रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

आत्म-प्रौढी

जर खरोखर स्वत:चा विचार आपणास पडला तर, मग दुसर्‍याच्या हिताचाच विचार सदैव हृदयात आणि डोक्यात खेळत राहील. दुसर्‍याचे सुख, दुसर्‍याचे कल्याण हेच ध्येय होईल; या गोष्टींचाच ध्यास लागेल, हीच जीवाची भूक असेल. मग निराळ्या कार्यपध्दती, निरनिराळ्या योजना व कार्यक्रम, यांच्याबद्दल वादविवाद करण्यात आपण वेळ दवडणार नाही. दुसर्‍यांच्या हितार्थ जगण्याला एकदम आरंभच करू. ताबडतोब हातपाय दुसर्‍यासाठी झिजू लागतील, श्रमू लागतील. दरिद्री लोकांचे दारिद्र्य कसे दूर करू, अस्पृश्यबंधू- ज्यांना आपण पशूहून पशू केले-त्यांची स्थिती कशी सुधारू, लोकांतील शेकडो दुष्ट रुढी कशा नाहीशा करू अशा विचारात समाधी लागेल व समाधींतुन उपाय सुचतील- व सुचलेले उपाय अंमलात आणण्यसाठी हात धडपड करू लागतील. अशा रीतीने कायावाचामनाने, बुध्दी, हृदय व शरीर यांच्या द्वारा आपण सेवा करण्यात बुडून जाऊ, तन्मय होऊ. कर्म, कर्ता व कर्मसाधने सारी एकरूप होतील. आपला हक्क काम करण्याचा आहे. कर्मफल मागण्याचा आपला हक्कच नाही.

परंतु अशी सेवेच्या कर्मात तन्मय होण्याची स्थिती आजच प्राप्त झालेली आहे. असे समजू नका. क्षणोक्षणी तुमचे मन कर्म सोडून सुखाकडे वळेल, मोहाकडे वळेल. निंदास्तुतीचे तुमच्यावर परिणाम होतील; आशा-निराशा तुम्हाला हसवतील व रडवतील. सेवेमध्ये अहं विस्मरणपूर्वक रममाण होता यावे, म्हणून वर्षानुवर्षं सेवा करीत राहावे लागेल. आज आपण लायक झालो आहोत असे नाही; परंतु तोफेच्या तोंडी उभे राहून लायकी यावी म्हणून शरीराच्या चिंधड्या उडवून घेण्याची आपली तयारी आहे; लायक होण्यासाठी दिव्य करावयास तयार आहोत; कोणत्याही कसोटीतून पार पडण्यासाठी तहानलेले आहोत, सेवा करावयास मिळावी म्हणून हपापलो आहोत. समरयज्ञात स्वप्राणांचा बळी देऊन भयानक प्रसंगांतही अविचल व निर्भय राहून, दुर्योधनाने मोक्ष मिळविला, हा परमानंद चाखला. हा वीराचा मार्ग आहे, लेच्यापेच्यांचा नाही. स्वामी विवेकानंद म्हणत, “वस्तूमध्ये फरक केल्याने वस्तू सुधारत नसतात, आपण मात्र सुधारत असतो, चांगले होत असतो.”

हे जगत् म्हणजे पाठशाला आहे. अंतर्बाह्य बलवान् होण्याचा, हे जग म्हणजे जीवात्म्याचा आखाडा आहे. मानवजात म्हणजे सर्वत्र आरसे लावलेला आरसेमहाल नाही की, जेथे पाहू तेथे एकच प्रकार चे बाह्यरूप दिसावे. ईश्वराला आपणा प्रत्येकामधून भिन्नभिन्न विकास प्रकट करावयाचा आहे. नाना प्रकारची फुले या मानवी उपवनात त्याला फुलवायची आहेत; नाना रसांची फळे त्याला निर्माण करावयाची आहेत. आपण दुसर्‍या थोर पुरुषांची चरित्रे वाचतो, ती तसे होण्यासाठी नाही, शिवाजीचे चरित्र वाचून आपण शिवाजी होत नसतो किंवा व्हावयाचे पण नाही. आपण चरित्रे वाचतो ही ह्यासाठी की, त्या पुरुषांना कोणते नियम, कोणती बंधने उपकारक झाली, त्यांच्या धडपडीत कशाचा त्यांना आधार होता, त्यांचे बळ कशात होते- हे सर्व पाहण्यासाठी. सर्व थोरांच्या चरित्रांत एकच अनुल्लंघनीय असा परमोच्च कायदा आहे. त्या कायद्याचे सर्वांना पालन करावे लागेल. तो कायदा म्हणजे “त्याग, त्याग, त्याग”  त्यागाने नटून अज्ञानात बुडी मार; त्यागाने नटून व सजून स्वकर्तव्यात धाव घे. तुझ्या काळच्या तू गरजा पहा. तू ज्या ठिकाणी आहेस, तेथील लोकांची स्थिती अवलोकन कर. तेथेच तुझा स्वधर्म आहे. तो शोधून काढ. तुझ्या मुशाफरीची नाव त्यातूनच तुला बांधावयाची असेल; आपली नाव बरोबर दुसर्‍याच्या नावेसारखीच असली पाहिजे असे मनात आणू नको. तू लोकांचे आरोग्य सुधारण्याची नाव बांध, त्याला धर्म सुधारण्याची नाव बांधू दे. आजूबाजूच्या परिस्थितीत मी कोणते सेवाकर्म करू शकेन ते पहा, नीट निवड कर व ते कर्म हातात घे. ते कर्म म्हणजेच तुझा स्वधर्म, तीच मायानदीतून तरून जाण्याची तुझी होडी. त्या स्वधर्मपालनार्थ आता जग, त्यासाठी मर, दुसर्‍याचे अनुकरण नको. परधर्म तुला झेपणार नाही. तो तुला तारण्याऐवजी मारील. दूध चांगले असले, रूचकर व मोलवान असले तरी, माशाने पाण्यातच राहून विकास करून घेतला पाहिजे. दुधामध्ये तो जगणार नाही, दुसर्‍याच्या कर्माचे, दुसर्‍याच्या धर्माचे, अनुकरण नको. परंतु तो अशी धडपड करतो आहे, कसे सारखे प्रयत्न करतो आहे, वल्ही कशी सारखी मारतो आहे, ते मात्र पहा. दुस-याच्या जीवनातून आशा घे, प्रयत्न घे, उत्साह घे व ती स्वत:च्या कामात लाव. त्यांना त्यांच कर्मात यश येत आहे, मलाही माझ्या कर्मात यश येईल. ते तरून गेले, अलबत् मग मीही तरेन, असा मंत्र दुसर्‍यापासून घे. हा उत्साहमंत्र घेऊन, ही संजीवनी विद्या घेऊन, तू तूझी होडी घे व लोट तिला अथांग दर्यात! आपण कोण हे कळण्यासाठी होऊ दे तुझी सफर सुरू, होऊ दे महायात्रेला प्रारंभ, जे अजून निघाले नाहीत त्यांना तुझे होडी लोटणे स्फूर्तिप्रद वाटो, चैतन्यप्रद वाटो. तेही मग तुझ्या पाठोपाठ होड्या घालतील, तेही मर्द होतील. चल. वल्हव होडी. “मी, मी कोण” चल काढ शोधून. तू तूझी होडी ! पुढे सर्व आपोआप कळेल.

 

“तर मग आम्हांला प्रथम होऊ दे ख्रिस्ताप्रमाणे. ख्रिस्त झाल्यावर मग तर विजय मिळेल ना ? थांबू तोपर्यंत-” असो तो तमोगुणी मनुष्य उत्तर देतो. फार चांगले आहे, बाबा. परंतु काय रे, पदोपदी स्वत:चा विचार करून तू कसा रे ख्रिस्त होणार ? स्वत:चा अहं सारखा सबळ बाळगणे हा थोर पुरुष होण्याचा, महात्मा होण्याचा मार्ग नव्हे. महात्म्याकडे जाण्याचा हा रस्ता नव्हे. विजय मिळविण्यासाठी  जो स्वत:ला विसरतो, तोच विजयी होतो. लहान लहान गुण आपलेसे करून घेण्यासाठी बुध्दांनी ५०० जन्म घेतले. तेव्हा कोठे ते शेवटी बुध्द झाले, सिध्दार्थ झाले. प्रत्येक जन्मात ते स्वत:ला विसरले, जीवनाला विसरले, मरणाला विसरले, फक्त साधनेतच निशिदिन रमले. तळमळ व धडपड याच्याशिवाय त्यांना काही माहीत नव्हते. ज्वारीचा दाणा खापरात खाली वर तडफडतो, तेव्हा त्या दाण्याची शुभ्र व स्वच्छ लाही होते. बुध्दांना असेच अनेक जन्म भट्टीत घालून घ्यावे लागले, देहभान विसरावे लागले, अपार श्रम करावे लागले. आणि असे करून एक दिवस विश्वाचे साम्राज्य त्यांनी मिळविले; परंतु तेही क्षणभंगुर मानून, ज्या परम सत्याने तृषित जीवांना दयारस पाजण्यासाठी त्यांना दयेचे भरलेले पात्र बनविले त्या परम सत्याच्या प्रकाशात ते मिळून गेले.

ही मायानदी तरून जाण्यासाठी प्रत्येकाची साधने निराळी, प्रत्येकाचे मार्ग निराळे. ज्या दगडावर ह्या क्षणी मी पाय ठेवीन त्या दगडावर त्या क्षणी तुम्ही ठेवावयाचा नसतो. प्रत्येकजण आपापल्या दगडावर पाय ठेवून नदी ओलांडीत आहे. प्रत्येक वेळी एकच पाऊल, या दगडावर तोल सांभाळून आधी नीट उभे राहावयाचे व मग पुढल्या दगडावर अचूक सावधपणे उडी मारावयाची. त्या पुढच्या दगडावर जी उडी मारावयाची त्या क्रियेत सारे हृदय, सारा आत्मा ओतलेली असली पाहिजेत. आपणापैकी बहुतेक सर्वांना ह्या जन्मात परमतत्त्व नाही; ह्या जन्मात परतीर नाही. पुढचा गड गाठला तरी पुष्कळ झाले. लहानसे ध्येय, लहानसे काम, त्यासाठी आज आपणास जगावयाचे आहे, त्या लहान कर्तव्यासाठीच स्वत:ला विसरून जाण्याचे शिकावयाचे आहे. अशा रीतीने लहान लहान कर्मे उत्कृष्टपणे करीत, अशा रीतीने लहान लहान पाऊले मन:पूर्वक एकाग्रतेने टाकीत आपणास परतीर गाठावयाचे आहे. अशा मार्गानेच मोठे गेले, अशा मार्गानेच भगवान् बुध्द गेले. कर्मे करीत कर्मातीताकडे जाऊ; कला शिकत शिकत कलातीताकडे जाऊ; बंधने पाळून पाळूनच बंधनातीत होऊ. ह्या जगात अशा शेकडो लहानसहान गोष्टी आहेत की, ज्यांच्यासाठी आपणास आपली जीविते अर्पण करता येतील. जगात अशा गोष्टींचा दुष्काळ नाही. साक्षरताप्रसार, स्वदेशीप्रसार, व्यायामप्रसार, ज्ञानप्रसार, रानटी लोकांत जाऊन त्यांची सेवा करणे, मद्यपानबंदी, आपल्या देशाचा साराच संसार फाटला आहे. हजारो कामे पडली आहेत. ह्या कामात सर्वस्व अर्पण करून पडू या. जगात अशी मौल्यवान कामे पडली आहेत, त्यासाठी आज प्राणाचे मोल द्या. एकदम शेवटच्या परीक्षेस बसण्याची ऐट आणू नका. तशी नसती ऐट आणाल तर फसाल, पस्तावाल. आजच काही तुम्ही गरुड नाही. एकदम विहंगम मार्गने परमेश्वराकडे तुम्हाला उडता येणार नाही. तुमचा आमचा शेकडा ९९ लोकांचा पिपीलिका मार्गच आहे. आजचे तुमचे जीवन इतके मौल्यवान नाही की, ते देऊन परमेश्वर विकत घेता येईल. ते मोल एक दिवस येईल. परंतु अधीर होऊ नका. आज मुक्ती दूर आहे. परंतु एकेक पायरी चढत चढत ती आपण शेवटी गाठू. ही अनंत कर्माची शिडी एक दिवस मोक्षाच्या दिवाणखान्यात आपणास सोडल्याशिवाय राहणार नाही. नाना जीव नाना भूमिकेवर असतात. कोणी शिडीच्या फार वरच्या पायरीवर आहेत, कोणी खालच्या आहेत. परंतु एक दिवस सारेच चढून जाऊ. आपण ज्ञानाच्या शिडीवर चढणारी सारी बाळे आहोत. सर्व एकाच पयरीवर नाहीत. सर्वांना एकच उपदेश नाही. एकच कर्म नाही. अधिकार तैसा करू उपदेश. परंतु एक कायदा मात्र सर्वांना सारखाच लागू आहे. हा सर्वव्यापक असा नियम कोणता ते माहीत आहे का ? तो हा की, त्यागानेच, स्वत:चा पूर्ण विसर पडल्यानेच परमपदप्राप्ती करून घेता येते. हा तो सार्वभौम नियम होय.

 

अज्ञानाचे अनेक प्रकार आहेत. परंतु आत्मश्लाघेइतका निंद्य प्रकार दुसरा कोणताच नसेल. ह्या प्रकाराने पतन जितके सुलभ आहे तितके दुसर्‍या प्रकाराने नाही. आपण आपल्या जीवनात कितीदा तरी मागे पाहतो व सुस्कारा सोडतो. आपल्या भूतकाळाची आपण पूजा करतो, परंतु भविष्यकाळात वर चढण्याची हिंमत बाळगीत नाही. पुष्कळशा सत्प्रवृत्त माणसांचे बालपण भक्तिमय व भावनामय असते. ते त्यांना पुढे चिखलात बरबटल्यावर पुन्हा पुन्हा आठवते. पुन्हा पुन्हा ते मागे मुरडून बघतात. जीवनाच्या आरंभी जो आकार त्यांच्या जीवनाला होता, तो त्यांना अत्यंत मोहक व रमणीय दिसतो. कोणीही येवो त्याच्यासमोर ‘मी असा होतो, मी असे करीत असे, मी उपवास करीत असे, मी जप करीत असे.’ वगैरे आत्मविकत्थन ते सुरू करतात. असे करण्यात स्वत:च्या अहंकाराचे समाधान होत असते. समोरच्या श्रोत्याला आपले हे पूर्वीचे आत्मपुराण आवडते आहे की नाही, हेही तो पाहत नाही. तो आपली कथा त्याच्यावर लादीतच असतो. दुसर्‍याचे स्वातंत्र्य म्हणजे काय ह्याची आपणांमधील फारच थोडयांना कल्पना असते. आपण सारे दुसर्‍यावर लादू पाहणारे सुलतान असतो.

आजकाल “मी असा होतो व आम्ही असे होतो.” असे सांगण्याचा रोगच जडला आहे. आत्मप्रौढी, आत्मश्लाघा सर्वत्र अमर्यादपणे दिसून येत आहे. ह्या गोष्टीचा आरंभ सद्हेतून झाला. परंतु झाला तो सध्देतू लोक विसरून गेले आहेत. प्राचीन ध्येये फिरून हस्तगत करण्याचा आजचा काळ आहे. आपल्या भूतकाळाच्या समुद्रात पुन: पुन्हा बुड्या मारून, विशाल अशा गतेतिहासात फिरून फिरून शिरकून आपल्या विकासाच्या हातांतून सुटलेले टाके हातात घेऊन पुढे जाण्याच्या खटपटीत आहोत. याचा परिणाम नाना रूपांनी दिसत आहे. आपण आपल्या वंशावळी पाहू लागलो आहोत, आडनावे शोधू लागलो आहोत. आपण थोरामोठ्यांना यांचे वंशज आहोत, असे दाखविण्याच्या खटपटी सुरू झाल्या आहेत. आम्ही ‘ पवार ’ म्हणजे परमार घराण्यांतील, असे संबंध जोडण्यात येऊ लागले आहेत. काहीतरी करून आपली परंपरा थोर अशा पूर्वजांजवळ नेऊन जोडावयाची असे सुरू झाले आहे. आपली पूर्वजांची स्तूतिस्तोत्रे गाऊ लागलो. आम्ही असे होतो, आम्ही शिवाजी- बाजींचे, समर्थ-तुकारामांचे वंशज- अशा प्रकारचे वाक्संप्रदाय कानी सर्वत्र पडू लागले. आपण आपल्याला आकाशाइतके उंच करू लागलो. जणू स्वर्ग दोनच बोटे आता उरला ! परंतु हे सारे जे सुरू झाले, त्याच्यातील हेतू विसरलो. आपणास पुढे जाण्याला उत्तेजन मिळावे, पुढे जाण्यासाठी हुरूप यावा, आपली निराशा जाऊन आपण जोराने कार्यास लागून पूर्वजांप्रमाणे पुन्हा आजच्या जगात मोठे व्हावे हा यात हेतू होता. पूर्वजांची स्तुती करून त्यांच्या मोठेपणावर मिरवत राहणे हा यात हेतू नव्हता. पूर्वज मोठे होते- तूही मोठा होऊ शकशील, हा त्यात संदेश होता. पूर्वज मोठे होते, एवढ्यानेच मी मोठा होत नाही. मी काही न करता पूर्वजांच्या गादीवर आहे, एवढ्यानेच मी मोठा आहे असा अहंकार निर्माण व्हावा हा त्यात हेतू नव्हता. ज्या वेळेस एखादा वक्ता म्हणतो, “हे ऋषिमुनींच्या वंशजाने !” त्या वेळेस जर एखादा श्रोता स्वत:ला वसिष्ठ-वामदेव समजू लागले तर तो त्याचा तमोगुण आहे. दुसरे काय ? वक्त्याच्या म्हणण्याचा आशय हा की, अशा थोरांच्या कुळातील तुम्ही आज असे नादान कसे झालात ? काही लाज धरा व उठा.

तसेच दुसरे एक सांगावयाचे ते हे की, हिंदुस्थानातील कोटयावधी लोकांना तुम्ही चैतन्य व्हा, तुम्ही तुकाराम व्हा, तुम्ही ख्रिस्त व्हा, तुम्ही बुध्द व्हा, असे वक्तृत्वाच्या भरात वक्ते सांगत असतात. ते म्हणतात, “आमच्याने असे सांगितल्याशिवाय राहावतच नाही.”  राहावतच नाही! आपणातील प्रत्येक जर ख्रिस्त, चैतन्य असेल तर कसे राहवेल ? महंमद पैगंबर येशूख्रिस्ताबद्दल एकदा म्हणाले, “अंगावरील लोकर कापणार्‍या माणसासमोर मेंढी जशी गप्प बसते, तसे का ख्रिस्ताचे खुळेपण होते ? ख्रिस्ताचे मौन असे रडके, दीनवाणे नव्हते. त्याचे ते मौन दिव्य व अनंत सामर्थ्याने संपन्न असे होते.”  ख्रिस्ताच्या दिव्य व वक्तृत्वपूर्ण मौनाप्रमाणे आपले आजचे मौन आहे का ? आपण तोंड उघडीत नाही ते भीतीमुळे का आतील निर्भय अलोट सामर्थ्यामुळै ? ख्रिस्त झाल्याशिवाय ख्रिस्ताला ज्या साधनांनी विजय मिळाला, त्या साधनांनी आपणास मिळणार नाही. ख्रिस्ताने जे शस्त्र वापरले ते वापरावयाचे असेल तर आधी ख्रिस्त झाले पाहिजे. परंतु आपला मुकेपणा आहे मेंढरांचा. असला मुकेपणा काय फळ आणून देणार ? आपणांतील तमोगुणामुळे अशा ह्या चुका आपण करीत आहोत; काहीतरी भलभलते भकत आहोत, मनात मानीत आहोत. ख्रिस्त व्हा व मग त्याची साधने घ्या.