सोमवार, सप्टेंबर 27, 2021
   
Text Size


वेल (१४), जीवनतरू (१५), मजूर (२०), असो तुला देवा माझा सदा नमस्कार (२४), प्रभो, काय सांगू तुला मी वदोनी (२५), वेणू (२६), आई, तू मज मार मार (३७), दिव्य आनंद (३८), कैसे लावियले मी दार (३९), हस रे माझ्या मुला (४०), गाडी धीरे धीरे हाक(४४), आशा निराशा (४५), येवो वसंतवारा (४९), तुझ्या हातात (५१), रामवेडा (५६), मयसभा राहिली भरून (८३), मेघासारखे जीवन (८९), वंदन (९०), मदीय त्या नमस्कृती (९१), विपत्ती दे, तीहि हवी विकासा (९३), प्रभूप्रार्थना (१४८), राष्ट्राचे उद्यान (१४९), भारतीय मुले (१५७), महात्माजींस (१६०), खरे सनातनी (१६१) ह्या कविता मला विशेषच आवडल्या.

रा. साने त्यांच्या अनेक लहान-मोठ्या गद्यकृतींच्या द्वारे कसलेले लेखक म्हणून महाराष्ट्र वाचकांस चांगले परिचित आहेत. पत्रीतील काव्यरचनेतही त्यांचे भाषापटुत्व चांगल्या प्रकारे दृगोचर होत आहे. तसेच यातील काव्यशैली सहजरम्य, आल्हाददायक, प्रौढ, सुश्लिष्ट व यथोचित असून, तिच्यात सहजप्रवाहिता व गायनोचित शब्दलालित्य व नादानुकूलता ही आहेत. काही ठिकाणी मात्र ‘रडवेले वदन’, ‘पाणरलेले नयन’ अशासारखे कर्णकटू किवा काव्यरसाकर्षक शब्दप्रयोग किंवा ओठांवर ‘थरथरणारी’ प्रार्थना अशासारखे नादलुब्धतेच्या किंवा विदेश वाङमयसंस्काराच्या अनिवार्य मोहवशतेचे द्योतक असे ‘अ-सुभग’ कल्पनाविष्कार आढळतात. पण अशी स्थळे फारच क्वचित व पत्रीतील एकंदर रचनासौष्ठवाच्या मानाने पाहता ती गालबोटवजा समजण्यास हरकत नाही.

पत्रीतील एकंदर कवितांचे वैपुल्य आणि त्यातील ब-याचशा भागाच्या रचनेने व्यापलेला अल्पकाळ यांचे व्यस्त प्रमाण प्रमाण यांचाही विचार सहजगत्या डोळ्यांपुढे उभा राहण्यासारखा आहे व त्यावरून कशाही विषम परिस्थितीत क्षणश: कणशश्चैव अशी मनाची सारखी अव्यग्र अनुसंधानपर, साधनापर व उद्योगनिरत वृत्ती ठेवल्यास अल्पकाळात आत्मानंदकारी व प्रिय मातृभाषोत्कर्षाच्या कार्यास पोषक अशी किती तरी वाङमयनिर्मिती होऊ शकते, याचाही आमच्यातील तरुण व होतकरू कविवर्गास रा. साने यांच्या पत्रीवरून स्फूर्तिदायक व मार्गदर्शक वस्तुपाठ मिळण्यासारखा आहे, असे मला वाडते. पत्रीच्या संकलनाच्या पाठोपाठ रम्य सौरभपूर्ण अशा पुष्पांचा संग्रहही अर्थात् कर्तव्यप्राप्तच आहे. त्यास अनुसरून यानंतर रा. साने यांच्या इतरही गद्य-पद्य वाङमयपुष्पांचे प्रकाशन त्यांचा तरुण सेवकसंघ करणार आहे. तो त्यांचा हेतू लवकरच सफल होवो व गुणग्राही महाराष्ट्र जनता त्याला उत्तेजन देण्याचे कर्तव्य करीलच, असा भरवसा मी प्रकट करतो. रा. साने यांचे जनताशिक्षणाचे व्यावहारिक प्रयत्न आणि राष्ट्रीयत्व पोषक अशा गद्यपद्यात्मक वाङमय रचनेच्या द्वारे त्यांची अखंड चालू असलेली प्रिय मातृभूमीची सेवा यांचा सदैव उज्ज्वल उत्कर्ष व प्रगती होवो, अशी अंत:करणपूर्वक उच्छा व्यक्त करतो.

दि. १६-४-१९३४                              -श्री. नी. चाफेकर

।।सहा।।

वस्तुस्थितीनिरपेक्ष असे निकामी काव्य भरपूर निपजते, परंतु श्री. साने हे रिकामटेकडे म्हणून कुडाला तुंबड्या लावणारांपैकी नाहीत, ही संतोषाची गोष्ट होय. त्यांच्या काव्यात अंत:करणाची तळमळ व कळकळ पदोपदी व्यक्त होत असल्याने राष्ट्रजागृतीचे कार्य ह्या काव्यग्रंथांमुळे सुलभ होणारे आहे. सद्य:परिस्थितीविषयीचे कवीचे विचार अहंकाराचा उन्माद न झालेल्या कोणालाही मानवतील. कवीच्या निर्विकार सात्विक वृत्तीमुळे काव्याला प्रौढत्व व उदारत्त्व आले आहे. गीतारहस्यापासून प्रारंभ होणा-या तुरुंगवाङमयाचा विचार केला तर तुरुंग हा प्रौढ वाङमयाचा पोशिंदा आहे, असे म्हणावेसे वाटते.

-ना. गो. चापेकर

पत्री