शुक्रवार, जुलै 10, 2020
   
Text Size

“परंतु कोणती मदत मागायची ?” देवेन्द्राने विचारले.

सुदगुरू म्हणाले, “सर्व शस्त्रास्त्रांपेक्षा पवित्र हृदय अधिक प्रभावशाली असते. अग्नीला शीतलविणारे, पर्वतांना पाझर फोडणारे, वा-याला थांबविणारे, वज्राला फुलाप्रणाणे करणारे, असे एक संताचे हृदय असते. ते फुलाहून कोमल असते. वज्राहून कठोर असते. महात्म्यांच्या रोमरोमांत अपरंपार शक्ती भरलेली असते. सर्व त्रिभुवनाशी ते एकरूप झालेले असल्यामुळे सर्व त्रिभुवनाचे सामर्थ त्यांच्या जीवनात असते. त्यांचा दृष्टीक्षेप, यात अपार सामर्थ्य असते. देवेन्द्रा, त्या महात्म्याजवळ त्याचे हृदय आपण मागू. त्या महात्म्याचा सारा देहच पवित्र. त्यात हृदय अधिकच पवित्र. त्या हृदयाच्या अस्थी आपण मागू. त्या अस्थीचे कोण चूर्ण करील ! त्या अस्थी अभंग आहेत. अमर आहेत. त्या अस्थींचे आपण वज्र करू. हृदयाला वेढऊन असणा-या अस्थी. भोवती त्या अस्थी बसवू. मध्ये हृदय बसवू. असे ते अस्थिमय हृदय वज्राकार करून वृत्तावर फेकू. वृत्राचे पाणी पाणी होईल. वृत्र नाहीसा होईल.”

वरुण म्हणाला, “देवगुरुंचा सल्ला ठीक आहे. असेच करावे.”

इंद्राने विचारले, “त्या महात्म्याचे नाव काय ?”

वरूण म्हणाला, “दधीची.”

दधीची लहानपणी फार व्रात्य होता. आई-बापांना त्याची चिंता वाटे. पुढे त्यांनी त्याला एका आश्रमात ठेवले. आईबाप निघून गेले. गुरुगृही दधीची राहू लागला. त्याचे अध्ययनाकडे फारसे लक्ष नसे. आश्रमातील गाईंना चारायला नेणे त्याला आवडे.

“गुरुजी, मी गाईंना चारायला नेईन,  म्हणजे मला दूधही पुष्कळ पिण्यास मिळेल.” दधीची म्हणाला.

“ने गाई चारायला. पी पुष्कळ दूध.” गुरुदेव म्हणाले.

दधीची गाईंना आंजारीगोंजरी. त्यांच्यासाठी पावा वाजवी. रानात पळसाच्या पानांचा द्रोण करून ते गाईखाली बसे. गाई दूध देत. दधीची द्रोण भरभरून पिई. मग वानराप्रमाणे तो झाडावर चढे किंवा पाण्यात डुंबे. मजा करी.

दधीचीचे हाडपेर मोठे होते. तो आता मोठा दिसे. सिंहासारखी त्याची छाती होती. खांदे रुंद होते. तोंडावर एक प्रकारचे तेज दिसे. आश्रमातील सारी मुले त्याला भीत. त्याची खोडी कोणी काढीत नसे. कोणी काढली खोडी, तर त्याची कंबक्ती भरलीच समजा !

यज्ञ