बुधवार, सप्टेंबर 30, 2020
   
Text Size

राष्ट्र कितीही सुसंघटित, एकजिनसी असले तरी राष्ट्रात त्या विविध समूहात लहानमोठे भेद नेहमी लक्षात येण्यासारखे असतात.  सीमाप्रांतातील भिन्न राष्ट्रांचे परंतु एकमेकांशेजारचे दोन लोकसमूह पाहिले तर पुष्कळ वेळा त्यांच्यामधे भेद विरल होत होत हे लोकसमूह एकमेकांत मिसळलेले आढळतात व आधुनिक प्रगतीमुळे सगळीकडे एक प्रकारचा सारखेपणा येतो.  पण एका राष्ट्रातल्या सर्व लोकसमूहांची दुसर्‍या राष्ट्रातील लोकसमूहाबरोबर तुलना करून पाहिली तर राष्ट्राला एकसूत्रीपणा आणणारा मूलग्राही असा काही एक विशेष तेव्हाच उमटून दिसतो.  प्राचीन काळात त्याचप्रमाणे मध्ययुगातही आजकाल राष्ट्राची जी व्याख्या आहे, जी कल्पना आहे, ती नव्हती; त्या काळात सरंजामशाहीची तसेच धार्मिक, वांशिक आणि सांस्कृतिक बंधने यांना अधिक महत्व होते.  असे असूनही मला वाटते की, कोणत्याही काळी भारतीय मनुष्य भारतातील कोणत्याही प्रांतात गेला असता तरी त्याला घरच्यासारखेच वाटले असते.  आपण स्वदेशातच आहोत असे वाटले असते आणि दुसर्‍या कोणत्याही देशात आपण परदेशात आहोत असे वाटल्यावाचून राहिले नसते.  ज्या देशांनी भारतीय धर्म किंवा संस्कृती यांचा अंगीकार केला असेल त्या देशात अर्थात त्याला कमी परकेपणा वाटला असता.  जे हिंदुस्थानच्या बाहेरच्या धर्मांचे अनुयायी होते आणि हिंदुस्थानात येऊन जे घरेदारे करून राहिले ते काही थोड्या पिढ्या गेल्यावर भारतीय होऊन गेले.  ख्रिश्चन, ज्यू, पारशी, मुसलमान सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट दिसून येते.  हिंदुस्थानातील काही लोकांनी जरी परधर्म स्वीकारले तरी तेवढ्यामुळे ते अ-भारतीय झाले असे कधी वाटले नाही.  धर्मात बदल झाल्यामुळे त्यांच्या राष्ट्रीयतेत बदल होत नसे.  या विविध धर्मांचे हिंदी लोक त्या त्या धर्मांच्या परकीय राष्ट्रात गेले तर धर्म एक असूनही त्यांना परकीय, हिंदी राष्ट्राचेच मानण्यात येई.

आज राष्ट्रवादाची कल्पना अधिकच विकसित झालेली आहे.  परदेशात गेलेले हिंदी लोक आपसात कितीही भेद असले तरी एकच राष्ट्रीय संघ करून विविध कार्यांकरता त्या एका संघाला धरून राहतात.  हिंदुस्थानातील ख्रिश्चन मनुष्य कोठेही गेला तरी हिंदी म्हणूनच मानला जातो.  हिंदी मुसलमान तुर्कस्थान, अरबस्थान, इराण यांत कोठेही जावो, इतर कोणत्याही मुस्लिम धर्म असलेल्या देशात जावो, त्याच्याकडे हिंदी मनुष्य या दृष्टीने पाहण्यात येते.

आपल्या या मातृभूमीची प्रत्येकाच्या मनात निरनिराळी चित्रे असतील.  कोणतीही दोन माणसे अगदी समान विचार करतील असे कधी होणार नाही.  मी जेव्हा हिंदुस्थानचा विचार करतो, तेव्हा अनेक गोष्टी माझ्या मनासमोर असतात.  मोठमोठी शेती, विशाल मैदाने, मधून मधून ठिपक्याप्रमाणे वसलेली लाखो खेडी, मी पाहिलेली ती शेकडो पुरेपट्टणे; उन्हाने करपून रखरखीत झालेल्या धरणीवर मुसळधार जीवन ओतून, पाहता पाहता जिकडे तिकडे तळपू लागलेली हिरवी शोभा, खळखळ वाहते पाणी व विशाल नद्यांचा चमत्कार दाखविणार्‍या वर्षाॠतूची जादू, उत्तरेची खैबर खिंड आणि तिच्या भोवतालचा वैराण प्रदेश, दक्षिणेची ती कन्याकुमारी; आणि भारतीय जनता व्यक्तिरूपाने व समूहरूपाने; आणि सर्वांत उत्तुंग तो नगाधिराज हिमालय; त्याचा तो बर्फमय शुभ्र किरीट, ती हिमाच्छादित शिखरे; वसंत ॠतूत फुलांनी डवरलेली मधूनमधून बुडबुडत, सळसळा वाहणारे निर्झर असलेली काश्मिरातली एखादी नयनमनोहर दरी, हे सारे माझ्या डोळ्यांसमोर येते.  आपण आपल्या आवडीप्रमाणे चित्रे रंगवितो व मनोमंदिरात ती जणून ठेवीत असतो.  मी माझ्या चित्रासाठी ही पर्वतांची पहाडी पार्श्वभूमी निवडली आहे.  हिंदुस्थानातील उष्ण प्रदेशाची नेहमीची सर्वसामान्य पार्श्वभूमी माझ्या चित्रासाठी मी पसंत केली नाही.  दोन्ही चित्रे यथार्थच आहेत.  कारण विषुववृत्तापासून तो आशियाच्या थंडगार हृदयापर्यंत हा महान हिंदुस्थान विशाल पसरलेला आहे.