सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

निष्ठुर दैव

''परंतु त्यांची वाणी अमर आहे बाळ. ती वाणी त्यांची नव्हती. तूं येथें नव्हतास. एकदां ते जेवतांना म्हणाले-कधीं कधीं हजारों वर्षांचा भारतीय आत्मा माझ्या रोमरोमांत नाचत आहे असें मला वाटतें. आणि हातांतील घांस हातांत राहिला. पुन्हां म्हणाले, सुनंदा मी म्हणजे मी नाहीं. हा मी नाहीं जेवत. भारतीय जनता जेवत आहे. या देहांत माझा आत्मा मावत नाहीं. हा देह पडेल, फाटेल असें वाटतें ग. आंत आत्मा वाढत आहे. हे अन्न आंत कोठें भरुं ? यांला आंत जणूं जागा नाहीं सुनंदा. आणि असें म्हणून ते उठले. बाहेरच्या खोलींत जाऊन बसले. शांत होऊन शाळेंत गेले. रंगा, अशीं भव्य दर्शनें मला घडत; अशीं भव्य प्रवचनें मी त्यांच्या तोंडून ऐकायची. माझे भाग्य थोर. त्यांनीं माझें जीवन कृतार्थ केलें. उगी, रडूं नको. ते आपल्याजवळ आहेत. अधिकच आतां आपल्याजवळ असतील. त्यांचीं स्वप्नें पुरीं कर. नवभारताची स्वप्नें. विश्वाला मिठी मारणारा भारत. महान् भारत. ती दृष्टि तूं देशाला दे, जगाला दे. तुझे रंग यासाठीं आहेत. तुझी कला यासाठीं आहे. ऊठ बाळ. चिंता नको. हे घर, त्याची आसक्ति कशाला ? ध्येयाचें मंदिर उभारण्यासाठीं अशीं घरें होमावीं लागतात. जेथें हे देह होमावे लागतात, तेथें या दगडाविटांचे काय घेऊन बसलास. जा शिकायला. मी वाटेल तें काम करीन. तूं मोठा हो. मनानें, विचारानें, दृष्टीनें, ध्येयानें मोठा हो.'' असें म्हणून तिनें रंगाला जवळ घेतलें. दोघें डोळे मिटून बसलीं होती. पावन, गंभीर, मंगल दृश्य !

 

पुढे जाण्यासाठी .......