घनाचे भाषण सारी जनता ऐकत होती. प्रचंडच होती ती सभा. ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या ओव्या, अभंग घेऊन तो सांगत होता. त्यांना ते समजत होते. त्यांना ते अनोळखी विदेशी भारूड नाही वाटले; आणि “सुंदरपूरला संप झाला तर तुम्ही कामगारांना सहानुभूती दाखवणार की नाही? आपल्या भावाच्या तोंडातील भाकर काढून घेण्यासाठी तुम्ही नाही ना गिरणीत भरती होणार? बोला. कामगारांबद्दल सहानुभूती असेल तर हात वर करा.” असे त्याने म्हणताच हजारो हात वर झाले. शेकडो मायभगिनींनी हात वर केले.
घनाला आनंद झाला. राष्ट्रगीत होऊन सभा संपली. लोक घरोघर गेले, गावोगाव गेले. घनाची मोटार दुस-या गावाला गेली. असा प्रचार झाला.
त्या दिवशी सुंदरपूरला प्रचंड सभा झाली. आधी गावभर पलित्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. घोषणा होत होत्या. जयजयकार होत होते. ‘पगारवाढ ताबडतोब!’ हा आवाज सर्वत्र घुमत होता. प्रचारामुळे सभेला तुफान गर्दी झाली होती. वातावरण प्रक्षुब्ध होते. हे जागृत कामगार काय करतील कोणाला ठाऊक, असे सर्वांना वाटत होते. परंतु सर्वत्र शांती होती. आज सभेत पंढरीने एक सुंदर गाणे म्हटले:
समाजवादी आम्ही आहो वैषम्याचे वैरी
वैषम्याचे जहर झोंबतो अमुच्या या जिव्हारी
मानव्याचे अम्ही पुजारी मानवतेचे भक्त
मानवतेच्या महिम्यासाठी सांडू अपुले रक्त
धनधान्याचा कोण विधाता कोण तयांचा स्वामी
श्रमणा-यांचा आधी त्यावर हक्क, गर्जतो आम्ही
खरा धर्म हा, खरा न्याय हा, यास्तव आम्ही लढतो
यास्तव आम्ही लढता लढता प्राणहि अपुले देतो
सकळांचे संसार सुखाचे करणे, अमुचा धर्म
या धर्मास्तव निशिदिनि अमुचे चाले संतत कर्म
श्रमणा-यांना सुखी कराया अमुचे हे उद्योग
गीतेमधला आचरीतसो उदात्त गंभिर योग
भारतात या मोकळेपणे समाजवादी रचना
आज ना उद्या आणुच ऐशा मनी पूजितो स्वप्ना
या बंधूंनो, या भगिनांनो, करावया सहकार
उदात्त ध्येया, उदात्त धर्मा, करावया साकार
जीवनास या जाचक बोचक तोडु बंधने सारी
सौख्याचे माहेर करू ही भारतभूमी प्यारी
समाजवादी आम्ही आहो वैषम्याचे वैरी
वैषम्याचे जहर झोंबतो अमुच्या या जिव्हारी
गीता ज्या सर्व धर्मांना सोडायला सांगते ते कोणते धर्म? मी मोठा, मी उच्च कुळातला, माझीच जात श्रेष्ठ, माझाच धर्म श्रेष्ठ, माझेच राष्ट्र श्रेष्ठ—असले सतराशे अहंकारी धर्म गीता फेकायला सांगते. सर्व कर्माला एकच कसोटी भगवान गोपालकृष्ण लावायला सांगतात. मी करीत आहे ते देवाला आवडेल का, ही ती कसोटी. ही कसोटी लावून कर्मे तपासा. गरिबांसाठी घरे नसताना मंदिरे बांधणे देवाला आवडेल का? जीवंत माणसात का परमात्मा नाही? तो का केवळ पाषाणात आहे? आईच्या लेकरांना उपाशी ठेवून आईला पंचपक्वान्ने वाढाल तर ते आईला आवडेल का? त्याप्रमाणे देवाची कोट्यावधी लेकरे अन्नहीन, वस्त्रहीन, गृहहीन, ज्ञानविज्ञानहीन, सुखहीन, आनंदहीन, विश्रांतीहीन अशी ठेवाल व देवाला मात्र हार-तुरे वहात बसाल, त्याला हिरामोत्यांनी नटवीत बसाल, तर ते त्या जगन्मातेला आवडेल का? आम्ही ख-या धर्माचे उपासक आहोत. प्रभूच्या समोर सरळ मान ठेवून आम्ही उभे राहू शकू.”
घना जणू सारे अंतरंग ओतीत होता. त्याचा समाजवाद मानवी मूल्यांची पूजा करणारा होता. “ज्या समाजात मानवाची मान खाली आहे तेथे कोठला धर्म, कोठली संस्कृती? दुस-याचा विचार करायला हृदयाला शिकवणे यात धर्माचा आरंभ आहे. ही वृत्ती वाढून संत वसुधैवकुटुंबक होतात. ते खरे मानवाचे कैवारी. ग्यानबा तुकाराम असाच आवाज सर्वत्र घुमतो. कारण ज्ञानेश्वर व तुकाराम यांनी सर्व प्राणीमात्र सुखी व्हावेत असे इच्छिले. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ ही ज्ञानेश्वरांची थोर इच्छा.”
घना म्हणाला, “ज्ञानेश्वरांचे ते स्वप्न सत्यसृष्टीत येण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. समाजवाद म्हणजे प्रत्यक्षात आलेला वेदान्त. आम्ही मारून मुटकून काही करू इच्छित नाही. लोकांत प्रचार करून त्यांना पटवून सारे काही करू इच्छितो. हाच माझा वैदिक धर्म. वेद म्हणजे ज्ञान. ज्ञानावर, विचारावर श्रद्धा ठेवून आम्ही जातो. माझेच म्हणणे मान्य कर, नाही तर उडवतो मुंडके, अशी दहशतवादी अत्याचारी हुकूमशाही वृत्ती आमची नाही.या देशातील परसत्ता गेल्यावर कधी काळी आम्ही समाजवाद आणलाच तर तो जनतेला पटवून आणू. आम्ही मानवी प्राण पवित्र मानतो. सारे जीवन पवित्र मानतो. तुम्ही धर्म धर्म म्हणणारेच मानवी जीवनाची विटंबना करीत असता. कोट्यावधी हरिजनांना दूर ठेवलेत. हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवीत असता. धर्मांना देणग्या देणारे इकडे कामगारांच्या जीवनाकडे ढुंकूनही बघत नाहीत. हा का धर्म? ही का संस्कृती? ही का मानवता? हे का जीवनाचे, जीवमात्राविषयीचे प्रेम?”