मंगळवार, आँगस्ट 04, 2020
   
Text Size

सार्वजनिक कामगिरी

फिलॅडेल्फिया शहरांत एक संघ स्थापन करावा असें बेंजामिनच्या मनांत घोळू लागलें. मनांत कल्पना आली कीं ती कृतींत आणण्यासाठीं बेंजामिन लगेच धडपडूं लागे. संघ एक दिवस स्थापन तर झाला. या संघांत प्रथम १२ च लोक होते. या संघाच्या बैठकी भरत व निरनिराळे विषयांची तेथें चर्चा होई. या संघाच्या बैठकी भरत व निरनिराळे विषयांचीं तेथें चर्चा होई. धार्मिक, सामाजिक वाड्मयविषयक, शास्त्रीय अशा तत्वात्मक व व्यवहारात्मक सर्व गोष्टींची येथें चर्चा होई. बेंजामिन निरनिराळया सुंदर व स्वतंत्र कल्पना, व नवीन विचार या सभेंतील सर्वासमोर मांडी. मग त्यांवर वादविवाद, सूचना वगैरे येत. बेंजामिन या सभांतील चर्चाची हकीगत आपल्या वृत्तपत्रांतून जाहीर करी.

या सभेमधील कामाची लोकांस जसजशी माहिती होऊं लागली, तसतसे या सभेचे सभासद होण्याबद्दल लोक फार उत्सुक झाले. परंतु १२ च सभासदद घ्यावयाचे अशी अट असल्यामुळें सभासदांची संख्या वाढवितां येईना व त्यामुळें लोक असंतुष्ट झाले. शेवटीं बेंजामिन यानें एक खाशी युक्ति काढली. तो म्हणाला आपल्या १२ सभासदापैंकी प्रत्येकानें निराळा १२ जणांचा संघ स्थापन करावा. आपण एकत्र आल्यामुळें जसा आपणांस फायदा होतो, तसा फायदा या रीतीनें १४४ जणांस मिळेल. बेंजामिनची ही कल्पना सर्वास आवडली व अनेक विचारप्रवर्तक संघ त्या लहानशा शहरांत स्थापन झाले. या सर्व संघाची सामुदायिक बैठक मधूनमधून भरत असे. त्यांचीं संमेलनें पण होंत असत.

ही सभा जी असे ती केवळ निरर्थक गप्पांसाठीं नसें. या ठिकाणीं निरनिराळे महत्वाचे प्रश्न बेंजामिन उपस्थित करी. या प्रश्रांचा प्रत्यक्ष व्यवहारांत फायदा होईल इकडे बेंजामिनचें लक्ष असे. तो केवळ कल्पनासृष्टींत रमणारा नसून वस्तुस्थितींत कल्पना मूर्तिमंत आणणारा होता. त्यानें आपल्या सभेंत पुढील चार गोष्टींची चर्चा केली.

१.  फिलॅडेल्फिया शहरांतील रस्ते सुधारणें, ते विटांचे करणें; रात्री दिवे रस्त्यावर लावण्याची व्यवस्था करणें.

२.  धुराडीं सुधारणे.

३.  अग्निसंरक्षक संघ स्थापन करणें.

४.  रात्रीच्या वेळीं शिपायांचा पहारा असण्याची व्यवस्था करणें व या पहा-यासाठीं उत्पन्नाप्रमाणे कर बसविणें.

या सुधारणांसंबंधी जी चर्चा खासगी बैठकीत होई तो बेंजामिन वृत्तपत्रांत प्रसिध्द करी. वृत्तपत्रांत त्या सुधारणांचा सर्व दृष्टीने तो विचार करी, व लोकांचें मन वळविण्याचा प्रयत्न करी. हळुहळु बेंजामिनच्या प्रयत्नानें वरील सुधारणा अंमलांत आल्या. आग लागली असतां ती विझविण्यास जाण्यासाठी ही संघस्थापनाची कल्पना मोठी अपूर्व हाती. बेंजामिनच्या या कल्पनेपासूनच हल्लींचे ' फायरब्रिग्रड ' खातें निघालें. रात्रीं गस्त घालणें वगैरे प्रकार अमेरिकेंत बेंजामिननेंच प्रथम चालू केले.

या अत्यंत महत्वाच्या चार सुधारणा केल्यानंतर त्याचें लक्ष शिक्षणाकडे वळलें. लहान मुलांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे होती. या कामासाठी पांच हजार पौंड रकमेची जरूरी होती. बेंजामिननें एक पत्रक छापून काढलें व तें प्रमुख लोकांकडे पाठवून दिलें. ही रकम गोळा झाली व बेंजामिननें शाळा सुरूं केली. विद्यालयाचें कांही वर्षानीं महाविद्यालय (कॉलेज) पण निघालें व हल्लींची जी फिलॅडेल्फिया युनिव्हसिर्टी आहे ती या लहानशा शाळेंतूनच जन्मास आली.

 

पुढे जाण्यासाठी .......