गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

नवीन अनुभव

''होय बाळ. भाऊला त्रास नको देऊ''
''आतां भाऊचा ब्रश घेऊन मीच चित्र काढीन. भाऊचेंच चित्र काढीन.''

''किती बोलशील ग.''
''मी बोललें म्हणजे भाऊला बरें वाटतें. परवां मी बोलत नव्हतें. रागावलें होतें. तर भाऊ कसें म्हणे बोल बोल, एक शब्द बोल. आणि मला खुदकन् हंसूं आलें.''

''खुदकन् म्हणजे ग काय ?''
''मला काय माहीत ? तुम्हीच तर म्हणतां.''

अमृतराव घरीं आहे. कपडे काढून ते रंगाच्या खोलींत आले. ताई तेथें बसलेली होती. रंगाला थोपटीत होती. लिली कांही तर रंगकाम करित होती. अमृतरावांनी तेथील दृश्य पाहिलें. ताई उठली नि आपल्या खोलीत गेली. तिने स्टोव्ह पेटवला. पटकन् चहा करुन पतीला नेऊन दिला.

''मला नको चहा''
''घ्या ना. तुम्ही आलांत मला कळलेंहि नाहीं.''

''कशाला कळेल ? रंगाजवळ बसलें म्हणजे थोडेंच कांही कळणार आहे ? तुला लाज वाटत नाहीं. बेशरम. येथें राहयचें नाहीं याच्यापुढें. बिर्‍हाड बदलायचें. माझ्या संसारांत साप शिरत आहे. मला थोडथोडें वाटूं लागलेंच होतें. तरी म्हटलें हा सुटींत गेला कसा नाहीं ? आणि आतां आजाराचें सोंग. सारे रंग मला समजतात. कलावंतांचे हे नमुने. ते कलावान् आणि तूं कलावती. उचल तो चहा. खबरदार त्याच्या खोलींत जाशील तर ? लिलीला हि जाऊं देऊं नकोस. मी उद्यां दुसरीकडे जागा बघतों. येथें राहणेंच नको.''

अमृतराव विष वमत होते. बिचारी ताई गायीप्रमाणें कावरी बावरी झाली. ती तेथें खिळल्याप्रमाणें उभी राहिली. ती थरथरत होती. ती पडेल, कोलमडेल असें वाटलें. परंतु ती स्वयंपाक घरांत जाऊन रडत बसली.

''आई, रडूं नको. बाबा रागावले होय ना ? मी बाबांना मार देईन.''

''कुणाला मार देणार आहेस, बोल पुन्हां'' पित्यानें त्या मुलीच्या कोमल गालांवर भराभरा चापट्या मारल्या.

 

पुढे जाण्यासाठी .......