गुरुवार, नोव्हेंबर 14, 2019
   
Text Size

'परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये, असे तुम्हांला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ?' श्यामने विचारले.

'तुला बरे वाटत नव्हते, म्हणून काम करू दिले नाही. त्यांनी,' राम म्हणाला.

'लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे.' गोविंदा म्हणाला.

घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थने नंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरूवात केली.

आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात सा-याचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारळयात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यांवरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुध्दा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे. काय करील बिचारी! अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या-मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी.

त्या वेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते. परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले. ब्राह्मणवस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रध्दा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता.

आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीणबाई मोठया भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखादे वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, 'राधाताई! तुमच्याकडे काही काम असेल, तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन. मला थोडी मदत होईल.' राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय? परंतु करील काय? वडील पहाटे उठून बाहेर गेले, की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरूषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण टाकी. 'श्याम असता येथे तर सारे दळून टाकता.' असे तिच्या मनात येई मी घरातून रागावून कसा गेलो, हे आठवून ती रडू लागे. दळता-दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत, त्यांतून आई तेल, मीठ आणी व क्षणाचा संसार सुखाने करी.

दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना! एक काळ असा होता, की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्या वेळेस लागत असत; परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करावयाची? आई त्या पेन्शनरीणबाईंना म्हणाली, 'तुमचे धुणेबिणे सुध्दा मी धुऊन दिले, तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा.'

त्या पेन्शनरीणबाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, 'आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला न्हाऊमाखू घालीत जाल का?'