मंगळवार, जुलै 07, 2020
   
Text Size

सदिच्छेचे सामर्थ्य

मिरवणूक संपली. महासनावर साधूमहाराज बसले. राजाने त्यांची पूजा केली. नंतर साष्टांग प्रणाम करुन राजा म्हणाला, “हजारो लोक जमले आहेत. दोन उपदेशाचे शब्द सांगा.”

साधूमहाराज उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतर सारे शांत झाले. साधू म्हणाला, “मी काय सांगू ? मी एकच गोष्ट सांगतो. दुस-याला कधी दुःख देऊ नका, दुसरा तुमचे भले चिंतील अशा रितीने वागत जा. सर्वांना तुम्ही हवेसे वाटाला असे वागत जा. मनुष्य  जन्मतो तेव्हा स्वतः रडतो परंतु इतरांना आनंद होतो. आता असे मरा की, तुम्हाला मरताना आपण चांगले वागलो असे मनात येउन आनंद वाटेल व असा चांगला मनुष्य मरणार असे मनात येऊन लोक रडतील. लोकांची सदिच्छा, लोकांचे आशीर्वाद हेच आपले सुःख. राजा, तू नीट वागत नव्हतास. तुझा राज्यकारभार चांगला नव्हता. लोक म्हणत,

“राजा म्हणजे पीडा. कधी सरेल ही पीडा.” त्यामुळे तू व्याधीने पीडलास. परंतु तुझा कारभार कल्याणमय होऊ लागताच “किती चांगला राजा” असे लोक म्हणू लागले. तुझा रोग हटला. प्रजेच्या आशीर्दात राजाचे बळ, प्रजेच्या शापात राजाचे मरण, म्हणून सर्वांनाच सांगतो की, चांगल्या रीतीने वागा. एकमेकांचे शिव्याशाप न घेता एकमेकांचे आशीर्वाद घ्या. आणि हा संसार सुखाचा करा. पृथ्वीवर स्वर्ग आणा.”

 

पुढे जाण्यासाठी .......