जा, घना जा !
“असा आधार म्हणजे सर्व चराचराशी एकता अनुभवणे, दुजेपणाची वार्ताही नसणे. आपणास आपले मन क्षणभर तरी या सर्व पसा-यापासून अलिप्त करता आले पाहिजे आणि सर्व विश्वाशी असलेले मूलभूत ऐक्य अनुभवता आले पाहिजे.” घना म्हणाला.
“परंतु हे आंतरिक ऐक्य अनुभवणे सोपे नाही. बाह्य जीवनातही त्याची अनुभूती हवी. मी माझ्या खोलीत गणाला झोप म्हटले तर ते दुसरे पंडित हसले! पाऊस पडत होता. गणाची झोपडी गळत होती. म्हणून मी त्याला म्हटले, ये माझ्या खोलीत झोप. त्या रुपल्याला मी शिकवतो, तर त्यांना बघवत नाही! रुपल्या माझ्या खाटेवर चित्रांचे पुस्तक पाहात बसला तर त्यांना ते कसे तरीच वाटते!”
“कॉलेजमधून एम्. ए. वगैरे होऊन आलेली ही मंडळी. त्यांना गरिबांशी समरस होणे अजून माहीत नाही.”
“आणि हे का संस्कृती आणि वेदान्त यांचा अभ्यास करणारे?”
“जसे शेठजी तसे हे! सुंदरदास वेदान्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. ते दानशूरही आहेत. परंतु गिरणीतील कामगारांसाठी ते काही करणार नाहीत. कामगारांच्या श्रमाने मिळणारा पैसा ते दुस-या शेकडो संस्थांना देतील, परंतु कामगारांसाठी सुंदर चाळी नाही बांधणार. एवढे कशाला, त्यांनी राममंदिर बांधले ना? परंतु तेथे हरिजनांना अजून प्रवेश नाही! एकदा कापसाच्या संस्थेची सभा होती. व्यापारी, शेतकरी दोघांचे प्रतिनिधी तेथे बसून भाव ठरवतात. सारे जमले. सुंदरदास उशीरा आहे. त्यांच्यासाठी तेथे एक खुर्ची होती; परंतु तेथे शेतकरी खुर्च्यांवर बसलेले पाहून ते खालीच बसले रागारागाने! अहो, वर बसा. तेथे ही खुर्ची आहे- असे सारे त्यांना म्हणाले. तर उसळले व म्हणाले, ‘कुणबट्यांबरोबर मी नाही बसणार!’ जणू कुणबटे म्हणजे खाली बसण्याच्या लायकीचे. असा हा वेदान्त आहे! त्यांच्या चर्चा मोठ्या विनोदी असतात. ‘शुनिचैवश्वपाकेच पंडिता: समदर्शिन:’ असा गीतेत चरण आहे. सुंदरदास म्हणाले, पंडित सर्वत्र समदर्शी असतात समवर्ती नव्हे! सारे कमान असे दिसले तरी वर्तणूक समान कशी ठेवायची! गायीचा चारा का आपण खायचा? गायींना चाराच हवा. आपल्याला अन्नच हवे. हाच मुद्दा पुढे नेला तर श्रीमंतांना बंगलेच हवेत, गरीबांना झोपड्याच हव्यात, श्रीमंतांना खुर्चीच हवी, गरीबाने दूरच बसले पाहिजे,-यावर आपण येतो. असे हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. ते म्हणतात, आपण कसेही वागलो तरी आत्म्याचा त्या वागण्याशी संबंध नाही, अशी आत जाणीव असावी. हाच मोक्ष. परंतु हे सारे शब्द आहेत. त्यांचे म्हणणे असे : आत्मज्ञान झाले तरी तुमचे पूर्वसंस्कार कोठे जाणार? ते तुम्हांला खेचून नेणारच. आत्मज्ञानाने सारे चित्ताचे मळ धुतले जातात, जीवनात क्रांती होते असे मानीतच नाहीत.”
पुढे जाण्यासाठी .......