मंगळवार, मे 26, 2020
   
Text Size

चार गोष्टी

जो प्रकार शेतक-यांच्या बाबतीत तोच कामगारांच्या बाबतीत. 'उत्पादन वाढवा, उत्पादन वाढवा ' म्हणून त्यांना येताजाता सारे डोस पाजत आहेत. कोटयावधींचा नफा उकळणा-या मालकांसाठी का अधिक उत्पादन करायचे ? ज्या कारखान्यात आपण श्रमतो, तेथील माल जनतेच्या कल्याणार्थ आहे, जनता पिळली जाणार नाही, काळेबाजार होणार नाहीत, तेथील नफा धनवतांच्या विलासात, दगडी राजवाडयात उधळला जाणार नाही, ही खात्री वाटली तर कामगार आनंदाने नाचत वाटेल तितका श्रमेल. परंतु जोवर गरिबांची होते होळी, बडयांची पिकते पोळी, हे त्याला दिसत आहे तोवर त्याचा जीव अधिक उत्पादनात संपूर्णतया कसा रंगेल ? एवंच आर्थिक समता दूर आहे.

आणि सामाजिक समता ?  जोवर शिक्षणाने, राहणीने, संस्कृतीने सारे थर समान पातळीवर येत नाहीत तोवर सामाजिक विषमता तरी कशी दूर होणार ?  सा-या जातीपाती समान माना म्हणून म्हटले तरी जिच्या केसाला तेल नाही, जिचे नेसू चिंधी अशी कातकरीण स्वच्छ इरकली पातळ नेसलेल्या, वेणीफणी केलेल्या भगिनीजवळ कशी बसणार ? तिला बसू कोण देणार ? बिहारमध्ये चंपारण्यांत गांधीजी गेले. कस्तुरबांना म्हणाले, ' भगिनींना स्वच्छता शिकव. ' एक भगिनी कस्तुरबांना म्हणाली, 'आंग धुतले तर दुसरे नेसू काय ?' सामाजिक विषमता नष्ट करायलाही आर्थिक विषमता दूर करावी लागते. धार्मिक विषमता दूर करण्यासाठी सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टींचा प्रचार करणे, कोणत्याही धर्माचा असो तो लायक असेल तर त्याला कामावर घेणे, भेदभाव न करणे या गोष्टी हव्यात.

स्वराज्यातील चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अहिंसक रीतीने सरकारला  विरोध  दाखवण्याची मोकळीक असणे. गांधीजी  म्हणत, ' आय ऍम द ग्रेटेस्ट डेमोक्रॅट - मी सर्वात मोठा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. '  परंतु आज काय आहे ?  सरकार लोकशाहीचे पुरस्कर्ते असते तर येताजाता कार्यकर्त्यांना अटक ना करते, त्यांच्या मार्गात अडचणी ना आणते. परंतु सेवादलाचे ' बिजली नाचेल गगनात ' हे सुंदर नृत्यगीत पाहून एका मंत्र्याने म्हणे कपाळाला आठया घातल्या !  ' सेवादलात गाणे कशाला ? ' असे म्हणाले !  पु.विनोबाजींनी धुळयाला सेवादलाच्या कलापथकाचा कार्यक्रम पाहून संतोष दर्शवला व ' खेडयापाडयांतून जा असे कार्यक्रम करत ' असे सांगितले.

केवळ कायद्यने जनतेची हृदये का मिळत असतात  ?  दुस-या पक्षाला विधायक सेवाही करू द्यायची नाही !  त्यांच्या नावावर सेवेचे भांडवल उगाच जमा व्हायला नको. 'आमच्या प्रौढ साक्षरता वर्गांना मंजूरी मिळत नाही मग मदत कोठून मिळणार ?' असे एक कार्यकर्तां म्हणाला.

बर्नार्ड शॉने एके ठिकाणी सत्ताधा-यांना उद्देशून म्हटले आहे - 'इफ यू वॉन्ट ब्लड यू वुइल हॅव इट. हेंव युवर ओन चॉइस - तुम्हाला रक्ताचेच डोहाळे हवे असतील तर तीही तुमची इच्छा पूर्ण होईल !' रक्तपात नको असेल तर त्वरेने जनतेचा संसार नीट उभा करायला हवा.

दरिद्रनारायणा, तुला सुखवणारे स्वराज्य दूर आहे. ते जवळ यावे म्हणून निर्मळपणाने जे संघटना करू पाहतात, जे लोकशाही मार्गाने जाऊ इच्छितात त्यांच्या वाटेत निखारे पेरले जात आहेत. परंतु गांधीजींनी दिलेली श्रध्दा घेऊन आपण जाऊ. जय की पराजय हा सवाल नसून सारे सहन करत न दमता, न थकता उत्कटपणे काम करणे एवढेच आपल्या हाती.

साधना : फेब्रु. ५, १९४९

 

महात्माजींचा श्राध्ददिन भारतातच नव्हे तर सर्व जगात साजरा होतो. ते भारताच्या द्वारा जगाचीच सेवा करत होते. कारण येथे सर्व धर्म, सर्व संस्कृती. भारत म्हणजे मानवजातीचे प्रतीक. गांधीजी जगाचे हृदय झाले होते. त्यांच्यावरच्या आघाताने सारे जग क्षणभर निर्जीव झाले होते. सा-या जगाने श्रध्दांजली वाहावी  हे समुचितच होय.

श्राध्द अति पवित्र व मंगल वस्तू आहे. कृतज्ञतेची ती मधूर खूण आहे. ज्यांचे आपण श्राध्द करतो त्याला आपण श्रध्दापूर्वक स्मरतो. श्रध्दा चमत्कारजननी आहे. यजुर्वेदात म्हटले आहे की, अदेवाला श्रध्दा देवत्व देते. जो अ-देव आहे, ज्याच्या जीवनात दिव्यता नाही, अशा माणसाला जर अमर श्रध्दा मिळाली तर त्याचे जीवन ज्वलंत होते. ते दैवी होते. श्रध्दा ध्येयाकडे घेऊन जाते, ध्येयाचा ध्यास लावते. सारे जीवन धगधगीत, रसरशित होते. मग अन्य काही सुचत नाही, रुचत नाही.

तुका म्हणे व्हावी, प्राणासवे ताटी
नाहीतरी गोष्टी, बोलू नये

महात्माजींना श्रध्दांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या ध्येयाला श्रध्दांजली. आज सर्वोदय, समन्वय अनेक शब्द उच्चारले जात आहेत. सर्वांचा उदय व्हावा, सारे सुखी व्हावेत म्हणून प्राचीन ऋषीपासून, ऋषीश्वरांपासून सारे सांगत आले, परंतु केवळ शब्दोच्चाराने सारे सुखी कसे व्हायचे, हा प्रश्न आहे. सर्वांचा उदय व्हावा म्हणूनच स्वराज्य हवे होते, परंतु सर्वांच्या उदयाची तीव्रता आपल्याला लागून राहिली आहे का ?  भांडवलदारांना शतसवलती देऊन, आणखी काही वर्षे तुमचे कारखाने राष्ट्राचे होणार नाहीत असे आश्वासन देऊन त्यांचा उदय सुरक्षित केला जात आहे. गरिबांचे काय ? हा प्रश्न आहे.

महात्माजींनी स्वराज्यात चार गोष्टी हव्यात म्हणून लिहिले होते (1) आर्थिक समता (2) सामाजिक समता (3) धार्मिक समता  (4) लोकशाही. सरकारचे धोरण पसंत नसले तर शांततेने विरोध दाखवायला परवानगी. या चार गोष्टी अजून किती दूर आहेत, हे पाहिले म्हणजे दु:ख होते, वेदना होतात.

दिल्लीला महात्माजी म्हणाले, ' एक दिवसही स्वतंत्र हिंदुस्थान आर्थिक विषमता सहन करणार नाही. 'परंतु आज काय दिसते ?  शेतक-याला दिलीत जमीन ? काटकसर करून विकत घे, असे सांगणे म्हणजे सर्वोदयी श्रध्दा नव्हे. शेतमजुराजवळ मालकीची जमीन नाही. त्याच्याजवळ दोनचार बिघं जमीन विकत घेण्याइतके पैसे कधीही साठणार नाहीत, चलनवाढीची सबब न सांगता जमीनमालकाला दीर्घ मुदतीची सेव्हिंग्ज सर्टिफिकिटे द्या आणि शेतमजुराला जमीन द्या. कानावर आले की कोणी काँग्रेसचे बडे अधिकारी म्हणाले, 'पुढच्या निवडणुकीनंतर हे करावयाचेच आहे.' तुमच्या पुढच्या निवडणुकीसाठी आज या लोकांना असेच सडतपिचत ठेवणार होय ?  गरिबाच्या चितेची होळी पेटत ठेवून त्यावर भावी निवडणुकांची भाकर भाजणार ? दुस-यांना सत्तालोलुप म्हणणा-या या लोकांची ही सत्ता टिकवण्याची कारस्थाने पाहिली की किळस येते !