सोमवार, जानेवारी 18, 2021
   
Text Size

सती

मैनेने सावकारांची मनधरणी केली. सावकारांनी वाडयाचा काही भाग ठेवला, बाकीचा ताब्यात घेतला. मैनेचा तो महाल तिच्या ताब्यात ठेवण्यात आला होता. वासुदेवराव त्या महालातील पलंगावर पडलेला होता. ज्या महालात येण्यासाठी पूर्वी तो लाळ घोटी, त्या महालात आता तो रात्रंदिवस होता. ज्या मैनेजवळ घटकाभर बसावे, असे पूर्वी त्याला वाटे, ती आता सारखी त्याच्याजवळ बसलेली होती. तिचा हात हातात घ्यावा, असे त्याला वाटे, तिचा हात आता सारखा त्याच्या हातात होता. वासुदेवराव म्हणजे जणू लहान मूल. त्याचे सारे करावे लागे. मैना त्यांचे तोंड धुवी, त्यांचे डोळे पुशी, सारे करी.

मैना आता गोपाळाकडे जातनाशी झाली. रात्रंदिवस तो त्या महालात असे. वृध्द पतीची सेवा करीत असे.
'मैने, गोपाळाकडे का जात नाहीस?' तो वाट नसेल का बघत? मी येथे पडून राहीन. जा, जाऊन ये.' पती म्हणाला.
'या बाह्य मैनेची गोपाळाला जरूर नाही. त्याच्या हृदयात चिन्मय मैना नेहमीच मंजूळ गाणी गात आहे. तुम्हाला माझी जरूर आहे. खोकला आला तर? गोपाळाकडे नको आता जायला. मी गोपाळाकडे जात असे, म्हणून तुम्हाला काय वाटे?

'प्रथम वाईट वाटले, अब्रू जाते असे वाटले; परंतु नंतर मी शांत झालो. तू करतेस त्यात अयोग्य काही नाही, असे वाटले. मैने, मी पापी आहे. मला क्षमा कर. माझे मरण मला डोळयांसमोर दिसत आहे. सारी संपत्ती मला सोडून गेली. सारे लोक सोडून गेले. बायका सोडून गेल्या. आता प्राणही मला सोडून जातील. मैने, तू मात्र सोडले नाहीस. जा, तूही सोडून जा. मी तुला परवानगी देतो. त्या तिघी माहेरी गेल्या. परंतु त्यांनी विचारलेही नाही. जातो असे सांगितलेही नाही. मी त्यांच्या दृष्टीने मेलेलाच आहे. लग्न लागले त्याच क्षणी मी मेलो. का बरे त्यांनी मला विचारावे? खायलाप्यायला दिले म्हणून? दागदागिने दिले म्हणून? मैने तूही का नाही जात? का नाही दागदागिने घेऊन गेलीस? जा. गोपाळाकडे गेलीस, कायमची गेलीस तरी चालेल. मी नावे नाही ठेवणार, तीच खरी धर्ममय गोष्ट होईल. येथे राहणे हाच अधर्म. मैने, जा हो तू. येथे राहणे म्हणजेच ओझे, म्हणजेच मला आभार, उपकार नकोत. कोणाचे उपकार मला येथे किडयाप्रमाणे, माझ्याच घाणीत मरू दे. माझ्या पापांचा नरक मला येथेच मरताना अनुभवू दे. मैने, जा. नको चेपू माझा हात, नको चेपू पाय. ही हाडे आता जळायची आहेत. काय करायचे चेपून? या घाणीत तू कशाला राहतेस? घाण येते माझ्या तोंडाला, माझ्या श्वासाला, माझ्या थुंकीला, माझ्या मनाला, कोणी जवळ येत नाही. कोणी माझी वस्त्रे धुवायला धजत नाही. तू कशाला जवळ बसतेस? जा, तू जा. या पाप्याला एकटाच मरू दे.'

मैना काही बोललो नाही. वासुदेवराव बोलून थकले. ती आता त्यांची सेवा करीत होती. अनाथाची सेवा. जगाने टाकलेल्याची सेवा. ती स्थितप्रज्ञाप्रमाणे तेथे बसे. कपाळावर आठी नसे; कंटाळा नसे. आदळआपट नाही. काही नाही.

गावातील लोकांना मैनेच्या वर्तणुकीचे आश्चर्य वाटे. उदबत्ती आता नदीपलीकडे जाताना दिसेना. म्हाता-या नव-याची ती रात्रंदिस सेवा करीत आहे. ही गोष्ट ज्याला-त्याला कळली. सर्वांना कौतुक वाटले. नावे ठेवणारे वानू लागले. टीका करणारे गप्प बसले. मैना म्हणजे जणू एक कोडे होते. हे कोडे कोणाला सुटणार, कोण सोडवणार?

त्या दिवशी सकाळची वेळ होती. मैनेने सारा महाल स्वच्छ केला होता. उदबत्ती लावलेली होती. खिडकीतून सुगंधी वारा मंद-मंद येत होता. सूर्याचा प्रकाशही आत आला होता. गणेशपंत वैद्य नाडी पाहण्यासाठी आले होते. त्यांनी आत पाऊल टाकले व ते स्तब्ध उभे राहिले.

'या गणेशपंत' मैना म्हणाली.
'तुमची धन्य आहे!' ते म्हणाले, थोडा वेळ थांबून ते पुन्हा म्हणाले, 'जिवंतपणी वासुदेवरावास तुम्ही स्वर्ग देत आहात. अपकार करणा-यावर   उपकार करीत आहात. तुमच्या जीवनाची माती करणा-याची सेवा करीत आहात. तुम्हाला प्रणाम.'

गणेशपंतांनी मैनेला प्रणाम केला. ते पाटावर बसले. वासुदेवरावांकडे त्यांनी पाहिले.
'नाडी बघा.' मैना म्हणाली.
'पाहण्याची जरूरी नाही.' वैद्य म्हणाले.

'हात हातात घ्यायला घाण का वाटते?' तिने विचारले.
'तुमच्यादेखत तरी वाटणार नाही. तुम्ही समोर असलात, म्हणजे कर्तव्याचा पंथ दिसेल.' ते म्हणाले.
'काय वाटते तुम्हाला?'
'औषधे आता नकोत, चाटणे नकोत, मात्रा नकोत. रामनाम त्यांना ऐकवा. भगवद्गीता ऐकवा.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती