रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

हिंदुधर्म व संघटना

स्वयंसेवक होऊन चार जणांनी एकत्र येणे, समुदायरूप व्यक्ती होणे व कार्यभार उचलणे- हा जयिष्णू हिंदुधर्मातील विशेष होय. समाजसेवेसाठी व्यक्तीने सामुदायिक व्यक्तित्व पत्करावयाचे व स्वत:चे व्यक्तित्व जणू विसरावयाचे. समुदायाचे हातपाय आपण व्हावयाचे. परंतु प्रत्येक कार्य सिध्दीस जाण्यासाठी आजूबाजूच्या विशाल समाजातही तशा प्रकारची हालचाल, तशा प्रकारचे विचारवारे असावे लागतात. यासाठी अल्पसंख्याक संघांनी व आश्रयांनी बहुसंख्य अशा समाजाचे शत्रू बनून काम करू नये तर सेवक बनून काम करावे. शिव्याशाप देऊन काम करू नये, तर त्यांचे शिव्याशाप सहन करून काम करावे. एका चळवळीला यश येण्यासाठी इतर अनेक चळवळी निघाव्या लागतात; व मग या चळवळीचा परस्पर उपयोग होतो, एकमेकांस आधार मिळतो, फायदा मिळतो. हिंदुस्थानात औद्योगिक शिक्षण देण्यास भरपूर फंड नव्हते असे नाही. फंड भरपूर जमले, जमतील; परंतु आजुबाजूच्या समाजात एकंदर औद्योगिक वातावरणच मुळी कमी, साहस कमी, औद्योगिक दृष्टी कमी- ही गोष्ट औद्योगिक शिक्षणाच्या बाबतींतील मुख्य अडचण आहे. शिक्षण व प्रगती यांच्यामध्ये प्रमाण ठरलेले आहे. अदलून बदलून, आलटून पांलटून दोन्ही गोष्टींना निश्चयपूर्वक पुढे रेटीत नेले पाहिजे. या सर्व गोष्टी व समाजाला उच्च शास्त्रीय शिक्षणाची कितपत जरूरी आहे, ही गोष्ट यातही प्रमाण आहे. उद्योगधंदे नसतील तर शास्त्रीय शिक्षण तरी कशाला ? आणि हे सर्व प्रश्न पुन्हा सर्वसंग्राहक समाजाच्या उत्साहावर अवलंबून असतात. समाजाच्या उत्साहावर समाजाच्या गरजा अवलंबून असतात. समाजाचे कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कोणती संघटना पाहिजे आहे, वगैरे गोष्टींचा विचार सेवा-संघाची सामुदायिक उत्साहशक्ती करीत असते. संघाचा सामुदायिक उत्साह ! एका ध्येयाने प्रेरित झालेल्या संघाचा उत्साह ! सांघिक उत्साहाची ही नवीन भावना, ही नवीन कल्पना, सर्वांच्या हृदयात आज आधी पेटली पाहिजे. ही भावना जागृत करा, विकसित करा, वाढवा, पेटवा, ह्या भावनेला नेहमी कार्यमग्न ठेवा. सामुदायिक शक्तीने आज प्रथम पुढील गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाचा अभाव ही मुख्य बाब प्रथम हाती घेतली पाहिजे. जनतेची मनोभूमी नीट चांगली नांगरून टाकण्याची जरूरी आहे. या कामाला रावांनी व रंकांनी, छोटयांनी व मोठ्यांनी, सर्वांनी हातभार लावला पाहिजे. हे काम करण्यासाठी भिकारी बना, दारिद्र्याच्या परम वेदना सहन करा. आपल्याच फक्त पोरांबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न नाही, तर सर्वांच्या, ही गोष्ट अशी आहे की, जीत सर्वांचे हित तेच आपले हित, सर्वांची जरूरी तीच आपली जरूरी, असे झाले पाहिजे. आपणाला आपल्या संस्कृतीत चैतन्य ओतावयाचे आहे. वस्तूंकडे व्यापक दृष्टीने बघावयास, सर्व दृष्टींनी बघावयास शिकावयाचे आहे मानवजातीला जे जे ज्ञान आहे, त्याचे आपण स्वामी झाले पाहिजे. कोपर्‍यात कुंपण घालून राखून ठेवलेले थोडेसे ज्ञान, तेवढ्याने आता संतुष्ट राहून चालणार नाही. या बाबतीत अल्पसंताषीपणा नको. ज्ञानाची भूक वाढतच जावो. शास्त्रसंशोधनासाठी, निरोगी व धष्टपुष्ट जीवनासाठी, हितकर विचार करण्यासाठी, व्यापक दृष्टीसाठी, आपण लायक आहोत की नाही ? या गोष्टीसाठी आपणात हिंमत व कुवत आहे की नाही ? असेल तर ती स्वत:ची शक्ती, स्वत:ची लायकी सिध्द करून दाखविण्याची वेळ आली आहे.

या अज्ञानरुपी शत्रूच्या किल्ल्यावर हल्ला चढविण्यासाठी आपण कोठून निघावे ? हा हल्ला धैर्याने प्रथम धार्मिक बाजूकडून धर्मसंस्थांनी सुरू करावा. ज्या देशांतून बौध्दधर्म आहे, त्या देशात बौध्दभिक्षूंच्या विहाराभोवतीच शाळा, ग्रंथालये, संग्रहालये, औद्योगिक शिक्षण यांच्या संस्था उभारलेल्या असतात. धर्माच्या ओलाव्यानेच या गोष्टी त्या देशात वाढतात. आपल्या देशातही धर्मानेच या अज्ञानावर हल्ला का चढवू नये ? दक्षिण हिंदुस्थानातील प्रचंड मठ व मंदिरे यांनी बुध्दविहारांप्रमाणे हे ज्ञानदानाचे व ज्ञानसंवर्धनाचे काम का सुरू नये ? या श्रीमंत देवस्थानांनी असे उदाहरण का घालून देऊ नये ? नवीन उच्च शिक्षण का वाढवू नये ? ब्राह्मण हा पुराणप्रिय असतो, कूपमंडूक असतो, अशी शंका घेतां? अशी भीती तुम्हाला वाटते ? परंतु अशी शंका का यावी ? आपणास जर देशकालानुरूप योग्य विचार करता येतो, तर ब्राह्मणांत वा देवस्थानांच्या व मठांच्या संतमहंतांत ती पात्रता नसेल का ? जगातील कोणत्याही राष्ट्राला जी जास्तीत जास्त विशाल व अत्यंत प्रगल्भ अशी दृष्टी घेता येईल, ती दृष्टी भारतातील सर्व बंधू घेतील, घेऊ शकतील, अशी अपेक्षा आपण धरू या. अशी श्रध्दा बाळगल्यानेच आपण खरेखुरे हिंदुधर्माचे अनुयायी होऊ हा नवीन विचार आहे, नूतन आरंभ आहे. हे पहिले आरंभकर्ते, नवपंथप्रवर्तक हिंदू आपण होऊ या. ‘ हिंदू ’ हा भव्य व थोर शब्द स्वत:ला लावून घेण्यापूर्वी तो शब्द लावून घेण्यास आपली पात्रता आहे का, त्या शब्दावर आपला हक्क आहे का, याचाही विचार करा. आपल्या देशाचे, आपल्या धर्माचे नाव स्वत:ला लावणे - मी अमक्या देशाचा व अमक्या धर्माचा असे म्हणणे - पोरखेळ नाही. ही गंभीर गोष्ट आहे. त्या पुण्यभूमीचे व पुण्यधर्माचे नाव स्वत:ला लावणे म्हणजे एका नवीन पंथाची आपण पवित्र दीक्षा घेणे होय; ते नाव आपण स्वत:ला लावणे म्हणजे एका नवीन पंथाची आपण पवित्र दीक्षा घेणे होय; ते नाव आपण स्वत:ला लावणे म्हणजे आपण स्वत:ला प्रेमाने निष्ठापूर्वक त्यांच्या सेवेस बांधून घेणे होय; स्वेच्छेने श्रमावयास व झिजावयास आपण सिध्द झालो, याची ती खूण होय.


 

ज्या कामाबद्दल उत्साह वाटत असेल, ज्या कामाची माहिती असेल, ते काम, ती सेवा करावयास त्या त्या मनुष्याने पुढे यावे. लायकी पाहावी, मग त्याची जात, त्याचा वर्ण याचा विचार करू नये. मानवजातीचा जो सेवक झाला, त्याचा जन्म कुठेही झालेला असो, तो पवित्र आहे. तत्त्वज्ञानी ज्ञानाने ऋषी बनतो, तर सेवा करणारा सेवा करून मनाने पवित्र व शुध्द होत होत संत होतो.

आपण दहा जण जेव्हा कमर कसून एकाच कामासाठी पुढे येतो, तेव्हाच ते कर्म सुकर वाटते;  त्या कर्माबद्दल उत्साह वाटतो, कर्तृत्वशक्ती दुणावते. जेव्हा कर्म एका व्यक्तीचेच न राहता, एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या संघाचे ते होते, तेव्हा कर्मशक्तीला भरते येते; अडचणी व संकटे पळून जातात. मला कोण मदत करणार, कोण साहाय्य देणार, अशा रडगाण्याला मग अवसरच राहत नाही. येथे एकटयाची मुशाफरी नसून, संबंध जथाच्या जथा यात्रेला निघालेला असतो; यामुळे वाटेतील संकटे पाहून भीती न वाटता उलट आनंदच होतो. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन अनेकांनी एखाद्या कार्यास लागणे, ही प्रचंड शक्ती आहे. समान भावना आपणास प्रबळ करते, अजिंक्य करते. लहान लहान धर्मपंथांनी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रचंड चळवळी केल्या, याचे कारण त्या पंथाचे अनुयायी सारे एकाच विचाराने भारलेले असत. उदाहरणार्थ, लहानशा ब्राम्हो समाजाने हिंदुधर्माच्या मोठमोठ्या व ठळक ठळक अशा रूढींच्या बुरुजांवर हल्ले चढविले व त्यात त्यांना बरेचसे यशही आले. सेवकाला असे लहान लहान संघ म्हणजे मोठा आधार वाटतो. हे संघ, हे आश्रम म्हणजे जणू सेवकांचे घर. हा संघ म्हणजे जणू सेवकाची आईच. ही संघमाता, ही आश्रममाता सेवकास काम करावयास पाठवते; त्याच्या कामात यश आले म्हणजे त्याची पाठ थोपटते; त्याचे अभिनंदन करते; तो काम करून आश्रमात घरी परत आला म्हणजे त्याचे निंबलोण उतरते. सेवक आजारी पडला तर संघमाता त्याची शुश्रूषा करते. प्रेमळ मातेप्रमाणे त्याला जपते. अशा प्रकारचा प्रेमाचा विसावा, अशा प्रकारचे आधारधाम असल्याशिवाय, सेवकाचा उत्साह कसा टिकावा ? त्याने कोठवर धैर्य धरावे ? अशा प्रकारचे आधारभूत आश्रय नसतील, सेवकांचे कौतुक करणारे, त्याला साहाय्य देणारे, त्याच्याकडे लक्ष ठेवणारे जर आश्रय नसतील, तर सेवकास सेवा करावयास जोर कोठून येणार ? त्याला एकाकी काम करणे जड जाईल. आपल्या प्रेमळ बंधूंचा जो संघ, त्या संघाने आपणास उत्तेजन द्यावे, आपले काम पाहून आनंद दर्शवावा, असे सेवकास वाटत असते. या गोष्टीसारखी गोड गोष्ट सेवकाला अन्य कोणती असणार ? या प्रेमाच्या बळावरच, जी संकटे एरव्ही दूर करावयास आली नसतीं, ती तो सहज लीलया दूर करतो. ती संकटे दूर करावयास त्याला स्फूर्ती मिळते, चैतन्य मिळते. ही स्फूर्ती मिळाल्याने ज्या संकटांना पाहून तो पळाला, त्यांनाच तो धैर्याने तोंड देतो. ‘नेति नेति’ या निषेधात्मक ज्ञानाने आत्म्याने वाटेल तितके वर चढावे, परंतु ही वर सांगितलेली सेवेची व संघटनेची गोष्ट विसरता कामा नये.

आज संघटना करून सामुदायिकरीत्या अनेक प्रश्न हाती घेतले पाहिजेत. ते प्रश्न आपली वाट पाहत आहेत. मी एकटा दुनियेला हलवीन या भ्रमात, या पोकळ घमेंडीत अत:पर कोणी राहू नये. लावलेला प्रत्येक शोध, लिहिलेले प्रत्येक काव्य, कल्पनेत खेळवलेले प्रत्येक स्वप्न, संपादिलेली कोणतीही गोष्ट- ती सामुदायिक होऊ दे, सर्वांची मिळून होऊ दे, सर्वांसाठी होऊ दे त्या त्या गोष्टीच्या सिध्दीसाठी समाजाने सहाय्य केले आहे. म्हणून समाजालाही त्यांची फळे चाखू दे; जो खरा धर्ममय सेवक आहे, त्याने स्वत:चा अहंकार आधी साफ पुसावा. मी म्हणजे मुख्य कार्यकर्ता, ही भावना त्याने आधी दूर फेकून द्यावी. प्रबळ स्नेहबंधनांनी एकत्र बांधलेले, एकाच ध्येयाचे भक्त बनलेले, अशा दोन-चार लोकांनी प्रथम एकत्र यावे, आणि नंतर मानवजातीचे ज्यात कल्याण आहे, स्वबांधवांचे ज्यात खरे हित आहे, असे कोणते तरी कर्म अंगावर घ्यावे. ते प्रथम शाळेत किंवा महाशाळेत एकत्र शिकलेले असतील; कदाचित एकाच गुरुच्या हाताखाली शिकल्यामुळे ते गुरुबंधू झालेले असतील; कधी ते एकाच गावचे असतील वा एकाच धंद्यात काम करणारे असतील. त्यांना एकत्र आणणारे, परस्परांस जोडणारे बंधन मुळात कोणतेही असो, त्यांच्यात समान ध्येय असावे, प्रयत्नात सहकार्य असावे. त्यांच्यातील ज्या व्यक्ती संस्थेच्या प्राणभूत अशा असतील, त्या व्यक्तीत अभंग प्रेमबंध असावा, अतूट व अखूट प्रेम असावे. अशा तर्‍हेने जर एकत्र येऊन कार्याला आरंभ केला, तर यश येण्याचा संभव असतो.

 

हिंदुधर्माची वाढ अत्यंत सुंदर रीतीने व सुसंबध्दपणे झालेली आहे. हिंदुधर्मात ज्या उणिवा आहेत, त्या तो वाढता असल्यामुळे आलेल्या आहेत. हिंदुधर्म यंत्र नसून, वृक्षाप्रमाणे वाढता आहे. आजचे युग यंत्राचे आहे. यंत्रयुगात तंतोतंतपणा, काटेकोरपणा, हिशेबीपणा, व्यवस्थितपणा, चोखपणा या गोष्टी आवश्यक असतात. हे गुण नसतील तर यंत्रदेवता प्रसन्न होणार नाही. यंत्राच्या बाबतीत बिनचूकपणा पाहिजे. अशा या यंत्रयुगात जी वस्तू वाढत आहे, जिचा अजून विकास होत आहे, जिला अजून व्यवस्थितपणा पूर्णपणे प्राप्त झालेला नाही, अशा वस्तूच्या मार्गात अडचाणी उभ्या राहतात. हिंदुधर्मवृक्षाला आजपर्यंत जी फळे लागली ती अपूर्व आहेत, अमोल आहेत, परंतु ज्या गोष्टींचा लाभ व्यवस्थित कार्यपध्दतीने होतो, ज्या गोष्टी मिळविण्यासाठी हेतुपुर:सर प्रत्येक पाऊल टाकावे लागते, विचारपूर्वक प्रत्येक क्रिया करावी लागते, कार्यकारणभाव ओळखावा लागतो, योजना आखाव्या लागतात, अशा गोष्टी हिंदुधर्माच्या पध्दतीने आपणास मिळणार नाहीत. जगातील इतर धर्मांत न दिसणारा जो सत्याशी सहकार, तो हिंदुधर्मात आहे. सत्याजवळ हिंदुधर्माचा कसलाच वाद नाही. विचारवंत
मनाला अनंतात वाटेल तितकी खोल बुडी मारण्यास हिंदुधर्मात प्रत्यवाय नाही. वाटेल तो शोध लावण्यासाठी अंधारात असलेले जे वस्तूंचे स्वरूप ते प्रकट करण्यासाठी शास्त्रीय वृत्तीच्या माणसाने वाटेल तेथे उड्डाण घ्यावे; तत्त्वज्ञान्यांनी आपापले विचार खुशाल मांडावे, आपापली दर्शने दाखवावी; हिंदुधर्मात या गोष्टीला मुभा आहे. भोळेभाविक लोक मात्र या खोल पाण्यात न जाता, आत्मानात्मविचारात न शिरता आपल्या श्रध्देला चिकटून राहतात. हिंदुधर्मात ही स्वतंत्रता आहे, ही गोष्ट खरी. हिंदुधर्माला आज पुढील प्रश्न विचारण्यात येत आहे, “आपल्या मुलांबाळांस उच्च असे शास्त्रीय शिक्षण मिळावे म्हणून काय सोय करण्यात आलेली आहे ? शास्त्रीय ज्ञानात पुढे घुसण्यासाठी हिंदुधर्माने आपल्या मुलास प्रोत्साहन दिले आहे का? समाजसेवा करण्यासाठी हिंदुधर्माने आपल्या अनुयायांस स्फूर्ती दिली आहे का? संघटनेचे, सहकार्याचे महत्त्व हिंदुधर्माने ओळखले आहे का ?”

या गोष्टी संपादन करण्यास हिंदुधर्म मज्जाव करीत नाही. विवेकानंद म्हणत असत की, ‘हिंदुधर्माने आता जयिष्णू झाले पाहिजे.’ विवेकानंदांच्या म्हणण्याचा भावार्थ हा की, हिंदुधर्माने अत:पर एकांगी असून चालणार नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात अनिरुध्दपणे संचार करावयाचा; एकाच गोष्टीला वाहून घेऊन चालणार नाही; सर्वांगीण विकास आता करून घेतला पाहिजे; दक्ष राहून उत्साहाने सारा संसार साजरा करावयाचा; सर्व कारभार पाहावयाचा; सामुदायिक विचार करावयाचा; सामुदायिक जीवन वाढवावयाचे; सहाकार्य करावयाचे. हिंदुधर्माने जियिष्णू व्हावयाचे, याचा अर्थ परदेशात स्वधर्मप्रचारक पाठवावयाचे एवढाच नाही; तर स्वत:ची सुधारणा करावयाची, स्वत:चे सामुदायिक जीवन उत्कृष्ट व बलिष्ठ करावयाचे. मत-प्रचार करून हिंदुधर्मात नवीन भरती करणे एवढाच जयिष्णू हिंदुधर्माचा अर्थ नाही; तर कार्यावर, कर्मशक्तीवर, व्यापावर भर देऊन आध्यात्मिकताही त्याचबरोबर वाढवावयाची. आज धर्माला, सामाजिक कार्य करण्याची जी हौस, तिची जोड दिली पाहिजे. समाजसेवा हे धर्माचे प्रधान अंग आज झाले पाहिजे. मी म्हणजे मी एकटाच नाही, तर मी म्हणजे माझा सर्व समाज, अशी प्रगल्भ व विशाल भावना आपल्या हृदयात बिंबवून घेतली पाहिजे. शिक्षणाच्या प्रांतात आज वर्गमहत्त्व राहिले नाही. तेथे सर्वांना मुक्तद्वार आहे. ज्याला ज्याला म्हणून बुध्दी आहे, त्याने बुध्दिमान व्हावे, विचारवान् व्हावे, बौध्दिक कार्य करावे. ज्याला ज्याला म्हणून शिकण्याची हौस आहे, त्याने शिकावे. ज्याप्रमाणे शिक्षणप्रांतात कोणास अडथळा नाही, मज्जाव नाही, त्याप्रमाणे प्रत्येक सामाजिक बाबतीत, प्रत्येक सार्वजनिक कार्यात झाले पाहिजे. समाजसेवा कोणीही करावी. ती ती सेवा करण्यास लायक व्हा व ती ती सेवा करा. विद्यालये, रुग्णालये, संशोधनसंस्था, अनाथसंगोपनगृहे, सूतिकागृहे, अनाथ वनिताश्रम-नाना संस्थांची जरूरी आहे व या संस्थांतून ज्याला जे काम येत असेल, ज्याला ज्या कामाची हौस व आवड असेल त्याने त्या कामाला वाहून घ्यावे.