शुक्रवार, सप्टेंबर 25, 2020
   
Text Size

लिलीची भेट

'हिचे आणखी पैसे पाहिजेत.'

'आणखी?'

'हो. माझा हिशेब चुकला.'

'तू चावट आहेस. तू पैसे मागितलेस तेवढे मी दिले. या मुलीला रात्रंदिवस राबवलंस. फुकट का खायला घातलंस? तिच्या आईजवळून सारखे पैसे मागत असस. आजारी आहे, पैसे पाठवा. थंडीसाठी कपडे करायचे आहेत, पैसे पाठवा. कोणते रे हिला कपडे केलेस? लफंग्या, जा. निमूटपणं जा. नाही तर हा सोटा पाहिलास ना?'

'परंतु मी मुलगी देणार नाही. तिच्या आईचं पत्र आणा व मग मुलगी न्या. तुम्हीच लफंगे दिसता. मला फसवून मुलगी नेऊ पाहता.'

आजोबाने आपल्या अंगरख्यातून एक चिठ्ठी काढली. त्याने ती त्या खाणावळवाल्यास दाखविली.

'आई ना तिच्या आईची चिठ्ठी? ओळखता की नाही अक्षरं? तिच्या आईनंच हिला आणा असं सांगितलं आहे. जा. माघारी जा. खबरदार पाठोपाठ येशील तर. नीघ.'

खाणावळवाला भीत भीत माघारी चालला. आजोबांनी लिलीला खांद्यावर घेतले. पुन्हा ते झपझप वेगाने चालू लागले. त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले. तो तो खाणावळवाला आहेच. आजोबांनी अशा काही प्रखर दृष्टीने त्याच्याकडे पाहिले की, तो खाणावळवाला घाबरला. तो मागे मागे जात चालला. गेला, दूर गेला, दिसेनासा झाला. दातओठ खात तो परत चालला होता. 'काय करू रे, बरोबर पिस्तुल आणायला विसरलो. चुकलो. इथंच याचा बळी घेतला असता. माझा अपमान? या चिमुरडया पोरीच्यादेखत माझा अपमान? या अपमानाचा सूड घेईन. त्या पोरीचे पुन्हा हाल हाल करीन. रोज चाबकानं तिला फोडीन. अपमान. विसरणार नाही मी अपमान. या अपमानाचा सूड घेण्यासाठीच आता जगायचं. बस्स. ठरलं' असे म्हणत तो खाणावळवाला घरी गेला.

 

पुढे जाण्यासाठी .......