बुधवार, ऑक्टोबंर 21, 2020
   
Text Size

त्या शत्रूने सूर्य तर गिळला, आता इतर तारामंडळही तो गिळू पाहत आहे. आपल्याविरुद्ध कोणीच कोठे हालचाल करीत नाही, हे पाहून तो उन्मत्त झाला आहे. देवेन्द्रा, उठा. सारी शक्ती पणास लावा. बाकी तुमची शक्ती कितपत पुरी पडेल याची मला मोठी शंका आहे. कर्तव्यपालनाने सामर्थ्य वाढते. कर्तव्यहीनतेने शक्ती क्षीण होते. विलास म्हणजे विनाश. तुम्ही तर सारे विलासलोलुप झालात. तरीही प्रयत्न करून करून पहा. तुमची शक्ती अपुरी पडली तर मानवांची मदत घ्या. मानव जरी आज मरत पडले असले, तरी कोणी कोणी महात्मे तपश्चर्या करीत असतील. त्यांच्यामुळेच अद्याप जगात धुगधुगी आहे. त्या महात्म्यांची मदत घ्या. सुरांनी, नरांनी सहकार्य करून शत्रूचा निःपात करावा. तुम्ही सारे देव बाहेर पडा. मीही मानवजातीत जाऊन कोणी आहे का महात्मा, ते नीट पाहून येतो. कोणी दिसला तर तुम्हाला येऊन सांगतो. जातो इंद्रदेवा, क्षमा करा कमीअधिक बोलल्याची. शेवटी आपण सारे कर्तव्यदेव आहोत, हे आपण ध्यानात धरू या.”

असे बोलून वरुणदेव निघून गेले. ते आपल्या दिव्य सिंहासनावर बसून पृथ्वाचे नीट निरिक्षण करू लागले. कोणता महात्मा तारील, त्याची चिकित्सा करू लागले. नीतीचा प्रकाश, सुरम्य प्रकाश त्यांच्या सिंहासनाभोवती झळकत होता. त्यांच्या सिंहासनाला नाना सद्गुणांचे हिरेमोती झळकत होते. वरुणदेवांची मुद्रा गंभीर दिसत होती. ती क्षणात करुण होई, क्षणात क्रोधी होई.

वरुणदेव गेले. इंद्र तेथेच बसून राहिला. त्याला वाईट वाटले. वरुणदेवांनी केलेली कानउघडणी वर्मी लागली;  परंतु त्यात अयोग्य काय होते ? वरुणदेव यथार्थ तेच बोलले. इंद्र अजून पक्का कर्तव्यचुत झाला नव्हता. त्याचे मन त्याला खाऊ लागले. निजलेली कर्तव्यबुद्धी जागी झाली. सदसद्विवेकबुद्धीचा डोळा उघडला. मुकाट्याने तेथे तो बसून राहिला. मुखकळा म्लान झाली. खिन्नता मुद्रेवर पसरली. अधोवदन तो बसला होता. पापाला वर पाहवत नसते. पापाची मान शेवटी खालीच व्हावयाची, आज ना उद्या.

इंद्र आपल्या अंतःपुरात गेला. तेथे रडत बसला, इंद्राणी बाहेर गेली होती. नंदनवनातील फुले गोळा करायला गेली होती. नवीन शेज रचायची होती. नंदनवनातील कल्पवृक्ष रोज नवीन नवीन रंगाची फुले देत. ‘कल्पवृक्षांनो, आज नवीन गंधांची, नवीन रंगाची, नवीन आकारांची फुले द्या.’ असे म्हणताच ते देत. तेथे काय तोटा ?

इंद्राणी आनंदाने नाचत आली. फुलांचे झेले हातात घेऊन आली; परंतु पती ना वर बघे, ना हसे, ना बोले. इंद्राणी पतीच्या जवळ गेली. त्याच्या खांद्यावर आनंदाने हात ठेवून म्हणाली,

यज्ञ