एक पुरुष मुख्य असतो. त्याच्या हाताखाली आणखी दोन असतात. यातील एक जण नवशिक्यांना शिकवितो, दुसरा आलेल्या अतिथिअभ्यागतांचे स्वागत करतो. मठात किती का लोक असत ना; प्रत्येकाला काम नेमून दिलेले. याचा त्याच्या कामाशी घोटाळा नाही. सारे व्यवस्थित व शांतपणे चाललेले असते. गडबड नाही, घोटाळा नाही. धावपळ नाही, अव्यवस्थितपणा नाही. अशी एकही घटका जात नाही, असा एकही क्षण जात नाही, की ज्या वेळेस कोठले ना कोठले तरी नियुक्त कर्म प्रत्येक जण करीत नाही. सर्व आखून दिलेले. आळसाला, विलासाला स्थान नाही. गडबडीला अवसर नाही. त्रागा नाही, तंटा नाही. अशा रीतीने या मठरूपी देहातील सारे अवयव आपापली कामे नीट करीत असतात, सहकार्याने चालवीत असतात आणि मठाचे ध्येय वाढवीत असतात. त्या ध्येय-हृदयातील रक्त सार्‍या अवयवांतून वाहत असते. ‘सूत्रबध्द, व्यवस्थित कर्म कर’ अशी प्राणमय घटना तेथे असते. शत्रूवर स्वारी करणार्‍या लष्करांतही तितकी शिस्त व आज्ञाधारकता नसेल, जितकी सेवा करणार्‍या या मठवासीयांत असते.

अशा संस्थांचा विकास व्हावयास अनेक शतके लागली. ह्या संस्थांच्या विकासातच अर्वाचीन अवाढव्य जो युरोपियन व्यापार, त्याची बीजे आहेत. प्रचंड व्यापारी मंडळ्या, लाखो मजूर काम करीत असलेले कारखाने- परंतु सारे कसे रेखीव व आखीव चाललेले असते. गडबडगुंडा कोठेच नाही. एक शब्द ऐकू येणार नाही. सारे आपआपल्या कामात चूर. सारी घडी बसलेली, लष्करात, व्यापारात, राज्यकारभारात- सर्वत्र शिस्त, संयम, व्यवस्थितपणा यांचे बी पेरले गेले आहे. डोंगराच्या मध्यावर एखादा वृक्ष प्रयत्नाने मोठा व्हावा, त्याला फुले, फळे यावीत व त्या फळातील बीजे वार्‍याने सर्वत्र पेरावी- मग तसा तो डोंगर त्याच प्रकारच्या वृक्षांच्या जंगलाने नटून जातो- मलयगिरी चंदनाच्या वृक्षांनीच जसा सजून गेला- तसे युरोपमध्ये झाले. सुसंघटित संन्याशांच्या संस्थांनी- शतकानुशतके त्या विशिष्ट गुणांचा विकास करीत असलेल्या ह्या संस्थांनी संघटनेची बीजे सर्व युरोपभर सर्व कर्मक्षेत्रात पेरली व ती सर्वत्र रुजून आज मोठी झाली आहेत- त्या बीजांचे प्रचंड वृक्ष झाले आहेत. समाज तिकडे एकरूप आहे. संन्यासी समाजापासून वेगळा नाही. एकाने केलेल्या उद्योगाचे फायदे- एकाने केलेल्या प्रयोगाचे फायदे सार्‍या समाजास मिळतात.

विचाराच्या पाठीमागे अनुभव असतो व अनुभवापोटी ज्ञान असते. नाना प्रकारच्या अनुभवांतून आपण शहाणपण शिकतो. विचारांचा पूर्ण विकास व्हावयास अनुभव लाभतो. मग तो विचार व्यक्तिगत असो वा सर्व समाजाचा असो. असा कोणता प्रत्यक्ष अनुभव होता की, ज्यामुळे युरोपातील लोकांच्या अगदी रक्तांत, अगदी हाडामासांत ही कार्यकुशलता, ही कार्यकारी एकता, ही शिस्त व ही संघटना इतर देशांतील लोकांपेक्षा अधिक बिंबली ? कोणत्या अनुभवामुळे हा इतर देशांतील लोकांपेक्षा त्यांचाच विशेष झाला ?

समाजशास्त्रज्ञ म्हणतात की, समुद्रावरील वर्चस्व याच्या मुळाशी आहे. समुद्रावर विजय हा तो अनुभव होय. युरोपातील अनेक देशांना समुद्रकिनारा आहे. समुद्रकाठी लाखो लोक राहतात. त्या लोकांच्या संघटनेच्या मुळाशी गलबत व गलबताचे ध्येय आहे. गलबतावर कोणते खलाशाचे मंडळ असे ? प्रत्येक गलबतावरचे खलाशी म्हणजे सारे कुटुंबातलेच असत. पिता मुख्य नायक असे. मुलगा मुख्य तांडेल धाकटा मुलगा त्याचा सहकारी. इतर मुलगे, भाचे, पुतणे- सारे खलाशी अशा प्रकारचे गलबतावरचे कार्यमंडळ असे. त्यांचे संबंध ठरत, कामे वाटली जात व गलबत हाकारले जाई. आता वादळ झाले तरी कोणीही आपआपले काम सोडावयाचे नाही. बापाने रडत मुलाकडे जावयाचे नाही; मुलाने बापाला हाका मारावयाच्या नाहीत. सारे आपापल्या कामात दक्ष. आपापल्या ठिकाणी गाडून घेतल्याप्रमाणे उभे. गलबतावरची संघटना सार्‍या युरोपाने उचलली परंतु पुढे मासे मारावयाचे सोडून राष्ट्र मारू लागण्याचे या गलबती संघटनेचे ध्येय, तेही युरोपने उचलले.

 

सार्वजनिक जीवनात नाना प्रकारचे प्रयोग करण्याचा जो उत्साह, तो काय काय करू शकतो हे पाहावयाचे असेल, तर आपण पश्चिमेकडे वळले पाहिजे. यात कोणाचे दुमत होणार नाही असे वाटते. हिंदुस्थानात विचारांचे दर्शन जास्त सम्यक् कदाचित् होत असेल, परंतु ते विचार कृतीत कसे आणावे, सामाजिक संघटनेत कसे ओतावे, हे पाश्चिमात्यांनाच अधिक माहीत आहे. पाश्चिमात्यांच्या या अनुभवांचा आपण अभ्यास केला पाहिजे, मनन केले पाहिजे. निरीक्षण केले पाहिजे. सत्याचे दर्शन झाल्याशिवाय, सत्यज्ञान झाल्याशिवाय चूक कळून येत नाही व चूक कळलीच नाही, तर दूर कशी करता येणार ? सामाजिक बाबतीत सुधारणा केल्याच पाहिजेत किंवा जुन्यालाच चिकटून बसले पाहिजे असे काही नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे की, डोळे उघडून पहा व नीट समजून घ्या. केवळ नवीन म्हणून उतावीळपणे अविवेकाने ते घेणे, किंवा ‘जुने तेवढे सोने’ असे म्हणून नवीनाकडे ढुंकूनही न पाहणे या दोन्ही वृत्तित आग्रह आहे. जेथे आग्रह आहे. तेथे सत्यदर्शन नाही. बुध्दे फलं अनाग्रह:- कशाचाही आग्रह न धरणे हे तर बुध्दीचे फळ. विचाराला पटेल ते घेतले पाहिजे वस्तुस्थितीचे नीट आकलन होण्यासाठी पूर्वग्रहदूषित दृष्टी घेऊन चालणार नाही. पक्षपातात, निरहंकारी व निरपेक्ष, अशी शांत वृत्ती घेऊन विशाल दृष्टीने नवे व जुने, पौर्वात्य व पाश्चिमात्य पाहिले पाहिजे व जे योग्य वाटेल ते घ्यावयास निर्भयपणे तयार झाले पाहिजे.

युरोपमध्ये निरनिराळे प्रश्न कसे सोडवले जातात, त्याची आपल्या पध्दतीशी तुलना करू या. आणि यापासून काही शिकण्यासारखे असेल, घेता येण्यासारखे असेल तर शिकू या, आनंदाने घेऊ या.

धार्मिक गोष्टीच प्रथम घेऊ. हिंदुस्थानातील पूजा म्हणजे एक यजमान व एक उपाध्याय. हिंदुस्थानातील पूजेत सामुदायिक जीवनाची भावनाच नाही. त्याच्या उलट युरोपमध्ये बघा. तेथील धार्मिक प्रार्थना म्हणजे एक विशाल व भव्य संघटनाच असते. त्या कार्यात अनेकांचे सहकार्य असते. गाणारे, वाजविणारे, सांगणारे, म्हणणारे, प्रवचन करणारे सर्वांमिळून प्रार्थना होते. हिंदुधर्मातील संन्यासी घ्या. तो कोणतीही जबाबदारी न घेता या ठिकाणाहून त्या ठिकाणी असा भटकत राहतो व गुरूपासून मिळविलेले आपले वैयक्तिक ध्येय-त्याला वाढवू बघतो. पुष्कळ वेळा त्याच्या जीवनात दिव्यतेचेही दर्शन होते. कधी कधी तर परमोच्च वेयक्तिक विकास त्याच्या ठिकाणी प्रतीत होतो. परंतु नीट सुसंघटित रीतीने बांधलेले जे समाजरूपी मंदिर- त्या मंदिराचा तो भाग होऊ शकत नाही. कारण समाजाची शिस्त, बंधने व जबाबदारी तो घेऊ इच्छीत नाही, पाळू इच्छीत नाही. ज्याला समाजमंदिरात, समाजघटनेत नांदावयाचे आहे त्याने ‘मेलो तरी हरकत नाही, परंतु ही आज्ञा पाळीन, काहीही होवो ही जबाबदारी पार पाडीन, काहीही नुकसान होवो, मी वेळेवर हजर राहीन’ अशी बंधने पाळावी लागतात. नीट व्यवहार करू, चालरीत पाळू, सभ्यता दाखवू..... या सगळ्या गोष्टी सामाजिक जो घटक आहे त्याला अवश्य असतात. आणि भारतीय संन्यासी तर बंधनातील असणार. त्याला स्वत:ची काय बंधने असतील तेवढीच. समाजाची मानावयास तो तयार नसतो. युरोपमध्ये संन्यास सामाजिक जीवनाशी एकरूप होऊन गेला आहे. सामाजिक हिताहिताशी निगडित झाला आहे. संन्याशांनी लोकहिताच्या व लोककल्याणाच्या मोठमोठ्या चळवळी तिकडे केल्या. शेती करणारे व शेती शिकविणारे सिस्टरशियन् शिक्षणप्रचार करणारे डोमिविकन् व जेसुइट, नीतिप्रसार व भूतदयेचा प्रसार करणारे केवळ सेवामय असे फ्रॅन्सिस्कन हे सारे संन्यासी संघच होते. फ्रॅन्सिस्कन संन्याशांच्या उदाहरणानेच दवाखाने, रुग्णालये, आरोग्यधामे, स्वस्तिकमंडळे, शुश्रूषा करणारी सेविकापथके, रोगप्रतिबंधक संस्था, दुष्काळनिवारणमंडळे वगैरे सारे सेवेचे प्रकार युरोपमध्ये सर्वत्र रुढ झाले व आता सार्‍या जगभर पसरले. तसेच जेसुइट लोकांच्या शिक्षणाच्या कामावरच आजच्या युरोपातील मोठमोठ्या विद्यापीठांची उभारणी झालेली आहे. ही सारी सेवेची बीजे संन्याशांच्या संस्थांनी पेरली व आज त्यांचे विशाल वृक्ष झाले आहेत.

   

आपणांवर सोपविलेले काम, टाकलेली जबाबदारी, पार पाडणे म्हणजे देवाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे होय. ज्या वेळेस आपणांवर काही जबाबदारी सोपविण्यात येते, काही विश्वास टाकण्यात येतो, त्या वेळेस परमेश्वर परीक्षा घेत आहे असे समजावे. जे काम आपणांवर सोपविण्यात आले ते पार पाडण्याची आपण आपली शिकस्त केली पाहिजे. तुकारामांनी म्हटले आहे, “विश्वासाची धन्य जाती.” आपल्यावर सारे विश्वास ठेवतात, याहून भाग्याची व कृतकृत्यतेची दुसरी कोणती गोष्ट ? जे काम आपण पुरे करीत नाही, शेवटास न नेता अर्धवटपणे सोडून देतो, ते अपूर्ण राहिलेल्या यज्ञाप्रमाणे आहे. आणि यज्ञ अर्धवट राहणे म्हणजे स्वत:चा नाश करून घेणे होय. इंद्रजिताच्या भंगलेल्या यज्ञांतून, पुरा न झालेल्या त्या यज्ञांतून विजयरथ बाहेर पडला नाही. अर्धवट यज्ञांतून फलप्राप्ती नाही. त्याप्रमाणे अर्धवट काम करून फायदा नाही. कर्म म्हणजे यज्ञच तो. सामाजिक कर्तव्ये, नागरिकत्वाची किंवा इतर राष्ट्रीय कर्तव्ये करीत असताना आपण आपल्या वैयक्तिक भावना, खाजगी प्रश्न, घरची सुखदु:खे, वैयक्तिक तंटे व विरोध-सारे घरीच ठेवून बाहेर पडले पाहिजे. सार्वजनिक कर्माची जबाबदारी मजवर असताना मी माझा क्षुद्र अहं त्या वेळेस विसरून गेले पाहिजे. माझ्या सार्वजनिक कर्तव्यक्षेत्रात ही घरातील स्वार्थमत्सराची भुते, ह्या उंदीरघुशी बाहेर येता कामा नयेत. सार्वजनिक जबाबदारी शिरावर असताना स्वत:चा स्वार्थच काय तर स्वत:चे आरोग्यही क्षणभर दूर ठेविले पाहिजे. थोर मॅझिनी म्हणत असे, “माझ्या राष्ट्राला माझी जरुरी असताना मी आजारी कसा पडू शकेन !” न्यायमूर्ती रानडयांना त्यांची प्रकृती बरीच बिघडल्यामुळे डॉक्टर लाहोरच्या सामाजिक परिषदेस त्यांना जाऊ देताना; त्या थोर संताच्या, आधुनिक ऋषीच्या डोळ्यांतून घळघळ पाणी आले ! “माझ्यावर ही जबाबदारी आहे-” ह्या विचाराने आपणास पराकाष्ठेचे प्रयत्न करण्यास सामर्थ्य आले पाहिजे; पराकाष्ठेचा त्याग करावयास स्फूर्ती वाटली पाहिजे.  “माझी जबाबदारी पार पडली, आता मी सुखाने मरतो-” असे बाजीप्रभू म्हणाले. “माझे डोके तरी किल्ल्यांत जाऊन पडू दे, नाही तर किल्ला हातात पडू दे-”  असे भीष्म प्रतिज्ञ चिमाजीअप्पा बोलले. “आधी कोंडाण्याचे लगीन, मग माझ्या रायबाचे-’ असे जबाबदारी ओळखणारा नरवीर तानाजी म्हणाला.  “प्रत्येकाने आपल्यावरची जबाबदारी पार पाडावी अशी इंग्लंडची अपेक्षा आहे-”  हा लहानसा संदेश नेल्सनने दिला होता. परंतु त्यात अपार प्रेरणा व स्फूर्ती होती. जबाबदारी पार पाडणे, विश्वासाला पात्र होणे- फार भव्य व दिव्य आहे ही गोष्ट. तुम्ही पडलेत तरी चालेल, परंतु जबाबदारी पार पाडा.

याच्यावर दया दाखववी की नाही, याच्या बाबतीत न्यायाच्या काटा जरा सौम्य करू का- वगैरे प्रश्नांना दुसरे उत्तर नाही. ज्याची अत्यंत आवश्यकता असेल ते करा. जेथे जरूर असेल तेथे दया दाखवा, जेथे सौम्य होणे आवश्यक असेल तेथे जरा सौम्य व्हा. ज्याच्यावर दया करावयाची, त्याला त्या दयेची कितपत जरुरी आहे, तो त्या दयेला मनात किती किंमत देईल- हे पाहिले पाहिजे. श्रीमंतावर दया करण्यात काय अर्थ ? त्याला त्या केलेल्या दयेची आठवणसुध्दा राहणार नाही. “त्यात काय मोठेसे केलेत, नसतेत जरा थांबलेत, तर भरले असते दंडाचे पैसे.”  असे उर्मटपणाने तो खुशाल मागून बोलेल. जबाबदार मनुष्याने या सर्वांचा विचार करून वागावे. त्याच्या वागण्याला स्वार्थाची दुर्गंधी येऊ नये म्हणजे झाले. नाहीतर पुष्कळ वेळा गरिबांच्या बाबतीत अधिकारी कंटक असतात व श्रीमंतांच्या बाबतीत ते मऊ असतात. ‘सार्वजनिक जागेचे अतिक्रमण झाले’ या सबबीवर गरिबाची झोपडी ताबडतोब जमीनदोस्त होते; श्रीमंताची हवेली मात्र उभी राहते. गरिबाने कर भरला नाही तर लगेच जप्ती, परंतु मातब्बरास मात्र वाटेल तितकी सवलत. अशा ज्या गोष्टी सार्वजनिक जीवनात, स्थानिक संस्थांच्या कारभारात होतात याच्या पाठीमागे स्वार्थ, भीती, मानसन्मानाच्या इच्छा- नाना वृत्ती असतात. अंगावर जबाबदारी घेणार्‍याने या वृत्तीपासून दूर राहिले पाहिजे.

सार्वजनिक जीवनात मोठे होण्याची इच्छा, स्वार्थ, सत्तेची व कीर्तीची लालसा ह्या गोष्टी तितक्या प्रेरक असतात. सर्वांत अत्यंत जोरदार प्रेरणा “ही गोष्ट मीच करू शकेन. मला तेथे जाऊ दे-” ही होय. इंग्लंडच्या इतिहासात थोरला पिट म्हणाला, “राष्ट्राला मीच काय तो वाचवू शकेन. दुसरा कोणी ते करू शकणार नाही.”   ज्याला असे म्हणता येईल, त्याच्या भाग्याला सीमा नाही. “ हे काम माझ्यावर सोपवा. मी ते जितके उत्कृष्टपणे करू शकेन तितके दुसरा कोणी करू शकणार नाही. या माझ्या खांद्यावरच ती जबाबदारी शोभेल-” असे अहमहमिकेने म्हणणारे उत्साही, आत्मश्रध्द व कार्यधुरंधर लोक जेथे भरपूर निघतात, त्या देशाचे भाग्य थोर होय. याच विचाराने पहारेकरी, चौकीदार आपापल्या ठिकाणावरून न हालता तेथे जरूर पडली तर मरून जातील. याच ध्येयाने व प्ररणेने आगीचे बंबवाले आगीत घुसतील; हाच विचार झोपाळू जीवांना जागृती देईल, मागे मागे रेंगाळणार्‍यांना पुढे खेचून आणील; आणि हाच धर्म होय.

 

नागरिकांच्या जीवनात कोणकोणत्या गोष्टी येतात, हे जर आपण तपासावयास लागलो तर भिन्न भिन्न वृत्तीचे लोक भिन्न भिन्न गुणांवर व गोष्टींवर जोर देतील. शिष्टाचार, चांगली चालचलणूक, सभ्यता यांना नागरजीवनात महत्त्वाचे स्थान आहे. आपण आपल्याच ओळखीच्या लोकांच्या व आप्तेष्टांच्या सहवासात असताना या गोष्टीत जे काही महत्त्व असते, त्यापेक्षा शतपटीने अधिक महत्त्व शहरात- जेथे हिंदुस्थानातील प्रत्येक भागांतून आलेल्या लोकांचा समुदाय बनलेला असतो तेथे आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. जेथे नाना ठिकाणचे, नाना जातीचे, नाना पंथाचे लोक असतात तेथे सभ्य रीतिरिवाज फारच कसोशीने पाळणे अगत्याचे आहे. सामुदायिक जीवनात, सामाजिक व्यवहारात सभ्य चालचलणुकीस कमी लेखून चालणार नाही. गाडीच्या चाकाला जसे तेलाचे ओंगण, त्याप्रमाणे समाजाच्या गाड्याला सभ्य चालचलणुकीचे, गोड शिष्टाचाराचे ओंगण अवश्य असते. अशानेच गाडी नीट चालेल, नाही तर खटाखट व कुरकुरी सुरू होतील. बरे बोलावयास, बरे चालावयास, बरे बघावयास, बरे हसावयास कोणाचे काही खर्च होते, असे थोडेच आहे ! परंतु ह्या दिसावयास क्षुद्र गोष्टी जरी असल्या तरी त्यांचे परिणाम फार चांगले होतात. जबान मिठास असणे ही गोष्ट फार जरूरीची आहे. या जिभेने, गोड जिभेने जगमित्र होता येते. आणि आपल्या या सभ्यतेच्या पाठीमागे, गोड बघण व गोड बोलणे यांच्या पाठीमागे सुकुमार व कोमल अशा सामाजिक भावनाही जर असतील तर तीच सभ्यता दंभ न राहता सत्यरूप होईल. अशी ही हार्दिक सभ्यता- देखल्या देवा दंडवत नव्हे, वरवरची हस्तिदंती नव्हे- मानवजातीला मिळालेला बहुमोल देणगी होय. आपण बाहेर वागतानाच सभ्यता पाळावी असे नाही, तर घरातसुध्दा ती पाळावी. आपली आई, आपले भाऊ, आपल्या बहिणी, आपली भार्या ही आपली झाली म्हणून काय झाले? त्यांच्याशी का आदराने वागावयास नको ? मर्यादेने वागावयास नको? मी लोकांशी बाहेर चांगले वागावे आणि माझ्याच घरातील माझ्याजवळच्या प्रिय माणसांशी मी पशूसारखे करावे, त्यांच्याशी तुसडेपणाने व तिरस्काराने वागावे, हे बरे आहे का, भले दिसते का? जे माझ्या ओळखीचेही नाहीत, ज्यांचे माझे ना सोहेरसुतक, त्यांच्याजवळ मात्र सुष्टात्मा आणि घरात मात्र मी दुष्टात्मा बनावे का ? बाहेरच्याजवळ साळसूद, घरात मात्र भूत, असे वागावे का ?

दुसरे काही लोक वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, नियमितपणा या गुणांवर जोर देतील. सामुदायिक जीवनात, सार्वजनिक जीवनात वक्तशीरपणा व व्यवस्थितपणा हे गुण अत्यंत आवश्यक आहेत. ते जर नसतील तर फार गोंधळ होतो व अनेकांच्या गैरसोयी होतात. खरोखर नियमितपणा हा आपला धर्म झाला पाहिजे. सूर्य-चंद्र ठरल्या वेळी येतात, ऋतू ठरल्या वेळी येतात. नियमितपणाचा अभाव म्हणजे संयमाचा अभाव होय व संयमाचा अभाव म्हणजे सामर्थ्याचा नाश होय. आपण नियमित नसणे म्हणजे आपण आपल्या आसक्तींना व मोहांना बळी पडणे हाच त्याचा अर्थ होय. दुसर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून, दुसर्‍याचा थोडा विचार म्हणून तरी आपण आपला आळस व इतर सुख दूर ठेवून नियमित व वक्तशीर झालेच पाहिजे.

तिसरी गोष्ट-दुसर्‍याजवळ वागताना सदैव विश्वासार्ह राहिजे पाहिजे. दुसर्‍याने आपणांवर बिनधोकपणे विसंबावे अशी आपली पत व दानत हवी. नाही तर सांगावे एखाद्याला की, टाकतो पत्र पेटीत व पत्र आपल्या कोटाच्या खिशातच महिना महिना पडून राहावे ! ‘आठ वाजता येतो म्हणून सांगावे व दहा वाजले तरी पत्ता नसावा!’  ‘या महिनाअखेर पगार होताच पैसे देतो’ म्हणून कबूल करावे, परंतु पगार होऊन तो खलास होण्याची वेळ आली तरी देण्याची आठवण मात्र होऊ नये ! ‘पुस्तक आठदिशी परत करतो’ म्हणून सांगावे. परंतु महिना महिना घरी ठेवून शेवटी ते आपणच जुन्या बाजारात नेऊन विकावे व त्या पैशांनी नाटक व सिनेमा पाहून घ्यावीत ! आपणास या लहान व क्षुद्र गोष्टी वाटतात. परंतु या बारीक गोष्टींनीच राष्ट्रीय चारित्र्य बनत असते. जो बारीकसारीक व्यवहारात विश्वासार्ह नाही, तो मोठ्या व्यवहारात तरी कसा राहील ? विश्वासभंगासारखे पाप नाही. वचनभंगासारखा दोष नाही, ह्या भरतभूमीत वचन पाळण्याचे महत्त्व सांगण्याची जरुरी पडावी का? हरिश्चंद्र व रामचंद्र यांच्या या भूमीत ‘विश्वासार्ह बना’असे उपदेशण्याची पाळी यावी का ?


   

पुढे जाण्यासाठी .......