शनिवार, डिसेंबर 05, 2020
   
Text Size

संस्कृति व साहित्य

आन्तरभारतीचा विचार करताना गुरुजींची सर्वमावेशक दृष्टी भारतीय भाषाभगिनींना गुण्यागोविंदाने संसार करण्यात सांगत होती. साहित्य आणि संस्कृती यांचे परस्परांशी असलेले नाते तसेच चांगल्या साहित्याचे निकष या संबंधीच्या विचारांचा परिचय.....

राधाकृष्णन् गांधीजींना संस्कृतीची मूर्ती मानती होते. मानव्याचे प्रतीक मानीत होते. गांधीजींविषयी त्यांना किती आदर, केवढे भत्तिप्रेम ! राधाकृष्णन् यांनी 'संस्कृतीचे भवितव्य' म्हणून पुस्तक लिहिले आहे. त्याचा मराठी अनुवाद प्रसिध्द आहे. राधाकृष्णन् यांची संस्कृतीविषयक मते सर्व सुशिक्षित जगाला ज्ञात झाली आहेत.

सकळ संस्कृतीचा पाया प्रेम आहे. विवेकानंद म्हणत, ''ख्रिश्चन धर्म सांगतो, शेजार्‍यावर प्रेम कर.'' परंतु का प्रेम करावे. याचे कारण हिंदुधर्म देतो, वेदांत देतो. त्याच्या ठिकाणी तूच आहेस म्हणून तूच सर्वात आहेस. दुसर्‍याची हत्या म्हणजे स्वतःचीच. मानवी जीवन सुखी करायचे तर हा महामंत्र घेऊनच कार्यप्रवृत्त व्हायला हवे. हृदयशून्यता म्हणजे मानवी, जातीविषयी बेफिकीरी. हृदयशून्यता म्हणजे निर्दयता. जगात दुःख, दैन्य आहे; कारण हृदयशून्यता आहे. हे सारे माझे असे मानीन तर मी दुसर्‍याला छळणार नाही, पिळणार नाही. सर्वांना सुखी करण्यासाठी धडपडेन; म्हणून वेद घोष करतो, ''सर्वेऽपि सुखिनः सन्तु.''  म्हणून ज्ञानेश्वर घोषवतात, 'अवघाची संसार सुखाचा करीन!'

ही भारतीय संस्कृती, ही मानवी संस्कृती. रवींद्रनाथ म्हणतात, ''मनुष्याबद्दल प्रेम असल्याशिवाय कोठली संस्कृती? सामर्थ्य हे संस्कृतीचे माप नव्हे. मानवाच्या संस्थांनी नि कायद्यांनी प्रेमवृत्तीचा किती विकास केला यावरून संस्कृती मापली जाते. जेव्हा मानव निर्दय होतात, तेव्हा संस्कृती धुळीस मिळते. स्वातंत्र्यप्राप्ती, समता, न्याय यांचे खूप करणे म्हणजे संस्कृती नष्ट करणे. आसुरीपणा कराल तर संस्कृती जगणार नाही.'' राधाकृष्णन्, रवींद्रनाथ, विवेकानंद, महात्माजी, विनोबाजी, जवाहरलाल,-कित्येक वर्षापासून संस्कृती म्हणजे काय ते सांगत आहेत, आचरत आहेत. या संस्कृतीत अहिंसक समाजवाद आपोआप येतोच. राधाकृष्णन् परवा पुण्याला म्हणाले, ''धर्म म्हणजे भस्मे, गंधे नव्हेत. बाहेरची सोंगे, ढोंगे म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे सर्वाची धारणा होणे.'' सर्वांचे कल्याण म्हणजेच समाजवाद. राधाकृष्णन् मागे मद्रासला म्हणाले, ''कम्युनिझम का फोफावतो? तुम्ही पिळवणूक दूर कराल, सर्वाना अन्न-विस्त्र मिळेल असे कराल, सर्वांच्या विकासास संधी द्याल तर कशाला कम्युनिझम वाढेल?'' हिंदी सरकार जर निराळे धोरण न स्वीकारील तर कम्युनिझम कसा रोखला जाईल?

मानव संस्कती नि अहिंसक समाजवाद यांचा संदेश त्या विख्यात तत्त्वज्ञाकडून त्यांना मिळेल. गांधीजी याच गोष्टी आमरण शिकवीत होते आणि मारणार्‍यालाही प्रणाम करून भारतीय संस्कृतीचा परमोच्च बिंदू त्यांनी दाखवला.

 

पुढे जाण्यासाठी .......