शुक्रवार, जुलै 19, 2019
   
Text Size

खरी महत्वकांक्षा

सर्व प्रश्नांचा नीट अभ्यास करू या. मोठमोठे ग्रंथ वाचू या, माहिती मिळवू या, आकडे जमा करू या, उत्कृष्ट ग्रंथालये, संग्रहालये, प्रयोगालये स्थापू या. हीच खरी मंदिरे व देवालये. तेथे ज्ञानपूजा करू या. सत्यशोध करू या. कोणत्याही अडचणीने डगमगून जाता कामा नये, खचून जाता कामा नये. घोडे कोठेही न अडता दौडत गेले पाहिजे. आपल्या मार्गात दुर्दैव संकटे आणून रचीत असते. त्याचा हेतू एवढाच की, त्या संकटांतून तरून जाऊन आपला आत्मविश्वास वाढावा, आपल्या असीम सामर्थ्याची आपणास कल्पना यावी. संकटात सुप्त शक्ती जागृत होते. घर्षणाने अप्रकट व अज्ञात वन्ही प्रकट होतो. येऊ देत संकटे. संकट म्हणजे विकासमाता. वटवृक्षाची मुळे फत्तरांतून, दगडधोंडयांतून वाढीस लागतात, परंतु पुढे त्याचा केवढा विस्तार होतो. तो आपला माथा गगनाला भिडवितो, विश्वाला हातांनी कवटाळतो. चिरंजीव वटवृक्ष! तो हजारोंना छाया देतो व आश्रय देतो. त्याच्या अंगप्रत्यंगांतून शेकडो महान् वृक्ष निर्माण होतात; हा शक्तिसंग्रह त्या दगडधोंडयांतील झगडण्यात त्याला मिळाला. जो संकटात वाढला, त्याची वाढ देवांनी केली; तो देवांचा लाडका झाला. त्याला दिव्यशक्ती मिळाली, तो मर्त्यांत अमर्त्य झाला.

मोठमोठे संग्राम, मोठमोठ्या धडपडी ज्या होत असतात, त्यात सारे सारखेच धडपडत असतात, लढत असतात. कोणीही त्यात दाखल व्हावे व झगडावे. तेथे कुणाला मज्जाव नाही. जो जिंकील त्याला पदक. परंतु ज्याला पदक मिळाले ते त्याचे एकटयाचे नाही. ते सर्वांचेच आहे. सर्वांतर्फे म्हणून ते पदक घेण्यासाठी तो उभा असतो. तो झगडणार्‍या सर्वांचा प्रतिनिधी असतो. व्यक्ती... मग ती स्त्री असो वा पुरुष असो... श्रेष्ठ असो वा कनिष्ठ असो- तिला एकटयाने मोठे होता येत नाही. समुदाय, संघ संस्था यांतूनच एकमेकांस धीर येतो व सारे लढत राहतात, कष्ट करीत राहतात. व्यायामशाळेत व्यायाम करण्यात घरच्यापेक्षा काही निराळेच असते. दुसर्‍याच्या पाचशे बैठका पाहून आपणास हजार माराव्या असे वाटू लागते. परस्परांस परस्परांपासून उत्साह मिळतो. एकाला यश यावे ह्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची जरूरी आहे. जो वर चढतो त्याला आपल्या पाठीमागून वीस येत आहेत या कल्पनेने धीर येतो असतो व त्या पुढे जाण्याने पाठीमागच्या वीसजणांस हुरूप येतो. तटावर ‘हर हर महादेव’ करून चढणार्‍या पहिल्या तुकडीला- पाठीमागून हजारो सैनिक आहेत, ते आपले काम अपुरे राहिले तर पुरे करतील असा आधार असतो. आपल्या पाठीशी ते पाठपुरावा करावयास आहेत, मदत व साहाय्य देण्यास ते वेळ पडताच धावून येतील अशी आशा असते. तसेच आपले ज्ञान; ते सारे केवळ एकटयाचे नसते. हजारोंची ती कमाई असते. आपण दुसर्‍यांपासून मिळवितो व स्वत: त्यात जमले तर भर घालतो. सारे ज्ञान सामुदायिक आहे, यश हे सामुदायिक आहे. एकटयाला सर्व क्षेत्राचे आक्रमण करता येणार नाही. सर्वत्र श्रमविभाग आहे. समाज आपणास वर नेऊन बसवितो. समाजाच्या खांद्यावर आपण उभे असतो व चमकतो. मंदिराचा कळस दुरून चमकतो, परंतु न दिसणारे पायांतील अभंग व मजबूत दगड, भिंतीच्या विटा, यांच्यावर तो उभारलेला आहे. जो आज विजयी म्हणून दिसतो, त्याला अनेकांच्या त्यागाचे साहाय्य मिळाले आहे; त्याच्या विजयाला दुसर्‍या हजारोंच्या विजयांची मदत मिळालेली आहे. एकाची कीर्ती ती सार्‍यांची होते. सीतेची दिव्यता सर्व स्त्रीजातीच्या मालकीची आहे. बुध्दांचा त्याग सर्व मानवजातीला भूषणास्पद आहे. थोर पुरुषांचा अभिमान सार्‍या मानवजातीला वाटत असतो; कारण त्यांच्या यशांत आपण सारेच आपआपल्यापरी भाग घेत असतो.

विचार, विचार, विचार ! निर्मळ विचार व निर्मळ दृष्टी यांची अत्यंत आवश्यकता आहे. संशयातीत अचूक विचार ! असा विचार मिळावयास श्रमांची जरूरी असते; अभ्यासाची जरूरी असते. कोणत्याही ध्येयाला प्राप्त करून घेण्यासाठी, कोणत्याही क्षेत्रात विजय मिळविण्यासाठी दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. स्पष्ट व नि:संदिग्ध विचार व ध्येयाबद्दल अपरंपार प्रेम. ते ध्येय म्हणजे आपल्या जीवनगर्भात वाढलेले जणू बाळ असे आपणास वाटले पाहिजे. त्या ध्येयाला वाढवू, त्याला पुजू. त्या ध्येयासाठी तडफड व तळमळ सारखी असली पाहिजे. ध्येयाचा क्षणभर विसर पडताच गुदमरल्यासारखे झाले पाहिजे. ध्येय म्हणजे प्राण असे झाले पाहिजे. गुरुनानकाने म्हटले आहे, “देवा, तुझे नाव श्वासाच्छवासाप्रमाणे मला होवो.” ध्येयासंबंधी अशीच वृत्ती आपली झाली पाहिजे.

जे राष्ट्र स्वत:च्या परंपरेला पारखे झाले नाही, स्वत:चे चारित्र्य विसरले नाही, जे राष्ट्र स्वत:च्या हृदयाची प्रतारणा करीत नाही, जे राष्ट्र स्वत:शी सत्यनिष्ठ असते, ते राष्ट्र युगधर्म ओळखत, नवीनाची हाक ऐकते, ते राष्ट्र लाखो मोठ्या पुरुषांना जन्म देईल, मग ते मोठे पुरुष जगाला दिसोत वा न दिसोत, त्यांची नावे जगाला कळोत वा न कळोत. डोळ्याला न दिसणारे लाखो तारे आकाशगंगेत आहेत; ते न दिसले तरी आपंल्या ठिकाणी राहून आपला निर्मळ प्रकाश विश्वमंदिरात ओतीतच आहेत. लाखो थोर पुरुष निर्माण होतील यात आश्चर्य नाही; कारण परमात्म्याचे दिव्य वैभव सर्वांमधून अमर्याद उसळत आहे आणि एकाचा मोठेपणा हा सर्वांना मोठे करील.


 

थोर महत्त्वाकांक्षा, महनीय व उदात्त ध्येये ! आपण आपल्या जीवनाचे काय करणार, या जीवनाचे काय करावयाचे ? आपण आपला अहंकार धुळीत मिळविण्याची शपथ घेऊ या. अहं पुसून टाकू या. सिध्दीचे हे पहिले साधन आहे.

अनहंवेदनं सिध्दि । अहंवेदनमापद: । 

अहंकाराहित्य म्हणजे सिध्दी, अहंकाराची सदैव जाणीव म्हणजे अपयश व आपत्ती. अहंकाराचे विस्मरण म्हणजे विजय, अहंकाराचे स्मरण म्हणजे मरण. कोणतेही कार्य अंगावर घ्या, कोणताही पंथ स्वीकारा, कोणतेही ध्येय पसंत करा. ते ध्येय, ते कार्य तुमच्याहून मोठे असले पाहिजे. सर्व सेवेची कर्मे सारखीच पवित्र आहेत. कोणतेही उचललेत तरी चालेल. परंतु जे उचलाल त्याच्यासाठी सारे जीवन अर्पण करा. जेथे जाल तेथे ध्येय सांगाती असू दे. ध्येयासाठी म्हणूनच ध्येय शोधा. शेवटपर्यंत ध्येयाचा पिच्छा पुरवा. या जन्मात गाठ न पडली तर आणखी जन्म पडलेच आहेत. परंतु आणखी जन्म आहेत म्हणून हळूहळू रेंगाळत जावयाचे नाही. याचि जन्मी, याची डोळा ध्येयपांडुरंगाला भेटेन, असा निश्चय करून कष्टत राहिले पाहिजे. जे जे करावयाचे, त्यात तन, मन, धन ओतून करावयाचे. आता कातडी कुरवाळायची नाही, शरीराची पूजा करीत बसावयाचे नाही. तन, मन, धनाच्या पुष्पांनी आता ध्येयदेवाची पूजा बांधायची. सुखाला व विलासाला लाथाडून, स्वार्थाला काडी लावून, अहंकार धुऊन टाकून, जे उच्च ध्येय आपणाला बोलावीत आहे, त्याच्याकडे जाऊ या. ध्येय हातात पडेपर्यंत वाटेल ती किंमत देऊ, परंतु पुढेच जाऊ. प्राचीनकालांतील समाजनेते सांगत असत की, “जो ईश्वराला मिळवितो, तोच ब्राह्मण.” ह्यांतील अर्थ हाच की, जन्म कोठेही होवा, ती काही महत्त्वाची गोष्ट नाही. परमेश्वर सर्वत्र तितकाच जवळ आहे...... त्याला मिळव. परमेश्वर मिळविणे, ध्येय गाठणे ही गोष्ट कधीही डोळ्यांआड होऊ देऊ नको.

त्या त्या काळातील शिक्षणाला त्या त्या काळातील प्रश्न सोडवावयाचे असतात. त्या त्या काळातील ऋषींना त्या त्या काळात अनुरूप असा वेद द्यावा लागतो. अर्वाचीन ज्ञानासमोर अर्वाचीन प्रश्न आहेत. ह्या सर्व ज्ञानप्रांतात हिंदी माणसाने घुसले पाहिजे. अर्वाचीन जिज्ञासा त्याचीही झाली पाहिजे. मुलांमध्ये जिज्ञासा उत्पन्न केली की, शिक्षणाचे काम झाले असे म्हणतात. आपणांमध्ये अर्वाचीन ज्ञानासंबंधी अशी तहान उत्पन्न झाली पाहिजे. अशी तहान आपणास नाही का लागणार ? हिंदी लोकांच्या मेंदूने मोटारी व विमाने ह्यात सुधारणा करू नये की काय ? अशा कामाला आम्ही का नालायक आहोत ? असमर्थ आहोत ? आमची बुध्दी का येथे कुंठित होईल ? ती चालणारच नाही ? तसे असेल तर युरोपियनांच्या मेंदूपेक्षा आपला मेंदू हिणकस झाला म्हणावयाचा; त्याच्या बुध्दीपेक्षा आपली बुध्दी कमदर्जाची झाली म्हणावयाची !

जर युरोपियन लोकांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा हक्क पाहिजे असेल तर तो सिध्द केला पाहिजे. खानावळी व हॉटेल काढण्याच्या महत्त्वाकांक्षा द्या फेकून; कारकून व नोकर होण्याच्या महत्त्वाकांक्षा-घाला त्या चुलीत. आपण शिकू व जगाला शिकवू, ही महत्त्वाकांक्षा बाळगा. मानवजातीला देण्यासाठी आपणही सत्य शोधून काढू. खेडयांतील लोकांपुढे येसफेस करून तेथे मिरवण्यासाठी; दोन पिसे लावून मोर होऊ पाहणार्‍या डोंबकावळ्याप्रमाणे उसन्या ऐटीने नाचण्यासाठी- आपले शिक्षण नाही. स्वत:ला आता सैल सोडू नका, स्वत:चे बिलकुल लाड नकोत, स्वत:शी आता निष्ठुर व्हा व स्वत:ला घासून घासून चांगली पाणीदार धार लावा. उच्च आकांक्षांसाठी स्वत:ला अहर्निश श्रमवा, झिजवा, कष्टवा. जो जो विषय हातात घ्याल, त्यात जाणण्यासारखे जोपर्यंत म्हणून काही शिल्लक आहे तोपर्यंत स्वस्थ बसू नका. तोपर्यत विश्रांती नाही. मरणानंतर आहेच विश्रांती. हे जग कर्मभूमी आहे. येथे विश्रांतीचे नाव काढू नका. तो तो विषय पुरा करा. सारे त्रिभुवन धुडाळा त्याच्यासाठी. मग तो विषय कोणताही असो. ग्रामसंघटना असो का खादीशास्त्र असो, समाजशास्त्र असो का अर्थशास्त्र असो. मजुरांच्या चळवळी असोत का धर्मसुधारणेच्या चळवळी असोत.

 

आपली जात काय ती इतरांपेक्षा श्रेष्ठ व वरिष्ठ, आपले राष्ट्र तेवढे थोर, आपला देश सर्वांत चांगला- इतर हीन- असे जर आपल्या मुलांबाळांना आपण शिकवू तर त्यात फार धोका आहे. आपण स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजून इतरांपासून जर आपण अहंकाराने दूर राहिलो, तर यात स्वाभिमान नसून अत्यंत क्षुद्र व पोरकट, सर्वस्वी निंद्य व त्याज्य असा दुरभिमान मात्र आहे. ज्यांना आपण तुच्छ, हीन-पतित असे मानू, त्यांचा तर पाणउतारा आपण केलाच, परंतु जे खरे थोर आहेत, सत्यासत्याची पर्वा करणारे जे आहेत, त्यांच्या दृष्टीने आपणही तुच्छ, पतित ठरू. आपले कुळ कितीही उच्च असो, श्रेष्ठ असो; जगात आपणंपेक्षा दुसर्‍या कोणत्याही बाबतीत कोणी वरचढ नाही; कोणी श्रेष्ठच नाही, ही गोष्टच अशक्य व असंभवनीय आहे. शेराला सव्वाशेर हा जगाचा न्याय आहे. आपण श्रेष्ठ कुळात जन्मलो याने वाटणारा अभिमान व आनंद यांना मर्यादा आहे. हा अभिमान सदैव सापेक्ष आहे व तसाच तो असला पाहिजे. आणि पुढे एक दिवस आपणास समजेल की, “सर्वांत मोठे भूषण म्हणजे माझा साधेपणा, माझी निरहंकारी वृत्ती; सर्वात मोठा अलंकार म्हणजे माझे सच्छील; आणि कोणत्याही प्रकारचा अभिमान किंवा वारसदारी सांगणे म्हणजे क्षुद्रत्वाचे निदर्शक होय.”

कुलाभिमान याचा अर्थ एवढाच की, अंगावर जबाबदारी आली. ती जबाबदारी अंगावर न देता फुकट ऐट मात्र आपण मिरवू पाहतो व दुसर्‍याला तुच्छ लेखतो. हरिश्चंद्राच्या वंशात जन्मणे याचा अर्थ हा की, सत्यासाठी सर्वस्वावर पाणी सोडून भिकारी होण्याची तयारी राखणे. कुलाभिमान म्हणजेच आपणावर टाकलेला विश्वास, पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला दिव्य व भव्य नंदादीप. हा नंदादीप हाती असल्यामुळे, ही दिव्य उदाहरणे डोळ्यांसमोर असल्यामुळे, श्रेष्ठ व थोर कार्य करावयास आपणास स्फूर्ती व धैर्य ही मिळतील- हाच कुलाभिमानाचा अर्थ. माझ्या कुळात ही गोष्ट शेकडो पूर्वजांनी केली, मग मी का रडावे ? मी का डरावे ? त्यांना साजेसा सुपुत्र मला व्हावयाचे असेल तर मलाही त्यांच्याप्रमाणे वागू दे. मर्द होऊ दे. त्यांनी तसे केले तर मला का करता येणार नाही ? हिंमत बाळगीन तर मीही तसे करीन- अशा प्रकारचे तेज कुलाभिमानापासून मिळते. कुलाभिमान कार्य करावयास आधी संधी देईल, धैर्य देईल. कुलाभिमान त्याचबरोबर कर्तव्यही दाखवीत असतो. कुलाभिमान ध्येय दाखवितो व ध्येयाकडे जाण्यासाठी आपणास स्फूर्ती व धैर्य देतो. माझे स्थान जितके ज्येष्ठ व श्रेष्ठ, त्या मानाने माझी जबाबदारी मोठी; त्या मानाने माझे कर्तव्यही अवघड व अधिक दगदगीचे. माझ्या कुलाची ज्या मानाने विशुध्दता व पवित्रता अधिक, त्या मानाने कष्ट सहन करण्याची, सत्व न गमावण्याची मजवरची जबाबदारी मोठी.

परंतु खर्‍या दृष्टीने जर आपण पाहिले तर आपणास दिसून येईल की, मनुष्यजन्माला येणे म्हणजेच मोठ्या कुळात जन्माला येणे. प्रत्यक माणसाने आपण मनुष्य आहोत, हे दाखवावे म्हणजे झाले. आपण पशू नाही, वृकव्याघ्रापरीस नाही, मर्कटचेष्टा करणारे वानर नाही, हे प्रत्येकाने दाखवावे म्हणजे झाले. मी मानवजातीत जन्मलेला- मी मानवजातीला कलंक लागेल असे वागता कामा नये. मी माणूस आहे, असे माझ्या माणुसकीने मला पटवून दिले पाहिजे. प्रत्येक मनुष्य तो मनुष्य म्हणूनच थोर आहे. त्याने ते सिध्द करावे म्हणजे झाले. सर्वांना सर्व काही शक्य आहे. कारण तो अनंत अपार परमात्मा, तो सर्व-स्वतंत्र, सर्व-पवित्र, सर्व-समर्थ परमात्मा सर्वांतर्यामी सारखाच भरून राहिलेला आहे, मनुष्यामनुष्यांमध्ये मनुष्याला फरक करू दे, भेद पाडू दे, श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवू दे. ईश्वराजवळ भेदभाव नाही. त्याने आपले दिव्यत्व सर्वांमधे ठेवलेले आहे व हे तो विसरणार नाही. ईश्वर मनुष्याला तुच्छ मानील तर स्वत:लाच त्याने तुच्छ मानले असे होईल. परमेश्वराने सर्वांच्याजवळ सदबीज दिले आहे. प्रत्येकाने ते वाढवावे. झगडण्याचा, धडपडण्याचा हक्क सर्वांना त्याने दिला आहे. ‘मामनुस्मर युद्ध्य च’ - माझे स्मरण राखून झगडत राहा, स्वत:चा विकास करीत राहा, अर्थात् हा झगडा त्याचे स्मरण ठेवून करावयाचा, म्हणजे अशा साधनांनी व अशा मार्गांनी झगडत राहावयाचे की, जी साधने व जे मार्ग परमेश्वराला प्रिय व मान्यच असतील. हे विश्वरणांगण मोकळे आहे. येथे परमेश्वराने शर्यत लावून दिली आहे. तो खेळ पाहात आहे. ह्या शर्यतीत आपण कोणता खेळ खेळावा, कोणते स्थान घ्यावे, हे ज्याचे त्याने ठरवावे व पाहून घ्यावे. सर्वांना मोकळीक आहे व स्वातंत्र्य आहे. सर्वांना सामर्थ्य दिलेले आहे.

   

आपण स्वत:ची जी पात्रता समजतो, आपण स्वत:ला जी किंमत देतो, त्यावरून आपण ज्या कुळात जन्मलो, त्या कुळाची व ज्या समाजात आपण जन्मलेले आहोत त्या समाजाची- त्यांचीही पात्रता व किंमत कळून येते. शितावरून भाताची परीक्षा. समुद्रातील एका बिंदूला जीव चव तीच सर्व समुद्राची. वृक्षावरील एका फळाची जी चव त्यावरून सार्‍या वृक्षाची. समाजातीलचे एक व्यक्ती आपण असल्याने आपल्या किंमतीवरून व योग्यतेवरून आपल्या समाजाचीही किंमत व योग्यता दुसर्‍यांकडून अजमावली जाते. यामुळे स्वत:वर फार मोठी जबाबदारी आहे. परदेशात जाऊन तेथे जर आपण नादान ठरलो, नालायक ठरलो, तर आपल्या सार्‍या समाजाची नालायकी तेथे सिध्द केल्यासारखे होईल. आपल्या वर्तनाने आपल्या कुळाला, आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला व मानवजातीला कलंक लागता कामा नये, मान खाली घालावी लागता कामा नये, असे आपले वर्तन असले पाहिजे.

कुलाभिमानासारखा दुसरा कोणता अभिमान आहे ? प्रेरणा देणारा, चालना देणारा ह्यासारखा दुसरा कोणता अभिमान आहे ? हे ब्राह्मणाला शोभत नाही, हे क्षत्रियाच्या बच्च्याला शोभत नाही, हे शिवाजीच्या वंशजांस शोभत नाही, हे वसिष्ठ- विश्वामित्राच्या कुळांतल्यांना शोभत नाही, हे महाराष्ट्रीयांस शोभत नाही- यामध्ये काय अर्थ आहे ते आपल्या सदैव ध्यानात असले पाहिजे आणि जो दुसर्‍याला मान देतो, तो स्वत:च्या मानालाही जपेल. जो दुसर्‍याला स्वातंत्र्य देतो, तो स्वत:च्या स्वातंत्र्यालाही सांभाळील; ते तो गमावणार नाही.

हिंदुस्थानात हजारो वर्षे कुलाभिमानाचे शिक्षण काळजीपूर्वक देण्यात आले आहे. कुलाभिमान, वर्णाभिमान यांवरच राजकीय व सामाजिक इमारत आपल्याकडे उभारण्यात आली. आपल्या राष्ट्रीय व सामाजिक सुरक्षिततेचा पाया म्हणजे हा कुलाभिमान होता व आहे. अभिमान नाना प्रकारचे असतात व विशिष्ट मर्यादेतच ते गुण असतात. ती मर्यादा सुटली म्हणजे अभिमानाचा अहंकारी अभिनिवेश होतो; तो गुण न राहता दुर्गुण होतो. ब्राह्मण काय किंवा शूद्र काय दोघांना अभिमान, स्वाभिमान आहेच. परंतु शूद्राला तुच्छ मानून ब्राह्मण जेव्हा त्याला खाली मान घालावयास लावतो, त्यावेळेस ब्राह्मणाचा तो अभिमान म्हणजे अक्षम्य अपराध होय. आपण स्वत:ही योग्य अभिमान बाळगावा व दुसर्‍यालाही स्वाभिमानी राहावयास शिकवावे. माझी मान मी वर राखीन. त्याचप्रमाणे दुसर्‍याचीही वर राहावी म्हणून झगडेन. कुणाचीही मान अपमानाने खाली झालेली मला सहन होता कामा नये. कुलाभिमान व स्वातंत्र्य आपणाला प्रिय आहेत असे अशा वेळेसच दिसेल. जो दुसर्‍याच्या आईचा अपमान करतो, त्याला स्वत:च्या आईचाही खरा मान राखता येणार नाही. मी माझ्या आईला मान देतो, मी दुसर्‍याच्या आईसही मान देईन, मी माझे स्वातंत्र्य प्यार मानतो, दुसर्‍याचेही मानीन. मला स्वाभिमान आहे, दुसर्‍याच्याही स्वाभिमानाचे मी कौतुक करीन. सत्याची, सद्गुणाची, मीच पूजा करावी असे म्हणणे चमत्कारिक आहे. जे जे सत् आहे, त्याची पूजा सर्वांनी करावी, मी करावी व इतरांनाही करू दिली पाहिजे. जे गुण मला पूजनीय वाटतात, त्या गुणांची पूजा करावयास इतरांना शिकवीन.