गुरुवार, जानेवारी 23, 2020
   
Text Size

प्रकरण ३ : शोध

द्विविध जीवन

या अशा व अनेक प्रकारे मी हिंदुस्थानचे गतकालीन व वर्तमानकालीन यथार्थ स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न चालविला.  त्याकरता आज प्रत्यक्ष समोर वावरणार्‍या व पूर्वीच्या होऊन गेलेल्या व्यक्तींच्या विचारांचे, भावनांचे कल्लोळ नीट समजून घ्यावे म्हणून मी मनाने त्या त्या व्यक्तीशी तद्रूप होत होतो.  त्या व्यक्तींची अखंड रांगच्या रांग माझ्यापुढे होती व या रांगेत शेवटी शेवटी मीही धडपडत चाललो होतो व या रांगेशी, परंपरेशी एकरूप व्हावयाचा माझा प्रयत्न चालला होता.  मधूनच एखादेवेळी मी या रांगेतून निघून प्रेक्षक म्हणून डोंगरावरून दरीतले दृश्य पाहावे तसा पाहात होतो.

ह्या लांबच्या प्रवासाचा हेतू काय ?  ही कधीही न थांबणारी रांग थांबणार कोठे ?  हे विचार मनात सारखे येऊन मला थकवा येई व निराश होऊन हा खटाटोप व्यर्थ वाटे.  अशा वेळी या वृत्तीतून सुटण्याकरिता मी एक प्रकारची त्रयस्थ वृत्ती अंगी बाणण्याचा प्रयत्न करी.  हळूहळू माझ्या मनाला हे वळण लागून मन घट्ट झाले, व व्यक्तिश: मला किंवा माझे काय होणार या विचाराला मी अगदी काडीचीसुध्दा किंमत देईनासा झालो.  निदान असे मला तरी वाटू लागले, व काही अंशी खरेच असे वाटू लागले की हे आपल्याला साधले !  पण ते काही फारसे खरे नाही, कारण माझा स्वभाव ज्वालामुखीसारखा आतल्याआत इतका खळबळ करतो की, ही खरोखरी त्रयस्थवृत्ती काही जमत नाही व एकदम एखादेवेळी ही सर्व बंधने तटातट तुटून लांब उडून पडतात व माझी अनासक्तवृत्ती पार कुठल्याकुठे नाहीशी होते.

परंतु जे काही थोडे यश अशी वृत्ती मिळविण्यात मला आले होते त्याचाही फार उपयोग होई; आणि कर्माच्या भोवर्‍यात पडलो असताही त्या कार्मापासून स्वत:ला अलग करून त्रयस्थवृत्तीने मी बघू शकत असे.  कधीकधी माझे रोजचे सारे उद्योग, सारी चिंता विसरून घटका दोन घटका मी मनाच्या त्या अंतर्गाभार्‍यात जाऊन बसत असे आणि थोडा वेळ का होईना एक निराळेच जीवन अनुभवीत असे.  अशा रीतीने माझे हे जीवनाचे दोन भाग एकमेकांत पक्के गुंतलेले पण खरोखर वेगवेगळे राहून जीवनमार्ग कंठीत होते.

 

बहुजनसमाजाची संस्कृती

अशा रीतीने आजच्या भारतीय जनतेचे चालू नाटक मी पाहिले.  त्यातल्या पात्रांची दृष्टी भविष्यकाळाकडे गेलेली असतानासुध्दा त्यांचे जीवन भूतकालाशी जोडून ठेवणारे धागे मला केव्हा केव्हा आढळून येत.  त्यांच्या जीवनावर अपरंपार परिणाम करणारी सांस्कृतिक पार्श्वभूमीही सर्वत्र मला आढळून आली.  ती 'दंतकथा, परंपरा, इतिहास, पुराणे, सोपे तत्त्वज्ञान या सर्वांचे मिळून एक मिश्रण होते व ते असे एकजीव झालेले होते की त्यातले एक संपून दुसरे कोठे सुरू झाले ते कळणे शक्य नसे.  अशिक्षित व निरक्षर मनुष्याच्या वाट्याला हीच पार्श्वभूमी आलेली होती.  सर्वसामान्य जनतेला रामायण, महाभारत व इतर प्राचीन ग्रंथांची भाषांतरातून व इतर तर्‍हेने खूप माहिती असे व त्यांतले एकूणएक ठळक प्रसंग, कथा व तात्पर्य यांच्या मनावर इतके ठसलेले होते की त्यामुळे त्यांचे मन सुसंस्कृत होऊन त्यांच्या विचाराला भरीवपणा आलेला होता.  त्यांची मनोभूमी पडीत नव्हती, हृदय रिते नव्हते.  खेड्यातील अशिक्षित लोकांना शेकडो कविता तोंडपाठ असत.  त्यांच्या बोलण्यात ही काव्ये, सुभाषिते, हे चरण पदोपदी येत.  किंवा कधी जुनी पौराणिक गोष्ट येई, तिच्यात एखादे सुंदर नीतितत्त्व गुंफलेले असे.  एखादवेळेस एखाद्या खेड्यात मी आजकालच्या गोष्टींवर बोलत असताना जमलेली मंडळी सगळ्या बोलण्याला अशा पौराणिक कथांनी अशी एक निराळी कलाटणी देत की, त्याचे मला आश्चर्य वाटे.  माझ्या लक्षात असे येई की, माझ्या डोळ्यांपुढे जशी इतिहास ग्रंथात येणारी प्रत्यक्ष घडलेली म्हणून ठरलेली भूतकाळची चित्रे येत, तशी निरक्षर शेतकर्‍यांच्या डोळ्यांपुढेही काही भूतकालची चित्रे येत.  त्यांची ती चित्रे, दंतकथा, परंपरागत गोष्टी किंवा पुराणातले प्राचीन वीर किंवा सतींची असत.  त्यात ऐतिहासिक असा फार थोडा भाग असे.  परंतु निदान त्यांच्या बुध्दीला तरी ती अगदी खरी म्हणून पटलेली होती.

त्या जमलेल्या लोकांचे चेहरे, बांधा व शरीराची हालचाल पाहिली तर कितीतरी मनमोकळे चेहरे व घाटदार, ताठ, मजबूत बांधे दिसत; कितीतरी स्त्रिया मला सुंदर, सडसडीत, तरळ, रूबाबदार वाटत. क्वचित एखादी अगदी उदास दिसे.  वरच्या वर्गातील लोकांमध्ये बहुधा सुंदर शरीरांचे नमुने अधिक दिसत.  कारण आर्थिक दृष्ट्या ते किंचित बरे असत.  कधी कधी एखाद्या खेडेगावातून किंवा जवळच्या रस्त्यातून जात असताना असा एखादा सुंदर पुरुष, एखादी सुंदर बाई दृष्टीस पडे की, मला एक आश्चर्याचा धक्का बसून प्राचीन लेण्यांतील नमुन्यांची आठवण होई. शेकडो वर्षे ह्या देशात किती भयानक प्रसंग आले, किती हलाखीची परिस्थिती आली तरी त्या सर्व प्रसंगांतून पिढ्यान् पिढ्या टिकाव धरून हा नमुना कायम कसा राहिला याचे मला आश्चर्य वाटे, आणि मनात येई की काळ चांगला आला व या लोकांना सुधारायला जास्त वाव मिळाला तर अशा लोकांच्या हातून काय करून दाखविता येणार नाही ?

जिकडे तिकडे दारिद्र्य दिसे आणि त्यामुळे पाठोपाठ आलेली शेकडो दैन्ये दु:खे दिसत.  प्रत्येकाच्या कपाळावर हा दारिद्र्याचा शाप लिहिलेला दिसे.  सारे जीवन चिरडून विद्रूप झाले होते; जगणे म्हणजे एक संकट झाले होते व ह्या वेडेवाकडेपणामुळे, त्या कायम हालाखीमुळे, ह्या रोजच्या चिंतेमुळे कितीतरी दुर्गुणांचे पाझर जिकडे तिकडे वहात होते.  हे सगळे पाहिले की जीव उबगे; पण स्पष्ट खरे पाहू गेले तर हीच हिंदुस्थानची यथार्थ वस्तुस्थिती होती.  जे नशिबात आले ते मुकाट्याने भोगावे अशी आगतिक शरणागतीची वृत्ती फार बोकाळली होती.  परंतु हजारो वर्षांच्या या प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून जो एक सौम्यपणा, शांतपणा, लोकांच्या अंगी बाणला होता तो कसल्याही संकटांनी घासले तरी पुसून जाण्यासारखा नव्हता.

 

उमेदवारांच्या नावे मी क्वचितच उल्लेख करीत असे.  आम्ही उभे केलेले उमेदवार म्हणजे आमच्या ध्येयाचे निशाण धरणारे याहून काही अधिक अर्थ नाही असे मी सांगत असे.  माझा प्रचार विचारात्मक असे, ध्येयाच्या भूमिकेवरून असे.  मतदारांच्या मनोबुध्दीला मी जागृत करू बघत असे.  ते हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला व त्याकरता कराव्या लागणार्‍या संग्रामाला म्हणून मागत असे.  मी इतर वचने देत नसे, फक्त स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्ही सारखे लढत राहू एवढे एकच अभिवचन मी देत असे.  आमचे ध्येय, आमचा कार्यक्रम पसंत असेल, व त्याप्रमाणे वागण्याची तयारी असेल तरच मत द्या व त्याप्रमाणे आम्ही वागू ही खात्री ठेवा; काँग्रेसचे ध्येय, कार्यक्रम यांच्यावर श्रध्दा नसेल, या गोष्टी पटत नसतील तर मते देऊ नका असे मी स्पष्ट सांगत असे.  आम्हांला खोटी मते किंवा उमेदवार व्यक्तिश: आवडतो म्हणून मते नको होती.  मते व निवडणुकी यांचा पल्ला ध्येयाच्या लांबच्या प्रवासातल्या चार पावलांइतकाच होतो.  मत देणे याचा अर्थ काय व त्यामुळे पुढचा ठरेल तो कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी किती हे नीट समजावून घेतल्याशिवाय आम्हाला मते देणे म्हणजे आम्हाला फसवणे व देशाचा विश्वासघात करणे होय.  आमच्या पक्षाचे उमेदवार चांगले व प्रामाणिक तर पाहिजेतच, पण उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा ध्येयाला, ते ध्येय असलेल्या संस्थेला व ती संस्था ज्याच्या स्वातंत्र्याकरता झटत होती त्या राष्ट्राला जास्त महत्त्व दिले पाहिजे.  त्या स्वातंत्र्यातील अर्थ मतदारांना मी समजावून सांगत असे.  गोरी नोकरशाही जाऊन तेथे काळी येणे म्हणजे स्वराज्य नव्हे; सत्ता लोकांच्या हाती येणे; ती सत्ता लोकांनी लोकांच्यासाठी चालविणे; दारिद्र्य, दैन्य, दु:ख, उपासमार नष्ट होणे म्हणजे स्वराज्य असे मी सांगत असे.

माझ्या भाषणांचा हा रोख असे.  त्या निवडणुकीच्या दौर्‍यात अशा व्यक्तिनिरपेक्ष रीतीनेच मी समरस होऊ शकत होतो.  हा उमेदवार यशस्वी होतो की नाही, त्या उमेदवाराचे काय हे विचार मला सतावीत नसत.  त्याचे मला फारसे महत्त्व वाटत नसे.  अमक्यातमक्याच्या निवडणुकीतील यशापेक्षा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर असे आणि एखाद्या उमेदवाराच्या यशाच्या दृष्टीनेही अशा उच्च भूमिकेवरून प्रचार करणे हेच योग्य होते.  कारण अशामुळे ती व्यक्ती व त्याची निवडणूक ही एकदम संकुचित वातावरणातून उच्च वातावरणात जात; दारिद्र्याचा सनातन शाप नष्ट करण्यासाठी धडपडणार्‍या कोट्यवधी लोकांशी त्या प्रश्नाचा संबंध येऊन जुळे; महान भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या भूमिकेवर ती व्यक्ती आणि त्याची निवडणूक येऊन पोचत.  अनेक प्रमुख काँग्रेसकार्यकर्ते या अशा विचारांचा सर्वत्र तुफानी प्रचार करीत हिंडत होते; समुद्रावरून जोरदार स्वच्छ वारे यावेत आणि वातावरण निर्मळ व्हावे तसे देशात झाले; निवडणुकीतील इतरांचे क्षुद्र प्रचार क्षुद्र विचार, नाना नीच हिकमती व थोतांडे— या सर्वांचा धुव्वा उडाला.  मी भारतीय जनतेला ओळखून होतो.  तिच्यावर माझे प्रेम होते व त्याच्या लाखो डोळ्यांनी बहुजनसमाजाचे मानसशास्त्र मला शिकविले होते.

सकाळपासून रात्रीपर्यंत दररोज निवडणुकीसंबंधी मी सारखा बोलत होतो.  परंतु या निवडणुकीत माझे लक्ष क्वचितच असे; निवडणुकीचा विचार मनात वरवर तरंगे.  केवळ मतदारांकडे माझे चित्त लागलेले नव्हते.  मतदारांची संख्या ज्याच्या पासंगालासुध्दा पुरणार नाही अशा एक विशाल वस्तूशी- भारतातील कोट्यवधी जनतेशी माझा निकट संबंध येऊ लागला होता व मला जो काही संदेश द्यावयाचा होता तो मतदार व शिवाय इतर प्रत्येक हिंदी स्त्री-पुरुष-मुलापावेतो पोचवावयाचा होता.  मोजणे शक्य नाही इतक्या असंख्य व्यक्तींचा प्रत्यक्ष देहाने व भावनेने जो मला परिचय होत होता तो एक अपूर्व चित्तक्षोभाचा अनुभव होता व त्यात मी रंगून गेलो; परंतु गर्दीत सापडले म्हणजे आपण जनसंमर्दात आहो, गर्दीतल्या अनेकांपैकी एक आहोत, व बरोबरच्या लोकांची जी लहर लागेल तीच आपली अशी त्या गर्दीची छाप माझ्यावर पडत नसे.  माझ्या डोळ्यांकडे त्यांचे डोळे लागत व आमची दृष्टिभेट झाली म्हणजे आम्हाला कोणी अनोळखी भेटले असे न वाटता सांगू म्हटले तरी भाषेतल्या शब्दांनी सांगता येणार नाही अशी काही अंतरीची खूण पटे.  मी हात जोडून त्यांना नमस्कार करताच हजारो हात वर होत व मलाही नमस्कार करीत.  त्यांच्या तोंडावर एक मित्र भेटल्याचा आनंद दिसे व त्या अफाट जनसंमर्दातून माझे शब्दांनी स्वागत करताना जो अस्पष्ट ध्वनी येई तो मला प्रेमाने मिठी मारतो आहे असे वाटे.  मी भाषण करी व मला जे सांगायचे होते ते सांगे.  पण माझे शब्द व त्यांचा अर्थ त्यांना कितपत कळेल याची मला शंका वाटे.  परंतु शब्दापलीकडचा काही खोल अर्थ त्यांना पटल्याचा प्रकाश त्यांच्या डोळ्यांत मला दिसे.

   

सर्वसाधारण निवडणुका

हिंदुस्थानभर लौकरच होणार्‍या निवडणुकीकरताच विशेषेकरून हा माझा दौरा होता.  परंतु त्याकरता प्रचार म्हणून नेहमी जे मार्ग व युक्त्या-प्रयुक्त्या वापरल्या जातात त्या मला पटत नसत.  लोकशाही प्रकारात निवडणुका हा एक महत्त्वाचा आवश्यक भाग आहे.  त्याशिवाय लोकशाहीला अर्थच नाही, व त्यावाचून गत्यंतर नाही.  परंतु पुष्कळ वेळा निवडणुकीच्या वेळीच मनुष्यस्वभावातल्या नीच वृत्तीला वाव मिळतो.  सर्वांत चांगला तोच प्रतिनिधी ठरावा हे या निवडणूक पध्दतीने साधत नाही हे स्पष्ट होते.  म्हणून स्वाभिमानी व जमेल त्या बर्‍यावाईट रीतीने स्वत:ची जाहिरात करायला नाखूष असलेले लोक यांना निवडणुकीची अडचण पडे व ते उभे राहण्याचे शक्य तर टाळीत.  मग लोकशाही म्हणजे कमावलेल्या कातडीसारखी वृत्ती, आरडोओरड करायला तयार आवाज व सोयीप्रमाणे खोटीखरी ठरविणारी बुध्दी बाळगून असलेल्या लोकांचे राखीव कुरण बनायचे की काय ? 

मतदारसंघ जेथे लहान असे तेथे निवडणुकीतील वाईट प्रकार अधिकच असत.  जेथे मतदारसंघ अधिक विस्तृत असे तेथे हे प्रकार फारसे दिसत नसत.  नाहीसे होत.  अर्थात प्रचंड मतदारसंघातील मतदारांना एखाद्या खोट्याच मुद्दयावर एकदम दुसर्‍या बाजूला ओढता येत असे.  धर्माच्याच नावाने पुकारा करून किंवा असेच काहीतरी थोतांड उभे करून मतांचा तोल भलत्याच पारड्यात पडल्याचे पुढे अनुभव आलेच.  परंतु उलट पारड्यातही काही गोष्टींचे वजन पडे, आणि त्यामुळे अधिक भ्रष्ट प्रकार टाळले जात.  मतदानाचा हक्क जास्तीत जास्त मोठा असावा,  जास्तीत जास्त जनतेस असावा या तत्त्वावर माझा विश्वास अनुभवाने दृढ झाला आहे.  स्थावर जंगम मिळकत किंवा शिक्षण यावरच लायकी ठरणार्‍या मर्यादित मतदारसंघापेक्षा प्रचंड मतदारसंघावर अधिक विश्वास ठेवायला मी तयार होतो.  मिळकतीवर अधिकार अवलंबून ठेवणे हे केव्हाही वाईट आहे.  शिक्षणावर अवलंबून ठेवणे योग्य आणि आवश्यकही आहे.  माझ्या अनुभवावरून मला असे आढळले की, जेमतेम अक्षरओळख किंवा अगदीच तुटपुंजे शिक्षण असलेल्या माणसांत असे काहीच विशेष ज्ञान नाही की, त्यामुळे त्याला अक्षरशत्रू परंतु थोडेसे व्यवहारज्ञान बाळगून असलेल्या भक्कम शेतकर्‍यापेक्षा मताच्या बाबतीत अधिक समजावा.  ते काही असो.  जेथे मुख्य प्रश्न शेतकर्‍यांचाच आहे तेथे त्याच्या मतालाच अधिक महत्त्व असायला हवे.  वयात आलेल्या सर्व सज्ञान माणसांना मताधिकार असावा असे माझे निश्चित मत आहे.  स्त्रिया आणि पुरुष उभयतांसही हा अधिकार असावा.  या मार्गात काही अडचणी असतील.  मला त्यांची कल्पना आहे.  परंतु आज तरी सार्वत्रिक मतदानाच्या बाबतीत जे आक्षेप घेण्यात येतात त्यांच्यात काही अर्थ नाही; ज्यांची मिरासदारी आहे, जे मालमत्तावाले आहेत अशांच्या भीतीवर ते आक्षेप उभारण्यात आले आहेत.

प्रांतिक विधिमंडळासाठी १९३७ मध्ये ज्या निवडणुका झाल्या; त्या निवडणुकांसाठी फारच मर्यादित मतदारसंघ होता.  लोकसंख्येपैकी शेकडा फक्त १२ लोकांना मताधिकार होता.  परंतु पूर्वीपेक्षा ही बरीच मोठी सुधारणा होती; मोठी वाढ होती.  त्यामुळे हिंदी संस्थाने वगळून जवळ जवळ तीन कोटी माणसांना मताधिकार मिळाला होता.  हिंदी संस्थाने वगळून सर्व हिंदुस्थानभर या निवडणुका व्हायच्या होत्या.  प्रत्येक प्रांताने आपले विधिमंडळ निवडायचे होते.  काही प्रांतांना वरिष्ठ व कनिष्ठ अशी दोन विधिमंडळे होती.  त्यांना दोन निवडणुका होत्या.  उमेदवारांची संख्या काही हजारांपर्यंत होती.

माझी आणि बहुतेक सर्वच राष्ट्रीय सभावाल्यांची या निवडणुकांबाबतची दृष्टी नेहमीच्या निवडणुकीतील दृष्टीपेक्षा निराळी होती.  उमेदवार कोण उभे आहेत त्यांच्याशी आम्हाला फारसे काही करायचे नव्हते.  उमेदवारांच्या नावे आम्ही प्रचार करीत नव्हतो.  मी तरी त्या बाबतींत उदासीन असे.  मला सर्वत्र राष्ट्रीय सभेविषयी प्रेम निर्माण करायचे होते.  राष्ट्रीय सभेने जी स्वातंत्र्याची चळवळ चालविली होती, तिचा जो निवडणूक जाहीरनामा होता त्याविषयी सर्व देशात मला अनुकूल वातावरण निर्माण करण्याची इच्छा होती. असे वातावरण निर्माण करण्यात जर आम्हाला यश मिळाले तर सारे काही मिळाले; आणि ते जर साधले नाही तर मग हा उमेदवार यशस्वी झाला किंवा नाही त्याचे मला काही महत्त्व नव्हते.

 

हिंदुस्थानातील प्रवास

१८३६ सालच्या अखेरीस आणि १९३७ सालच्या आरंभीच्या महिन्यांत माझ्या दौर्‍यांना प्रचंड वेग चढत जाता जाता अखेर सारे तुफानी काम सुरू झाले.  या अफाट देशभर एखाद्या झंझावाताप्रमाणे मी अहोरात्र सारखा प्रवास करताना क्वचित कोठे थांबत सारखा गरगर फिरत होतो.  मला सगळीकडून सारखी निकडीची बोलावणी येत, कारण निवडणुकीच्या तारखा जवळ आल्या होत्या व वेळ फार मोजका उरला होता व निवडणुक जिंकून देणारा अशी माझी ख्याती झाली होती.  बहुत करून मोटारने मी प्रवास करीत असे.  कधी विमानही वापरले; मधून मधून आगगाडी.  प्रसंगविशेष हत्ती, उंट, घोडे यांचाही उपयोग करावा लागला; परंतु फार थोडा वेळ, थोड्या अंतरापुरता.  आगबोट, नाव, होडी यांनाही मी वगळले नाही.  दुचाकीचाही क्वचित उपयोग केला.  काही मजल पायीही केली.  नेहमीच्या दळणवळणाच्या ठरलेल्या मार्गापासून दूरवर आजूबाजूला पडलेल्या ठिकणी जाण्याकरता चित्रविचित्र नानाविध वाहनांचा उपयोग करणे कधीकधी भाग पडे.  बरोबर ध्वनिक्षेपक दोन होते, कारण एक बिघडला तर दुसरा असावा; त्यांच्याशिवाय या विराट सभांतून मला बोलणे मुश्किलीचेच झाले असते, आणि त्यांच्याशिवाय माझा आवाज टिकलाही नसता.  ते ध्वनिक्षेपक माझ्यासमोर तिबेटच्या सरहद्दीपासून तो बलुचिस्थानच्या सीमेपर्यंत कुठल्या कुठल्या ठिकाणी फिरत होते.  तेथे तोपर्यंत असले यंत्र कोणी कधी पाहिले तर नव्हतेच, पण अशा यंत्राची कोणाला वार्तासुध्दा नव्हती.

पहाटेपासून तो रात्रीचे बारा वाजेपर्यंत मी एका ठिकाणाहून दुसरीकडे सारखा धावपळ करीत जात होतो.  सगळीकडे प्रचंड समुदाय ताटकळत बसलेले असत.  ठरलेल्या सभास्थानाशिवाय पुन्हा ठिकठिकाणी थांबावे लागे.  कारण शेकडो लोक दुरून दुरून माझ्या स्वागातासाठी म्हणून येऊन वाट पाहात बसलेले असत.  या मधल्या थांबण्यामुळे ठिकठिकाणच्या ठरलेल्या वेळा साधता येत नसत व पुढच्या कार्यक्रमांना उशीर होई.  परंतु या ठिकठिकाणी जमलेल्या गरीब बिचार्‍या लोकांची उपेक्षा करून त्यांना ओलांडून जाणे कसे शक्य असेल ?  उशिरावर उशीर वाढत जाई.  प्रचंड जनसमूहातून वाट काढीत सभास्थानी पोचण्यातही काही मिनिटे जायची; आणि पुन्हा परत येताना असाच वेळ मोडायचा.  प्रत्येक मिनिट महत्त्वाचे होते.  मिनिटामागून अशी मिनिटे जात आणि त्यांचे तास होत.  सायंकाळच्या सभेला शेवटी कितीतरी उशिरा जाऊन मी पोचत असे.  परंतु लोक शांतपणे तासनतास बसून राहात.  हिवाळा होता.  सभा उघड्यावर असायच्या, लोकांच्या अंगावर कपडे नसायचे.  थंडीत कुडकुडत ते बसून राहात.  अशा रीतीने दिवसाचा जवळजवळ १८ तासांचा कार्यक्रम होई.  शेवटचा मुक्काम मध्यरात्रीला कोठेतरी होई.  कधी कधी मध्यरात्रही उलटून जात असे.  एकदा कर्नाटकात तर कमालच झाली.  फेब्रुवारी महिन्याच्या मध्याचे ते दिवस होते.  आम्ही त्या दिवशी सीमोल्लंघन केले, स्वत:चा उच्चांक स्वत:च मोडला.  त्या दिवसाचा कार्यक्रम भरगच्च होता, गर्दीचा होता.  अतिसुंदर अशा डोंगराळ जंगलातून रस्ता होता.  रस्ता फारसा चांगला नव्हता.  नागमोडी होता.  सारखी वाकणे-वळणे होती.  त्यामुळे फार हळूच जावे लागत होते.  आधी प्रचंड सभा झाल्या, लहान सभा वाटोवाट किती झाल्या त्यांची गणतीच नव्हती.  सकाळी आठला कार्यक्रमाला सुरूवात झाली होती आणि शेवटची सभा पहाटे चारला झाली !  (ती सात तास वास्तविक आधी झाली पाहिजे होती) आणि त्यानंतर पुन्हा ७० मैलांचा प्रवास करून उरलेल्या रात्रीच्या म्हणून मुक्कामी आम्हाला जाऊन पोचायचे होते.  त्या मुक्कामाच्या जागी उजाडत सात वाजता आम्ही पोचलो.  दिवस रात्र मिळून ४१५ मैलांचा प्रवास आम्ही केला; वाटेतील सभा निराळ्या.  चोवीस तासांतील तेवीस तास कार्यक्रम व प्रवास यातच गेले व दुसर्‍या दिवसाचा कार्यक्रम सुरू व्हायचा होता, तो एका तासावर येऊन ठेपला.

कोणी एकाने गणित करण्याचे श्रम घेऊन असा हिशेब केला की, जवळजवळ एक कोटी लोकांनी सभांतून माझा संदेश ऐकला.  या संख्येत वाटेवरच होणार्‍या अचानक छोट्या सभांतील लोकांची संख्या मिळवली पाहिजे.  लाखालाखांच्या विराट सभा कोठे भरत, वीस हजार तर नेहमीच असायचे.  एखाद्या गावातून जाताना सारा गाव सुनासुना दिसे.  चिटपाखरू दिसत नसे; दुकाने बंद असत याचे मला आश्चर्य वाटे.  परंतु त्याचा उलगडा पुढे होई.  गावातील झाडून सारे आबालवृध्द स्त्री-पुरुष जवळपास किंवा जरा दूर असलेल्या सभेसाठी निघून गेलेले असत व तेथे ते माझी वाट बघत बसलेले असत.

या सगळ्या धमालीत माझी प्रकृती एकदम ढासळली नाही कशी ते मला समजत नाही.  तसे म्हटले तर हा एकंदर कार्यक्रम पार पाडणे म्हणजे शरीराने टिकून राहण्याचा चमत्कार करून दाखविणेच होते.  शारीरिक सहनशक्तीची ती कमाल होती.  मला वाटते माझ्या देहाने हळूहळू त्या बेताल जीवनाची सवय करून घेतली.  दोन सभांच्या दरम्यान मोटारीतच अर्धातास जो मिळे तेवढ्यात मला गाढ झोप लागे.  जागे होणेही मुश्किलीचे होई.  परंतु दुसर्‍या सभेचे स्थान येताच मला जागे तर व्हावेच लागे.  जयजयकार करणार्‍या जनसंमर्दांच्या जयघोषांनी मला जाग येई.  मी शक्य तितक्या कमी वेळा जेवू लागलो व मधून मधून एखादे (विशेषत: सायंकाळचे) जेवण टाळू लागलो व त्यामुळे मला बरे वाटू लागले.  परंतु माझी शक्ती टिकली व मला पुरेशी हुशारी राहिली याचे खरे कारण मी जाईन तेथे तेथे माझ्याभोवती आसमंतात भरून राहिलेला लोकांचा उत्साह व त्यांचे माझ्यावरचे प्रेम.  मी जाईन तेथे तोच प्रकार आढळे.  परंतु मला त्याचा सराव असा कधीच झाला नाही व रोज नव्याने मला त्या प्रकारचे आश्चर्य वाटे.

   

पुढे जाण्यासाठी .......