रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

'आपण या सुंदर ठिकाणी भांडायला का आलो? ही फुलं तुझ्या केसांत घालू?'
'काही नको.'

'नको म्हणजे हवीत. बायकांचं उफराटं बोलणं, अहंभावी बोलणं.'

'किती घाणेरडी आहेत ती फुलं!'

'माझा हात लागून घाणेरडी झाली. तुझ्या केसांचा स्पर्श होऊन सुंदर होतील!'

'एक सुंदरसा बंगला कधी घेऊन देणार?'

'तुझं माझं लग्न लागेल तेव्हा.'

'अजून नाही का लागलं?'


'तसं देवाधर्मासमक्ष कुठं लागलं आहे?'

'देव सर्वत्र आहे ना? आपण एकत्र आलो त्या क्षणीच लग्न लागलं. ते देवानं पाहिलं. हृदयातील धर्मानं अभिनंदिलं.  हसता काय?'

'परंतु मंत्र वगैरे कुणी म्हटले का? माझे बाबा वगैरे तिथे होते का?'

'मंत्र म्हणणं म्हणजे धर्म वाटतं? खरंच सांगा, तुमचं माझं लग्न विधिपूर्वक करायचं म्हटलं तर तुमचे वडील वगैरे येतील का?'

'जाऊ देत ही बोलणी. प्रेमात रमावं. जाईल दिवस तो आपला. पुढचं फार पाहू नये. आज आपण आनंदात आहोत ना?'
'आणि उद्या?'

'उद्याचं कोण सांगू शकेल? जगात नक्की असं काय आहे? सारं अस्थिर व चंचल. जाईल दिवस तो मजेत दवडावा. ऊठ. कोणी तरी येत आहे.'

'माझा हात धरून उठवा.'


'मला नाही उठवत.'

'मी तर हलकं फूल आहे.'

'तुम्ही असता फुलाप्रमाणं, परंतु बसता मानेवर दगडाप्रमाणं.'

'तुमच्या गळयाला का फास लावतो आम्ही?'