मंगळवार, जुन 02, 2020
   
Text Size

तीन मुले

‘बुधा, आता मी व मधुरी येथे बसतो. आम्ही खेळातली नवरानवरी. तू गाणे म्हण. श्लोक म्हण. आमचे तू लग्न लाव. मग आम्ही या माळा एकमेकांना घालू.’ मंगा म्हणाला.
‘पण मीच होता नवरा. तू आमचे लग्न लाव.’ बुधा म्हणाला.

‘तू नाही, मी फुले आणली, आणि आता तू आपला नवरा होणार का?’ मंगा रागाने म्हणाला.
‘मधुरी का फक्त तुझी?’ बुधाने विचारले.
‘हो, माझी.’ तो म्हणाला.
‘माझीही आहे. मी तिच्याजवळ बसेन.’

‘बघू कसा बसतोस तो.’ तुला खाली फेकीन.
दोघांची झोंबी सुरु झाली. बुधाला मंगाने पाडले. मधुरी भांडण सोडवीत होती. ती रडू लागली. ‘हे रे काय माझ्यासाठी भांडता?  मी जातेच मुळी. आजपासून मी बंदरावर येणार नाही.’ मधुरी  म्हणाली.
‘तू माझी आहेस.’ बुधा म्हणाला.

‘माझी आहेस तू.’ मंगा म्हणाला.
‘मी तुमच्या दोघांची नवरी होते. चालेल?’ लटोपटीच्या लग्नात सारे जमते. एकदा तू बस माझ्याजवळ, एकदा तू बस.’ मधुरी म्हणाली.
‘पहिल्याने मी बसेन. पहिला माझा हक्क. ये मधुरी. बुधा, म्हण शुभमंगल सावधान.’ मंगा म्हणाला.

मधुरी व मंगा जवळ जवळ बसली. बुधा कविता म्हणू लागला. शुभमंगल सावधान म्हणू लागला. मंगा व मधुरी यांनी एकमेकांस माळा घातल्या.
‘आतामला बसू दे.’ बुधा म्हणाला.

‘ये बस.’ मधुरी म्हणाली.
आता मंगाने श्लोक म्हटले. दोघांनी त्याच माळा पुन्हा एकमेकांस घातल्या. तिघे आनंदली. मंगाने दोन्ही माळा शेवटी मधुरीच्या गळयात घातल्या.
‘आपण आजीबाईकडे जाऊ.’ मंगा म्हणाला.
‘गळयात माळा घालून?’ मधुरीने विचारले.
‘हो आजीबाई हसेल. लग्न झाल्यावर पाया पडावे लागते.’ बुधा म्हणाला. तिघे धावत पळत म्हातारीकडे आली. मधुरीला पाहून म्हातारीला हसू लागले.

‘फुलांनी सजून देवीच झाली आहेस!’ आजीबाई म्हणाली.
‘आजी, आज मधुरीचे लग्न लागले.’ मंगा म्हणाला.

‘कोणाशी रे?’ तिने हसून विचारले.
‘आम्हा दोघांशी.’ बुधा म्हणाला.
‘होय का ग मधुरी?’ म्हातारीने विचारले.

 

पुढे जाण्यासाठी .......

तीन मुले