रविवार, ऑक्टोबंर 20, 2019
   
Text Size

रात्र छत्तिसावी

तेल आहे, तर मीठ नाही!

"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस?' भिकाने विचारले.

'आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले.' गोविंदा म्हणाला.

इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. 'अलीकडे श्यामचे मन दु:खी आहे. ते त्याचे दु:खी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे.' राम म्हणाला.

'सर्व सिध्दीचे कारण । मन करा रे प्रसन्न ॥'

असा तुकारामाचा चरण आहे.

'श्याम कोठे गेला आहे, गोविंदा?' रामने विचारले.

'ते मघा तर वरती होते.' भिका म्हणाला.

'ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते, तरी बरीच आजारी आहे म्हणतात.' गोविंदा म्हणाला.

'काय एकेक नाव? ऐलाबाई हे काय रे नाव? भिकाने विचारले. 'अरे, ऐलाबाई, म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो. तो म्हणाला.

यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला.

'काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले.

'काही नाही. ती ऐलाबाई कशी आहे?' त्याने विचारले.

'तिला गावाला पाठविली त्यांनी.' श्याम म्हणाला.

'बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत.' भिका म्हणाला.

'कोणाला माहीत? आपण तरी काय करणार? श्याम म्हणाला.

'भिका! आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते.' भांडयाकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला.

'जसे कापूस पिंजता तुमचे नव्हते.' भिका म्हणाला.

'का? आजचे पेळू चांगले नाही का झाले?' श्यामने विचारले.

त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे.' गोविंदा म्हणाला.

'माझे तर सूत तुटत नव्हते.' श्याम म्हणाला.

'तुमचे पेळू पहिले असतील.' भिका म्हणाला.

'नाही, रे; आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविलेले पेळू मी माझ्या पुडीत ठेवले होते.'

'मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल, म्हणून बदलले होते.' गोविंदा म्हणाला.

'श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही.' राम म्हणाला.

'झोप येत नाही, तर काय करू ? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो.' श्याम म्हणाला.

'झोप न यायला काय झाले ? आम्हांला बरी झोप येते ?' राम म्हणाला.

'तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसा तप करावे लागते. शरीर झिजवावे लागते.' श्याम म्हणाला.

'तू नाही वाटते काम करीत? सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास.' राम म्हणाला.