गुरुवार, नोव्हेंबर 14, 2019
   
Text Size

आई म्हणाली, 'हो, आनंदाने करीन. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे.'

आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावावयाला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने तिस-या प्रहरी ठरविली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे. असे आईला वाटे. त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सुख होई. त्याला मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल, लुबलुबीत टाळूवर तेल घालून 'तो तो तो! बाळाची बायको यो यो यो!' असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई न्हाऊमाखू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले; ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडाथोडा तजेला येऊ लागला.

राधाताईंची आईवर श्रध्दा बसली. महिना होताच त्यांनी दोन रूपये आईच्या हातावर ठेवले. 'दोन कशाला? एक पुरे, हो!' आई म्हणाली.

'घ्या, हो, यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो.

आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. 'देवा! माझी लाज सारी तुला! असे ती म्हणाली. दोन रूपयांतून तिने थोडे तेल, थोडे तूप आणविले, एक नारळ आणविला. थोडया करंज्या व चार अनरसे तिने केले. दिवाळीच्या चार दिवसांत बाहेर दोन दिवल्या लाविल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरूषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळिले. चार आणे पुरूषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरूषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटुकनळीत घालून पुरूषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली, तर पारिग्याचा पाला घालून वाजवी. निराळया फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही.

परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली-गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे. तरी गाडे ढकलता येत होते तो पर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरूषोत्तमाने घोरिवडयातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले, तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदीकुंकू वाहताना आई म्हणाली, 'तुळसादेवी! माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा.'