रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

त्यागवृत्ती

आज भारतवर्षात राष्ट्रभावना निर्माण झाली आहे. या भावनेसाठी हिंदुस्थान काय करणार आहे ? या नवीन भावनेस अनुरूप काय काय केले जाईल ? काय केले जाईल याबद्दल वाद नको. हिंदुस्थान या नवीन भावनेसाठी त्याग करणार, सर्वस्व ओतणार. राष्ट्राचे ध्येय एकदा नीट प्रज्वलित होऊ दे, विचारवन्ही नीट पेटू दे, म्हणजे त्यासाठी लागणारा त्याग पुरेपूर पुढे आल्याशिवाय राहणार नाही. राम दिसताच त्याच्याबरोबर मरावयास कोटयावधी वानर तयार होतच असतात. सीता मुक्त करायची आहे व सीता तेथे आहे हे नक्की कळण्याचाच अवकाश असतो. दिव्य व स्पष्ट ध्येय दाखवा म्हणजे त्या ध्येयार्थ त्याग करणारे आपोआप पुढे येतील. जो दिव्य संन्यास, जे दिव्य वैराग्य हिंदुधर्माचे परमोच्च ध्येय आहे, ते ध्येय आपणास हळूहळू गेल्यानेच प्राप्त होईल. प्रथम गावासाठी, मग प्रांतासाठी, मग राष्ट्रासाठी, मग विश्वासाठी अशा रीतीने त्यागविद्यालयात उत्तरोत्तर शिकून गेल्यानेच ते परमोच्च वैराग्य प्राप्त होईल. जो शहरातील म्युनिसिपालिटीचे काम चोख बजावताना नि:स्वार्थ राहील, तोच उद्या राष्ट्राचीही सेवा उत्कृष्ट बजावील. आजचा ग्रामसंन्यासी उद्या राष्ट्राचा संन्यासी होईल. आज ग्रामपंचायतीत उत्कृष्ट काम करणारा उद्या जिल्हा बोर्डात चांगले काम करील. अशा रीतीने उत्तरोत्तर वाढत गेल्याने, ग्रामसेवा, प्रांतसेवा, राष्ट्रसेवा अशा मार्गाने गेल्याने, चित्तशुध्दी होऊन मळ सारा झडून जाईल व मगच ज्ञान, भक्ती किंवा निरपेक्ष कर्मयोग यांच्या द्वारा जीवनात प्रकट होणारा परम संन्यास मनुष्याला प्राप्त होईल.

हा जो आज आत्मोध्दार करावयाचा आहे, राष्ट्रोध्दार करावयाचा आहे, त्याच्यासाठी अनेकांचे त्याग पाहिजे आहेत. आपल्या मुलाबाळांनी मामलेदार, मुन्सफ, वकील, बॅरिस्टर, कलेक्टर व्हावे, अशा आईबापांच्या ज्या आकांक्षा असतात, त्या आईबापांनी सोडून दिल्या पाहिजेत; एकदा सूनमुख बघू दे. नातवंडे खेळवू दे, असल्या इच्छा आईबापांनी फेकून दिल्या पाहिजेत; आपण अधिकारी होऊ, मोटार उडवू, पैसा कमवू, असल्या क्षुद्र इच्छा तरुणांनीही झुगारून दिल्या पाहिजेत; आणि हे नवीन संन्यासी, हे नवीन सेवाव्रती, हे सेवकराम भगवी वस्त्रे परिधान करून हिंडणार नाहीत, ते नाना कामे करतील, ते वर्तमानपत्रे चालवतील, कारखाने काढतील, संघटना काढतील, संस्था स्थापतील, संस्थांचे सभासद करतील; शाळा काढतील मजुरांची संघटना मोठ्या प्रमाणावर कशी करावी, शेतकर्‍याची स्थिती कशाने सुधारेल, शिक्षण कसे असावे, इत्यादी नानाविध राष्ट्रीय प्रश्नांचा रात्रंदिवस विचार करतील, मेहनत घेतील; किंबहुना, कुटुंबातही राहतील परंतु ‘उत्कृष्ट कुटुंबसेवा म्हणजे राष्ट्राचीच खरी सेवा’ या श्रध्देने ती कुटुंबसेवा करतील. त्या कुटुंबसेवेसाठी राष्ट्रहितावर आग ओतणार नाहीत व जेथे कुटुंबसेवा व राष्ट्रहित यांच्यात विरोध येईल त्या वेळेस कुटुंबाचा बळी देतील. कुटुंबही नीट दक्षतेने पाळावयाचे व वाढवावयाचे, परंतु पुढे ते राष्ट्राच्या कामाला यावे यासाठी वाढवावयाचे. वेळ आली म्हणजे कुटुंबाची होळी करावयाची. असा हा नवीन संन्यासी राष्ट्रास अर्पण करता यावे म्हणून लहान चिलयेही वाढवील. हिंदुस्थानच्या वतीने कुटुंबाची सेवा तो करीत राहील. कुटुंबासाठी म्हणून कुटुंबाची सेवा नाही, तर राष्ट्रासाठी म्हणून कुटुंबसेवा अशा अर्थाने व वृत्तीने कुटुंबातही राहतील, कुटुंबीही होतील.

श्रीगीता सांगते, “ज्याला भय नाही व इच्छा नाही असा जो निरिच्छ, नि:स्पृह, निर्भय पुरुष, तोच संन्यासी.” संन्याशाच्या वेशाने नटलेला, गेरूचा रंग दिलेला, भगवा पोषाख केलेला नव्हे; तर अंतरी त्यागाने रंगलेला संन्यासी वेषाचा नव्हे, तर संन्यस्तवृत्तीचा. ज्याला भय नाही. आशा-कामना नाहीत; जरूर पडली तर समाजासाठी पोराबाळांची उपासमार जो उघड्या डोळ्यांनी पाहील; आपल्या आजच्या पराजयांतूनही भावी पिढीला दिव्य विजय मिळेल या आशेने व श्रध्देने आजचे पराजयही स्वीकारावयास सज्ज असलेला; स्वत:च्या कामावाचून दुसरे ज्याला घर नाही; नि:स्वार्थ हेतूशिवाय अन्य ज्याची मालमत्ता नाही; जे ध्येय त्याला स्वत:ला दिसत असते व ज्याच्यासाठी तो स्वत:चे रक्त सांडीत असतो, जिवाचे रान करीत असतो, ‘ते ध्येय माझ्या इतर बंधूंच्याही दृष्टिपथात मी आणीन, त्यांनाही ते अनुभवयास व पूजावयास लावीन,’ या विचाराशिवाय, या आशेशिवाय ज्याला अन्य कसली आशा नसते; असे संन्यस्त वृत्तीचे तरुण आजच्या छात्रवृंदात, तरुणांत दिसू लागले आहेत. या तरुणांना, त्यांच्या आईबापांना, त्यांच्या आप्तमित्रांना आम्ही असे सांगण्याचे धाडस करितो की, “जी उदात्त ध्येये, ज्या थोर आशा, जी महनीय व स्पृहणीय स्वप्ने तरुणांच्या हृदयात आज उसळत आहेत व दृष्टीस दिसत आहेत; त्यांना खोटी मानू नका; तो भ्रम समजू नका. त्या स्वप्नांसाठी सर्वस्व पणास लावा. स्वत:वर श्रध्दा ठेवा. पुढे येणार्‍या पिढीवर श्रध्दा ठेवा. पुढील पिढी तुमचे काम पुढे चालवील, ही खात्री बाळगा. मनात उचंबळणार्‍या ह्या उदात्त भावना खर्‍या माना व त्यांच्यासाठी सर्व अर्पण करा, प्राण द्या. व्हा, पुढे व्हा. हं ! चला पुढे चला. जेवढे दिसते आहे, तेथे पाऊल भक्कम रोवा त्याच्या पुढच्या पावलासाठी मातेवर विश्वास ठेवा. जो नवभारत आज निर्माण व्हावयाचा आहे तो तुमच्या हृदयांमधून, मनोवृत्तींतून, जीवनातून, प्रयत्नांतून, उद्योगांतूनच, स्वप्नांतून, ध्येयांतून निर्माण व्हावयाचा आहे. तो नवभारत आज तुम्हांला दिसत नसताही, त्या दूर दिसणार्‍या ध्येयरूप भारतासाठी आशेने व श्रध्देने श्रम करणारे व मरावयासही सिध्द होणारे जे तुम्ही- ते धन्य आहात ! म्हणा ‘भारत माता की जय !’ , ‘म्हणा वंदे मातरम् !’

 

ही फ्रायर संन्याशांची गोष्ट झाली, तेराव्या शतकातील. परंतु त्याच्याही आधी अकराव्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये अत्यंत तपस्वी व त्यागी लोकांचा एक संघ निघाला होता. यांना सिस्टरशियन म्हणत. र्‍हाइन नदीकाठच्या व फ्रान्सधील दर्‍याखोर्‍यांत रानावनात व दलदलीच्या प्रदेशात हे लोक गेले. त्यांनी जंगले तोडली. दलदली सुकवल्या; मोठ्या प्रमाणावर त्यांनी शेती सुरू केली; त्यांनी मंदिरे बांधली, मठ बांधले. त्यांच्यातील काही लोक पुढे नॉर्वे देशात गेले. तेथे त्यांनी दगडांची घरे कशी बांधावी ते शिकवले; तेथील लोकांना रोमन लिपी व तेथील लोकांस राष्ट्रीय महाकाव्ये रचण्यास समर्थ केले.

ज्या युरोपमध्ये आज स्वार्थाचा जयजयकार केला जात आहे, जेथे स्वार्थ हाच देव होऊन बसला आहे, कोणतेही कार्य करण्याची प्रेरणा जेथे आज द्रव्यांतून व स्वार्थातून मिळत आहे, त्या युरोपचा पाया त्यागावर उभारलेला आहे. या युरोपियन लोकांच्या आजच्या संस्कृतीच्या पायात असे त्यागाचे शक्तिमान दगड घातलेले आहेत, म्हणून युरोप उभा आहे. त्यागामुळेच युरोपियन संस्कृती जिवंत आहे. त्या संस्कृतीच्या पायात असे सेवा करणारे महान् संत गाडले गेलेले आहेत. आजन्म श्रमणार्‍या, मुकेपणाने काम करणार्‍या त्या थोर पुरुषांनी आपल्या श्रमाचा मोबदला स्वत: न घेता समाजाला दिला व तेथे तो वाढीस लागला. त्या त्यागावरच, त्या भांडवलावरच युरोप उभा आहे. कोणतीही नवीन गोष्ट, नवीन शोध असो. ती गोष्ट तावून-सुलाखून आधी पाहावी लागते; ती निर्दोष व्हावी लागते; नीट व्यवस्थित पध्दतशीर व्हावी लागते. कोणाच्याही हातात देण्यासारखी ती झाली म्हणजे मग त्या गोष्टीपासून, त्या शोधापासून, फायदा मिळू लागतो. मग ती परिणत यंत्रे घरोघर जातात, बाजारात येतात. व्यवहार सुरू होतो; धंदे सुरू होतात; दर ठरतात, मजुरी ठरते. परंतु तो शोध, ते यंत्र अशा पूर्ण स्वरूपाला येण्यापूर्वी, नि:स्वार्थपणे सेवा करावी लागते; घरदार विकावे लागते; शोध करावे लागतात; प्रयोग करावे लागतात; अनेकांची आयुष्ये जातात; अनेकांना प्राण द्यावे लागतात, हुतात्मे व्हावे लागते. या अशा त्यागमूर्ती पुरुषांच्या डोळ्यांसमोर सर्व समाजाचे, सर्व जगाचे कल्याण, एवढाच प्रश्न असतो.

हिंदुस्थानची आज जी सामुदायिकरीत्या सुसंघटित रीतीने इंग्लंडहून लूट चालली आहे, तिचा पायाही त्यागावरच उभारलेला आहे व ही गोष्ट इंग्रजही अभिमानाने सांगतो व आपणही इंग्रजांच्या देशभक्तीचे उदाहरण म्हणून शाळांतून शिकवितो. दिल्लीच्या बादशाहाची मुलगी बरी केल्याबद्दल डॉक्टर हॅमिल्टन याने स्वत:साठी काहीएक न मागता, आपल्या कंपनीसाठी व्यापारी सवलती मागून घेतल्या; आपल्या संस्थेचा, संघाचा फायदा त्याने पाहिला. ज्या चळवळीत त्याग नाही, ज्या चळवळीच्या मुळाशी त्यागाची आध्यात्मिक शक्ती नाही, ज्या चळवळीत संन्याशाचे धगधगीत तेज नाही; त्या चळवळीची कोणासही भीती वाटावयास नको. परंतु त्यागावर उभारलेली चळवळ, फकिरांनी चालविलेली चळवळ ही विश्वाला गदागदा हलवील. या अशा संन्याशाच्या मनात समाजाच्या हिताची व कल्याणाची कल्पना सदैव जागृत असते. आपल्या व्यापारी बंधूंच्या अडचणी डॉक्टर हॅमिल्टन यास माहीत होत्या व त्यांच्या फायद्यांतच अप्रत्यक्षपणे माझा फायदा आहे, हेही त्याला माहित होते. त्यामुळे त्या व्यापारी संघासाठी स्वार्थत्याग करावयास तो सिध्द झाला. ज्या ज्या वेळेस नवीन संबंधाचे नवीन स्वरूप दाखवले जाते, त्या त्या वेळेस नवीन युगाचा उदय होत असतो, नवती मनूचा आरंभ होत असतो.

 

कोणतेही हाती घेतलेले कार्य हे नेहमीच आरंभापासूनच फायदेशीर होऊ लागते असे नाही. फारच थोड्या गोष्टी अथपासून इतिपर्यंत पैसे देणार्‍या असतात- फायदा करून देणार्‍या असतात. उदाहरणार्थ, समाजाच्या हिताच्या दृष्टीने शिक्षणाइतके महत्त्वाचे दुसरे काही नाही. परंतु कोणत्याही देशात जा, कुठल्याही समाजात जा, ज्ञानदानाचे काम करणारा गुरु- त्याला जेमतेम पोटापुरते वेतन मिळते. शिक्षक कसा जगता, ह्याचा लाजिरवाणा व शरमेचा इतिहास कोणाला माहीत नाही ? आज जगात कितीतरी ठिकाणी रोमन कॅथोलिक पंथाच्या धार्मिक संस्था शिक्षणाचे काम करीत आहेत. जेथे त्यांचा धर्म नाही, त्यांचा पंथ नाही, अशा देशातील शिक्षणाचा केवढा थोरला भार त्या संस्थांनी शिरावर घेतलेला आहे ! हा बोजा तो कसा घेऊ शकतात ? कारण रोमन कॅथोलिक विद्वान मनुष्य मोफत काम करावयास तयार असतो, आपल्या पंथाची इभ्रत वाढावी म्हणून विनावेतन शिक्षणाचे काम करावयास पुढे येतो. याने त्या माणसाचा व्यक्तिश: पैशाच्या रूपात फायदा होत नाही, परंतु त्याची जात, त्याचा पंथ यांचा जगात विजय होतो, यांना जगात तेज चढते, महत्त्व प्राप्त होते. त्यांच्या समाजाची प्रतिष्ठा वाढते. संस्थामधून काम करावयास येणार्‍यांच्या ज्ञानावर त्या संस्थांची व संस्था चालवणार्‍या पंथांची किर्ती अवलंबून असते; त्या काम करावयास येणार्‍यांच्या त्यागावर त्या संस्थांचा व पंथांचा विजय अवलंबून असतो. विद्वान व त्यागी स्त्री-पुरुष रोमन कॅथोलिक धर्मसंस्थांद्वारे शिक्षणाचे काम करावयास पुढे येतात व म्हणून रोमन कॅथोलिक पंथाला विपंथीय व विधर्मीय देशांतूनही महत्त्व प्राप्त झाले आहे. ही आजच्या शिक्षण प्रांतांतील गोष्ट झाली. परंतु कित्येक शतकांपूर्वी मध्य युरोपात इतर महत्त्वाच्या कर्मक्षेत्रांतही अशाच गोष्टी घडून आलेल्या दिसतील. इंग्लंडमध्ये फ्रायर नावाचे संन्यासी इ.स. १२२४ मध्ये युरोपमधून सेंट फ्रान्सिसने पाठविले व ते आले, त्यांच्याबद्दल जे. आर्. ग्रीन पुढीलप्रमाणे लिहितो :

“या ‘फ्रायर ’ संन्याशाचे काम इंग्लंडमध्ये दोन प्रकारचे होते. त्यांना लोकांची मने सुधारावयाची होती व शरीरेही सुधारावयाची होती. शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे रोग, दोन्ही प्रकारची गलिच्छता व अमंगलता त्यांना दूर करावयाची होती. अंतर्बाह्य जीवन झडझडून टाकावयाचे होते. रस्ते झाडणे व मने झाडणे या दोन्ही कामांना ते लागले. लहान-लहान खेडयांतून लोकसंख्या भरपूर वाढली होती. लोकसंख्या वाढली होती त्या मानाने आरोग्याची साधने वाढली नव्हती, म्हणून फारच वाईट स्थिती होती. गावातील आरोग्याच्या सोयी तुटपुंज्या व भिकारड्या आणि सरकारचे आरोग्यासंबंधीचे कायदेही अपुरे व बेताबाताचेच होते. यामुळे जिकडे तिकडे सांदीकोपर्‍यात, गल्ल्याकुच्यांत नाना प्रकारच्या रोगांचा नुसता बुजबुजाट झाला होता. ताप, प्लेग हे तर होतेच; परंतु त्यांहूनही भयंकर असा महारोग तोही भरपूर होता. साधू फ्रान्सिसने आपल्या शिष्यांना या रोगपीडित दुर्गंधिमय भागांकडे आधी बोट करून ‘तिकडे जा’ असे सांगितले व आज्ञेप्रमाणे ते तेथे आले. या फ्रायर संन्याशांनी या गलिच्छ रोगव्याप्त ठिकाणी वसती केली, या रुग्णशीर्ण लोकांच्या शेजारी आपल्या झोपड्या उभारल्या. प्रथम त्यांनी महारोग्यांची शुश्रूषा करण्याचे काम अंगावर घेतले. त्यांच्यातच राहणे त्यांनी पसंत केले; त्यांच्यात ते नांदू लागले. लंडन शहरातील कसाईखाने वगैरे ज्या बाजूला असत व जेथे फार घाण होई तेथेही त्यांच्यातील काही गेले व तेथे वसती करून आरोग्य व स्वच्छता तेथे प्रकाशवू लागले; काही ऑक्सफर्डच्या जवळ ज्या दलदली होत्या व डासांचे मारक, अमर संगीत जेथे सतत सुरू असे, तेथे जाऊन राहिले व त्यांनी तेथे सेवाश्रम काढिले; दलदली बुजवल्या; आजूबाजूच्या गोरगरिबांच्या चंद्रमौळी झोपड्याप्रमाणेच साध्या पर्णकुटी त्यांनी उभारल्या व त्यातच ते राहू लागले.”

   

समाजात निरनिराळ्या विशिष्ट भलभलत्याच चुकीच्या कल्पना व भलभलतेच विचार रूढ होत असतात. त्या त्या काळात अशा भ्रामक कल्पना आपणास नेहमी दिसून येतील. आजच्या काळातील लोकांचीही अशीच एक चुकीची दृष्टी बनली आहे. आज कोणाला काहीही करावयास सांगा, एखादे नवीन तत्त्व सांगा, एखादा नवीन विचार सांगा, एखादे नवीन स्वदेशीचे व्रत, एखादा नवीन आचार सांगा, - की लगेच ते विचारतील, “यापासून लभ्यांश कोणता ? आमचा फायदा काय होईल ? किती होईल ?”  प्रत्येक प्रसंगी गिधाडाप्रमाणे “फायदा काय ? तुकडा केवढा मिळेल ?” असे विचारणे ही विचारसरणी आज रुढ झाली आहे. बाजारी दृष्टी सर्वत्र बोकाळली आहे. त्या प्रश्न विचारणार्‍याला उलट आपण प्रश्न विचारावा..... “फायदा कोणाचा विचारीत आहेस ? राष्ट्राचा का तुझा ? तुझा आजचा या क्षणाचा तात्पुरता की, भावी पिढीचा कायमचा ?” या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडून नीट मिळाल्यांशिवाय त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पडू नये.

फायदा काय, असे विचारणारी व्यक्ती नेहमी स्वत:च्या तात्पुरत्या फायद्यालाच मनात धरून बोलत असते. स्वत:चा फायदा हेच व्यक्तीचे नेहमी उद्दिष्ट दिसून येत असते. अमक्या अमक्या तर्‍हेने वागल्यास, काही ठराविक मुदतीत तुमचा अमुक फायदा होईल, असे सांगितले तर लगेच तसे करावयास माणसे तयार होतात. फायदा होणार असेल तरच करणे योग्य, नाहीतर अयोग्य - असे आजचे योग्यायोग्यतेचे बाजारी माप आहे.

व्यक्ती या शब्दांतील अर्थ विशाल असेल तर हरकत नाही. ‘आमचा फायदा काय,’ असे विचारताना, ‘आमचा’ हा जो शब्द त्यात सर्व समाज, सारे राष्ट्र येत असेल, तर हरकत नाही. ‘फायदा’  हा जो शब्द त्याचा अर्थही विशाल असेल, केवळ चार दिडक्या एवढाच नसेल तरीही हरकत नाही. परंतु असा विशाल अर्थ घेण्यास मनुष्य तयार नसतो. अशी ही विशाल दृष्टीच कोणाला मुळी नसते. ‘चांगले कर’  असे सांगताच, फायदा काय असे विचारतात. परंतु स्वत: वाटेल तसे रोज वागतात, त्या वेळेसही ‘असे केल्याने फायदा काय,’ असे जर स्वत:ला विचारतील तर किती छान होईल ? सद्गुणाने फायदा होत नाही, सद्गुण होळी करावयास सांगणार आहे, त्याग करावयास लावणारा आहे. परंतु तुझ्या दुर्गुणाने तरी काय फायदा होतो ? तुझे दुर्गुण शेवटी सर्व समाजाच्या अंगात विषसम भिनतील व सर्व समाजाचा नाश होईल. तुझी पापे सर्वत्र पसरून तुझा व तुझ्या समाजाचा दोघांचा बळी घेतील. सदाचाराचा, सद्गुणाचा फायदा आज दिसला नाही, तरी उद्या दिसेल परंतु तुझ्या असद्विचाराचे व असद्वर्तनाचे काय तुझ्या व्यसनांचे व पापांचे काय ?

मानवी ज्ञानात जी जी मौल्यवान् भर पडली, जो जो प्रत्येक नवीन शोध लागला, नवीन शोध मिळाला, त्या सर्वांच्या मुळाशी त्याग आहे. जे जे नवीन तत्त्व सापडले, जी जी नवीन सिध्दी मिळाली, त्या सर्वांच्या मुळाशी यज्ञ आहे. मानवजातीचा इतिहास ही गोष्ट निरपवाद शतमुखांनी सांगत आहे. “त्यागेन एकेक अमृतत्वमानशु ।” ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या स्वार्थावर पाणी सोडले, मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र अखंड श्रम करण्यातच ज्यांनी जीवनाची सफलता मानली, अशा व्यक्तींकडूनच ज्ञान संवर्धिले गेले, सत्य प्रकट केले गेले. भारतवर्षात आपण असे चटकन् म्हणायचा संभव आहे, की त्याग फक्त संन्याशाने करावा !परंतु प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यात संन्याशी लागत असतात, ही नवीन गोष्ट आज आपणास शिकावयाची आहे. समाजाच्या नानविध क्षेत्रांत संन्यास आज वावरू लागला पाहिजे; त्याची सर्वत्र जरूरी आहे. ज्या कामात संन्यास नाही, ज्या वर्गात संन्यास नाही, तेथे तेज चढत नाही.