सोमवार, सप्टेंबर 28, 2020
   
Text Size

क्रांती

२९. भविष्यवाणी

माहेराहून माया मनोहर बालक घेऊन परत आली होती. प्रद्योतचे लग्न लावून आली होती. गीतेचा व दयारामचा विवाह झाला होता. आश्रमाला मीनाच्या वडिलांची मदत आली होती. क्रांती सर्वांची होती. एकाच पाळण्यात कधी क्रांती व कधी क्रांतिकुमार यांना झोपवण्यात येई.

मोहनने मरता-मरता केलेला पाळणा गीता म्हणे आणि माया, तीही एक पाळणा म्हणे. मुकुंदरावांनी तो पाळणा मायेला कधीच करून दिला होता. तो पाळणा बंगालमध्ये बाळ पाळण्यात घालताना म्हणण्यात आला होता. माया गोड आवाजात पाळणा म्हणे. गीता एके दिवशी म्हणाली, ''मला उतरून घेऊ दे तुमचा पाळणा. माया म्हणू लागली व गीता उतरून घेऊ लागली.

बाळा जो जो रे । बाळ जो जो रे ।
सुख-कंदा, अभिनवपरमानन्दा, बाळा जो जो रे ॥ धृ.॥

तू भगवंताचे, सानुले रूप परम चांगले,
आलासी भुवनी, सुंदरा,मनोहरा, सुकुमारा ॥बाळा.॥

तू शुभ मंगल, उज्ज्वल, महाराष्ट्र बंगाल -
ऐक्याची मूर्ति, निर्मळ, तेजाळ, स्नेहाळ ॥ बाळा.॥

भेदाभेद किती भारती, नष्ट करायासाठी
आली तव मूर्ती, मोहना-अतुल-मधुर लावण्या ॥ बाळा.॥

रोमी-रोमी तुझ्या, सुस्वर-वरदा, भागिरथी नी गोदा
मातांचे प्रेम, अनुपम, विपुल, विमल, उत्तम ॥बाळा.॥

बाळा मोहना, भूषणा, निजकुलनवमंडना
भूषण संसारा, तू होई होई, भारत विभवी नेई ॥बाळा.॥

तू आमची आस, उल्हास, सुखद बंधुवृंदास
झिजुन अहोरात्र, हो पात्र, होई पवित्र-चरित्र ॥ बाळा.॥

सद्गुण लेणी तू, लवोनी, शीलावर पांघरुनी
प्रेमाची वंशी, वाजवी, भारतभू हर्षवी ॥ बाळा.॥

होई वीर गडया, मार उडया, करि क्रांतीचा झेंडा
बळकट दृष्ट धरुनी, क्रांती करी, भारतभू उध्दरी ॥ बाळा.॥

हो दीर्घायुषी, होई ऋषी व सत्कीर्ती वधूसी
हेचि मागतसे प्रभूपाशी, देवो करुणा-राशी ॥ बाळा.॥

''गोड आहे नाही पाळणा?'' मायेने विचारले.

''परंतु मोहनचा अधिक परिणाम करतो.'' गीता म्हणाली.

 

पुढे जाण्यासाठी .......

क्रांती