रविवार, मे 31, 2020
   
Text Size

धर्म

आपण आपल्या मित्रांच्या डोळ्यांसमोरही उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. आपणच फक्त उदात्त ध्येयाचे पूजक न बनता आपल्या मित्रांनाही केले पाहिजे. क्षुद्र गोष्टीत रंगणार्‍यांची संगत नका. संन्यासी असो वा गृहस्थ असो- मनुष्याने धुतल्या तांदळाप्रमाणे राहण्याची खटपट केली पाहिजे. उदात्त जीवनाची पूजा त्याने चालविली पाहिजे. ब्राह्मण असो वा शूद्र असो; प्रत्येकाने स्वाभिमानी राहून दुसर्‍यासही स्वाभिमानी राहावयास शिकविले पाहिजे. स्वत:ची मान वर ठेवून इतरांची मान वर राहील, स्वत:च्या दुबळेपणामुळे आणि समाजाच्या उर्मटपणामुळे व अनियंत्रितपणामुळे ती खाली होणार नाही म्हणून झटले पाहिजे. दुसर्‍यास पशूसमान जेथे लेखले जाते, तेथे कोणाचेही हित करता येत नसते. आपल्या औदासीन्याने आपल्या जवळच्या बंधूस पशुस्थितीत जर आपण राहू दिले, त्यास पशूप्रमाणे इतर वागवीत आहेत हे जर उघड्या डोळ्यांनी पाहून, त्वेषाने आपण उठलो नाही, तर आपण काय पराक्रम करणार, कोणती सेवा करणार ?

शाळेमध्ये त्या त्या वर्गात शिकविण्यासाठी क्रमिक पुस्तके तयार केलेली असतात. परंतु त्या सर्व पुस्तकांमिळून शिक्षण पुरे होत असते. प्रत्येक धड्याला महत्त्व आहे. प्रत्येक धड्याकडे शाळेचे चालक लक्ष देतात. संस्कृतीचेही तसेच आहे. उद्योगधंद्यांतील माणसाची सचोटी संन्याशाच्या वैराग्याइतकीच पवित्र वस्तू आहे. संन्याशाचा त्याग प्रभुचरणावर अर्पण करण्यास जितका योग्य, तितकीच व्यापार्‍याची ती सचोटीही योग्य आहे. जगात प्रामाणिक सांसारिक नसतील, प्रामाणिक कर्मयोगी नसतील, तर खरा संन्यास टिकणार नाही. उत्कृष्ट प्रपंच असेल तरच संन्याससंस्था टिकेल, नाही तर तिचा अध:पात होईल व ती धुळीस मिळेल. संन्यासाचे महत्त्व ज्याला वाटत असेल, त्याने आधी समाज सुसंघटित व संपन्न आहे की नाही हे पाहिले पाहिजे.

व्यावहारिक अशा गोष्टीचे महत्त्व आज हिंदुधर्माने ओळखले पाहिजे. फार व्यापक न होता आज जरा कमी व्यापक व्हावयास शिकले पाहिजे. मोक्षनगराकडे डोळे न लावता पायाजवळच्या दीन संसाराकडे पाहिले पाहिजे. विरूध्द वाटणार्‍या अशा ध्येयांचा आज हिंदुधर्माने समन्वय केला पाहिजे. नवविकासाला अनुरूप व अनुकूल असे विचारखाद्य आपल्या अपार भांडारगृहांतून हिंदुधर्माने पुरविले पाहिजे, काढले पाहिजे, वाढले पाहिजे. व्यवहारातील जीवन व्यवहारांशी जोडले जाऊ दे. अति अ-कर्मी अतिकर्माशी मिळू दे. संन्यास व कर्मयोग यांचा योग्य सहकार होऊ दे. कर्मयोगाच्या निरोगी व सुंदर झाडाला संन्यासाचे फळ येते. कर्मयोगाच्या खांद्यावर संन्यास उभा असतो. जेथे उत्कृष्ट कर्मयोग नाही, तेथे संन्यास पडेल, मरेल. संन्यास व कर्मयोग यांच्या परस्पर मर्यादा नीट ठरल्या पाहिजेत; यांचे परस्पर संबंध नीट जोडले पाहिजेत, ओळखले पाहिजेत. रानावनातील संन्याशालाच मोक्ष मिळतो असे नाही, तर घरात दळणकांडण करणारी, सर्वांची सेवाचाकरी करणारी जी कष्टमूर्ती स्त्री तिला किंवा शहरातील खाटिक सजन कसाई त्यालाही मोक्षाचा तितकाच अधिकार असतो व तो मोक्ष त्यांना मिळतोही, मिळालाही.

 

ही दृष्टी जर नीट समजली, हा वर सांगितलेला विचार जर पूर्णपणे पटला, तर आपणास जुन्या धर्मग्रंथांकडे नवीन दृष्टीने पाहावे लागेल. ज्या वचनांमुळे आपल्या या सभोवतालच्या जगातील नाना प्रकारची सेवेची कर्मे करण्यास उत्साह वाटेल, स्फूर्ती मिळेल, अशा प्रकारची वचने आपण शोधून काढली पाहिजेत. त्या वचनांवर जोर दिला पाहिजे, भर दिला पाहिजे. ती वचने आज जीवनाला वळण देणारी झाली पाहिजेत. त्या वचनांचा जयजयकार सर्वत्र केला पाहिजे. कर्मत्यागाने जो मोक्ष मिळतो, तोच कर्म सतत केल्यानेही मिळतो, असे शिकविणारी शेकडो वचने आहेत. परंतु संन्यासावरचे सारा भर आजपर्यंत दिला गेला व त्यामुळे कर्मयोगाच्या आचरणाकडे संन्यासावरच सारा भर आजपर्यंत दिला गेला व त्यामुळे कर्मयोगाच्या आचराणाकडे लोकांनी लक्ष दिले नाही. लोकसंग्रहरूप धर्माचरणाची उपेक्षा केली गेली. लोकसंग्राहक धर्माची महती दाखवली गेली नाही. पाश्चिमात्य समाजरचनेत संन्यासाला स्थान नाही ही उणीव आहे खरी, परंतु हिंदुधर्मांतही नागरिकत्वाची कर्तव्ये, सामाजिक कर्तव्ये यांवर जोर दिला जात नाही. ही उणीव आहे, ही पण गोष्ट तितकीच खरी. ज्या वेळेस हिंदुधर्मग्रंथ रचले गेले, त्या वेळेस आध्यात्मिक संपत्तीबरोबर आधिभौतिक संपत्तीही येथे भरपूर होती, हे या वरील उणिवेचे कारण असणे शक्य आहे. परंतु देशातील ऐहिक वैभव कमी होताच आध्यात्मिकताही लोपली; प्रपंच रोडावताच सत्त्वाचाही र्‍हास झाला. एकाचा विनाश होताच दुसर्‍याचा विनाश थांबणे अशक्य होते. आज संपत्ती व सद्गुण, ऐहिक व पारमार्थिक, अभ्युदय व नि:श्रेयस दोन्ही गोष्टी आपणास मिळवून घ्यावयाच्या आहेत, हे विसरून चालणार नाही.

म्हणून आज श्रमांची महती शतमुखांनी गायली पाहिजे. आज कर्माची पूजा केली पाहिजे, कर्माला सिंहासनावर बसविले पाहिजे. “कर्मदेवी भव”  हे आज आपले जीवनसूत्र झाले पाहिजे. ‘जग म्हणजे पाठशाळा आहे.’  या शाळेत एकेक धडा शिकत शिकत खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जावयाचे असते. आपण चाकाला स्वत: खांदा दिला पाहिजे व डोळ्यांसमोर जे प्राप्तव्य आहे, ते प्राप्त होईपर्यंत अविश्रांत श्रम केले पाहिजेत. कष्टेविण कीर्ती कदापि नाही. हे ओळखून वागले पाहिजे. व करंटेपण दूर झुगारले पाहिजे. उत्कट व भव्य जे जे आहे हे घेण्यासाठी अदम्यपणे उठविले पाहिजे. सांसारिक जीवनात परिपूर्णता अशक्य आहे. निर्दोष व अव्यंग असे परमपद प्राप्त होणे अशक्य आहे, असे आपले तत्त्वज्ञान जरी सांगत असले तरी - मुळीच प्रगती होणार नाही, परिपूर्णतेकडे मुळीच जाता येणार नाही- असे ते म्हणत नाही; परिपूर्णतेच्या जवळ जाणे शक्य आहे. या सापेक्ष जगात कर्म करीत असताना, पुढच्याच पावलाला कदाचित् परिपूर्णता मिळेल, अशा दृढतम श्रध्देने आपण पुढे जात राहिले पाहिजे.

साध्या साध्या अशा रोजच्या कर्मातही ध्येयवादित्व सोडता कामा नये. एका कारखान्यातील कोण एका मजुराला “तू चांगले स्क्रू करतोस का ?” असा कोणी प्रश्न केला. त्या मजुराने उत्कटतेने व तेजाने उत्तर दिले, “चांगलेच नाही तर जितके उत्कृष्ट करता येणे शक्य असेल, तितके उत्कृष्ट स्क्रू मी तयार करीत असतो.”  हीच दृष्टी आपली असली पाहिजे. शक्य तितके उत्कृष्ट स्क्रू तयार करा. जे हातात घ्याल ते उत्कृष्ट करा. कोणत्याही कार्यक्षेत्रात जा, कोणतेही समाजसेवेचे कर्म उचला, परंतु “उत्कृष्ट स्क्रू तयार करीन” हे सूत्र विसरू नका. उत्कृष्ट करणे, परमोच्च संपादणे, त्या त्या कर्मात पराकाष्ठा करणे- हे कठीण नाही, पराकाष्ठा पाहिजे. पराकाष्ठा हीच कसोटी- हीच परीक्षा. पराकाष्ठेपेक्षा कमी नको. कसे तरी मेंगुळगाड्यासारखे मिळमिळीतपणे केलेले, वेठ मारलेले, झटपटरंगार्‍याप्रमाणे केलेले नको. सोपे, स्वस्त नको. संन्यास घेणार्‍या संन्याशाला जी तीव्रता असेल, जो उत्साह व जी उत्कटता त्याच्या ठिकाणी असेल, ती मजूर होण्यातही असू दे. मजूर होण्याने जर मातेची सेवा आज उत्कृष्टपणे करता येत असेल, तर आज आपण उत्साहाने मजूर होऊ या आणि मातेचा संसार साजरा करू या.

 

संन्यास व कर्मयोग यांच्या सहकाराची आवश्यकता

प्रत्येक धर्मात कोणती तरी एक मुख्य कल्पना असते व त्या कल्पनेभोवती त्या धर्माचा विस्तार होत असतो, त्या कल्पनेच्या अनुरोधाने त्या धर्माचा विकास होत असतो. प्राचीन मिसर देशांतील धर्मात मृत्यूच्या कल्पनेला प्राधान्य होते; इराणी लोकांच्या धर्मात पापपुण्याचा मुख्यत्वेकरून विचार केला जात असे. मानवजातीला तारणारा, मानवजातीचा उध्दार करणारा जो थोर अवतारी पुरुष, त्याच्या दिव्य प्रेमाची महती ख्रिश्चन धर्मात आहे; एका हिंदुधर्मानेच काय ती वैराग्य व मोक्ष यांच्याकडे उडी मारली आहे. हिंदुधर्म, जे संकुचित आहे, त्याचा अंगिकार करीत नाही. हिंदुधर्माला, जे विशाल आहे, जे उदात्त आहे., ते कवटाळावे असे वाटते. फार उंच उडी मारणे ह्यात हिंदुधर्माचा मोठेपणा आहे, परंतु ह्यांतच हिंदुधर्माचा दोषही आहे. ज्या गोष्टीत हिंदुधर्माची थोरवी आहे, त्या गोष्टींतच हिंदुधर्मातील उणीव आहे; कारण जो जो नवा विचार येईल, जो जो नव प्रकाश येईल, त्याला आपलासा करून घेण्याची सर्व संग्राहक दृष्टी, ही सनातन दृष्टी हिंदुधर्माजवळ आहे. विविधतेतून एकता निर्माण करण्याची कला हिंदुधर्माला साधलेली आहे. हिंदुधर्माला ही हातोटी मिळालेली आहे. हिंदु संस्कृती पुराणप्रिय आहे. परंतु हिंदुधर्म संग्राहक आहे. हिंदु संस्कृती जे नवीन आहे त्याच्याशी टक्कर देते, त्याला विरोध करते; परंतु हिंदुधर्म नवीन घ्यावयास आनंदाने उभा असतो. सुस्वागत म्हणावयास सज्ज असतो. मानवी संस्कृतींतील हा एक विरोधाभास आपणास येथे पाहावयास सापडतो. नाना प्रकारच्या धार्मिक मतमतांतरांतून हा धर्म मुळात निघाला. वेदान्त या संज्ञेने ओळखल्या जाणार्‍या तत्त्वज्ञानाने सर्व मतभेदांचा समन्वय केला. पुढे मुसलमानानी धर्माशी जेव्हा संबंध आला तेव्हा पुन्हा हिंदुधर्मांत नवीन उदार पंथ निघाले. आज ख्रिस्ती धर्माशी संबंध आला तर याही काळात नवीन पंथ निघालेच. इतर धर्मांतून निघालेल्या नवीन विचारांमुळे, मिळालेल्या नवीन ध्येयामुळेच हे नवीन पंथ निघाले. प्रत्येक नवीन पंथ अन्य धर्मातून मिळालेल्या नवीन ध्येयामुळेच हे नवीन नवीन पंथ निघाले. प्रत्येक नवीन पंथ अन्य धर्मातून मिळालेल्या नवीन ध्येयामुळेच अस्तित्वात आला. मिळालेल्या नवीन ध्येयाबद्दलची पुज्यबुध्दीच, मिळालेल्या नवीन दृष्टीबद्दल वाटणारी कळकळच, या नवपंथस्थापनेने प्रकट केली.

जीवनक्षेत्रांतील नवीन नवीन भाग, नवीन नवीन क्षेत्रे आज आपणास आपलीशी करून घ्यावयाची आहेत. बारीकसारीक गोष्टींकडेही आज लक्ष देण्याची जरूरी आहे. ख्रिस्ती धर्मातील मर्यादित दृष्टी आज आपणास अंगीकारिली पाहिजे, येरव्ही गत्यंतर नाही. आकाशाकडे पाहावयाचे सोडून आज पायांपाशी आधी पाहण्याची जरूरी उत्पन्न झाली आहे. ज्यांना मुक्ती नको असून स्वर्गच केवळ पाहिजे आहे, त्यांनाही धर्म शिकविला पाहिजे, त्यांना उत्तेजन दिले पाहिजे. सदाचार व धगधगीत वैराग्य समाजात दोन्ही पाहिजेत. कर्म व संन्यास दोन्ही पाहिजेत. एक थोर संन्यासी समाजात निपजावयास हजारो उत्कृष्ट गृहस्थांची जरूरी असते. जेथे कर्माची उत्कृष्ट पूजा होत आहे, तेथेच खरा संन्यासी निर्माण होईल. कर्माची सुंदर, सुगंधी फुले ज्या समाजरूपी उपवनात नित्य फुलत असतील तेथेच संन्यासाचे उत्कृष्ट फळ एखादे वेळेस लागण्याचा संभव असतो. संन्याशाच्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. परंतु त्याच्याही आधी नागरिक धर्माचे तत्त्वज्ञान, गृहस्थांचे तत्त्वज्ञान, प्रपंचाचे-व्यवहाराचे तत्त्वज्ञान, याची अधिक आवश्यकता आहे.

एका गोष्टीला मान दिल्याने, दुसर्‍या गोष्टी नालायकच ठरतात, असे होत नाही. त्या त्या काळी निरनिराळ्या ध्येयांना, भिन्न भिन्न तत्त्वांना श्रेष्ठत्व देण्यात येत असते. अनेक ध्येयांचा समन्वय म्हणजेच पूर्णत्व. पूर्णत्व हे दिव्य आहे, अनंत आहे, अपार आहे. जो समाज अत्यंत सुसंघटित व नीतिमय आहे, त्या समाजात थोर संत निर्माण होत असतात. मातापितरांच्या पवित्रतेमुळे, कुळात साचलेल्या तिळतिळ पवित्रतेमुळेच अवतारांचे जन्म संभवतात; समाजात पवित्रता भरपूर जमली म्हणजे त्या पवित्रतेतूनच संत-जन्मांची भूमिका तयार होत असते. जेथे उत्कृष्ट आदर्शभूत गृहस्थधर्म आहे, जेथे वैवाहिक संबंध नीट पाळले जातात, बंधनांच्या पलीकडे गेलेले असे जे विषयलोलुप भोगासक्त जीव, त्यांचा बुजबुजाट जेथे फार झालेला नाही, तेथेच खरा संन्यासी लाभणे शक्य आहे; तेथेच जिवंत संन्यास दिसू शकेल. उदात्त असे धार्मिक ध्येय समाजात सदोदित तळपत राहावे असे वाटत असेल, तेजस्वी संन्यास समाजात असावा, असे वाटत असेल, तर ह्या ध्येयसंवर्धनासाठी म्हणूनच उत्कृष्ट गृहस्थांची, मानधन नागरिकांची, कर्तव्ये नीट पार पाडणार्‍या सन्मान्य जनतेची नितांत आवश्यकता आहे.