गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

श्यामची आई

सावित्रीव्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्या वेळेस मी आठ-नऊ वर्षांचा असेन. सावित्रीव्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात तीन दिवस वडाला १०८ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती.

आईने 'श्याम' अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, 'काय आई? काय होते? पाय का चेपू?

आई म्हणाली, 'पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुध्दा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू?'

आईचे ते करूण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, 'श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो. पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे, करशील ना तू बाळ?'

"कोणते काम? आई मी कधी तरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले.

आई गहिवरून म्हणाली, 'नाही. तू कधीसुध्दा नाही म्हणत नाहीस, हे बघ, उद्यापासून वट-सावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला १०८ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन. पूजा करीन. तीन प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ.'

असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करूण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले.

"आई! माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील?' मी विचारले.  'चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा. माझाच जणू भाग! माझेच तू रूप! तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे हे देवाला माहिती आहे.' आई म्हणाली.

"पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत ' अहाऽ रे बायको! असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार! शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील.' अशा अनेक सबबी मी सांगू लागलो.

आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली 'श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम! त्या दिवशी चुलीमागचा खोब-याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले. पण बोलल्ये नाही. जाऊ दे. मुलाची जात आहे. परंतु त्या वेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडवप्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन हो. येऊन-जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम! तुमच्यासाठीच जगत्ये रे-' असे म्हणून आईने डोळयांना पदर लावला.

आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. 'देवाचे काम करावयास लाजू नको; पाप करण्याची लाज धर-' थोर शब्द! आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरूरी आहे? देवाच्या कामाची देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची, आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी-सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई