गुरुवार, मे 28, 2020
   
Text Size

या राष्ट्राचे कसे व्हायचे?

ज्यांच्यावर उद्याची भिस्त तो विद्यार्थी व तरुणवर्ग त्यांच्यात तरी सत्यनिष्ठा आहे का ?  तर कळले की मुंबईच्या अमेरिकन लायब्ररीतून अनेक ग्रंथ नाहीसे होतात. तेथील फळयावर, वार्ता फलकावर' अमूक ग्रंथ नाहीसे झाले आहेत, कृपा करुन आणून द्या.' अशी पत्रके असतात ! काय त्या चालकास वाटत असेल ?  जगाला आम्ही नीतिपाठ शिकवू पाहातो; परंतु आमची तर ही दशा !  इतर देशांतून आमच्या विद्यार्थ्यांनी अशीच अपकीर्ती मिळवल्याचे ऐकले होते. पुस्तकांची पाने फाडणे, चित्रे फाडणे याचे आम्हांस काही वाटत नाही. सार्वजनिक वस्तूचे पावित्र्य ही चीजच आम्हाला कळेनाशी झाली आहे. सारा तरुणवर्ग असाच आहे, असे मी कसे म्हणू ? परंतु सत्याची चाड कमी, ही गोष्ट खरी.

ज्या देशाला लोकशाही मार्गाने जावयाचे आहे त्याला सदगुणांची जोपासना करण्यावाचून गत्यंतर नाही. तुम्ही दुर्गुणी व्हाल तर तुमच्या-तून कोणी हडेलहप्पी हुकुमशहाच उद्या निर्माण होईल. स्वातंत्र्यास तुम्ही नालायक ठराल. जेथे संयमी, विवेकी, सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक असतील, श्रमणारे, दुस-याची कदर करणारे लोक असतील तेथे लोकशाही वाढेल. तेथे व्यक्तिस्वातंत्र्य नीट नांदू शकेल. परंतु जेथे दुस-याचा विचारच नाही तेथे फटके मारणाराच कोणीतरी उद्या उभा राहणार ! तुमची जी लायकी तसे सरकार तुम्हाला मिळते.

मी म्हणजे भारत, मी म्हणजे मानवजात. माझा शब्द, माझा आचार, माझा विचार असा नसो की जेणेकरून भारताची मान खाली होईल, मानवजातीच्या मूल्यांची हानी होईल. मी भारताचा एवढेच नव्हे तर मानवजातीचा घटक आहे. ही दहा हजार वर्षांची मानवजातीची परंपरा, तिचा मीही प्रतिनिधी आहे. ही विशाल कल्पना पदोपदी मनात आणून वागू तर आचार बदलेल, विचार बदलेल. जीवन अंतर्बाह्य स्वच्छ नि सुंदर होईल. नवभारताला या दृष्टीची जरुरी आहे. तुम्ही शहरात असा वा खेडयात असा, कारखान्यात असा की, कचेरीत जाणारे असा, आपल्याकडून सत्याची पायमल्ली होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. सार्वजनिक पैसा, त्याचा नीट हिशेब देता आला पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणत, ' व्यवहार व परमार्थ, दोन्ही ठिकाणी चोखपणा हवा.'  ज्या राष्ट्राचा सार्वजनिक व्यवहार चोख असेल त्याला आशा आहे. सार्वजनिक जीवन जर येथे पै किंमतीचे झाले असेल, तर या राष्ट्राला कोणती आशा ?
साधना : जून ११, १९४९

 

कारखानदार, कंपन्या, व्यापारी यांची ही दशा तर सार्वजनिक संस्थाही अशाच सडलेल्या. परवा मुंबईत घर पडले. दोनतीन माणसेही दगावली म्हणतात. मी तेथे जवळच होतो. मी म्हटले, 'काही काही घरे फारच जुनाट झाली आहेत. पावसाळयात आता ही पडतील '  म्युनिसिपालिटी यांना सांगत का नाही?  घरे पडेपर्यंत मालक भाडे घेणार ?  प्रणाचेही मोल शेवटी घेणार का ?  तर जवळचे एक सद्-गृहस्थ म्हणाले, 'म्युनिसिपालिटीने जरी मालकाला अमुक दुरुस्ती करा वगैरे कळवले तरी दहा रुपये दिले की दुरुस्ती झाल्याचे सर्टिफिकेटही मिळू शकते !' ते गृहस्थ मजकडे बघून रागाने म्हणाले, 'जेथे वाटेल तो मनुष्य विकत घेता येतो असा हिंदुस्थानच असेल ! '  माझ्या डोळयांत पाणी आले. भारताविषयी मला किती प्रेम  नि  भक्ती ! नाशिकच्या तुरुगांत असतांना आम्ही बगीच्या कामाला गेलो की मी हळूच तेथील माती माझ्या कपाळी लावायचा. त्यावेळेस मी पुढील चरण मनांत गुणगुणे -

तुझ्या धूलीमाजी वाटे लोळणे सुखाचे
इथे पाय पावन फिरले राम-जानकीचे

त्या भारतभूमीची का आज अशी अवनत दशा व्हावी ? महात्माजींचा ना हा देश ?

परवा खेडेगावातला एक मित्र आला होता. आम्ही बोलत होतो. तो म्हणाला, ' गुरुजी, या देशाचे कसे व्हायचे ? मोठेही खोटे बोलणारे, आणि खालची जनताही तशीच !  कोणी शेतीसाठी म्हणून तगाई घेतो, परंतु शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून तिचा विनीयोग होईल तर शपथ !  बैलांसाठी म्हणून सरकार कर्ज देते, परंतु बैल विकत घेतले जात नाहीत. कोणी शेतीसाठी खते मिळवतात आणि मग त्याचा काळाबाजार करतात. विहीरीसाठी पैसे घेतात नि ते लग्नात खर्च केले जातात. शेतीच्या इंजिनासाठी खानदेशकडे काहींनी पैसे घेतले, परंतु यातून त्या राष्ट्राला मोबदला काय मिळणार ?  अन्नोत्पादन वाढावे, या देशाला भाकरीसाठी तरी दुस-याच्या तोंडाकडे बघण्याची पाळी येऊ नये, असे कुणाला वाटत आहे ?  देशाची, समाजाची भावनाच नाही. स्वार्थ हा सर्वांचा धर्म आहे. मग तो बावळट, भोळा समजला जाणारा शेतकरी असो वा जगाशी आयातनिर्यात करणारा बडा व्यापारी असो ! 'मी ऐकत होतो. शेवटी मी डोळे मिटून पडून राहिलो. मला ते बोलणे ऐकवेना. हे राष्ट्र इतक सत्त्वशून्य कसे, याचे मला राहून राहून वाईट वाटत होते.


 

भारतवर्ष जगाला मार्गदर्शन करील, भारताकडे जगाचे डोळे आहेत, इत्यादी आत्मगौरवपर वक्तव्ये नि मंतव्ये आम्ही करीत असतो; परंतु वस्तुस्थिती पाहिली तर जगातील कदाचित सर्वांहून हतपतित असे राष्ट्र आपण असू असे वाटते. ही भारतभूमी एकेकाळी सत्यासाठी विश्वविख्यात होती. स्वप्नातील शब्द पाळणारे, सत्यासाठी बारा बारा वर्षे वनवास भोगणारे सत्वशील राजे येथे झाले. येथे दिलेल्या शब्दाचे केवढे महत्व !  भीष्म, शीबी, श्रियाळ, कर्ण केवढाली नावे !  प्रतिज्ञा-पालनाचा केवढा  महिमा !  येथे आलेल्या प्रवासी लेखकांनी लिहून ठेवले आहे की, 'हिंदुस्थानात दाराला कडीकुलूप लावण्याची जरूरी पडत नाही. पराकाष्ठेचा प्रामाणिकपणा येथे आहे. सत्याची येथे नितांत कदर आहे !'

असा हा हिंदुस्थान !  सत्य-अहिंसेला पुन्हा जगात सिंहासनावर स्थापू पाहणारे महात्माजी येथे झाले; परंतु त्या महापुरुषाला हिंदी जनतेच्या हृदयावर सत्य नि अहिंसा यांचा खोल ठसा उमटवता आला नाही असेच म्हणावे लागते! अहिंसेतूनही गांधीजी सत्याला महत्व देत. ते एकदा म्हणाले होते, 'खून करून रक्ताने माखलेल्या हातांनी कोणी मजकडे आला; परंतु त्याने प्रामाणिकपणे सारे कबूल केले तर त्यालाही मी जवळ करीन;  परंतु असत्य बोलणा-याला मी सहन करू शकरणार नाही.'  सत्य म्हणजे जीवनाची प्रतिमा. उपनिषदांत सत्याचा अपार महिमा आहे. सत्य परमात्मा. धर्मराजाचा रथ चार बोटे उंच चालावयाचा. परंतु 'नरो वा कुंजरो वा' करताच तो एकदम खाली आला!

परंतु सत्यपूजेसाठी प्रसिध्द असलेली ही प्राचीन पूण्यभूमी आज सत्याची सर्वस्वी पारखी झालेली आहे. वरपासून खालपर्यंत सारे राष्ट्र पोखरल्यागत झाले आहे. आमच्या देशातून ज्या ज्या देशांत माल जातो ते ते देश माल चांगला नसतो, आत घाण असते, तुमच्या कंपन्या फसवतात, अशा तक्रारी पाठवतात. 'भारताचा नैतिक वारसा' म्हणून तुम्ही आम्ही, लहानमोठे सारेच गौरवाने बोलत असतो. परंतु कोठे आहे तो नैतिक वारसा?  कोठे आहे ती भारतीची आध्यात्मिक संपत्ती?  कोठे आहे ते गुणांचे अपार वैभव?

भारतीची ती खरी संपत्ती होती. सुवर्णाला सुवर्णभूमीत आम्ही मान दिला नाही. राजेमहाराजे मोठ मोठी राज्ये साम्राज्ये तृणवत फेकून गंगातीरी तपस्या करायला जात. मोठमोठे सम्राट लंगोटया शुक्रा-चार्याच्या चरणांवर आपली मुकुटमंडीत मस्तके ठेवत. या देशात सत्याचा महिमा होता, सद्गुणांचा गौरव गायिला जाई. कोठे आहे ती भारतीय उदात्तता ?

मोठमोठे कारखानदार, मोठमोठया कंपन्या यांना या देशाचे नाव कलंकित होऊ नये म्हणून काहीच वाटत नाही का ?  ज्या देशात राम-कृष्ण झाले, बुध्दमहावीर झाले, त्या देशाचे नाव कलंकित करतांना काही वाटत नाही ?  दहा हजार वर्षाच्या भव्य परंपरेला दोन दिडक्या मिळाव्या म्हणून काळिमा फासायला आपण तयार होतो ?  परराष्ट्रांना फसवतो, स्वराष्ट्राला फसवतो?  सरकारला प्राप्तीवरचा कर प्रामाणिकपणे कोण देतो?