शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size

ज्याचा भाव त्याचा देव

सायंकाळ झाली. मुले घरोघर गेली. गोपाळ व त्याचे पंतोजी निघाले. पंतोजींनी वाटेत पुन्हा विचारले, 'गोपाळ, खरचं कोणी दिलं रे गाडगं?' गोपाळ म्हणाला, 'खरंच म्हणजे? मी का कधी खोटं सांगतो? आई सांगते, नेहमी खरं बोलावं. खोटं बोललो तर आईला वाईट वाटेल. खरंच दादानं दिलं ते.' पंतोजींनी विचारले, 'तो कोठे राहातो?' गोपाळ म्हणाला, 'त्या राईत. ओढयाकाठच्या जंगलात. तेथे गाई चारतो. त्याला घरी यायला वेळ नसतो. त्याला फार काम. मला भीती वाटे म्हणून मी आईला सांगितलं. आई म्हणाली, 'त्या रानात तुझा दादा आहे त्याला हाक मार.' मी हाक मारली तर खरंच आला. रोज माझ्याबरोबर येतो. त्यानंच दिलं गाडगं. आईजवळ काही नव्हतं. ती म्हणाली, 'जा, दादाजवळ माग.'

बोलत-बोलत दोघे जंगलाजवळ आले. गोपाळने 'दादा दादा, हे बघ पंतोजी तुला पाहायला आले आहेत. ये रे लवकर -' अशी हाक मारली; परंतु आज वेली हालल्या नाहीत, पाने सळसळली नाहीत. गोड तोंड डोकावले नाही. पंतोजी म्हणाले, 'गोपाळ! बर्‍याच गप्पा मारतोस. असे, हया जंगलात वाघ, लांडगे राहातात. कोठला दादा व कोठल्या गाई. खरं सांग कोणी दिलं गाडगं ते.'

गोपाळ कळवळून व रडकुंडीस येऊन म्हणाला, 'खरंच माझ्या दादानं दिलं. मला खोटा नका म्हणू. माझ्या आईला वाईट वाटेल.' गोपाळने पुन्हा दादाला हाक मारली व तो म्हणाला, 'दादा ये. आजच्या दिवस तरी ये. तुला मी रोज त्रास देतो म्हणून रागावलास होय? नको रागावू. उद्यापासून रोज नको येऊ. पंतोजी मला खोटा म्हणतात, म्हणून तरी ये. ये, दादा, ये. ये.'

दादा आला नाही; परंतु झाडांतून, त्या जंगलातून गंभीर आवाज ऐकू आला. पंतोजी कान टवकारून ऐकू लागले. काय होता तो आवाज? काय होती ती वाणी? ती वाणी पुढीलप्रमाणे होती--

'नाही, मी येणार नाही. तुझ्या आईची माझ्यावर जेवढी श्रध्दा आहे, तेवढी तुझ्या पंतोजींची नाही. ज्याचा भाव त्याचा देव. ज्याचे प्रेम, त्याचा मी.'

 

गोपाळ आईला म्हणाला, 'आई! शाळेत पंतोजींनी काही तरी घेऊन येण्यास सांगितलं आहे. त्यांच्या घरी मुंज आहे. दे काही तरी.' आई म्हणाली, 'बाळ! आपल्या घरात काय आहे द्यायला? आपण गरीब आहोत.' 'काही तरी दे. इतर मुलं नाही तर मला हसतील' गोपाळ रडवेला होऊन म्हणाला. सीताबाई म्हणाल्या, 'गोपाळ! दादाजवळ माग, तो देईल. जा.' खरंच. त्याच्याजवळ मागतो. तो काही तरी जम्मत देईल,' असे म्हणत गोपाळ निघाला.

गोपाळ दादाला म्हणाला, 'दादा, पंतोजींनी काही मदत घेऊन येण्याबद्दल सांगितलं आहे. काही तरी दे.' दादा म्हणाला, 'मी रे काय देऊ? मी गाईंचा गोवारी, म्हशींचा खिल्लारी. माझ्याजवळ रे काय आहे?' गोपाळ म्हणाला, 'हे रे काय असं? आई म्हणते, माझ्याजवळ नाही, तू म्हणतोस माझ्याजवळ नाही. मग मी मागू तरी कोणाजवळ? बाबा असते तर देते. दे? नाहीतर मी रडेन बघ.' दादा म्हणाला, 'रडू नको गडया. माझ्याजवळ दहयाचं एक गाडगं आहे ते देऊ? दहयाचं गाडगं नेशील?' गोपाळ म्हणाला, 'हो. काहीही चालेल. दे गाडगं.'

दादाने शिंकाळी बांधलेले, दहयाने भरलेले गाडगे गोपाळच्या हाती दिले. गोपाळ शाळेत गेला. तेथे मुलांची गर्दी होती. मळेवाल्याच्या मुलाने केळीचे लोंगर आणले होते. सावकाराच्या मुलाने पंचवीस रूपये आणले होते. मिठाईवाल्याच्या मुलाने पेढे आणले होते. कापडाच्या दुकानदाराने आपल्या मुलाबरोबर दोन ठाणे पाठविली होती. पंतोजी सारे घेत होते. गोपाळकडे कोणाचेच लक्ष जाईना. हातात गाडगे धरून तो कधीचा उभा होता. शेवटी तो मुसमुसू लागला.

पंतोजींचे लक्ष गेले. 'अरे, काय रे गोपाळ! काय झालं?' त्यांनी विचारले. गोपाळ स्फुंदत म्हणाला, 'माझं गाडगं कोणी नाही घेत.' पंतोजींनी विचारले 'काय आहे गाडग्यात?' 'दही' गोपाळ म्हणाला. पंतोजी म्हणाले, 'आण इकडे, ओतून घेतो.

एका पातेल्यात त्यांनी गाडगे ओतले; परंतु पुन्हा ते गाडगे भरलेले. पुन्हा त्यांनी ओतले. तर गाडगे पुन्हा भरलेले! घरातील सारी भांडी भरली तरी गाडगे रिते होईना. सार्‍या गावकर्‍यांनी दही भुरकले. देवाघरचे दही. अमृतासारखे ते गोड होते. किती खाल्ले तरी वीट येईना. पोट भरेना. हवे-हवेसेच वाटे. सारे लोक आश्चर्यचकित झाले.

पंतोजींनी गोपाळला विचारले, 'गोपाळ! कोणी दिलं बाळ हे गाडगं?' गोपाळ म्हणाला, 'माझ्या दादानं'. पंतोजींनी पुन्हा विचारले, 'मला दाखवशील तुझा दादा?' गोपाळ आनंदाने म्हणाला, 'हो. माझ्याबरोबर या, म्हणजे दाखवीन. किती छान आहे माझा दादा. डोक्यावर मोराची पिसं, तोंडात पावा, खांद्यावर घोंगडी. गोड बोलतो. गोड वाजवतो. दाखवीन तुम्हाला. तुम्हालसुध्दा आवडेल.'

 

हलल्या वेली! मूर्ति सांवळी डोकावली॥ ध्रु0॥
मोरपिसें तीं डोक्यावरतीं
खांदिं घोंगडी खांके काठी
वनमाळा ती शोभे कंठी
ओठी मुरली!! मूर्ति सांवळी डोकावली॥


वेली हालल्या. पाने सळसळली. डोक्यावर मोराच्या पिसांचा मुगुट, तोंडात बासरी, असा दादा बाहेर आला. बासरी वाजवीत दादा आला.

गोपाळने विचारले, 'तू का माझा दादा? किती छान माझा दादा! मला देशील मोराची पिसे? उद्या दे हं मला आणून. हा पावा वाटतं? तुझ्या गाईंसाठी, होय ना? गोपाळला खूप आनंद झाला. दादाचा हात धरून तो चालू लागला. दादाचा हात धरून सारखे चालत राहावे असे त्याला वाटले, मधूनच तो दादाच्या तोंडाकडे बघे, हसे, बोले.

दादा म्हणाला, 'गोपाळ!  मी आता जातो. तुला भीती वाटली म्हणजे मला हाक मार’दादा माघार गेला. शाळा सुटल्यावर गोपाळ मुद्दाम हळुहळू जात होता. सारी मुले पुढे गेली. त्याने दादाला हाक मारली. दादा गावापर्यंत पोहोचवीत आला व म्हणाला, 'ते बघ तुझं घर. जा हं आता.'

गोपाळ घरी आला व आईला म्हणाला, 'आई! दादा किती छान दिसतो, कसं गोड वाजवतो. डोक्यावर त्याच्या मोराची पिसं. मला देणार आहे उद्या दोन. मी रोज शाळेत जाईन.' सीताबाईंच्या डोळयांत पाणी आले.

'किती रे श्रमसी तूं वारंवार॥'

हा चरण त्यांच्या ओठांवर आला. देव घोडे खाजवील, द्रौपदीला लुगडी पुरवील, तो दामाजीसाठी महार होईल, जनाबाईबरोबर दळील, तो कबीराचे शेले विणील, धर्माघरी उष्टी काढील. सीताबाई म्हणाल्या, 'देवा! माझ्यासाठी तू आलास ना धावून. तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे? आम्ही तुझी.'

एके दिवशी पंतोजी मुलांन म्हणाले, 'मुलांनो! माझ्या घरी मुंज आहे. तरी तुम्हाला आई-बापांपासून जी मदत मला देता येईल ती घेऊन या. माझं कार्य पार पाडा.'

   

गोपाळ शाळेत गेला. तेथील पंतोजींनी त्याची चौकशी केली. रामभाऊंचा मुलगा हे कळल्यावर त्यांनी त्याची पाठ थोपटली व ते म्हणाले. 'येत जा हं बाळ. हुशार हो. वडिलांची कीर्ती पुन्हा तू मिळव.'

गोपाळ घरी आला. आईने विचारले, 'गोपाळ! कशी आहे शाळा?' गोपाळ म्हणाला, 'फार चांगली. पंतोजी चांगले आहेत. त्यांनी पाठीवरून हात फिरविला व ते म्हणाले' 'चांगला हो. हुशार हो.'

सायंकाळ झाली. सीताबाई गोपाळचा परवचा घेत होत्या. त्याला रामरक्षा वगैंरे स्तोत्रे शिकवीत होत्या. जेवण करून गोपाळ झोपी गेला. सीताबाई माळ घेऊन जप करीत बसल्या. रूद्राक्षांची माळ. ती त्यांच्या पतीच्या जपाची होती. एखादे वेळेस माळ जपता-जपता सीताबाईंच्या डोळयांतील आसवांची माळही सुरू होई.

एक-दोन दिवस गेले. एके दिवशी गोपाळ म्हणाला, 'आई, मी नाही जात शाळेत.' आईने विचारले, 'का रे बाळ? असं नये करू. शिकलं पाहिजे. विद्या मिळवली पाहिजे.' गोपाळ म्हणाला, 'नाही. मी जायचा नाही.' ती माउली म्हणाली, 'असा हट्ट नये करू गोपाळ. गरिबाला हट्ट करून कसं चालेल? का जात नाही ते तर सांग.' गोपाळ म्हणाला, 'मला सायंकाळी परत येताना त्या जंगलाजवळ भीती वाटते. इतर मुलं मोठी आहेत. ती पळत पुढं निघून येतात. मी एकटाचं मागं राहातो. मला भय वाटतं. नको मला पाठवू शाळेत.'

गोपाळच्या आईने देवावर भरवसा ठेवला. ती म्हणाली, 'गोपाळ, तिथं रे कसली भीती? त्या जंगलात तर तुझा दादा राहातो. त्याला हाक मार. तो येईल.' काय, माझा दादा राहातो तेथे? मला दादा आहे? इतके दिवस तू का नाही सांगितलंस? दादा घरी ग का नाही येत?' असे गोपाळने उत्सुकतेने विचारले. सीताबाई म्हणाली, 'दादाला फार काम असतं. त्याला यायला वेळ नसतो. त्याचा धनी रागीट आहे. जा तू हाक मार. थोडा वेळ तो तुझ्यासाठी येईल, जा बाळ.'

गोपाळ निघाला. तो पळतच निघाला. केव्हा एकदा दादा पाहीन असे त्याला झाले होते. तो त्या जंगलाजवळ आला. त्याने 'दादा-दादा' अशी हाक मारली. दादा येतो का गोपाळ बघत होता. तो काय आश्चर्य!

 

सोनगावचे लोक हळहळले. गावची शाळा बंद झाली. पुन्हा कोठला एखादा शिक्षक मिळेपर्यंत ती बंदच राहाणार. सोनगावची मुले शेजारच्या गावच्या शाळेत जाऊ लागली. असेल कोसा-दीड-कोसावर ते गाव. त्या लांबच्या शाळेत जरा मोठी झालेली मुलेच जात. लहान मुले जात नसत. त्यांना भय वाटे.

गोपाळच्या आईची स्थिती आता वाईट होती. तिचा पती होता तोपर्यंत गावकरी जे लागेल ते आणून देत; परंतु आता तिच्याकडे कोणी लक्ष देईना. ती कोणाकडे दळण-कांडण करी, कोणाकडे धुणी धुवी; असे करून स्वत:चे व स्वत:च्या मुलाचे पोट भरी. गोपाळकडे पाहून ती सारे दु:ख गिळी. ती त्याला जवळ घेऊन म्हणे, 'माझा गोपाळ मोठा होईल व आपल्या आईचे कष्ट दूर करील.' चिमणा गोपाळ हसे व आई त्याचा मुका घेई.

गोपाळ आता मोठा झाला. पाच वर्षे संपून सहावे वर्षे त्याला लागले. गोपाळला आता शाळेत घातले पाहिजे असे आईच्या मनात आले. येत्या दसर्‍याला मुलाला शाळेत घालण्याचे तिने ठरविले. दसरा आला. गोपाळची आई आदल्या दिवशी गोपाळला म्हणाली, 'गोपाळ, उद्या दसरा. विजयादशमीचा दिवस. उद्यापासून तू शाळेत जा. तुझ्यासाठी माझ्या हाताच्या सुताचं कापड केलं आहे. ते धोतर अंगावर घे. लाकडाची धूळपाटी घे, पाटीवर धूळ पसरून तीत बांबूच्या काडीनं अक्षरं काढ. एक काढून झालं की पुन्हा साफ करावं, नवीन अक्षर काढावं, अशा रीतीनं शीक. शाळा जरा लांब आहे; परंतु तेथील शिक्षक चांगले आहेत असं म्हणतात, ते तुला नीट शिकवतील. गोपाळ, शीक व मोठा हो. विद्या मिळव. तेच तुझं धन, तोच तुझा मान. जाशील ना शाळेत?'

गोपाळ म्हणाला, 'जाईन, बाबांसारखा मी शहाणा होईन.'

मुलाला पोटाशी धरून सीताबाई म्हणाल्या, 'शहाणा आहे माझा बाळ. गुणाचा माझा राजा.'

दुसर्‍या दिवशी सीताबाईंनी गोपाळला लवकर उठविले. त्याला त्यांनी आंघोळ घातली. गोपाळने नमस्कार घातले. त्याने गंध लावले. आईने विद्यादेवीची पूजा करावयास बरोबर फुले दिली, अक्षता दिल्या. निघाला गोपाळ बाळ. सीताबाई उंबर्‍यात उभ्या होत्या. गोपाळ गेला व त्यांना हुंदका आला. आज पती जिवंत असता तर गोपाळ घरीच शिकता, त्याला इतक्या लांब जावे लागले नसते इत्यादी विचार त्यांच्या मनात आले; परंतु पदराला डोळे पुसून त्या कामाला लागल्या. गरिबीला रडावयाला वेळ नसतो, हे एकपरी बरे.

   

पुढे जाण्यासाठी .......