शुक्रवार, सप्टेंबर 25, 2020
   
Text Size

स्वभावाशीं परिचय

राजवाडे रागीट होते. महाराष्ट्रांतील राष्ट्रीय शिक्षणाचे अध्वर्यु विजापूरकर त्यांस प्रेमानें दुर्वास म्हणत व कोल्हापुरास ते जें घर बांधणार होते तेथें या दुर्वासांसाठी ते एक स्वतंत्र खोली ठेवणार होते. राजवाडे कधी कोणाकडे उतरले तर त्यांच्या पोथ्या पुस्तकांची पोती, रुमाल त्यांच्याबरोबर असावयाचेच. 'माझ्या पुस्तकांस पोराबिरांनी हात लावला तर मी थोबाडीत देईन' असें प्रथमच सांगून मग ते तेथें रहावयाचे. म्हणजे मागाहून भांडण व्हावयास नको. आधीच हडसून खडसून असलेलें बरें. कधी कधी त्यांचा राग अनावर होई व त्या रागाच्या भरांत ते वाटेल तें बोलत. एकदां ग्वाल्हेरीस एका भिक्षुकाजवळ ते एक महत्वाची जुनी पोथी मागत होते. त्या भिक्षुकानें ती पोथी दिली नाही, तेव्हां संतापानें राजवाडे म्हणाले 'तुझ्या विधवा बायकोपासून मी सर्व पोथ्या घेऊन जाईन.' हेतू बोलण्यांतील हा कीं या पुस्तकांची व पोथ्यांची तुझ्या मरणानंतर तुझी बायको रद्दी म्हणून विक्री करील, वाण्याच्या दुकानांत माल देण्यासाठी मग या रद्दीचा उपयोग होतो. राजवाडे यांनी वाण्याच्या दुकानांतून कित्येक महत्वाचे कागद विकत घेतले होते. व-हाडांत एकदां हिंडतांना एका वाण्याच्या दुकानांत १-२ दौलताबादी जुने कागद त्यांनी पाहिले. त्या वाण्याजवळ आणखी ४-५ कागद होते. राजवाडे यांस ते कागद महत्वाचे वाटले म्हणून ते कागद त्यांनी वाण्याजवळ मागितले परंतु तो वाणी देईना. राजवाडे सांगतात 'मी ढळढळां रडलों तरी तो वाणी कागद देईना. शेवटी कनवटीचा रुपया फेंकला-तेव्हां त्या वाण्यास दया आली व ते कागद मला मिळाले.' असे महत्वाचे कागद ज्यांच्या घरांत असतात, त्यांना त्यांचे महत्व समजत नसतें; रुमाल बांधलेले धूळ खात असतात; फार तर दस-याच्या वेळेस त्यांची झाडपूस होऊन, त्यांच्यावर गंधाक्षता पडावयाच्या आणि घरांत कर्ता, मिळविता कोणी राहला नाही म्हणजे या पोथ्या रद्दी म्हणून वाण्यास विकावयाच्या असें नेहमी होत आलें आहे. राजवाडे यांनी या गोष्टी पाहिल्या होत्या व म्हणून त्यांनी त्या ब्राम्हणाजवळ पोथी मागितली असतां त्यानें दिली नाही म्हणून ते भरमसाट अशुभ बोलून गेले. परंतु त्यांचा हा राग त्यांना आलेल्या कटु अनुभवाचा परिणाम होता. अनेक अनुभवांचा तो उद्रेक होता त्यांच्या विक्षिप्तपणांतही व्यवस्थेशीरपणा होता, तसेंच त्यांच्या रागासही कांही तरी सबळ कारणें असत. निष्ठेनें कार्य करीत असावे. त्याच्यासाठी अनंत कष्ट करावे आणि स्वजनांकडून अल्पस्वल्प अशी मदतही होऊं नये अशा वेळी अशी जळजळीत वाणी तोंडांतून बाहेर न पडली तरच आश्चर्य. 'ज्याचे जळतें त्यास कळतें'-इतर कार्याविषयी उदासीन असणा-यांस या रागाचें, या क्रोधाचें आश्चर्य वाटेल व काय विक्षिप्त व आततायी हा राजवाडे असें ते म्हणतील परंतु राजवाडे यांस असे उद्गार काढावयास लावणारी माणसं आमच्या देशांत आहेत म्हणून मात्र आम्हांस वाईट वाटतें व राजवाडे यांच्या कार्यनिष्ठेबद्दलचा आदर दुणावतो आणि या महापुरुषाचें अंत:करण कसें कार्यासाठी तिळतिळ तुटत असेल तें मनास समजून येतें.

ईश्वरावर त्यांची आयुष्याच्या पूर्वार्धात श्रध्दा होती. परंतु पन्नाशी उलटल्यावर या मतांतही उलटापालट झाली. त्यांनी वयास ४६ वें वर्ष लागलें असतां जें उद्बोधक टिपण लिहिलें आहे, त्यात ते म्हणतात 'ईश्वराची कृपा भरपूर पाहिजे म्हणजे सर्व होईल.' हा विश्वास पुढें राहिला नाही. ईश्वर ही एक मानवी भ्रांत कल्पना आहे असें ते म्हणूं लागले. नास्तिकपणाकडे ते झुकूं लागले. परंतु समाजदेवाचें अमरत्व व अस्तित्व त्यांस मान्य होतें व त्यासाठी ते रात्रंदिवस खटपट करीत होते.

 

पुढे जाण्यासाठी .......