मंगळवार, एप्रिल 20, 2021
   
Text Size

गोड निबंध - २

युरोप-अमेरिकेंतील लोकांना रोमन रोलंड हे दिव्य संदेश सांगणा-या देवदूतासारखे वाटतात,  त्यांचे वय ६५ वर्षांचे आहे.  या त्यांच्या आयुष्यांत त्यांनी अनेक युध्दप्रसंग पाहिले आहेत.  अगदीं लहानपणापासून युध्द म्हटलें कीं त्यांच्या अंगावर कांटा उभा राहत असे.  एक भयंकर युध्द होणार आणि त्यांत लक्षावधि लोक मृत्युमुखीं पडणार अशीं त्यांना पूर्वीपासून स्वप्नें पडत असत.  त्यामुळें त्यांचे बाळपणाचे दिवस देखील या चिंतेतच गेले.  आपल्या ग्रंथातून त्यांनी भावी युध्दाची आगाऊच सूचना दिली होती ; या युध्दापासून अलिप्त रहा असा इषाराहि दिला होता;  परंतु संपत्तीच्या मदानें आणि ऐश्वर्यानें धुंद झालेल्या युरोपनें त्यांचा संदेश नीट ऐकला नाहीं;  आणि म्हणूनच १९१४ सालीं जर्मनी आणि फ्रान्स यांचेमध्यें गेलें महायुध्द सुरू झालें आणि या युध्दाचा वणवा युरोपांत किंबहुना सर्व जगांत पेटणार हें पाहून त्यांचा विश्वावर प्रेम करणारा मृदु आत्मा करपून गेला.  जर्मन, फ्रेंच, इंग्लिश इत्यादि एकाच संस्कृतीच्या लोकांनी परस्परांचे प्राण घ्यावयास उद्युक्त व्हावें हें आश्चर्य नव्हे काय?  मग जगाचा ऊध्दार कसा होईल?  जगांत विश्वबंधुत्व नांदावें हें आपलें ध्येय -- ज्याच्या प्रसाराकरतां आपण आजपर्यंत प्रयत्न केला--तें सर्व थोतांड म्हणून टांकून द्यावें काय असा क्षणभर त्यांच्या मनांत व्यामोह ऊत्पन्न झाला.  परन्तु ते मोठें आशावादी आहेत.  त्यांच्या ध्येयवादित्वाला एवढा अकल्पित धक्का बसला तरी मनुष्याच्या सत्प्रवृत्तीविषयीं त्यांची श्रध्दा अढळच राहिली.  विश्वबंधुत्व हें जगांतून पार मेलें नाहीं;  फार तर त्याला तात्पुरतें ग्रहण लागलें असें म्हणता येईल.  परन्तु लवकरच हें ग्रहण सुटेल आणि सर्व लोक बंधुभावानें पुन्हां नांदूं लागतील असा त्यांचा दांडगा विश्वास होता.  आपल्या मातृभूमीबद्दल-फ्रान्सबद्दल- त्यांच्या ठिकाणीं अकृत्रिम प्रेम असलें तरी तिच्याकरितां जर्मनीचा द्वेष करणें आणि त्याच्याविरुध्द सुध्दां युध्दाकरितां सज्ज होणें पाप आहे असें त्यांस वाटत होंते म्हणून शेवटपर्यंत ते शंतिवादीच आहेत.  आणि त्याकरिता लोकनिंदाहि त्यांनीं सहन केली.  युध्द समाप्तीनंतर जिज आणि जेते असा भेदभाव न करितां तह करा आणि बंधुत्वाचा प्रसार करा असा जाहीरनामा त्यांनी काढला.  दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या जाहीरनाम्याला मान दिला असता तर जेते व जित अशीं सर्वच राष्ट्रें आजच्यासारखीं डबघाईला आलीं नसती.

सन १९१४ सालापूर्वी रोमन रोलंड यांची फ्रान्समध्येंहि फारशी प्रसिध्दी नव्हती.  पॅरिसमधील नॉर्मल स्कूलमध्यें लेक्चररचें काम करावें आणि फावल्या वेळांत ग्रंथलेखन करावें हा त्यांचा व्यवसाय होता.  त्यांना पैशाची किंवा कीर्तीची हांव नव्हती.  लोकांत फारसें न मिसळतां एका बाजूला राहून आपला ग्रंथलेखनाचा उद्योग चालवावा एवढाच त्यांचा हेतु होता.  लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती.  प्रत्यक्ष त्यांच्या मातेंनें त्यांना संगीताचे धडे दिले होते.  संगीत आणि ललित कला यांविषयींचे सामान्य लोकांचे औदासिन्य पाहून त्यांना अत्यंत हळहळ वाटत असे.  लोकांमध्यें संगीत आणि ललित कला यांविषयीं अभिरुचि वाढविण्यांकरितां त्यांचे अहर्निश प्रयत्न चालू होते.  त्याकरीतां त्यांनी बरेचसें ग्रंथहि लिहिले आहेत.  राजकारणांतहि त्यांनी थोडासा भाग घेण्याचा प्रयत्न केला.  परंतु राजकारण कुटिल नीतीनें भरलें आहे, असे आढळून आल्याबरोबर त्यांनी त्यांतून आपलें अंग काढून घेतले.

 

३३ दोन महात्म्यांची भेट

गोलमेज परिषद आटोपल्यानंतर महात्मा गांधींना युरोपमध्यें थांबण्याची इच्छा नव्हती.  तडक त्याच पावलीं परत हिंदुस्थानांत यावें असें त्यांचें ठरलें होतें.  जर्मनी, फ्रान्स इत्यादि देशांतील अनेक मोठ्या आणि प्रसिध्द लोकांनी अत्यंत आग्रहाचीं आणि प्रेमाचीं बोलावणीं केलीं होतीं.  त्या सर्वांचा महात्मा गांधींनी मोठ्या कष्टानें अव्हेर केला.  रोमन रोलंड यांच्या निमंत्रणाला मात्र त्यांना नाहीं म्हणतां येईना.  त्यांना भेटण्याकरिता महात्मा गांधीं मुद्दाम स्वित्झर्लंडमध्यें गेले.

रोमन रोलंड हे फार मोठे गृहस्थ आहेत आणि महात्माजींनी हिंदुस्थानांत जें कार्य चालविलें आहे, त्याचाच प्रकार रोमन रोलंड हे युरोप-अमेरिकेमध्यें करतात.  अशा माणसाच्या शब्दाला नकार देणें महात्मा गांधींना जड गेलें हें उघडच आहे.  कदाचित् रोमन रोलंड आणि आपली गांठ पडल्यानें जगांतील कलह थोडे तरी कमी होण्याचा संभव आहे, अशी महात्माजींना आशाहि वाटली असेल!  स्वित्झर्लंडसारख्या सृष्टिसौंदर्यानें फुलून गेलेल्या देशांत या दोन महात्म्यांची -- एक पूर्वेचा आणि दुसरा पश्चिमेचा -- भेट म्हणजे समसमांचा संयोग होय.  ' पूर्व ती पूर्व आणि पश्चिम ती पश्चिम;  दोघांचा संयोग कधींहि होणार नाहीं. '  असे उद्गार मदोन्मत्त झालेल्या किपलिंग या इंग्लिश ग्रंथकारानें काढलेले आहेत.  रोमन रोलंड आणि महात्मा गांधी हे अशी कांही अपूर्व घटना घडवून आणतील कीं पूर्व आणि पश्चिम यांचाहि मिलाफ होईल!

गांधी आणि रोलंड या दोन महात्म्यांची भेट झाली तरी राष्ट्राराष्ट्रांमधील वैरें कशीं शमतील, जगांत शांतता कशी नांदेल याचा विचार करण्यांकरितां कोणीहि जमत नाहींत.  परन्तु सध्यां जगाला युध्दाची धडकी भरली आहे, आणि शांततेची दृढतर उत्कंठा लागली आहे.  पुन्हां युध्दाची धुमश्चक्री सुरू झाली तर संबंध मनुष्य जातच रसातळाला जाईल अशी अनेक लोकांना भीति पडली आहे.  या दोन महात्म्यांची भेट होऊन जगाची ही भीति थोडीशी तरी कमी होईल काय? जगांत विश्वबंधुत्व पसरावें, सगळया लोकांनी गुण्यागोविंदाने रहावे; सुधारलेले, मागासलेले, पाश्चात्य, पौरस्त्य, इत्यादि सर्व लोकांचा सारखाच उत्कर्ष व्हावा हें दोघांच्या आयुष्याचें ध्येय आहे.  जगाला द्वेष, कलह, युध्दें यांची कीड लागली आहे;  म्हणून सृष्टि इतकी सुंदर आणि समृध्द असूनहि लोकांना आपत्तीमध्यें दिवस कंठावे लागत आहेत.  सत्य आणि अहिंसा यांचे साम्राज्य सर्वत्र पसरलें तर सुख आणि समृध्दि यांची कोणालाहि वाण पडणार नाहीं हा दिव्य संदेश दोघांनाहि सांगावयाचा आहे.

महात्मे हे कोणत्याहि एका देशाचे नसतात.  त्यांच्यावर सगळया जगाची सत्ता असते.  सगळे देश आणि काळ यांच्याकरितां त्यांचा संदेश असतो.  रोमन रोलंड हे फ्रेंच असले आणि महात्मा गांधी हे हिंदी असले तरी जगांतील २०० कोटि लोकांचे डोळे आपल्या उध्दाराकरितां त्यांच्याकडे लागले आहेत.  महात्मा गांधींचे चरित्र सर्वांना अवगत आहेच. म्हणून रोमन रोलंड यांच्याविषयीं थोडी माहिती खालीं देतों.

 

हे दृश्य दाखवून एल्फिन्स्टन म्हणाला, ' बाबासाहेब, तुमची राज्यें नष्ट होण्यास आणि आमचीं स्थापित होण्यास मुख्य कारण काय हें तुमच्या लक्षांत आलेंच असेल.  अंमलदाराचा हुकूम आमचे शिपाई प्राण गेला तरी पाळतात, परन्तु तुमचे लोक पळतात.'

वरील गोष्ट खोटी आहे काय?  आम्ही युरोपियन लोकांप्रमाणे शिकलेलें सैन्य ठेवूं लागलों, तर ती शिस्त आपल्या सैन्यांत मुरली नव्हती.  मैदानी लढायांची आमच्या लोकांस तितकी संवय नसे.  शिपायांनी जागा न सोडणें हा मैदानी लढयांतील महत्त्वाचा भाग असतो.  समोरासमोरच्या लढाईत सैन्य बेशिस्त झालें कीं, पराजय झालाच.   अहमदशहा अब्दालीनें त्यांचे सैन्य जेव्हा पळूं लागलें, तेव्हां त्या पळणारांची मुंडकीं मारण्याचा हुकूम केला.  कारण एक पळूं लागला कीं सारे पळूं लागतात.  पहिल्या बाजीरावानें वसईच्या हल्ल्याच्या वेळीं एका पत्रांत लिहिले आहें, 'जे मागें फिरतील त्यांची डोकीं परिच्छिन्नपणें मारावी .'  सैन्य माघारी न वळणें हें लढाईतील विजयाचें मोठें साधन आहे.

नेपोलियन आपल्या जयाची किल्ली सांगतांना म्हणतो, ' शत्रुपक्षाची चलबिचल झाली आहे, असें मला दिसतांच मी त्यांच्यावर शिलकी सैन्यानें जोराचा हल्ला करीत असें. '  अशी चलबिचल उत्पन्न होऊं न देणें हें मुख्य काम आहे.  सैन्य पळूं लागल्यानें ही चलबिचल उत्पन्न होते.

वाटर्लू येथे १८१५ मध्यें इंग्लिश सैन्याचा तळ पडला होता.  जर्मन सैन्याची वेळेवर मदत होण्याचें चिन्ह दिसेना.  फ्रेंच तर चवताळून आले होते.  फ्रेंचांच्या जोरदार हल्ल्यांसमोर आपला टिकाव कसा लागेल याची वेलिंग्टन या इंग्रजी सेनापतीस धास्ती होती.

वेलिंग्टन घोडयावर बसून आपल्या शिपायांच्या रांगांतून हिंडला व म्हणाला, 'माझ्या शिपायांनो, धीर सोडूं नका, जाग्यावरून हलूं नका.  आपणांस इंग्लंडातील लोक काय म्हणतील याचा विचार करा.'  ते शिपायी वेलिंग्टन यास म्हणाले, 'महाराज, आपण तिळमात्र काळजी करूं नका ; आमचें कर्तव्य आम्ही जाणतों, तें आम्ही नीट पार पाडूं. '  तें कर्तव्य म्हणजे कोणतें, तर सेनापतीनें सांगितल्याप्रमाणें वागणें.  नेपोलियननें जर्मन मदत इंग्रजांस येऊन मिळण्यापूर्वी निकराचे हल्ले केले.  परन्तु इंग्रज सैन्य मागें गेलें नाहीं ; इंग्रजांची फळी फोडतां आली नाहीं.  शेवटी सायंकाळी चारचे सुमारास जर्मन मदत आली व इंग्रज विजयी झाले.

आपलें सैन्य गैरशिस्त, सेनापति कमी दर्जाचे, शस्त्रास्त्रें हिणकस, आणि फंदफितुरी व ऐक्याचा अभाव, इत्यादि कारणसमूहांचा परिणाम म्हणजे आपली राज्यें जाणें व इंग्लिशांचे राज्य होणें  होय!  आपणांस शिस्त, आज्ञाधारकपणा व ऐक्य या सद्गुणांचे नीट संवर्धन केल्याशिवाय स्वराज्य कसें मिळेल, मिळालें तरी कसें राखता येईल?

   

३२ आपलीं राज्यें गेलीं व इंग्रजांचें कसें आलें?

[बालबोध मासिकांत पुष्कळ वर्षापूर्वी कै. ओक यांनी पुढील आंग्रे यांची गोष्ट दिली होती, तिचा मी उपयोग केला आहे.]

जगांतील कोणत्याहि व्यवहाराचा तुम्हीं विचार करा तुम्हांला असें आढळून येईल कीं, कारणांवाचून कोणतेहि कार्य घडत नसतें.  पुष्कळ वेळां कार्य स्पष्टपणे दिसतें, परन्तु कारण मात्र चटकन् ध्यानांत येत नाहीं.  परन्तु यावरून त्या कार्यास कारणच नाहीं असें म्हणणें चुकींचे होईल.  ज्याप्रमाणे एखादा मुलगा आजारी पडता म्हणजे तो म्हणतो ' कां बोवा आजारी पडलों कांहीं समजत नाहीं. '  परंतु हळुहळू अनेंक कारणें जमत आलेलीं असतात, हें त्यास कोठें माहित होतें?  कधीं जागरण केलें असेल, कधी ऊणें अधिक खाल्ले असेल, कधीं उन्हांतून येतांच पाणी प्यायला असेल.  या सर्व कारणांचा संमिश्र परिणाम म्हणजे तो आजार.  प्रत्येक गोष्टीस पूर्वेतिहास आहे.  हा इतिहास शोधावा, हीं कारणें शोधावीं व तीं दूर करावीं.  उगीच दैवावर ढकलूं नये.  दैवाचा अर्थ हाच कीं अज्ञान व अदृश्य अशा कारणांची मालिका.

आम्हीं लोक या देशांतले.  येथें आमचीं मोठमोठीं राज्यें होती. आम्हीं म्हणू ती पूर्व दिशा पूर्वी येथे होती;  ती राज्यें कोठें गेली?  आज सर्व हिंदुस्थानचा नकाशा तांबडा झाला आहे.  याची कारणें काय?  सातां समुद्रांपलीकडून येणा-या मूठभर लोकांच्या हातीं आम्ही गेलों कसे?  आम्हीं राजे होतो, आतां गुलाम झालों.  दुस-यास पाणी पाजणारे आम्हीं होतो;  आज दुस-याच्या ओंजळीनें पाणी पिणारे झालों आहोत.  केवढा हा चमत्कार आहे !  परन्तु या चमत्कारास कारणें नसतील का?  आहेत तर.

एकदां अलिबागेस आंग्रे ह्यांच्या वाड्यांच्या तिस-या मजल्याच्या खिडकीमध्यें बाबाजीं आंग्रे व एल्फिन्स्टन साहेब उभे राहून गोष्टी करीत होते.  खाली वाळवंटात उभय पक्षांची सैन्यें होती.  आंग्रे ह्यांचा समुद्रात किल्ला आहे.  ओहटीच्या वेळेस किल्ल्याजवळचें पाणी अगदीं कमी होतें.

राजकारणाच्या गोष्टी चालल्या होत्या.  बोलतां बोलतां बाबाजी आंग्रे यांनी एल्फिन्स्टन यांस विचारलें  'आमच्या देशांतील आमचीं स्वत:ची राज्यें नष्ट व्हावींत आणि त्यांच्या जागीं तुम्हा परकीयांची स्थापन व्हावीत असें होण्यांत तुम्हां-आम्हांत कमी. जास्त काय आहे?'

एल्फिन्स्टन म्हणाला  ' कमी जास्त काय आहे तें दाखवतों.  हीं आपलीं सैन्यें खाली उभीं आहेत.  थोड्याच वेळानें भरती येऊं लागेल.  या उभय सैन्यांस आपण तेथें उभें राहण्याविषयीं हुकूम करूं या आणि काय चमत्कार होतो तो पहा. '

उभय सैन्यास त्याप्रमाणें हुकूम झाले.  भरती येऊं लागली व पाणी वाढूं लागलें.  आंग्-यांचे सैन्य मागें पळूं लागलें.  परन्तु इंग्लिशांचे छातीपर्यंत पाणी झालें तरी हललें नाहीं.

 

शिक्षणाच्या प्रसारार्थ आज आधीं संघ हवे आहेत.  अज्ञानरूपी शत्रूच्या किल्ल्यावर हल्ले चढवूं या.  हे हल्ले चढविण्यांस कोण पुढें येणार?  विद्यार्थी, तरुण विद्यार्थी हेंच राष्ट्राचे अरुण.  ह्या तरुण अरुणांना आज आव्हान आहे.  तरुणांनी अग्रेसर झालें पाहिजे.

सभोवतालच्या सामाजिक प्रश्नांचा विचार विद्यार्थ्यांनी नाहीं करावयाचा तर कोणी?  आपल्या राष्ट्रासाठीं काय केलें पाहिजे, आपली स्थिति कशी सुधारेल, लोकांत तेज व बळ कसें येईल, संसार कसा सुधारेल ह्याचा विचार तरुण विद्यार्थ्यांनी नको का करायला?

शहरांतील वा खेड्यांतील प्रौढ विद्यार्थ्यांनी आपल्या शहरांत वा खेड्यांत किती अशिक्षित आहेत याचा विचार करावा.  ते कोठें राहातात, कोठल्या गल्लीत राहतात ते पहावें.  त्यांना मग ज्ञानाची भाकर घेऊन जावे.  आपल्याच बंधु-भगिनींस आपण ज्ञानाच्या बाबतीत बुभुक्षित ठेवूं तर केवढा द्रोह! ज्या सवलतीं मला आहेत, जीं सुखे मला आहेत, त्यांत इतरांस भागीदार केव्हां करीन हा विचार नको का मनांत यावयास ?  आपल्या बांधवांसाठीं आपणांस कितीतरी गोष्टी करतां येतील परन्तु इच्छा हवीं; तळमळ हवी.

शक्याशक्यतेच्या शंका काढूं नका.  ज्यांना शाळेंत जातां येत नाहीं, शिक्षण घेण्याचीं साधनें ज्यांना नाहींत, अशांसाठीं निदान वर्षांत १२ तास देईन व शिकवीन अशी प्रतिज्ञा जर प्रत्येक प्रौढ विद्यार्थी करीत तर भारतीय विचारांत केवढी क्रांति होईल!  बारा धडे शिकविणें, तें का ओझें आहे? परन्तु शिकणा-यांना ती केवढी मदत!  हे बारा धडे कसलेहि चालतील.  तुम्हाला व्यायामाचे प्रकार येतील तर ते शिकवा;  चित्रकला येत असेल तर ती सांगा.  परन्तु लिहिंणे, वाचणें व अंकगणित ह्या तीन गोष्टीं लोकशिक्षणांत हव्या.  सर्वांत उत्कृष्ठ गोष्ट म्हणजे इतिहास, भूगोल शिकविणें.  भूगोलांने इतिहास घडतो.  इतिहास भूगोलाच्या गप्पा मारा;  तसेंच रोजच्या जीवनांतील शास्त्रीय गोष्टी समजूं द्या.

विचारांची थोडीशीहि पुंजी जवळ असेल तर जीवनाला कळा चढते.  जीवनाला नवरंग येतो.  एकादाच किरण परन्तु काळ्या ढगाला तो रमणीयत्व देतो!  एखादाच पेरलेला विचार, एखादेंच वाचलेलें वाक्य जीवनांत कसें वाढेल, कसें रुजेल, जीवनाला कसें गंभीर करील ह्याची कल्पना आपण कधीं केली आहे काय?  खरोखर ज्ञान हीच जीवनाची खरी भाकर आहे.  ह्या भाकरीशिवाय जीवनांत रुचि नाहीं, रंग नाहीं, राम नाहीं, ज्ञानाशिवाय जीवनाला तेज नाहीं, अर्थ नाही.  ज्ञानासारखें पवित्र कांहींहि नाही.  म्हणून स्वत:पाशीं जें कांही असेल, जें जें कांही उत्कृष्ठ  असेल, ते तें घेऊन आपल्या आजूबाजूच्या बंधुभगिनींस देण्यासाठी चला.  भारतीय मनोबुध्दि पडित आहे.  या भूमीस सुपीक करावयास चला.  ही देवाघरची शेती आहे.

युरोपखंडात सक्तीचें लष्करी शिक्षण असतें.  शिक्षण संपल्यावर ३ वर्षे लष्करी शिक्षण घ्यावेंच लागतें.  मग तो मोकळा होतो.  आपण सक्तींचे शिक्षण प्रसाराचें व्रत घेऊं या.  विद्यापीठानें एकेक वर्ष खेडयांत साक्षरताप्रसार केल्यावरच पदवीपत्र द्यावें.  परन्तु असे सक्तीचे कायदे करण्यांत काय अर्थ?  आपण प्रेमानें ही गोष्ट नाहीं का करणार?  आपल्या सहजस्फूर्तीने ही गोष्ट झाली पाहिजें.  साक्षरताप्रसाराचा महान् विचार निर्माण झाला आहे.  या विचारासाठीं किती जण आपलें सुखस्वास्थ्य बाजूस ठेवतात हा प्रश्न आहे.  विचारासाठीं, ध्येयासाठीं कोणत्या लायकीचीं किती माणसें खपलीं, झिजलीं, बळी गेलीं, या गोष्टीला शेवटी महत्त्व आहे.  जीवनें अर्पिल्याशिवाय कोणताहि विचार वाढत नाहीं.  भारतीय बंधु-भगिनींच्या शिक्षणासाठीं कितीजण सुखावर, स्वार्थावर, स्वास्थ्यावर पाणी सोडावयास तयार आहेत? बोला.

-- वर्ष २, अंक ६

   

पुढे जाण्यासाठी .......