बुधवार, ऑक्टोबंर 21, 2020
   
Text Size

वनमालेने ‘ये वनमालाधार गोपाळा’ चरण घोळून घोळून म्हटला. गोठ्यात मोरीसुद्धा तो चरण म्हणत होती. गीत थांबले. गोपाळाची सुरेल मुरली तशीच वाजत होती. थांबली मुरली.

“मला हे गाणं फार आवडत. भाव गोड, चाल गोड, शब्द गोड-” वनमाला म्हणाली.

“तू मोघम सांगितलंस, पण त्यात ते कोणते शब्द तुला जास्त आवडले, सांगू ?” गोपाळ म्हणाला.

“सांगा.”

“ज्यात तुझं नाव आहे तो चरण तू घोळून घोळून म्हटलास. मी तो चरण मुळीच म्हटला नसता.” गोपाळ म्हणाला.

“म्हटलं, माझं नाव त्यात नसून आपलं वर्णन त्यात आहे. ‘वनमालाधर गोपाळ’ असं आहे. आपल्या प्रिय वस्तूचं नाव आहे, म्हणून तो चरण मला आवडला.” वनमाला म्हणाली.

“आपण गोठ्यातून जाऊन येऊ चल. शेण वगैरे ओढून घेऊ. दोघेही निघाली. वनमालेने हातात कंदील घेतला होता. गोठ्यात गायी सुखाने बसल्या होत्या. मोरी सुखावली होती. त्या मंगल मो-या गायीने वनमालेला आशिर्वाद दिला. “बाळे, तुझाही कुसवा धन्य होऊ दे. तुझ्याही पोटी ध्येयवादी सत्त्वनिष्ठ, सुंदर, समर्थ, तेजस्वी, धर्मपूजक, सत्यवेधक, प्रेमळ व दयाळू बाळ येवो. तूही पुत्रवती हो.”

मोरी गाय आता चांगली भरदार दिसे. तिला गाजरे व इतर फळे गोपाळ चारी. तिच्या अंगावर तेज दिसू लागले. आपल्या पोटी गर्भ राहावा असे तिला वाटे. तिला गर्भ राहिला. तिची कळी वाढू लागली. तिच्या अंगप्रत्यंगातून जणू तेज ठिपकत होते. वनमाला म्हणे, “कशी दिसते मोरी गाय ? जणू भूषण आहे आपल्या ह्या छोट्या संसाराच ! भारतातील गायी अशा झाल्या पाहिजेत.”

सकाळचे दूध थोडे घरात ठेवून बाकीचे गोपाळ विकून येऊ. बाजाराच्या दिवशी घरात ठेवून बाकीचे गोपाळ विकून येई. बाजाराच्या दिवशी घरात जमलेले तूप तो विकी. मळ्यातला भाजीपालाही त्या दिवशी न्यायचा. आता पावसाळ्यात पुष्कळ भाज्या लावल्या होत्या. दोघांपुरते धान्यही तो पेरी. गोपाळने आता एक लहानसा मुलगा कामाला ठेवला. तो तेथेच जेवी. त्याचे नाव सावळ्या.

वनमालेलाही आता दिवस गेले होते. तिला सारे काम उरकत नसे आणि दिवसेंदिवस कामही वाढत होते. आता आणखी गायी विणार होत्या, म्हणून सावळ्याला गोपाळने ठेवले होते. सावळ्याला काम आवडे.

गोपाळचे गोपालन-कार्य अशा प्रकारे चालले होते. मोरी मोठ्या सुखात नांदत होती. ती तेथील आराध्यदेवता होती.

मोरी गाय