सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

प्रवेश पहिला

(अभंग)
जल्प देऊनीया । जन मारायासी । दरिंदळ देशी । काय देवा ॥ ध्रु॥
वितयाची माया । काय ही म्हणावी । अन्नावीण यावी । तूटी काय ॥१॥
गरिबीची दोरी । पडे, कीं अपूरी । क्षणीं न घेणारी ।पंचप्राणा ॥२॥
मृत्यूच्याहि पेक्षां । करी हाल भारी । देवा सुरी बरी । प्राण घ्याया ॥३॥
कृपाळु पिता तूं । मारीं न लेकरूं । न तूं पापभीरू । देवा काय ॥४॥


कुत्रासुध्दां नाहीं खायचा आमचे हाल ! आम्ही काय असं पातक मागलया जन्मात केलं व्हतं कीं, म्हाराच्या पोटी आम्हांस घातलंस ? दिवस भर मरमर कुठंतरी काम करावं, अन् कसातरी गुजराणा करावा; पण अशी दुखणींबाणीं आली म्हणजे काम करायला तरी कुठं जातां येतं ! (राघू डोळे उघडतो.)

राघू -  बाबा, तुम्ही जा ना कामावर ! मी अगदीं नीट पडून राहीन. बय नाही आली अजून ?

पांडू -  ती किनाई अंगारा आणायला गेली आहे ! मी तुला सोडून कसा जाऊं ?
( नारायण प्रवेश करतो.)

नारायण - आपलाच मुलगा आजारी आहे का ?

पांडू
-  होय महाराज, पण आपण कोण ? आपणास काय पाहिजे ?

नारायण - मला दुसरं कोणी नको. मी तुमच्याकडेच आलों आहें.

पांडू - आम्हा म्हारांकडे ?

नारायण - होय. मी रोज या ओळींत येऊन म्हारवाडयांत कुणी आजारी आहे कीं काय याची चौकशी करतों. मला कळलं कीं, तुमचा मुलगा फार आजारी आहे; म्हणून आपणांस मदत करण्यासाठीं मी आलों आहे. मी त्याच्याजवळ रात्रीं येऊन बसत जाईन, म्हणजे तुम्हांस झोंप मिळेल !

पांडू - थोर मनाचे आहांत तुम्ही, रावसाब; पण तुम्ही तर थोर कुळीचं दिसतां ! तुमच्या आईबापांस कळलं तर ते तुम्हांस घरांत घेणार नाहींत. आ. हीं जातीनं महार, नीच जात. आम्हीं कोल्ह्याकुत्र्यांच्या संगतीत रहावं. महाराज, जा आल्या पावलीं माघारें जा. असं पाहूं नका. देव तुमचं भलं करील. जा, जा, झटकन् कुणीं पाहिलं नहीं तों माघारें परता !

 

पुढे जाण्यासाठी .......