शुक्रवार, जुलै 19, 2019
   
Text Size

अनुभव

आपल्या मनात जे विचार येतात, ज्या सुंदर सुंदर भावना मधून मधून चमकतात, त्यांना साठवून ठेवण्यासाठी, त्यांना मरू न देण्यासाठी आपण काय करतो, कोणती किंमत देतो, कोणता त्याग करतो ? आपणात अशी चाल आहे की, तीर्थयात्रा झाली की, त्या तीर्थयात्रेचे स्मरण म्हणून एखाद्या पदार्थाचा त्याग करावयाचा; म्हणजे ती ती वस्तू दिसताच, तो पदार्थ समोर येताच त्या यात्रेची- त्या पुण्य प्रसंगाची आठवण आपोआपच राहील. आपला आत्मा विचारांच्या क्षेत्रात सारख्या यात्रा करीत असतो व कधी कधी पवित्र स्थळी तो जात असतो. परंतु त्याचे स्मरण राहावे म्हणून आपण कोणत्या गोष्टींचा त्याग करतो ? ज्या वस्तूचा त्याग आपण करतो, त्या वस्तूच्या दर्शनाने आपणास पुन्हा त्या पावन अनुभवाची स्मृती होते. क्षणभर पुन्हा आपण परमेश्वराजवळ जातो. ज्या ज्या वेळेस श्रीरामकृष्ण फुले पाहात, त्या त्या वेळेस त्या पूर्वीच्या पावन व शिव अशा अनुभवांची त्यांना स्मृती होई व तो अनुभव अधिकच दृढ व अधिकच श्रीमंत होत जाई; त्या अनुभवात अधिकच गोडी व अधिकच रस उत्पन्न होई. अधिकस्य अधिकं फलम् क्षुद्र वस्तू व क्षुद्र गोष्टी यांच्या पसार्‍यात आपण इतक गुरफटून गेलेलो असतो की, आपणाला मिळालेल्या थोर व मोलवान अशा क्षणांची आपणास आठवणही राहत नाही. क्षुद्र वस्तूच आपणास प्राणासमान झालेल्या असतात. दगड उराशी बाळगून मोती फेकून देत असतो. उच्च अनुभवांची अशा रीतीने अपेक्षा व टेहाळणी आपण करीत असतो. अशांना ते थोर अनुभव अधिकाधिक कसे मिळावे व का मिळावे ? काकाला मोती कशाला ? बेडकाला कमळे कशाला ? गोचिडीला दूध कशाला ? मोठमोठ्या धडपडीनंतर एखादा किरण भाग्याने मिळतो, सद्विचार हृदयात स्फुरतो. परंतु त्याला हृदयात आपण कितीसे स्थान देतो ? त्या अनुभवांशी किती सत्यतेने वागतो ? तो अनुभव किती आपलासा करून घेतो, त्याला दृढ करतो ? आपणांपैकी बहुतेकांची जीवने वाळूचा डोंगर चढून जाणार्‍या मुशाफराच्या प्रगतीप्रमाणे असतात. तो मुशाफर एक हात चढतो व दोन हात खाली घसरतो ! त्याप्रमाणे आपणही जे मोठ्या कष्टाने मिळते, ते क्षणात गमावून बसतो. आपणाला काही लाभले होते, एखादा सत्किरण हृदयात आला होता, ह्याची आपली आठवणही पार बुजून जाते.

आत्म्याचे सुंदर जीवन- ते विसरून कसे बरे चालणार ? तिकडे दुर्लक्ष करून भागणारच नाही. आपल्या सभोवतालच्या पसार्‍यात, सभोवतालच्या कचर्‍याच्या ढिगात हीच एक अत्यंत महत्त्वाची व सत्यमय अशी वस्तू असते. तीच गमावून कसे बरे चालेल ? कधी कधी हा इंद्रियांचा आडपडदा किंचित् बाजूला झाल्यासारखा होतो व त्या पडद्याआड बसलेल्या त्या सुंदराचे- त्या परमेश्वराचे- अंधुक दर्शन झाल्यासारखे वाटते. मधून मधून तो असा डोकावतो व आपणाला मुकेपणाने बोलावीत असतो. परंतु हे क्षण वाढवावे असे आपल्या मनात येतच नाही. जरा दार उघडा की तो परमेश्वर आत येण्यास उभा आहे. दार जरा किलकिले करताच बाहेरची स्वच्छ हवा व स्वच्छ प्रकाश आत घुसतात. परंतु आपण दारे लावून बसतो. आत्मसूर्याचा अखंड प्रकाश आपण आपल्या जीवनात आणीत नाही. तो दृष्टीआडच राहतो व आपण अंधारातच चाचपडत रडतो व पडतो. त्या आत्मसूर्याला प्रकट होऊ दे. त्याला विरोध करू नका. या विविधतेच्या पाठीमागे असलेले जे एकम् सत्, जे सत्यम् शिवम् सुंदरम्, त्याला पुढे येण्यास अवसर द्या. एवढे करा म्हणजे तुम्हाला असे दिसून येईल की, जगातील वस्तुमात्राला आपल्या आत्म्याचे जीवनच नटवीत आहे, घडवीत आहे. जन्म वा मरण, सुख वा दु:ख, त्याच्याहूनही महत्त्वाच्या गोष्टी ज्ञान व अज्ञान, ह्या सर्वांची विल्हेवाट आध्यात्मिक शक्ती, आत्म्याची शक्ती हीच लावीत असते. ही आध्यात्मिक शक्ती सर्व वस्तूंना वाकविते, तापविते, आकार देते. ही शक्तीच सर्व वस्तूंचे मूल्यमापन करून हे त्याज्य, हे ग्राह्य, हे तुच्छ, हे उच्च, हे श्रेय, हे प्रिय असे ठरवीत असते. ही शक्तीच वस्तूचे अंतरंग दाखविते, वस्तूचा अर्थ समजून देते. तुम्ही काय शिकलात एवढाच प्रश्न नसून त्याबरोबर दुसरा एक प्रश्न आहे की, जे शिकलात ते दृढ करण्यासाठी, ते जीवनात आणण्यासाठी, ते जीवनात कायमचे असावे म्हणून काय किंमत दिलीत ? कोणता त्याग केलात ?

 

जे महात्मे आपणामध्ये वावरले त्यांच्या जीवनकथा लिहून पुढील पिढीच्या हातात देण्याची वेळ आता आली आहे. “ते थोर पुरुष ज्या काळात वावरले, ज्या काळात ते हिंडले, फिरले, बोलले, सहन करते झाले त्या काळात आपण असतो तर त्या महापुरुषांना आपण पाहिले असते तर......” असे पुढील पिढीला ही चरित्रे वाचून म्हणावेसे वाटेल. “ते महापुरुष नाही, तर नाहीत, परंतु त्या महापुरुषांना ज्यांनी पाहिले त्या महापुरुषांजवळ जे होते, त्या महापुरुषांच्या तोंडून ज्यांनी दोन शब्द ऐकले...... अशा व्यक्तींना तरी आपण पाहिले असते तर..... तो महापुरुष कसा बोले, कसा फिरे, कसा वागे, कसा मागे, कसा जनहिती जागे, तो खाई काय, पिई काय, तो कसा हसे, कसा बसे.... सारे विचारले असते.” असे भावी पिढी हळूहळून म्हणेल परंतु आपले भाग्य फार थोर आहे. आपण दोन्ही प्रकारचा अनुभव घेतला. प्रत्यक्ष महात्म्याचेही दर्शन घेतले व त्या महात्म्यांचे दर्शन ज्यांनी घेतले, ज्यांच्याजवळ त्यांच्या आठवणी होत्या.... त्यांच्याही गाठीभेटी आपल्या झाल्या. आपल्या सौभाग्यास सीमा नाही, पुण्याईस पार नाही.

श्रीरामकृष्णांनी चरित्रकथा वाचताना एक गोष्ट पटकन् ध्यानात येते. रामकृष्णांना स्वत:च्या अनुभवाबद्दल फार पूज्य बुध्दी वाटे. अनुभव, साक्षात्कार हे त्यांच्या जीविताचे ध्येय होते. जो जो थोर अनुभव मिळे तो ते आपल्या हृदयमादुसेत जपून ठेवीत. अनर्घ्य रत्नाप्रमाणे त्याला ते जपत. आणि असे शेकडो दिव्य अनुभव त्यांना मिळाले होते. अनुभवांची थोर व संस्मरणीय पावन व गंभीर अशा अनुभवांची अपरंपार संपत्ती त्यांच्याजवळ होती. इतकी संपत्ती होती, तरी ते प्रत्येक नवीन अनुभवाला जपत. स्वकष्टाने अगणित संपत्ती मिळविली तरीही संसारी पैनपैला जपतच असतो. घरात धान्याची कोठारे भरलेली असूनही अंगणात जर धान्याचे दाणे पडलेले दिसतात, तर खरा शेतकरी ते दाणे प्रेमाने उचलील व कोठारात आणून टाकील. रामकृष्ण आध्यात्मिक धान्याचे भांडारी होते. आध्यात्मिक कोठारे त्यांच्याजवळ भरलेली होती. तरीही प्रत्येक नवीन पवित्र अनुभवाला ते प्रेमाने उराशी धरीत, परंतु आपण किती बेफिकीर असतो. आपणाजवळ अगदी तुटपुंजी सामग्री असते. एका महाभाग्याने एखादा पावन क्षण जीवनात येतो, पवित्र अनुभव परंतु आपण तो साठवून ठेवीत नाही. त्यांची आठवणही आपण विसरतो. हे मानवी जीवन म्हणजे सोनियाचा कलश आहे. पवित्र अनुभवांची, जीवनाला विशुध्द व सुंदर, उन्नत व सरस करणार्‍या अनुभवांची सुधा ह्या कलशात भरावयाची असते. परंतु आपण काय करतो ?

सोनियाचा कलश । माजि भरला सुरारस

एखादा अमृताचा बिंदू मिळालाच तर त्याचीही किंमत आपणाला वाटत नाही. अशाने आपले जीवन समृध्द व सुंदर कसे होणार ? थेंबे थेंबे तळे साचे. कण कण गोळा करीत राहिले पाहिजे. श्रीरामकृष्ण एके दिवशी प्रात:काळी देवाच्या पूजेसाठी म्हणून फुले तोडीत होते. हातात परडी होती- फुले तोडीत होते. परंतु एकदम एक भव्य विचार त्यांच्या हृदयाकाशात ठळकपणे चमकला- “ही सर्व भूमाता म्हणजे एक विशाल पूजा मंदिरच आहे. ही झाडावरची फुले देवाच्या चरणांवर आधीच वाहिलेली आहेत; सृष्टीदेवीने विश्वंभराची पूजा आधीच केली आहे. नमस्कार करणे एवढेच आपले काम उरले.” त्या दिवसापासून श्रीरामकृष्णांनी देवपूजेसाठी पुन्हा म्हणून फुले तोडिली नाहीत; फूल पाहताच त्यांची जणू समाधी लागे.