गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

इंदूरकडे प्रस्थान

सखाराम व मालती आगगाडीत बसली. मालतीच्या जीवनात एक निराळा प्रयोग सुरू झाला. नवीन प्रयोग. सखाराम सर्व देशात भटकून आलेला, मालती कधी बाहेर न पडलेली. परंतु तिला अपार उत्साह वाटत होता.

एका स्टेशनवर रामफळे आली होती.

“भाऊ, घेतोस का? त्यांना रामाच्या फळांची भेट नेऊ.” मालती म्हणाली.

सखारामने ती रामफळे घेतली. मालतीने ती करंडीत हलकेच ठेवली.

ती बाहेर बघत होती. काय बघत होती? गाडी भरधाव जात होती. तिचे विचारही धावत होते. तिचे मन घनाकडे कधीच गेले होते. परंतु हे मातीचे शरीर,-- याला जायला वेळ लागतो.

सायंकाळ होत आली. सुंदरपूर जवळ आले. गिरणी दिसू लागली. नदीचा पूल आला. तिकडे घाट दिसत होता. एका बाजूला टेकडी होती. घाटावरील देवळे पाहून मालतीने प्रणाम केला. गाडीचा वेग कमी होत होता. मालतीच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढत होता. घनाजवळ काय बोलू. कसे त्याच्याकडे बघू, हसू की गंभीर असू,-- ती मनात ठरवीत होती. परंतु काही ठरेना. कृत्रिमता कशाला? हृदयातील भाव तोंडावर उमटू देत. सूर्य दिसल्यावर कसे फुलायचे ते फुले का ठरवीत असतात? सूर्यफूल का योजना आखते? वसंत ऋतु आला म्हणजे कसे कुऊ करायचे ते का कोकिळा ठरवते? हे सारे सहज होत असते.

हे बघा स्टेशन. अपार गर्दी आहे! गाडी थांबली.

‘कामगारांचा विजय असो. घनश्याम जिन्दाबाद, सखाराम जिन्दाबाद.’ असे जयघोष झाले. परंतु घना कोठे आहे? मालतीचे डोळे भिरीभिरी सर्वत्र बघत होते, तिला तिचे निधान आढळले नाही!

“हे घनाच्या वतीने हार. त्यांच्या हातच्या सुताचे त्यांनी मुद्दाम काढून ठेवले होते.” रामदास म्हणाला.

“ते कोठे आहेत?” मालतीने विचारले.

 

पुढे जाण्यासाठी .......