गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

इंदूरकडे प्रस्थान

“हे का तुमच्या हातचे सूत?” त्याने विचारले. “हे माझ्या सुतासारखे आहे.” घना म्हणाला.

“तुमचे हात नि माझे हात का निराळे आहेत? तुम्ही आमच्यासाठी पाठवलेला हा हार मी तुमच्यासाठी आणलेला आहे. दोघांना एकच हार!”

“तुम्ही म्हणे काल बांगड्या दिल्यात?”

“तुम्ही तर सारे जीवन दिले आहे.”

“सखाराम, तू आलास म्हणून माझी चिंता दूर झाली.”

“तुम्ही भाऊला ‘तू’ म्हणता व मला ‘तुम्ही’ म्हणता!”

“स्त्रियांचा मान मोठा.”

“आपल्या देशात मोठी नावे देऊन तुच्छ लेखण्याची वृत्ती आहे. आचा-याला महाराज म्हणतात! भंग्याला मेहतर म्हणतात! मेहतर म्हणजे महत्तर-फार मोठा. होय ना रे भाऊ?”

“होय. मेहतर महाराजच.” सखाराम हसून म्हणाला.   

“संपाविषयी काय वाटते?” घनाने विचारले.

“अजून तर आरंभ आहे. दहावास दवस गेल्यावर खरी कसोटी. हा पगार हातात आहे म्हणून धीर आहे. महिनाभर समजा संप चालला तर पुढे काय? जवळ पैसा नसेल. दुकानदार उधार देणार नाहीत.”

“दुकानदार देतील उधार. दुकाने फुटली जातील – अशी त्यांना भीती वाटेल.”

“परंतु एकंदरीत सत्त्वपरीक्षा पुढेच आहे. बायका किती टिकाव धरतील ते खरे. मुलेबाळे असतात. त्यांच्यावर घरची जबाबदारी. ओलासुका तुकडा दुपारच्या वेळेला देता आला पाहिजे? बघू या. तुझ्या खटस्याचे काय?”

“दुसरा मॅजिस्ट्रेट येत आहे तोवर नाही, असे कळते.”

“मला तर कळले की हाच मॅजिस्ट्रेट तडकाफडकी निकाल देणार आहे. मालकाने त्याचा खिसा चांगलाच गरम केला आहे असे कळते!”

“अपील करता येईल.” मालती म्हणाली.

“परंतु दिवस मोडतात. इकडे संप चालला आहे.” सखाराम गंभीरपणे म्हणाला.

 

पुढे जाण्यासाठी .......