सोमवार, आँगस्ट 19, 2019
   
Text Size

दुर्दैवी

हेमा- हेमंताबरोबर आपणही मूकपणाने, गंभीरपणाने तो कागद वाचू या.

''रंगराव सुनीत याचे मृत्यूपत्र''
१. हेमाला माझ्या मृत्यूची वार्ता कळविण्यात येऊ नये. माझ्यासाठी तिला दु:ख नको.
२. मला नेहमीच्या स्मशानात नेऊ नये. कोठे तरी अनाथाप्रमाणे मला मूठमाती द्यावी.
३. माझ्यासाठी भटजी नको, विधी नको, प्रार्थना नको, काही नको.
४. माझा मृतदेहही कोणाला पाहू देऊ नये.
५. माझ्या प्रेताबरोबर दु:ख करायला कोणी नको, अश्रू ढाळणारे कोणी नको.
६. माझ्या शवावर फुले उधळू नयेत. मला मूठमाती देण्यात येईल तेथे कोणी दगड बसवू नका. झाड लावू नका.
७. कोणीही माझी कधी आठवण करू नये.

सही
रंगराव सुनीत''

''हेमा, काय करायचे?'' हेमंत जड स्वरात म्हणाला.

''हेमंत, त्या शब्दांत केवढी निराशा आहे, केवढी करुणा आहे! माझे सारे चुकले, अरेरे!'' तिचे डोळे भरून आले. तिला अश्रू आवरेना. परंतु डोळे पुसून ती म्हणाली.

''शेवटी मृताची इच्छा आपण पवित्र मानलीच पाहिजे. अरेरे! त्यांची नीट क्रियाही आपण करू शकत नाही. अश्रू ढाळीत त्यांच्या प्रेताबरोबर जाऊ शकत नाही. दोन अश्रू नि चार फुले त्यांच्या मृत शरीरावर वाहू शकत नाही. लहानसे स्मारक उभारू शकत नाही. अरेरे! येथून निमूटपणे जाणे हाच मार्ग!''

त्यांनी लखूला पैसे दिले. त्याला सारे समजावून भरलेल्या अंत:करणांनी हेमा-हेमंत निघून गेली.

हेमा आता शांत आहे. त्या घटनांनी तिला एक प्रकारे अकाली प्रौढत्व आले आहे. तिचे जीवन गंभीर झाले आहे. ती आनंदी असते, हसते. परंतु त्या वैभवाचा तिला गर्व नाही. स्तुती व निंदा दोहोंच्या पलीकडे ती गेली आहे. थोरामोठयांच्या बायका तिला भेटायला येतात, तिला बोलवतात. परंतु त्यामुळे तिला विशेष काही वाटत नाही. गरीब बाया माणसेही तिच्यावर प्रेम करतात; तिची स्तुती करतात. ती शांत असते.

हेमाची वृत्ती समतोल झाली आहे. अती तिच्या जीवनात नाही. ती जणु स्थितप्रज्ञतेची मूर्ती झाली आहे. भाऊंच्या जीवनामुळे आणि त्या शेवटच्या घटनेने तिचे जीवनच तसे निराळे बनले. मागून पश्चात्ताप करून उपयोग नसतो; वेळीच जपावे, असे ती शिकली. मात्र गोड बोलावे, सहानुभूती दाखवावी, क्षमा करावी, स्वत:च्या सुख-दु:खांना फाजील महत्त्व न देता दुसर्‍यांची सुखदु:खे आधी पहावी. त्यांच्या भावना ओळखाव्या, त्यांच्या जीवनात शिरावे, सर्वांना शक्य तो आशा, आनंद, प्रेम याचा ओलावा द्यावा, वेळीच द्यावा; मागून उपयोग होत नाही, हे ती शिकली. आणि त्याप्रमाणे ती वागत आहे. ती सुखी आहे.

 

आणि मोठया प्रयासाने त्यांनी गाडी तेथवर नेली. लहानशी ती झोपडी होती. तेथे एक गरीब मजूर होता. परंतु हेमाने त्याला ओळखले.

''काय रे लखू, तू येथे कोठे?''

''तुम्हांला माहीत नाही? मी येथे रंगरावाच्या पाठोपाठ आलो. तुमच्या लग्नाला त्या दिवशी ते गेले आणि त्याच रात्री ते येत होते. मी गावाहून सारंगला परत येत होतो. मला रंगराव थकलेले दिसले.''

''कोठे जाता रंगराव?'' मी त्यांना विचारले.

''तू आपल्या वाटेने जा!'' मला म्हणाले.
परंतु मी त्यांच्या पाठोपाठ जात होतो. ते माझ्यााशी पूर्वी कठोरपणे वागले होते. परंतु माझी आई आजारी असताना त्यांनी मदत केली होती. कोळसे, धान्य पाठविले होते. मला त्यांचे लक्षण ठीक दिसेना. मी त्यांची पाठ सोडली नाही.

''अरे लखू, मागे फीर. येऊ नको सांगितले ना?'' ते पुन्हा म्हणाले. परंतु थकत चालले. मी त्यांना शेवटी हात धरून येथे आणले. आजूबाजूला कोठे गाव नव्हता. येथे ही एक झोपडी दिसली. म्हणून येथे त्यांना मी आणले. येथे एक गरीब रखवालदार राहतो. त्याच्या मदतीने मी लहानशी खाट केली. तिच्यावर त्यांना निजविले. परंतु ते थकत चालले. ते खात ना, पीत ना. आम्ही त्यांन दोन घास देऊ लागलो तर म्हणायचे, 'लखू, सारी भूक मेली रे. नको भरवू.'' ते गळत चालले. आणि शेवटी आता थोडया वेळापूर्वी त्यांचा प्राण गेला. माझ्याजवळ घडयाळ नाही. परंतु सावल्यांवरून अर्धा तास झाला असेल. तो रखवालदार शेवटच्या क्रियेसाठी काही सामान आणायला गेला आहे. आणि त्यांनी आपल्या खाटेच्या वरच्या बाजूला एका कागदावर काही लिहून तो कागद टाचून ठेवला आहे. परंतु आम्हांला लिहिता वाचता येत नाही. काय कळणार आम्हाला? तुम्ही आलेत! तुम्ही वाचा!''

हेमा- हेमंत आत गेली. रंगरावांचा- भाऊंचा तो मृत देह तेथे होता आणि तो कागद तेथे होता. हेमंताने तो हातात घेतला. दोघे मनात वाचीत होती. काय होते त्या कागदात? ते का शेवटचे मृत्युपत्र होते? काय होते त्याच्याजवळ कोणाल द्यायला? का ती शेवटची एखादी इच्छा होती?

 

लग्न होऊन चार दिवस झाले. जयंताला सारंगगाव आवडले नाही. त्याला समुद्रकाठच्या हवेची सवय. त्याने समुद्रकाठच्या एका गावी एक टुमदार घर घेतले. तेथे तो राहायला गेला. हेमा आनंदात होती. त्या बंगल्याची ती आता स्वामिनी होती. याच बंगल्यात आईबरोबर ती प्रथम राहायला आली. त्या बंगल्यात सार्‍या खोल्यांतून ती हिंडे. सर्वत्र नीटनेटकेपणा, स्वच्छता, सुंदरता आहे की नाही ते ती जातीने बघे. लग्नात बराच गोंधळ झाला होता. अस्ताव्यस्त सामानसुमान सर्वत्र पडले होते. परंतु आता सारे सुंदर दिसू लागले. एक महिना होऊन गेला. आणि एके दिवशी एका मोलकरणीला जिन्याखालच्या खोलीमध्ये कागदात गुंडाळलेला एक पिंजरा सापडला. आत एक मेलेला सुंदर पक्षी होता. मूठभर पिसे तिथे होती. त्या पिंजर्‍याचा कोणाला उलगड़ा होईना. परंतु एके दिवशी कोणी तरी हेमाकडे धावत येऊन म्हणाला, ''बाईसाहेब, त्या पिंजर्‍याचा उलगड़ा झाला.''

''कोणी आणला होता?''

''त्याच्यावर एक चिठ्ठी आहे. ती पाहा.''
तिने ती वाचली. तिच्या डोळयांत पाणी आले. रंगाने त्या दिवशी मंगल विवाहाची भेट म्हणून तो पक्षी आणला होता. ती हेमंताकडे धावत गेली.

''हेमंत, तो पक्षी भाऊंनी भेट म्हणून द्यायला आणला होता. पिंजरा खाली ठेवून ते गेले. पक्षी मेला. अरेरे, माझ्या लग्नासाठी आले होते. क्षमा मागत होते. मी त्यांच्याजवळ काही बोलणार तो ते निघून गेले. मी प्रथम फारच कठोरपणे त्यांना बोलले. भाऊंची मन:स्थिती एका क्षणात या वेळेस स्वच्छपणे मला दिसत आहे. त्यांच्या भावना आता मी शांत असल्यामुळे समजू शकते. हेमंत, चल, आपण जाऊ, त्यांना शोधू, त्यांना शांतवू, त्यांना घेऊन येऊ, चल.''

''परंतु कोठे शोधायचे त्यांना?''

''त्रिखंडात बघू. जोड तुझे घोडे. आपण सर्वत्र आसपास हिंडू, दरीखोरी बघू. डोंगर-पहाड पाहू. खेडेन् खेड शोधू. चल, हेमंत!''

आणि घोडयाची गाडी जोडून दोघे शोधत निघाली. या गावी जात, त्या गावी जात. कोठे पत्ता लागेना. दोघे निराश झाली. आडरस्त्याला, जेथे रस्ता नाही तेथेही त्यांनी गाडी नेली. इतक्यात त्यांना दूर एकदोन झोपडया दिसल्या.

''तेथे जाऊन पाहू.'' हेमा म्हणाली.

''चल.'' तो म्हणाला.

   

''हेमा, काय बोलतेस? महाशय म्हणून मला संबोधतेस! मी का परका, तिर्‍हाईत? असे उपरोधिक नको बोलूस. मला बाबा नको म्हणू, भाऊ म्हण. प्रेमाने हाक मार. तुझ्या बोलण्यावरून तुला सारे कळले असावे असे दिसते. तुझा खरा पिता तुला मिळाला. हेमा, मला माफ कर, कठोर नको होऊ.''

''मी तुम्हांला क्षमा केली असती. तुमच्यावर प्रेमही केले असते. परंतु तुम्ही माझा फार मोठा अपराध केलात. मला माझा खरा पिता-माझा खरा पिता नाही असे सांगितलेत. नाव बदलायला सांगितलेत. माझ्या पित्याला मला विसरायला लावलेत. आणि दुरून माझा पिता आला तर त्यालाही मी मेले म्हणून सांगितलेत. खरे ना? अशावर मी कसे प्रेम करू? हे सारे मी कसे सहन करू? अशक्य.''

तो खाली मान घालून उभा होता. त्याने आपला ओठ चावला. त्या आरोपांचे त्याला खंडन करता आले असते. तुझ्या आईनेच तू माझी मुलगी असे सांगून माझी पहिली फसवणूक कशी केली, आणि असहाय म्हणून, दैवाशी जुगार  खेळणार्‍याचा शेवटचा फासा म्हणून तुझ्या वडिलांना मी तू मेलीस असे म्हटले; परंतु तो विश्वास न ठेवता मला पुन्हा प्रश्न विचारील, सारे सांगावे लागेल वगैरे मनात कसे होते; मी त्याला शोधीत गेलो, परंतु गाडी गेली होती, हे सारे  त्याला तिला सांगता आले असते. हे सारे सांगून, अश्रूंनी, प्रार्थनांनी तिची क्षमा त्याला कदाचित मिळवता आली असती. परंतु हे सारे करून स्वत:चे दु:ख हलके करण्याची त्याला इच्छा उरली नाही. हृदयावरचा बोजा कमी करून घ्यावा,  आपल्या वेदनांचा आवेग कमी करून घ्यावा, असे त्याला वाटले नाही. तो जायला निघाला. तो म्हणाला, ''मी जातो. अत:पर माझ्यामुळे मनाला त्रास करून घेऊ नकोस, समजलीस? आणि अशा मंगलप्रसंगी तरी माझ्यामुळे तुला काही दु:ख व्हावे, तुझ्या मनाला त्रास व्हावा असे मी कसे मनात आणू? तुझ्याकडे आलो, हीच एकंदरीत चूक झाली. माझी चूक आता मला स्पष्ट दिसत आहे. परंतु हे शेवटचेच येणे, ही शेवटची चूक, म्हणून माझ्या येण्याची क्षमा कर. पुन्हा मी कधी तुला त्रास देणार नाही. हेमा, नाही बरे, कधीही त्रास देणार नाही. आता मी मरेपर्यंत माझ्याकडून तुला कधी त्रास नाही होणार. सुखी अस. आनंदी राहा.''

मन स्थिर करून, बावरलेल्या विचारांना जरा स्थिर करून ती काही बोलणार तो रंगा पायर्‍या उतरून निघूनही गेला. मागील दाराने आला होता तसा तो गेला. पुन्हा तिने त्याला पाहिले नाही.

 

त्या गावाहून एक नवीनच मोटर सुरू झाली होती. मोटारीतून आपण जाऊ असे त्याने ठरविले. म्हणजे लग्नाच्या वेळेपर्यंत त्याला पोचता आले असते. त्याने सारी तयारी केली. आणि तो निघाला. वाटेत त्या पाखराची तो काळजी घेत होता. त्या पिंजर्‍याला त्याने एक चिठ्ठी अडकवली. त्या चिठ्ठीत त्याने काय लिहिले होते? ''मंगल विवाहाची भेट. रंगा.'' एवढेच तीत होते. मोटर सारंगगावाला आली तो दिवस मावळला होता. रंगराव उतरला. त्याच्याकडे कोणाचे लक्षही नव्हते. तो मागच्या दाराने त्या बंगल्यात शिरला. आणि स्वयंपाकघराच्या बाजूने तो वर जाऊ इच्छीत होता. आधी पिंजरा कशाला बरोबर असे मनात येऊन त्याने तो पिंजरा खाली वेली होत्या त्या वेलींमध्ये ठेवला. आतील पक्षी झोपला होता. रंगराव वर गेला. तो तेथे त्याला कोणी तरी हटकले,

''कोण रे, कुठे चाललास?'' ती स्वयंपाकीण बाई असावी.

''मला हेमाला क्षणभर भेटायचे आहे.''

''त्यांचे आताच लग्न लागले. मोठमोठया भेटीगाठी होत आहेत. आता कोण तुला भेटणार?''

''तुम्ही हेमाला सांगून तर बघा.''

''तू तिकडे खाली बस. मग मी हाक मारीन.''
तो जिना उतरून खाली जाऊ लागला. परंतु काय असे ते असो, त्या बाईने त्याला परत वर बोलाविले.

''येथेच या आतील खोलीत बस. त्या येतील तेव्हा भेटतील.''

''बरे.''

तो त्या खोलीत बसला. हेमा येईल, मी तिची काकुळतीने मनधरणी करीन, माझ्या चुका, अपराध सारे कबूल करीन, मला क्षमा कर म्हणेन, ती मला क्षमा करील, असे तो मनात म्हणत होता. तिकडे आनंद चालला होता. वाद्ये वाजत होती. हर्षाचे, आनंदाचे उध्दार, सुखाची, विनोदाची बोलणी, सारे कानांवर येत होते. रंगाला तो आनंद सहन होत नव्हता. त्याच्या हृदयावर ओझे होते. ते निघाल्याशिवाय तो त्या वातावरणात कसा मिसळणार, एकरूप होणार? तो वाट पाहात होता. एकदम पलीकडून कोणी तरी गेले. त्याने पाहिले. तो हेमाचा पिता होता. जयंत होता. ती जयंताची सावली पडली होती. रंगाने पाहिले. त्याच्यावर त्याच्या अंतरात्म्याची दाट छाया पडली होती. त्या छायेतून जयंताची सावली तो बघत होता. परंतु जयंताच्या आपण नजरेस पडता कामा नये म्हणून तो एकदम कोपर्‍यात गेला.

काही वेळाने लगबगीने हेमा आली. विवाहवस्त्रे तिच्या अंगावर होती. मोत्यांचे हार गळयात होते. केसात सुंदर फुले होती. ती आली. तिने त्याच्याकडे पाहिले.

''रंगराव, महाशय, कशाला या वेळेस आलात?'' ती कठोरपणे म्हणाली.

   

पुढे जाण्यासाठी .......