शनिवार, डिसेंबर 05, 2020
   
Text Size

अघटित घटना

तिला कपडे शिवण्याचे काम मिळाले. एका दुकानदाराने तिला उक्ते काम दिले. शंभर कपडे शिवून दिले तर  अमुक इतके पैसे द्यावयाचे असे ठरले. लिलीची आई रात्रंदिवस शिवीत बसे! तिचे हात दुखून येत. सुईने शिवता शिवता हाताला भोके पडण्याची पाळी आली; परंतु ती शिवीत बसे. मुलीला पैसे नकोत का पाठवायला?

परंतु त्या दुकानदाराला दुसरा एक माणूस भेटला. तो आणखी कमी पैशात काम करून देणारा होता. लिलीच्या आईचे हे काम गेले. तिने त्या मालकाला पुष्कळ सांगून पाहिले; परंतु तो ऐकेना. तो म्हणाला, 'व्यवहार आहे. इथं दया करून कसं चालेल? माझं दिवाळं निघायचं. जो कमीत कमी पैशांत शिवून देईल, त्यालाच मी काम देईन.'

लिलीच्या आईला कोठे काम मिळेना. ती सर्वत्र भटकली; परंतु काम नाही. ती आता एकदाच जेवी. मुलीसाठी पैसे पुरले पाहिजेत. परंतु एक दिवस त्या खाणावळवाल्याचे, अधिक पैसे पाठवा, असे पत्र आले.

'तुमची मुलगी फार आजारी आहे. डॉक्टराचं बिल बरंच झालं आहे. तिला गरम कपडे करावे लागले. चहाकॉफी, फळं यांचाही बराच खर्च येतो. तरी या वेळेस तुम्ही पंचवीस रुपये तरी पाठवा.' असे ते पत्र होते. कोठून पाठवायचे पंचवीस रुपये? सारी शिल्लक संपली होती. दहा रुपये फक्त जवळ होते. काय करावे ते त्या मातेला समजेना. ती दु:खाने वेडी होऊन खोलीत बसली होती.

इतक्यात त्या घराचा मालक तेथे आला.

'काय पाहिजे?' तिने रडत रडत विचारले.

'तुमच्या दु:खाचं कारण विचारायला मी आलो आहे,' तो म्हणाला.

'पैसे, मला पैसे पाहिजेत. कोठून आणू? काम ना धाम, काय करू समजत नाही,' ती म्हणाली.

'मी सुचवू एक उपाय?' त्याने भीतभीत विचारले.

'हं, सुचवा.' ती आशेने म्हणाली.

'रागावणार नाही ना?' त्याने प्रश्न केला.

'उलट आभार मानीन.' ती म्हणाली.

 

पुढे जाण्यासाठी .......