रविवार, मार्च 07, 2021
   
Text Size

पतीच्या मदतीस

आज हजारो वर्षे आम्ही हरिजनांस दूर ठेवले. कधी होणार हे पाप दूर? ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांस हिंदू समाजापासून जणू कायमचे अलग करण्याचे ठरविले. महात्माजी या गोष्टीला विरोध करण्यासाठी प्राण हाती घेऊन उभे राहिले.

हिंदू समाजा, कधी तुझे डोळे उघडणार? हिंदुस्थानात आज जी मुसलमानांची संख्या आहे ती हिंदुधर्मातील स्वधर्मीयांविषयीच्या अनुदारतेचे फळ आहे. ज्या जातींना आम्ही तुच्छ मानीत होतो अशा जातीच्या जाती मुसलमानी धर्मात गेल्या. ख्रिश्चन धर्म आल्यावर हजारो तिरस्कृत लोक ख्रिश्चन होऊ लागले. सनातन्यांनो! ही गळती कधी थांबणार?

प्रेमाला तिचे लहानपणचे विचार आठवले. तो सत्यनारायण, तो बहिष्कार, ते आईचे मरण, सारे तिला आठवले. चार पाच कोटी लोक! केवढी शक्ती आपण फुकट दवडीत आहोत!

आपली इस्टेट अस्पृश्योद्धारास देऊन टाकावी असे तिला वाटू लागले; परंतु उपवासाचे काय होणार? महात्माजी वाचणार का?

उपवास सुटला. तडजोड झाली. देशभर आनंद झाला. प्रेमाने प्रभूची प्रार्थना केली आणि तिचा पतीही दोषमुक्त होऊन सुटला.

पतीला भेटावे का? पाहावे का? माझ्या सरोजाचा जन्मदाता पिता! जायचे का त्याला भेटायला? तिचे काही निश्चित होईना. पतीला भेटायचे तिला धैर्य झाले नाही. पतीची तिला खात्री वाटेना. ती दरिद्री असती तर जाऊन भेटली असती; परंतु ती आज श्रीमंत होती. त्या श्रीमंतीने पती पुन्हा पापपंकात बुडेल असे तिला वाटे.

परंतु आता ती श्रीमंती तिलाही भोगवेना. ती जमिनीवर निजे. एक वेळ साधे जेवी. प्रेमा जणू तपस्विनी झाली.

 

पुढे जाण्यासाठी .......