रविवार, जानेवारी 17, 2021
   
Text Size

स्वातंत्र्य व स्वराज्य

काँग्रेसची मोठमोठे नेते म्हणत असतात, ''एक काँग्रेस तरी सत्ता चालवील, नाही तर कम्युनिस्ट. समाजवाद्यांना कोण विचारतो?'' श्री रामानंदतीर्थाचे हेच हैदराबादी उदगार. '''Either we rule or the Communists.' युत्त प्रान्तातील एक मंत्री असेच एका मित्राजवळ बोलले. श्री. एस. के. पाटील वर्षापूर्वी हेच म्हणाले होते. निर्मळ साधनांनी, लोकशाहीवर श्रध्दा ठेऊन समाजवाद आणू पाहाणार्‍या  समाजवाद्यांना डोके वर काढू द्यायचे नाही. त्यांचे कार्यकर्ते तुरुंगात डांबून त्यांच्या संघटना मोडायच्या आणि कायद्याने इंटक येथे स्थापायची. अशा रीतीने काँग्रेसच सत्ता चालवील या मताने वागायचे. जनतेत असंतोष तर धुमसत आहे. समाजवादी त्याला संयमी मार्गाने संघटित करू बघतात, तर त्यांना मुंडी वर काढू द्यायची नाही. तेव्हा शेवटी कम्युनिस्टच या असंतोषाचा फायदा घेतील. आचार्य जावडेकरांनी म्हटल्याप्रमाणे मग उडेल भडका! तुमचे आस्ते कदम धोरण. ''आधी भांडवलदारांजवळ जमू दे तरी भरपूर-'' हे भुसावळचे श्री. शंकरराव देवांचे तथाकथित उदगार! आणि पुरोगामी संयमी असे समाजवादी नेतृत्व येनकेनप्रकारेण हाणून पाडायची द्वेषी, दुष्ट वृत्ती. याने शेवटी एकच होईल - गुदमरलेला असंतोष पेट घेईल. आमच्या काँग्रेसवाल्यांना त्याचीच हौस आहे असे दिसते. ''एक आम्ही राज्य करू, नाही तर कम्युनिस्ट'' असे गमतीने शब्द उच्चारतात. परंतु म्हणावे तुमचा होईल खेळ; राष्ट्राचा जाईल जीव! बर्नार्ड शॉने एके ठिकाणी सत्ताधार्‍या ना उद्देशून म्हटले आहे - ''If you want blood you will have it, at your own choice.'' ''तुम्हांला रक्तपाताचेच डोहाळे असतील तर तीही तुमची इच्छा पूर्ण होईल.'' समाजवादी शक्ती नष्ट होणे, म्हणजे लाल कम्युनिस्टांना मोकळे रान. मग होईल तुमची रक्ताची हौस पुरी.

चीन लाल झाला; ब्रह्मदेशात लाल भेसूर छायांचे तांडव नृत्य चालू आहे. इंडोनेशियात लाल रंगाचे वातावरण आहेच. पॅलेस्टाईनकडे लाल पंजा घुसत आहे. या खुणा आहेत. कम्युनिस्टांची शक्ती वाढायला नको असेल तर त्वरेने जनतेचा संसार नीट उभा करायला हवा. पंडित जवाहरलाल असे मागे म्हणाले. ऑस्ट्रेलियन अध्यक्ष नि मंत्री यांनी या उदगाराचे स्वागत केले. परंतु शब्दाबरोबर कृती हवी. ''भांडवलदारांजवळ आणखी जमू दे'' असे म्हणण्याने कम्युनिस्टी शक्ती कमी होत नसते.

भारतीय जनते, भांडवलदारांना काँग्रेस जरासा चिमटा घेईल. परंतु ती त्यांना निर्वीष करू इच्छित नाही. सर्पाचे विषारी दात काढून घ्या. मग ते निरुपद्रवी खुशाल खेळोत. परंतु सरकार आज त्याला तयार नाही. कम्युनिस्टांची राजवट येणे म्हणजे रक्तपात येणे, हुकुमशाही येणे, समाजाशी अविरोधी असे मर्यादित का होईना परंतु मोलाचे व्यक्तिस्वातंत्र्य गमावणे. या दोन्ही आपत्ती टाळायच्या असतील तर विचारपूर्वक आणि श्रध्देने समाजवादी पक्षाभोवती तमाम जनतेने उभे राहिले पाहिजे.

दरिद्रनारायणा! तुला सुखवणारे स्वराज्य दूर आहे. ते जवळ यावे म्हणून निर्मळपणाने जी संघटना करू पहातात, जे लोकशाही मार्गाने जाऊ इच्छितात, त्यांच्या वाटेत निखारे पेरले आहेत. परंतु गांधीजींनी दिलेली श्रध्दा घेऊन आपण जाऊ. जय की पराजय हा सवाल नसून सारे सहन करीत, न दमता, न थकता उत्कटपणे काम करणे एवढेच आपल्या हाती.

 

सार्‍या जातीपाती समान माना म्हणून म्हटले तरी जिच्या नेसू चिंधी अशी कातकरीण-, स्वच्छ इरकली पातळ नेसलेल्या, वेणीफणी केलेल्या भगिनीजवळ कशी बसणार? तिला बसू कोण देणार? बिहारमध्ये चंपारण्यात गांधीजी गेले. कस्तुरबांना म्हणाले, ''भगिनींना स्वच्छता शिकव.'' एक भगिनी कस्तुरबांना म्हणाली, ''आंग धुतले तर नेसू काय?'' सामाजिक विषमता नष्ट करायलाहि आर्थिक विषमता दूर करावी लागते. धार्मिक विषमता दूर करण्यासाठी सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे, कोणत्याही धर्माचा असो,-तो लायक असेल तर त्याला कामावर घेणे, धर्मामुळे भेदभाव न करणे, या गोष्टी हव्यात. परंतु सोलापूर म्युनिसिपालिटीने बस सर्व्हिस ताब्यात घेऊन मुसलमान कामगार काढले. एका मुस्लिम आझाद सैनिकाने, जो त्यात नोकर होता त्याने जाहीर पत्रकाने प्रसिध्द केले. म्युनिसिपालिटीत कोणाचे बहुमत आहे? ती गोष्ट खरी असेल तर किती वाईट!

स्वराज्यातील चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहिंसक रीतीने सरकारला विरोध दाखविण्याची मोकळीक असणें. गांधीजी म्हणत ''I am the greatest democrat'' - मी सर्वात मोठा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. परंतु आज काय आहे? बिहारमध्ये समाजवादी पक्षाच्या अधिवेशनाला मंडपही घालण्याची परवानगी मिळणे कठीण होत आले. विदर्भात समाजवादी अधिवेशनास परवानगी नाकारण्यात आली. सरकार लोकशाहीचे पुरस्कर्ते असते तर येता-जाता समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक ना करते. त्यांच्या मार्गात अडचणी ना आणते परंतु ''बिजली नाचेल गगनात'' हे सुन्दर नृत्यगीत पाहून आमच्या एका अहिंसक सहिष्णु मंत्र्यांनी कपाळाला आठया घातल्या. सेवादलाचे गाणे कशाला असे म्हणाले. पू. विनाबाजींनी धुळयाला सेवादलाच्या कलापथकाचा कार्यक्रम पाहून संतोष दर्शविला व खेडयापाडयांतून जा असे सांगितले. परंतु सेवादलाचे गाणे कानी पडताच या लोकशाही मंत्र्यांना अब्रह्मण्यम् वाटले! एवढी असहिष्णुता सत्यअहिंसेशी, सर्वोदयाच्या ध्येयाशी सुसंगत आहे वाटते? सेवादलाला लेझिमचीही बंदी; येथवर यांची अहिंसा गेली आहे. सेवादलात काहीही आकर्षक असता कामा नये. म्हणजे मुल तिकडे जाणार नाहीत, ही दुष्ट भावना मुळाशी. बाबारे, केवळ कायद्याने जनतेचे हृदये का मिळत असतात? दुसर्‍या  पक्षाला विधायक सेवाहि करू द्यायची नाही, कारण त्याच्या कानावर सेवेचे भांडवल जमा व्हायचे! बेळगावचे समाजवादी तरुण कार्यकर्ते म्हणाले, ''आमच्या साक्षरता वर्गांना मंजुरी मिळत नाही; मग मदत कोठून मिळणार?'' उदाहरणे कोठवर सांगू? समाजवादी म्हणजे सरकारच्या द्दष्टीने, काँग्रेसच्या द्दष्टीने राष्ट्रद्रोही लोक, धन्य त्या काँग्रेसची.

 

''तुका म्हणे व्हावी
प्राणासवे ताटी
नाही तर गोष्टी
बोलू नये''

आपण श्रध्दांजली वाहिली. त्यांना श्रध्दांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या ध्येयाला श्रध्दांजली. आज सर्वोदय, समन्वय अनेक
शब्द उच्चारले जात आहेत. सर्वांचा उदय व्हावा, सारे सुखी व्हावेत म्हणून प्राचीन ॠषीश्वरांपासून सारे सांगत आले. परंतु केवळ  शब्दोच्चाराने सारे सुखी कसे व्हायचे हा प्रश्न आहे. सर्वाचा उदय व्हावा म्हणूनच स्वराज्य हवे होते. परंतु सर्वांच्या उदयाची तीव्रता लागूल राहिली आहे का? भांडवलदारांना शतसवलती देऊन, आणखी काही वर्षे तुमचे कारखाने राष्ट्राचे
होणार नाहीत असे आश्वासन देऊन त्यांचा उदय सुरक्षित केला जात आहे. गरिबांचे काय? - हा प्रश्न आहे.

महात्माजींनी स्वराज्यात चार गोष्टी हव्यात म्हणून लिहिले होते. (१) आर्थिक समता, (२) सामाजिक समता, (३) धार्मिक समता (४) लोकशाही सरकारचे धोरण पसंत नसेल तर शांततेने विरोध दाखवायला परवानगी. या चार गोष्टी अजून किती दूर आहेत हे पाहिले म्हणजे दुःख होते. वेदना होतात. दिल्लीला महात्माजींनी म्हटले,... ''एक दिवसही स्वतंत्र हिंदुस्थान आर्थिक विषमता सहन करणार नाही.'' परंतु आज काय दिसते? शेतकर्‍याला दिलीत जमीन? काटकसर करून विकत घे असे सांगणे म्हणजे सर्वोदयी श्रध्दा नव्हे. शेतमजुराजवळ मालकीची जमीन नाही. त्याच्याजवळ दोन-चार बिघे जमीन विकत घेण्याइतके पैसे कधीही साठणार नाहीत हे का काँग्रेसी मंत्र्यांना माहीत नाही? चलनवाढीची सबब न सांगता जमीनमालकाला दीर्घ मुदतीची सेव्हिंग्ज सर्टिफिकिटे द्या आणि शेतमजुराला जमीन द्या. कानावर आले की, कोणी काँग्रेसचे बडे अधिकारी म्हणाले, पुढच्या निवडणुकीनंतर हे करावयाचेच आहे. तुमच्या निवडणुकीसाठी आज या लोकांना असेच सडत पिचत ठेवणार होय? गरीबांच्या चितेची होळी पेटत ठेवून त्यावर भावी निवडणुकीची भाकर भाजणार? दुसर्‍यांना सत्तालोलुप म्हणणार्‍या  या लोकांची ही सत्ता टिकविण्याची कारस्थाने पाहिली की किळस येतो. जो प्रकार शेतकर्‍याच्या बाबतीत तोच प्रकार कामगारांच्या बाबतीत. उत्पादन वाढवा, उत्पादन वाढवा म्हणून त्यांना येता जाता सारे डोस पाजीत आहेत. चार महिन्यांत १०० कोट नफा उकळणार्‍या गांधीभक्त मालकांसाठी का अधिक उत्पादन करायचे? ज्या कारखान्यात आपण श्रमतो तेथील माल जनकल्याणार्थ आहे, जनता पिळली जाणार नाही, काळा बाजार होणार नाही, तेथील नफा धनवंतांच्या विलास दगडी राजवाडयात उधळला जाणार नाही ही खात्री वाटली तर कामगार आनंदाने नाचत वाटेल तितका श्रमेल. परंतु जोवर गरिबांची होते होळी, बडयांची पिकते पोळी, - हे त्याला दिसत आहे तोवर त्याचा जीव अधिक उत्पादनात संपूर्णतया कसा रंगेल? एवंच, आर्थिक समता दूर आहे. आणि सामाजिक समता? जोवर शिक्षणाने, राहणीने, संस्कृतीने सर्व थर समान पातळीवर येत नाहीत तोवर सामाजिक विषमता तरी कशी दूर होणार?

   

आपल्या सर्व व्यवहारांत एक प्रकारची नैतिक तळमळ हवी. स्वराज्य लोकशाही म्हणजे थट्टा नाही, ही एक गंभीर वस्तू आहे. आपल्याला जनतेचे कल्याण करावयाचे आहे. एखाद्या जातीचे, पंथाचे स्तोम नाही माजवावयाचे. सार्वजनिक नीती म्हणून वस्तू आहे. इंग्लंडमध्ये प्रधानालाही त्याने सार्वजनिक वाहतुकीचा नियम मोडला म्हणून दंड करण्यात आला. परंतु आपल्याकडे काय प्रकार आहे? स्वराज्यात आपणच कायद्याची प्रतिष्ठा मानली पाहिजे. हातून बेकायदा काही झाले तर दिलगीरी दाखवावी. शिक्षा-दंड झाला तर भोगावा. अन्याय्य कायदे असतील तर त्यांच्या विरुध्द आपण जनमत तयार करू शकतो. परंतु जे कायदे जनतेचे जीवन नीट चालावे म्हणूनच केलेले असतील ते मोडणे पाप आहे. ते मोडून त्यात प्रतिष्ठा मानणे म्हणजे तर महान पाप आहे. तो माझ्या पक्षाचा, तो माझ्या जातीचा, तो माझ्या धर्माचा, तो माझ्या प्रान्ताचा, तो माझ आप्त, तो माझा सखा, असले संबंध न्यायालयासमोर थोर वर्तनाने हे जनतेला शिकवावयाचे आहे. आपण अजून सर्व राष्ट्राची सर्व समाजाची, अशी द्दष्टी  घेऊ शकत नाही. परंतु जोवर ही येत नाही तोवर लोकशाही म्हणजे एक थट्टा होईल. आलेले स्वातंत्र्य, मिळालेले स्वराज्य जर टिकवावयाचे असेल, कार्य जर करावयाचे असेल तर संकुचितपणा, क्षुद्रता, स्वार्थ इत्यादी गोष्टी आपण दूर करावयास शिकले पाहिजे. काही तरी सार्वजनिक भान आपणास आले पाहिजे. स्वराज्याच्या महान साधनाने आपणास मानव फुलवावयाचे आहेत. संस्कृती समृध्द करावयाची आहे. त्यासाठी अखंड साधना हवी. जीवन अनेकांगी आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात, सर्व व्यवहारात आपण साधकाच्या वृत्तीनेच वागण्याची धडपड केली पाहिजे. यालाच पुरुषार्थ असे म्हणतात. याचा अर्थ उत्तरोत्तर अधिक चांगले होण्याची खटपट करणे. एका अमेरिकन लेखकाने ''पुन्हा धर्माकडे'' म्हणून एक सुन्दर अनुभवजन्य पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने Betterism असा शब्द योजिला आहे. ''बेटरिझम'' म्हणजे माणसाने चांगला होईन, अधिक चांगला होईन-, हा ध्यास घेणे होय. चांगले कसे होता येईल? जीवन अधिक समृध्द, अंतर्बाह्य संपन्न कसे करता येईल? 'मी आणि माझे' हे तुणतुणे दूर करून, दुसर्‍याच्या सुखदुःखाचा जेव्हा आपण विचार करू, सेवा करू, दुसर्‍याचे चांगले करू, सर्वांचे स्वागत करू, अधिक लोकांशी मिसळायला लागू, तेव्हा अधिक चांगले होण्याचा मार्ग लाभेल. भारतीय जनतेला हे शिकावयाचे आहे. येथे अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जातिप्रजाती, अनेक धर्म यांचा संगम आहे. अशा देशांत जर खरी संस्कृती वाढवावयाची असेल तर मिळते - जुळते घेऊनच वागावे लागेल. वैराचा अभाव आणि विषमता नसणे ही रामराज्याची दोन लक्षणे होत. हीच व्याख्या गांधीजींनी केली होती. पण त्यांनी पाहिले की स्वराज्याचे दर्शन झाले नाही. तोच, वैराचे शमन होणे दूरच राहिले, वैराची अशी काही आग पसरली आहे की तिची क्वचितच तुलना असेल, हे पाहून स्वाभाविकच गांधीजी दुःखी राहात. ज्या वस्तूंचे पालन गांधीजींच्या जिवंतपणी आपण केले नाही ते आता केले पाहिजे. स्वराज्याची ही दोन लक्षणे आपण पूर्णपणे सिध्द केली पाहिजेत. हिंदुस्थानात इतके विविध समाज राहात आहेत मित्रभावचा पाठ शिकण्यासाठी होत असे आपण समजावे. आपल्या उदार संस्कृतीचा हा बोध जर आपण घेतला तर वैरभावही नाहीसा होईल आणि विषमताही समाप्त होईल. वैरभाव व विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे.

महात्माजींचा प्रथम श्राध्ददिन भारतातच नव्हे तर जगात पाळला गेला. ते भारताच्या द्वारा जगाचीच सेवा करीत होते. कारण येथे सर्व धर्म, सर्व संस्कृती. भारत म्हणजे मानवजातीचे प्रतिक. गांधीजी जगाचे हृदय झाले होते. त्यांच्यावरच्या आघाताने सारे जग क्षणभर निर्जीव झाले होते. सार्‍या  जगाने त्यांना श्रध्दांजली वहावी हे समुचितच होय.

श्राध्द अति पवित्र व मंगल वस्तू आहे. कृतज्ञतेची ती मधुर खूण आहे. ज्यांचे आपण श्राध्द करतो त्याला आपण श्रध्दापूर्वक स्मरतो. श्रध्दा चमत्कार जननी आहे. यजुर्वेदात म्हटले आहे की, अ-देवाला श्रध्द देवत्व देते. जो अ-देव आहे, ज्याच्या जीवनात दिव्यता नाही, अशा माणसाला जर अमर श्रध्दा मिळाली तर, त्याचे जीवन ज्वलंत होते, ते दैवी होते. श्रध्दा ध्येयाकडे घेऊन जाते. ध्येयाचा ध्यास लावते. सारे जीवन धगधगीत, रसरशीत होते. मग अन्य काही सुचत नाही, रुचत नाही.

 

नंतर बुध्ददेव त्या माणसाला म्हणाले, ''मित्रा, आता झोप; विश्रान्ती घे.'' तो मनुष्य झोपला. ''भगवान् तुम्ही त्याला धर्म शिकविण्याऐवजी खायला दिलेत, झोपायला सांगितलेत हे कसे?'' शिष्यांनी विचारले. बुध्ददेव म्हणाले, ''या माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोलले पाहिजे; तरच त्याला समजेल. उपाशी पोटी माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोला. त्याला अन्नदेव नेऊन प्रथम भेटवा.'' पोटभर लोक जेवू देत. नीट झोप घेऊ देत. मग त्यांच्याजवळ इतर गोष्टी बोलू. हिंदुस्थानातील कोटयवधी लोकांस भाकर आधी देऊ द्या. त्यांना आधी कोठला धर्म, कोठली संस्कृती? ते सारे-, 'आधी कळस मग पाया-,' असे होईल. कोटयवधी उपाशी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावयास जो उभा राहील, तो खरा धार्मिक, तो खरा हिंदू धर्माचा. तो खरा उपासक, जगन्मातेचा उपासक, परंतु स्वतंत्र झाल्याखेरीज व स्वराज्य आल्याखेरीज हे कसे जमणार?

स्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या विकासाला संधी. स्वातंत्र्य म्हणजे मुखसंपन्न होण्याचे साधन. अतःपर या देशात कोणी दुःखीकष्टी नको. सर्वांना स्वाभिमानाने जगता येवू दे. विकासाच्या आड दारिद्य येता कामा नये. ज्ञानविज्ञानाचा प्रकाश सर्वत्र जाऊ दे. स्वच्छता, आरोग्य येऊ दे. अन्याय जावू दे. उपासमार जाऊ दे. नको लाचलुचपत, नको वशिले, नको कोणी उन्मत्त. सर्वांची सरळ मान होऊ दे. सर्वांना वाव असूदे. सर्वांना अन्नवस्त्र मिळो, राहायला साधे-सुधे घरदार असो. मिरासदारी कोणाचीच नको. जमीन नसेल त्याला जमीन द्या. ते स्वतःच कसायला तयार असले म्हणजे झाले. कामगारांचे हितसंबंध आधी संरक्षले जावोत. अहिंसक रीतीने सर्वांना संघटना करण्याची मोकळीक असो. सरकारी सत्तेने कोणावर दडपण आणू नये. श्रमणार्‍यांनी आपली प्रतिष्ठा ओळखावी. मालकांनी नम्रता शिकावी. वरच्यांनी खाली यावे; खालच्यांनी वर चढावे. दोघांनी एकमेकांस भेटून रामराज्य निर्माण करावे.

स्वातंत्र्यात असें हे सारे आपणास निर्मावयाचे आहे. एक नवे युग अजमावयाचे आहे. एक नवी द्दष्टी अजमावयाची आहे. हे महान कार्य आहे. त्यासाठी सर्वांना संयम पाळायला शिकले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आपण एकमेकांच्या भावना ओळखावयास शिकले पाहिजे. सर्वांना सांभाळले पाहिजे. सर्वांना सन्मानिले पाहिजे. माझी जात, माझा प्रश्न, माझा प्रान्त, माझी भाषा, माझा धर्म असे सारखे म्हणणें बरे नव्हे, अखिल भारतीय द्दष्टी कधी विसरून चालणार नाही. एवढेच नव्हे तर आज भारती असूनही अतिभारती झाले पाहिजे. आपण जगाचे नागरिक एका अर्थाने झाले पाहिजे. म्हणून क्षुद्र कुंपने घालू नका. क्षुद्र घरकूल नका बांधू. विशाल द्दष्टी, व्यापक सहानुभूती याची अत्यंत आवश्यकता आहे. तरच संस्कृती फुटेल.

   

पुढे जाण्यासाठी .......