शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size

जीवनाची आशा

संघटना बांधली की थोडा तरी अभिर्निवेश येतोच. माझाच पक्ष खरा, माझीच संघटना सत्यावर उभी, असे मग मला वाटते. सत्य तर सुर्यप्रकाशाप्रमाणेच मोकळे हवे, वा-यांप्रमाणे सर्वगामी हवे. तरच ते सतेज, निर्मळ, प्राणमय राहील. संकुचितपणा सत्यास मानवणार नाही. अहंकार मानवणार नाही. राजकीय नेत्यांच्या ठिकाणी असा दैवी गुण भाग्यानेच आढळतो. गांधीजींनी या राष्ट्राला, जगाला दिलेली ती शिकण आहे. आपल्या निर्णयाची सत्यता स्वत:ला पटत असूनही दुस-याविषयी सद्भाव ठेवणे ही अहिंसा. यातच लोकशाहीचा आत्मा. महात्माजींनी आमरण ही गोष्ट कृतीने शिकवली. भारतीय संस्कृतीतच ही गोष्ट आहे.

संघटनेमुळे, पक्षामुळे अंधता येते;  जडता म्हणजे मीच खरा ही वृत्ती येते, अभिनिवेश येतो, सत्य गुदमरते, हे सारे खरे, परंतु जगात कार्य करायचे तर काही संघटना लागते. विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ' जगात कार्य करायचे तर थोडा अहंकारही लागतो. 'परंतु थोडा अहंकार म्हणजे अहंकाराचा पुंज नव्हे. लोकमान्य एकदा म्हणाले की ' स्वराज्य खोटे बोलून येणार असेल तर मी खोटेही बोलेन.'  यांतील ' ही ' शब्द महत्त्वाचा आहे. आता अगदी माझ्या खोटे न बोलल्यामुळे अडत असेल तर बोलतो बाबा. म्हणजे तो 'ही' दु:खच दर्शवतो.

खोटे बोलणे वाईटच, परंतु आलीच वेळ तर तेही करीन. परंतु लोक 'ही' विसरून गेले आणि लोकमान्यही म्हणत की स्वराज्यासाठी खोटे बोलले म्हणून काय झाले, राजकारणात हे चालायचेच, असा अर्थ करू लागले ! विवेकानंदांच्या वरील म्हणण्याचाही असा अर्थ कोणी करतील. परंतु विवेकानंद ' थोडा अहंकार ' म्हणतात. आपापले पक्ष करा, संघटना करा. आपण बरोबर आहोत ही श्रध्दा ठेवून, हा थोडा अहंकार ठेवून काम करा. पण अहंकार फाजील झाला की दुस-या पक्षाचे नि:संतान करायला निघाल. म्हणून जपा. गांधीजींनीही संघट-नेचा आश्रय करूनच प्रयोग केले. काँग्रेस संघटनेद्वारा त्यांनी काम केले. इतरही अनेक संस्था त्यांनी काढल्या, परंतु त्यांची स्वत:ची विशिष्ट श्रध्दा असूनही ते मोकळे असत. 'मला पटवा' असे ते म्हणत. सर्वांस ते असेच सांगत.

आपण मानव अपूर्ण आहोत. संपूर्ण सत्य आपणास मिळणे कठीण त्याचप्रमाणे मिळालेल्या श्रध्देनुसार अहंकाररहित होऊन जाणेही कठीण, परंतु प्रयत्न करावा. त्या दिशेने जावे. आपापल्या विचारांचा, कल्पनांचा प्रचार करा, त्या पटवा. त्यासाठी हाणामारीची, तुमच्या शस्त्रास्त्रांची जरूर नाही. सत्य प्राणमय असेल तर जगात विजयी होईल.  सत्य जर सत्तेवर अवलंबून असेल, आत्मा ऍटमबाँबवर अव-लंबून असेल, तर सत्ता, ऍटमबाँब म्हणजेच विश्वाचे आदितत्त्व वा अंतिमतत्त्व असे म्हणावे लागेल आणि तसे असेल तर जीवनाला आशा तरी कोणती?

साधना : मे १९४९

 

हे जुलूम का केले जातात ?  मनुष्य इतका निर्दय, कठोर कसा होतो ? माझ्याजवळ जे आहे तेच सत्य असल्यामुळे त्याच्या आड जो जो येईल तो उडवलाच पाहिजे, ही आसुरी वृत्ती त्यातून जन्मते. माझ्या सत्याला विरोध करायला कोणी उभा राहता कामा नये, यासाठी सर्वांना दहशत बसवावी असे त्यांना वाटते. नाझी लोकांना वाटे, 'जर्मन वंशच श्रेष्ठ, बाकीचे मानव म्हणजे केरकचरा, त्यांना जाळले काय, छळले काय, काय बिघडले ?' कम्युनिस्टांना वाटते, 'आम्हीच जगाचे उध्दारकर्ते. दुस-यांजवळ सत्य नाही. आमचा मार्ग म्हणजे मानवी सुखाचा, विकासाचा. त्या मार्गात जे जे आड येतील ते वाटेल त्या रीतीने नष्ट करणे हेच योग्य.'  अशा वृत्तीमुळे कम्युनिस्टी छळबुध्दी आणि खुनी वृत्ती जन्मली. संघाच्या लोकांना असेच वाटे. आणि अखेर महात्माजींचा वधही अशाच प्रवृत्तीतून झाला. एकदा ' मीच खरा '  हा अहंकार जडला की त्याच्यामागून अंधता, निर्दयता, सारे काही येते.

जैन हे अहिंसाधर्माचे उपासक. स्याद्वादाचा त्यांचा सिध्दान्त. 'इदमपिस्यात् ' हेही असू शकेल - असे ते म्हणत. स्वत:चे मत मांडतांना, त्याची सत्यता स्थापतांना दुसरीही बाजू असू शकेल, अशी अनाग्रही वृत्ती या स्वाद्वादात आहे. स्याद्वाद म्हणजे संशयात्मा नव्हे. मला या क्षणी जे सत्य वाटते ते मी घेऊन जावे ;परंतु त्याला विरोध करणा-यांची मी चटणी नाही उडवता कामा. कारण कदाचित् उद्या मला सत्य वाटणारी गोष्ट चुकीची ठरू शकेल. अशी वृत्ती समाजात राहील तर समाजात अहिंसा राहील. हिंदुस्थानात नाना दर्शने, नाना तत्त्वज्ञाने जन्मली ; परंतु कोणी कोणाला छळले नाही. जाळले नाही. पोळले नाही. चार्वाकवादी आपले मत मांडत आहेत. अद्वैती आपले तत्त्वज्ञान मांडत आहेत. आपापली मते मांडा. जनतेला जे पटेल ते जनता घेईल. अशानेच सत्याची पूजा होईल. सत्य का तलवारीने शिकावयाचे असते ? जेथे संकुचितपणा असेल तेथून सत्य निघून जाते. अहंकाराजवळ कोठले सत्य ?महात्माजी नेहमी म्हणत 'मला पटवा. माझी चूक दिसली तर मी निराळा मार्ग घेईन.'  ते स्वत:च्या श्रध्देने जात होते. ती श्रध्दा अचल होती, परंतु सदैव नवीन घ्यायला ते सिध्द असत.

श्रीकृष्णमूर्ती एकदा म्हणाले, 'ट्रूथ कॅन नेव्हर बी ऑर्गनाइजड- सत्याची संघटना नाही करता येत.'  विनोबाजी हेच म्हणाले होते. तुरुंगातून सुटून आल्यावर ते महात्माजींना म्हणाले 'मला कोठे अध्यक्ष चिटणीस नका नेमू. हे घ्या राजीनामे.'

महात्माजींनी विचारले, 'परंतु काम करणार
आहेस ना ?'
ते म्हणाले, 'हो.'
महात्माजी म्हणाले, ' मग दे तुझे राजीनामे.'

 

देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारत आता लोकशाही मार्गाने समाजवादी ध्येय प्राप्त करून घेईल अशी कोटयावधी भारतीयांना आशा वाटत आहे. हे ध्येय जास्तीत जास्त लौकर प्राप्त होण्यातच देशाचे कल्याण आहे. आंतरराष्ट्रीय शांती राहण्यासही भारताने त्वरेने सामाजवादी ध्येय गाठणे आत्यंतिक जरूरीचे आहे. स्वतंत्र राष्ट्रात अहिंसेचे व्यापक बंधन पत्करून आपापल्या मतांची नि योजनांची सर्वत्र प्रसिध्दी करायला सर्वांनाच वाव हवा. मोकळीक हवी. तरच लोकशाहीचा आत्मा जिवंत राहील.

देशात लोकशाहीचे तत्त्वज्ञान तेव्हाच दृढमूल होईल, जेव्हा आपण आपापल्या मतांचा अति अभिनिवेश बाळगणार नाही. याचा अर्थ आपल्या मतांविषयी आपणासच श्रध्दा नको असा नाही; परंतु सत्य समजणे कठीण आहे. मी माझ्या श्रध्देप्रमाणे जावे, परंतु तोच एक सत्याचा मार्ग असे मी कसे म्हणू ? कदाचित उद्या माझीही चूक मला कळेल आणि मी निराळा मार्ग घेईन. म्हणून मी माझे मन मोकळे करायला हवे. जीवन-प्रकाश घ्यायला सदैव ते तयार असायला पाहिजे. 'बुध्दे : फलमनाग्रह: ' असे वचन आहे. तुमच्याजवळही बुध्दी आहे, विचार करायची शक्ती आहे, हे कशावरून ठरवायचे ?  तुम्ही आग्रही नसाल, हट्टी नसाल तर. सत्याचा संपूर्ण ठेवा जणू आपणासच सापडला अशी भावना विचारी मनुष्य कधी करू शकणार नाही. तो आपल्या श्रध्देप्रमाणे जाईल ; परंतु त्या श्रध्देप्रमाणे न जाणा-याचा तो खून करणार नाही. त्यांचा आत्यन्तिक द्वेष तो करणार काही. त्याचे करणे आज तरी मला चुकीचे वाटते असे फार तर तो म्हणेल.

गांधीजीसारख्यांची या देशात हत्या झाली. याचे कारण काय ? आपण सर्वांनी या घटनेचा गंभीर विचार केला पाहिजे. मतांचा अभिनिवेश हाच या गोष्टींच्या मुळाशी नाही का ?  मला वाटते तेच सत्य, बाकीचे सारे चूक, एकढेच नव्हे तर राष्ट्राला ते खड्डयात लोटत आहेत, म्हणून त्यांना दूर केले पाहिजे, ही स्वत:च्या मताची आत्यन्तिक आग्रही वृत्तीच या खुनाला प्रवृत्त करती झाली.

कम्युनिस्टांचे आजकालचे तत्त्वज्ञान ' आम्हीच अचूक ' या समजुतीवर उभारलेले आहे. रशियातील स्टॅलिनची कारकीर्द रक्ताने माखलेली आहे. जो जो विरोधी तो तो दूर केला गेला. अपार छळ त्याचे झाले. नाझी लोकच क्रूर होते असे नाही. रशियातील तुरुंगातूनही जे लाखो जीव संशयावरून ठेवले जातात ते ज्यांना शक्य झाले त्यांनी स्वानुभावाने लिहिले आहे. पूर्वी ख्रिस्ती लोकही धर्माचा असाच प्रचार करत. प्रत्यक्ष ख्रिस्ती धर्मातही कॅथलिक किंवा प्रॉटेस्टंट यांनी एकमेकांचा का कमी छळ केला ? मुसलमानी धर्माचा काही प्रचार 'कुराणातच सारे सत्य आहे. ते माना, नाहीतर मान उडवतो.'  या अभिनिवेशानेच झालेला आहे.