गुरुवार, जुन 20, 2019
   
Text Size

कर्मद्वारा साक्षात्कार

आजे पुन्हा सत्याचे रणशिंग आपल्यामध्ये वाजविले जात आहे. पुन्हा एकदा भारतवर्ष जागा होत आहे. आपल्या इतिहासात ज्या ज्या वेळेस उज्ज्वल काळ यावयाचा असतो, त्या त्या वेळेस धर्म आधी पुढे येतो. धर्माचे वैभव प्रथम दिसू लागते. तो काळ पुन्हा येत आहे. हळूहळू पण निश्चितपणे येत आहे. भारताचा प्राचीन विचार नवविचारांत घुसेल व नवविचार प्राचीन विचारात मिसळून जाईल, तेव्हा भारतीय नवयुगाला सुरूवात होईल व अर्वाचीन काळातील ही फार महत्त्वाची व दूरवरचे परिणाम घडविणारी गोष्ट झाली असे इतिहासज्ञांस व मर्मज्ञांस वाटेल.

परंतु सध्या आपण काय करावयाचे ? भारताचे प्राचीन विचारभांडार सार्‍या जगाला देऊन आपण भिकारीच रहावयाचे की काय ? जगाला श्रीमंत व समृध्द करून आपण करंटे व हतपतितच राहावयाचे की काय ? तसे जर राहावयाचे नसेल व बलशाली व्हावयाचे असेल तर त्याला मार्ग कोणता, उपाय कोणता ? कर्मद्वारा मोक्षप्राप्ती, कर्मद्वारा ब्रह्म हा तो मार्ग होय. आजच्या युगात आपण आपले तत्त्वज्ञान यशस्वी करून दाखविले पाहिजे. विज्ञानाच्या मैदानावर जाऊन तेथेंहि भारतीय तत्त्वज्ञानाने विजयी ठरले पाहिजे. भारतवासीयांचे हे काम आहे. प्राचीन भारतीय विचारांची भव्यता व सत्यता पटवून द्यावयाची ही जबाबदारी आपणांवर आज आहे. काळपुरुषाने सर्व राष्ट्रांना आपापले विचार घेऊन येण्यास बजाविले आहे. तो हातात तराजू घेऊन बसला आहे. आपण आपले विचार वजनदार व सारभूत आहेत, सत्य, भरीव व कसदार आहेत, हे पटवून देऊ या.

दुसरेही एक महत्त्वाचे काम आपणास करावयाचे आहे. जसजसे नवीन ज्ञान मिळवू, तसतसे ते आपलेसे करू. अशा संतत साधनेनेच आपले ज्ञान यथार्थ होईल. अशानेच ज्ञान कर्मात प्रकट झाले म्हणजे त्यालाच सद्गुण म्हणतात. सॉक्रेटिस ज्ञानाची व्याख्या अशीच करी. ज्ञान म्हणजे वाचन अशी  तो व्याख्या करीत नसे, तर ज्ञान म्हणजे सद्गुण अशी व्याख्या तो करी. असा आजचा हा कार्यक्रम आहे. ही धडपड आहे. या कर्मावर, ह्या आजच्या धर्मावर सारे लक्ष द्या. या गोष्टीने वेडे व्हा. असे केल्यानेच नवीन आध्यात्मिक स्नायू, नवीन आध्यात्मिक बाहू आपणास मिळतील; असे केल्यानेच आपल्या पायांना पंख फुटतील व आपण चिखलात रुतून न बसता नीट उड्डाण करू.

 

विचाराला जर आचाराची जोड नसेल, विचार हे केवळ शब्दातच राहून जर कृतीत उतरत नसतील, तर त्याचे फार घातक परिणाम होत असतात. समाजावर ह्याचा फार अनिष्ट व वाईट परिणाम घडतो असे इतिहासावरून दिसून येते. आत्म्याच्या उन्नतीसाठी बाह्य जगातील धडपड चिरंतन महत्त्वाची आहे, सदैव आवश्यक आहे. मोक्षसमय जवळ आला म्हणजेच कदाचित् कर्म सरेल व तो पुरुषही जगाच्या पलीकडे जाईल. परंतु आपणा सर्वांस तर काम केलेच पाहिजे. आजूबाजूच्या या मर्यादित जगात एकाच ध्येयासाठी आपण आपले तन मन धन ओतू या; महान विचार व महान तत्त्व जीवनात प्रकट करू या. विचार आचारात येत गेल्यानेच त्यांचा प्रसार होतो, त्यांचा विकास होतो. याच मार्गाने दृष्ट उत्तरोत्तर अधिक विशाल होत जाईल व अधिकाधिक सत्य समजू लागेल.

वेदांताच्या इतकाच श्रम उन्नतीसाठी आवश्यक आहे; किंबहुना वेदान्तापेक्षाही प्रत्यक्ष कर्म हे अधिक महत्त्वाचे आहे. आणि कर्म करीत राहणे हे आपणा सर्वांस सदैव शक्य आहे. कर्म करणे हे आपल्या शक्तीबाहेरचे नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला काही ना काही करता येईलच येईल. भक्त ईश्वराची नाना उपचारांनी पूजा करितो. सृष्टीच्या कल्याणमय कर्मांनी-लहानमोठ्या परंतु मंगल कर्मांनी-पूजा करू या. कर्म म्हणजेच यज्ञ, कर्म म्हणजेच पूजा.

कृतिहीन विचार शुष्क वादविवाद माजवितो. ज्या वेळेस विचार कृतीत येत नाहीत, त्या वेळेस शब्दांचे कीस काढणारे लोक समाजात वाढतात. शब्दवेल्हाळ लोक ठिकठिकाणी दिसू लागतात. केवळ शब्दच्छल करीत बसणे हा बुध्दीचा सर्वांत मोठा दुरुपयोग होय; बुध्दीला जडलेला हा फार मोठा दुर्गुण होय. वादविवाद करणार्‍या बुध्दीस कर्मरूप होण्याची शक्ती असेल, परंतु तो कर्मद्वारा प्रकट होत नाही हे खरे. ही सवय जर अशीच चालू ठेवली, मोठमोठे विचार तोंडाने मात्र बडबडायचे, कृतीच्या नावाने मात्र पूज्य; असेच जर गाडे चालले, तर अपरंपार नुकसान होईल. ‘सर्वं खलु इदं ब्रह्म, तत्त्वमसि, अहं ब्रह्मास्मि’ इत्यादी महावचने तोंडाने पुटपुटणे हेच जर महत्त्वाचे, ही महावाक्ये फक्त वादविवादात उपयोगात आणण्यासाठीच असतील व जीवनात त्यांचा अनुभव घेण्यासाठी जर ती नसतील तर बुध्दीचा, नीतीचा व मानसिक शक्तीचा अध:पात झाल्याशिवाय राहणार नाही. ह्यासाठी या वादविवादात्मक पध्दतीला, या शब्दपांडित्याला, या शब्दच्छलाला आळा घातला पाहिजे; विचार व ध्येये यांना हळूहळू परंतु निश्चितपणे कृतीत उतरविण्याच्या प्रयत्नानेच ह्या गोष्टीस बंध घातला गेला पाहिजे.

ह्या जगात अनेक वेळा श्रध्देची व धर्माची महती गायिली गेली, परंतु त्या त्या काळात केवळ निष्क्रियत्वच होते असे नाही. युरोपमध्ये १३ व्या शतकात बहुतेक निष्क्रियत्व होते. वादविवादाला ऊत आला होता तरी त्याच काळात सुंदर व भव्य मंदिरे बांधली गेली. शिल्पशास्त्रात ध्येये प्रकट केली जात होती. युरोपमध्ये सर्वांत सुंदर अशी जी प्रार्थनामंदिरे आहेत, ती त्याच काळात उभारली गेली. ह्याचा अर्थ १३ व्या शतकात जरी राजकीय क्रांत्या युरोपमध्ये फार न झाल्या, राजकीय चळवळ फार जरी न झाली, तरी इतर कर्मक्षेत्रांत पराक्रम केले जातच होते. भारतवर्षांतही अशीच चुकीची कल्पना आपण करून घेण्याचा संभव आहे. शस्त्रास्त्रांचा खणखणाट, नष्ट होणार्‍या सिंहासनांचा कडकडाट- हे जरी ऐकू न आले तरी इतर कर्म सुरूच असते. ज्या काळात श्रध्दा केळवली गेली, त्या काळात विकास होत होता, कला व उद्योगधंदे संर्वधिले जात होते, शिक्षणाचा प्रसार होत होता. थोर श्रध्दा प्रचंड कार्यांना उभी करीत असते. ज्या वेळेस समाजात खरी श्रध्दा असते, त्या वेळेस समाज कर्मात रंगलेला असतो. त्या वेळेस समाजात चैतन्य खेळत असते.