शुक्रवार, जुलै 19, 2019
   
Text Size

पात्रता

आपणास हा प्रकाश कसा मिळणार ? परमोच्च सत्याकडे कष्टाने सतत चढत जाण्यानेच दिव्य दृष्टी मिळते. सतत श्रम करूनच दुसर्‍याच्या उपयोगी आपण पडू शकू, ही गोष्ट आपण सदैव ध्यानात धरली पाहिजे. ज्या ज्या मार्गात आपण घुसू, तेथे शक्य तितके पुढे आपण गेले पाहिजे. त्या त्या कर्मक्षेत्रात परमोच्च तत्त्वाचे दर्शन करून घेतले पाहिजे. रात्रंदिवस काम काम. काम करूनच स्वत:चा व स्वत:च्या बंधूंचा उध्दार करण्याची पात्रता आपल्या अंगात येईल. काम करीत गेल्यानेच अधिकाधिक शक्ती व उत्तरोत्तर अनुभवपूत निर्मळ दृष्टी प्राप्त होत जातील. प्राचीन ज्यू लोकांची प्रार्थना आपल्या ओठांवरही सदैव नाचू दे. “प्रभू, तुझ्या ह्या सेवकांना तुझे  काम सांग. ह्या सेवकांच्या मुलाबाळांना तुझे वैभव दे.” आपण आज ईश्वराचे काम करू, आपल्या मागून येणार्‍या पिढीला प्रकाश, आनंद व वैभव लाभेल.

अंत:करणात क्षुधा वाढू लागली तरी प्रथमच मिळालेल्या लहानशा फळाला खाऊन समाधान घेऊ नका. भूक लागली तरी उतावीळ होऊ नका. उतावीळपणाने केलेले काम, अविचाराने केलेले काम पतनास व नाशास कारणीभूत होतो. लोककल्याणासाठी एवढे प्रयत्न करीत असूनही अद्याप फळ कसे मिळत नाही असे मनात आणून जळफळणारे, बोटे मोडणारे, अधीर लोक नेहमी दिसतात. परंतु अशी अधीरता म्हणजे खरी भूतदया नव्हे. रोगी लवकर बरा होत नाही म्हणून रोग्यावर जळफळणारा हा खरा सेवक नव्हे. मुलग्याची किती सेवाशुश्रूषा करू, असे म्हणून माता कंटाळणार नाही. खर्‍या प्रेमाला व खर्‍या सेवेला कंटाळा माहीतच नसतो. “मला सदैव सेवा करावयास मिळू दे” असे खरा सेवक, खरा संत म्हणत असतो. ताबडतोब फळ मिळविण्याची इच्छा करणार्‍याचा प्रयत्न हा क्षणिक असतो. तो तामस प्रयत्न होय. अखंड सेवा, अखंड धारणा अनुभवाने हळूहळू पूर्ण होत जाणारी प्रज्ञा ह्या गोष्टी पदरी असल्याशिवाय मी इतके घाव घातले, मी इतकी सेवा केली, असे मोजण्याचा अधिकार नाही. बुध्दी जवळ असल्याशिवाय शुध्द सेवा करता येत नाही. आणि ही बुध्दी अनुभवानेच मिळत असते. आणि अनुभव म्हणजे प्रत्यक्ष सेवा. सेवा व ज्ञान ही परस्परावलंबी आहेत.

मागे फार लांबचा आहे. पल्ला पुष्कळ गाठावयाचा आहे. तरवारीच्या धारेवरून चालत जावयाचे आहे. कधी कधी पुढचे पाऊल टाकावयासही तेथे नीट दिसत नाही. संत ऋषिमुनी- त्या मार्गाने जे गेले ते असे सांगत आहेत - “तरीही निराश नको होऊ. जागा हो व ऊठ. धडपड करीत पुढे चल. ध्येय मिळेपर्यंत एक क्षणभरही थांबू नको.

 

परंतु जेथे सत्याचे हाल होत नाहीत तेथे सत्याचा प्रकाशही वाढत नाही. मग वाटते की, सत्याची पूजा करण्यापेक्षा, सत्यावर हल्ले चढविलेलेच बरे. सत्याच्या बाबतीत मूक राहण्यापेक्षा, सत्याची निंदा करणारे पत्करले. सत्याच्या उदोउदोपेक्षा सत्याला लाथ मारणे, बरे. कारण सत्य, सत्यशोधनाचा विचार जिवंत तरी राहील. सत्याचा विचार सदैव जागृत तरी राहील. मारण्यासाठी म्हणून का होईना कृष्णाचा ध्यास लागू दे. कृष्ण मरणार नाही, तो वाढतच जाईल. सत्याला मारू पाहणारे, छळू पाहणारे, सत्यावर उपकारच करतात. ते सत्याची प्रभा वाढवतात, सत्याला अमर करतात.

परवा एकदा एक युरोपियन म्हणाला, “देवाला ज्या वेळेस वाईट दिवस आलेले असतील, देशाची ज्या वेळेस दुर्दशा झालेली असेल, त्या वेळेस स्वत:चा स्वार्थ, स्वत:च्या आवडीनावडी, सर्व काही बाजूस सारून प्रत्येकाने देशसेवेला वाहून घेतले पाहिजे. देशाचे पडेल ते काम करावयास पुढे आले पाहिजे.” त्या वक्त्याच्या ध्येयाला वाहून घेऊन देशाला पुन्हा कळा चढविली पाहिजे.” त्या वक्त्याच्या म्हणण्याचा आशय असा की, “सुख, संपत्ती, सन्मान या वस्तू मिळविण्याच्या मागे लोकांनी लागू नये.” अमूर्त असे जे ध्येय त्याची जीवेभावेकरून सेवा करावयाची. त्याची सेवा करावयाची म्हणजे दारिद्रय पत्करावयाचे, कष्ट पत्करावयाचे; त्याची सेवा करावयाची म्हणजे भोग सोडावयाचा, सुख सोडावयाचे व मरावयाचे; आणि इतके करूनही कदाचित् अपयशही यावयाचे. ध्येयासाठी अशी ही किंमत द्यावी लागते. या ध्येंयाकडे जाण्याने माझे व इतर सर्वांचे अपरिमित कल्याण होणार आहे, हाच एक विचार ध्येयाला पुजणार्‍या माणसाचे मन पोलादी बनवीत असतो, म्हणून हृदयात महनीय आकांक्षा धरा, क्षुद्र भूक न धरता मोठी भूक बाळगा; क्षुद्र वस्तूकडे हृदय जाताच कामा नये; दृष्टी वळताच कामा नये. कमळ चिखलात असो वा सुंदर सरोवरात असो, त्याची दृष्टीवर सूर्याकडे असावयाची.

संन्यासी वैराग्यासाठी, अनासक्तीसाठी, पावित्र्यासाठी तळमळतो. आपण त्याचप्रमाणेच ज्ञानासाठी, विद्येसाठी, सत्यशोधनासाठी, न्यायासाठी, सामर्थ्यासाठी तळमळू या. अंधारात पडलेली मुले प्रकाशासाठी ओरडत असतात; सहाय्य मिळावे म्हणून ओरडत असतात. आपणही या मुलांप्रमाणे   प्रकाश, उध्दार, प्रकाश, सहाय्य असे ओरडू या.

तमसो मा ज्योतिर्गमय
असतो मा सद्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय

असे तळमळून, तडफडून आपण म्हणू या. प्रकाशाचा एक किरण, एक तिरीप कोठून येते का- चला भिरिभिरी हिंडून पाहू. ओरडा व झगडा. जर्मन महाकवी गटे मरताना म्हणाला, “आणखी प्रकाश, आणखी प्रकाश.”   अंधारात मुले मदतीसाठी धावा करीत आहेत, त्यांना प्रकाश व सहाय्य आपण नेऊन देऊ या. नेऊ देऊ अशी आशा करू या. कारण आपल्याजवळ असेल तर आपण देणार ? आपण स्वस्थ बसणार का ? मुले भुकेने तडफडत असता आईबाप का हात जोडून बसतील ? माना ढोपरात घालून बसतील ? आईबाप धडपड करतील व तुकडा घेऊन येतील. आपणही धडपडून प्रकाश मिळवू या व तो वाटू या.

 

प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत केवळ चांगुलपणा असून भागत नाही. चांगुलपणा तर पाहिजेच, परंतु तो तो विचार व ती ती कृती ही योग्यही असली पाहिजेत. आपण केवळ चांगले आहोत, सुस्वभावी आहोत, एवढ्याने भागत नाही. आपण कार्यक्षम आहोत की नाही, कार्याला लायक व समर्थ आहोत की नाही, हेही पाहिले पाहिजे. “मी जे करीन, जे जे बोलेन, ते योग्यच करीन, ते योग्यच असेल.” असे सनातन श्रध्देचे ध्येय असते. हिंदु धर्माची इतर गोंष्टीबरोबर अशी ही एक निक्षून आज्ञा आहे की, अर्धवट काहीही नको. अर्धवटपणा हा हानिकारक आहे. विचार असो, ज्ञान असो. त्याला परिपक्व करा. बुध्दीची पूर्ण वाढ करा, तिचा चांगला विकास करा. प्रार्थनेइतकेच ज्ञानही पवित्र आहे. पावित्र्य व ज्ञान यांमुळे पात्रता येते. केवळ चांगुलपणामुळेच पात्रता येत नाही, केवळ ज्ञानानेही ती येत नाही. हृदय व बुध्दी दोघांच्या संयुक्त विकासात पात्रतेचा जन्म होत असतो.

जगात एक हिंदुधर्मच असा आहे की, ज्याचे सत्याजवळ भांडण नाही मग ते सत्य प्रयोगशाळेत दिसलेले असो वा तपोवनात स्फुरलेले असो. ज्ञान कोठेही मिळो, कुठलेही असो, ते पवित्रच आहे. दुसरे धर्म प्रयोगशाळेतील सत्याला लाजत खाजत जवळ घेतील, परंतु हिंदुधर्म ती आवश्यक गोष्ट म्हणून सांगत आहे. गायत्रीमंत्र म्हणजे काय ? खोल झर्‍यामधून जसे स्वच्छ पाणी उसळत असते, त्याप्रमाणे सद्गुरुची, ऋषीची, विचारद्रष्टयाची दृष्टी असली पाहिजे, असे हिंदुधर्म सांगत आहे.

परंतु अरेरे ! हिंदुस्थानात सत्याला विरोध नसल्यामुळेच सत्य मेले ! सत्यावर कोणी हल्ले चढविले नाहीत, म्हणूनच सत्यसंशोधनाची वृत्ती मेली ! सत्याचा वटवृक्ष झगडयांतूनच फोफावतो. युरोपमध्ये मोठमोठे शास्त्रज्ञ, मोठेमोठे गाढे पंडित, त्या त्या शास्त्रात आजन्म संशोधन करणारे संशोधक किती तरी आहेत. हिंदुस्थानात बोटांवर मोजण्याइतके तरी आहेत का ? परंतु दोन्ही ठिकाणचा फरक पहा, युरोपमध्ये चार्लिस डार्विनवर वीस वर्षे सारी भटभिक्षुक मंडळी, सारे पाद्री सारखे भुंकत असत. केवळ पाद्रीच नाहीत, तर इतरही लोक टीकांचा पाऊस पाडीत होते, त्याला चावावयास बघत होते. आज या घटकेसही एखादा धर्मोदेशक व्यासपीठावरून बकल व लेकी यांच्यासारख्या महापंडीतांवर ताशेरा झाडीत असेल. बंधने न मानणारा इतिहासकार व टीकाकार, बंधने न मानणारा शास्त्रसंशोधक हे आपल्या मार्गांतील शत्रू आहेत, आपल्या कार्याला मारक आहेत असे प्रत्येक पंड्या-बडव्यास वाटत असते. मनातल्या मनात तो जळफळत असतो.

युरोपमध्ये सत्यावर हल्ले चढविले गेल्यामुळेच सत्याच्या संरक्षणासाठी नवजवान एकत्र येऊ लागले, ‘सत्याच्या झेंड्याखाली जमा’ अशी एकच गर्जना करण्यात आली. रिडले व लॅटिमर जिवंत जळले जात असताना म्हणाले, “आज आपण अशी मेणबत्ती पेटवू की, जी कधीही विझणार नाही.” ते मेले, परंतु सत्याचा प्रकाश वाढतच गेला, शास्त्रे वाढतच गेली. “पुढील अटीवर तह करता येईल; कबूल असतील तर शरण या.” असा निरोप हसन व हुसेन यांच्याकडे शत्रुपक्षाकडून एका सरदाराबरोबर पाठविण्यात आला. त्या सरदाराबरोबर आणखी तेहतीस शिपाई होते. तो निरोप व त्या अटी हसन-हुसेनास कळविल्यानंतर, ते पहिले कर्तव्य बजाविल्यानंतर, तो सरदार आपल्या तेहतीस अनुयायांसह वर्तमान हसन हुसेनांच्या झेंड्याखाली येऊन उभा राहिला. ते त्यांना येऊन मिळाले. उघड उघड मरणच पत्करणे ते होते, तरी त्यांनी पर्वा केली नाही. सर्व काळात हा एकच अनुभव दिसून येईल. सत्यच आपला आपण प्रचार करीत असते. त्याला ताशेनौबती वाजवाव्या लागत नाहीत. सत्याचा सूर्य दुसर्‍यावर विसंबत नाही. सत्यदेवाचा दरवाजा सदैव उघडा आहे. वाटेल त्या व्यक्तीने तेथे जावे व सत्याची पूजा करावी. जे आपणास सत्य म्हणून वाटते, त्याला आपण कसे सोडू ? त्याला आपण मिठीच मारणार, त्याला आलिंगन देणार- मग फासावर जावे लागो की जिवंत जाळून घ्यावे लागो. काहीही नशिबी असो. हाल, छळ, अपमान, यातना. मरण-सर्वांसाठी सत्यपूजकाची व सत्यसंशोधकाची तयारी असली पाहिजे.