रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

कमळ व भ्रमर

श्रीरामकृष्ण दोन शेतकर्‍यांची गोष्ट सांगत. एक-दोन वर्षे पीक नीट आले नाही; दुष्काळच पडला, म्हणून एका पांढरपेशा शेतकर्‍याने शेती करणेच सोडून दिले. त्याची शेते ओसाड पडली. परंतु दुसरा जो खरा हाडाचा शेतकरी होता, त्याने तिसर्‍या वर्षीही जमीन नीट नांगरून ठेवली. खत वगैरे घालून तयार करून ठेवली. तो म्हणे, “पाऊस येवो वा न येवो, पीक मिळो वा न मिळो, माझ्या हातात जेवढे आहे तेवढे मी करून ठेवले पाहिजे. मी अंगचोरपणा केला, कुचराई केली, असे होता कामा नये.”  या दुसर्‍या शेतकर्‍याप्रमाणे, या खर्‍या कर्मयोगी ध्येयवाद्याप्रमाणे आपण सर्वांनी वागले पाहिजे. आपले काम कितीही लहान व क्षुद्र का असेना- परंतु भावना ही वरच्याप्रमाणे पाहिजे. पुन: पुन:, पुन: पुन: अश्रांत श्रम केले पाहिजेत. ‘फिरून यत्न करून पहा’ हे आपले ब्रीदवाक्य असले पाहिजे. मरेपर्यंत धडपडू. धडपडीतच जीवनाची शेवटची पूर्णाहुती पडू दे. फुटलेल्या गलबतांतून समुद्रात पडलेला मनुष्य दूर जमीन दिसताना, तिला गाठण्यासाठी जसा लाटांतून सारखा अदम्यपणे पुढे जात राहील किंवा वरती उंच चमकणारे बर्फाच्छादित शिखर पाहून पर्वत चढणारा जसा सारखा चढत राहील- त्याप्रमाणे आपणही आपल्या लहान- मोठ्या गोष्टींत परतीर गाठण्याची, वरचे टोक गाठण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

स्कॉटलंडमधील हुशार व व्यवहारचतुर लहान लहान दुकानदारांच्या मधूनच आजचे सर्व जगाशी व्यापार करणारे कोटयावधी व्यापारी निर्माण झाले आहेत. त्या छोटया व्यापार्‍यांतूनच ऍडम स्मिथ याचा राष्ट्राची संपत्ती हा अर्थशास्त्रावरील ग्रंथ निर्माण झाला. साध्या व लहानसान गोष्टींतच मोठ्या गोष्टींची बीजे असतात. आपापली लहान लहान कामे नीट मन लावून करणारे लाखो लोक जेथे असतात, तेथेच महाकाव्ये लिहिणारे कवी, महान् शास्त्रे शोधणारे शास्त्रज्ञ, नवविचार देणारे ऋषी जन्मास येत असतात. राष्ट्रातील सर्व लहान माणसांनी आपल्या कामात उत्कृष्टता प्रकट करावी, म्हणजे सारे राष्ट्र मोठे होईल. ‘जे जे तुझ्या हातात करता येण्यासारखे असेल ते कर, त्यात आत्मा ओतून ते कर. तुझे कमळ तू फुलव.’

 

आपण फुललो ही बातमी कमळाला भ्रमराकडून कळावी, किती आश्चर्य ! परंतु आध्यात्मिक कार्ये अशीच निमूटपणे, नि:स्तब्धपणे घडत असतात. सृष्टी गाजावाजा करीत नाही. फुले किती मुकाटयाने फुलतात, जाहिराती लावीत नाहीत, फुलणार फुलणार म्हणून बातमीपत्रे पाठवीत नाहीत. शांतपणे परंतु अश्रांत श्रम. असे आध्यात्मिक श्रम, असे हे दिव्य श्रम फुकट जाणार नाहीत. त्याचे परिणाम दिसू लागतातच. फळे डोलतील, प्रकाश येऊन नाचेल, ज्याला साधने वापरता येतात, त्याच्याकडे साधन चालत येतात, यात संशय नाही. ज्याला ज्याची तळमळ, त्याला ते मिळेल. ज्याची जी लायकी त्याप्रमाणे त्याला ते मिळेल. जेवढे श्रम, व्यवस्थित व निरपेक्ष श्रम, तेवढा विकास. या जगात माझा वाटा काय ? माझे काम काय ? जय का पराजय ? मूर्ख कोठला ! धडपड हा तुझा वाटा, सारखे प्रयत्न एवढेच तुझे काम.

ज्या मानाने ध्येय मोठे व उच्च त्या मानाने पंथ बिकट व लांबचा असणार. प्रत्येक पाऊल लढत लढत टाकावे लागेल. तसू तसू जमीन रक्त सांडून जिंकून घ्यावी लागेल आणि इतकेही करून ज्यासाठी एवढी खटपट, ज्यासाठी मरावयाचे, ती गोष्ट अगदी क्षुद्रही असेल. तोफेला बत्ती देत असताना कित्येक शिपाई मरून पडतील. परंतु तो शेवटचा क्षण ? अत्यंत आणीबाणीचा कडोविकडीचा क्षण; त्या क्षणी तेथे आगीचा वर्षाव होत असता आपल्या तोफेजवळ अविचलपणाने उभे राहून तिची किल्ली फिरावयास पाठीमागची सारी तपश्चर्या लागत असते; पाठीमागचा सारा अभ्यास, सारा संयम, सारी शिस्त, सारी कवाईत ह्यांची त्या एका क्षणासाठी जरूर असते. ग्लॅडस्टन काय किंवा डार्विन काय, त्यांनी पुढे जी लोकात्तर बौध्दिक शक्ती प्रकट केली, ती का एकदम त्यांना प्रकट करता आली ? विद्यालयात, महाविद्यालयात असताना ते किती आस्थापूर्वक श्रम करीत होते. त्या पूर्वीच्या तपश्चर्येचे ते फळ होते. अपूर्व व लोकात्तर बुध्दी याचा अर्थ अश्रांत श्रम करण्याची पात्रता, एवढाच आहे. ग्लॅडसटनला रोजच्या कामात, शिकत असता वेळच्या रोजच्या अभ्यासात पार्लमेंटमधील भावी लढायाच दिसत असत. प्रत्येक दिवस लढाईचाच दिवस, असे वाटले पाहिजे. जो आजपर्यंत सुखविलासात लोळला तो वेळ येताच लढाईस कसा उभा राहणार ? मोठ्या लोकांना उपजतच मोठेपणाची स्वप्ने दिसत असतात. लहानपणी मिल्टन म्हणे, “मी मोठ्या कामासाठी जन्मलेला आहे.”  या जाणीवेमुळे इतर मुले खेळत खिदळत असता मिल्टन होमरच वाचीत बसे, भावी महाकाव्याची तयारी करीत असे. परंतु ते काहीही असो. भावी डोळ्यांसमोर दिसो वा ना दिसो, मिल्टन असो, ग्लॅडस्टन असो, अशाक असो वा राणाप्रताप असो. आपण कोण होणार हे आपल्या हाती नाही. परंतु प्रामाणिकपणे आपण सारेजण सारखे प्रयत्न करू या. मग काय जे व्हायचे असेल ते खुशाल होवो. काम करीत राहणे एवढेच आपले काम.

झगडण्यासाठी उत्तरोत्तर उदात्त ध्येये पाहिजेत. यासाठी झगड. त्यासाठी मर. ह्याप्रमाणे दिव्य ध्येये आपणास कोणी दाखविली पाहिजेत किंवा आपण निश्चित केली पाहिजेत. ध्येय इतके उज्ज्वल दिसले पाहिजे, सुंदर दिसले पाहिजे की त्याला मिठी मारावयास सारे विसरून आपण धावत गेले पाहिजे. पाणबुड्या मोत्यांसाठी सागरात नि:शंकपणे बुडी मारील. कृपण धनासाठी वाटेल ते आनंदाने करील. प्रियकर प्रियेसाठी सापाची दोरी करून वर चढेल, भरल्या पुरात वाहत जाणार्‍या मढ्याला लाकूड समजून पलीकडे जाईल. आपल्या ध्येयाकडे जीव कसा ओढला पाहिजे, सारे जीवन त्याच्याकडे धावून गेले पाहिजे. सर्व इंद्रियांनी ध्येयदेवाला आलिंगन दिले पाहिजे. डोळ्यांनी ध्येय पाहावे, कानांनी ते ऐकावे, पायांनी तिकडे चालावे, हातांनी काम करावे. ध्येयाच्याच ओलाव्याने जगले पाहिजे.

 

‘लाभालाभ, जयापजय सारखे करा.’  हा गीतेचे उपयोग केवळ संन्याशाला नाही. हे महावाक्य सर्वांनीच स्मरावयाचे आहे, डोळ्यांसमोर राखावयाचे आहे. ज्याला लाभालाभ सम झाले, ज्याने हे साधिले, त्याने अखेर साधली असे समजा; त्याने रंगेरी मारली असे जाणा; त्यांना विजय मिळालाच असे समजा. ज्याला ही कला साधली, ज्याला हे वरील तत्त्व आचरणात अनुभविता आले, त्याला यश येतेच येते. मनाची एकाग्रता होताच, बुध्दीची स्थिरता होताच, तिची समाधी लागताच फळे आपोआप येतात. परिणाम समोर दिसू लागतात. आपण इतका वेळ भांबावून गेलो होतो, हतबुध्द झालो होतो, निराश झालो होतो, अडचणीत सापडली होतो- याचे कारण ध्येय सूर्याप्रमाणे स्वच्छ असे डोळ्यांसमोर नव्हते. ध्येयाची निश्चितता नव्हती. ध्येयमंदिराचा कळस दुरून दिसू दे- मग किती का ते दूर असेना- आपण त्याला गाठूच गाठू. खरा नेम धरा की, तेथे जावयाचे. पक्ष्यांची मान व बाणाचे अग्र एका टोकात येताच अर्जुनाचे गांडीव टणत्कार करील व यशोदेवता त्याला माळ घालील.

आपले प्रयत्न कोणत्या ध्येयासाठी आहेत हे पुष्कळ वेळा आपणास स्वच्छ माहीत नसते. कोणत्या गोष्टींसाठी धडपडण्याचा मला हक्क आहे, अधिकार आहे, पात्रता आहे, हे आधी पाहिले पाहिजे. कशासाठी मी जन्मलो, काय करण्यासाठी-ते शोधून काढा. आपली इच्छा-शक्ती नागिणीप्रमाणे झाली पाहिजे. फणा वर करून, नीट नेम धरून ती नागीण उडी घेते व अचूक दंश करिते. त्या नागिणीप्रमाणे आपण योग्य ठिकाणी उभे राहून नीट तोल सांभाळून, दृष्टी अचूक करूनच ध्येयावर उडी मारिली पाहिजे. स्वच्छ बुध्दी पाहिजे, ध्येय स्पष्ट पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. घोटाळा नको. हे का ते नको. दोन डगरीवर हात नको. एक व ते एकच. ज्याच्या बुध्दीला शत फाटे फुटले, त्याचे नशीब फुटले. डोंगरावरचे सारे पाणी एकाच दिशेने जाईल तर त्याची नदी होईल, परंतु ते बारा वाटांनी जाईल तर त्याचा मागमूस राहणार नाही.

कोणते तरी ध्येय ठरवून त्याच्यासाठी मग सारे जीवन अर्पण करा. ध्येय कोणतेही असो. शाळेतील शिक्षक व्हावयाचे आहे ?.... व्हा. शिक्षक व्हा. त्यालाही आपला देश स्वतंत्र करता येईल. शिक्षणाचे काम करून स्वातंत्र्यात त्याला भाग घेता येईल. मोठ्या आनंदाने तो हे करू शकेल. परंतु केव्हा त्याला हे साधेल ? आपल्यासमोर बसलेली मुले...... ती ताजी फुले ..... ह्या देवाच्या मूर्ती आहेत, ही मुले म्हणजे सिंहाचे बच्चे आहेत, ध्रुव, शुक, प्रल्हाद, रोहिदास...... चिलया यांचे वंशज आहेत, यांचे भाऊ आहेत. अशी श्रध्दा गुरुजवळ कोठे असते ? ज्या शिक्षकाला मुले म्हणजे दगडधोंडे, गध्दे, टोणप्ये असेच दिसतात...... त्याला काय करता येणार आहे ? मुलांच्याबद्दल अत्यंत थोर भावना करून त्याला शिकवू दे. मुले खरोखरोच पुढे शिवाजी-बाजी, तुकाराम-रामदास- होवोत, वा न होवोत परंतु ‘ही मुले मोठी होतील’ याच जिवंत व उत्कट भावनेने शिक्षकाने शिकविले पाहिजे. जो गुरु या भावनेने शिकवील, जो शिक्षण शिकविताना ही दृष्टी ठेवील, तो राष्ट्राला वीरांचा पुरवठा करील; तो राष्ट्राला थोर कार्यकर्ते देईल. त्याने आपले कमळ फुलवीत राहावे- ध्येय पूजीत रहावे- भ्रमर आपोआप येतील.

आणि तो कोण आहे? कुंभार? काही हरकत नाही. तोही आपल्या बांधवांना स्वतंत्र करील. त्याने मडकी पक्की भाजावी, ठोकून ठोकून तयार करावी. त्याच्या स्फूर्तीने त्याचा आवा पेटविणारे मजूर- तेही पेटतील. कुंभाराच्या मनात चांगली मडकी करण्याचे घोळत होते, परंतु त्याच क्षणी मनाच्या मृत्तिकेतून तो वीर निर्माण करीत होता. शालिवाहनाने मातीचे घोडेस्वार करून साम्राज्य स्थापिले. मातीसारख्या पडलेल्या नि:सत्त्व लोकांतून तेजस्वी घोडेस्वार निर्माण केले.

   

भारतवर्ष आज संक्रमणावस्थेत आहे. अशा वेळी ‘कमळ फुलू दे, भ्रमर आपोआप येतील’ हे श्रीरामकृष्णांचे वाक्य जितके मार्गदर्शक महत्त्वाचे आहे, तितके दुसरे क्वचितच असेल. निराश झालेले कार्यकर्ते देशात सर्वत्र कामे करीत आहेत. कोणी चांगले मासिक काढण्यासाठी धडपडत आहे, कोणी नवीन धंदा करू पाहत आहे; कोणी आश्रम काढीत आहे, कोणी शाळा उघडीत आहे; कोणी शास्त्रसंशोधन करू बघत आहे, कोणी व्यायामप्रसार करू म्हणत आहे; प्रत्येकाच्या मार्गात दुर्गम व दुस्तर अशा अडचणी आहेत. वाटेतील विपत्ती पाहून, तसेच आजूबाजूचे औदासीन्य देखून कार्यकर्त्यांची कंबरच मोडून जाते, त्यांचा सारा धीरच खचतो. सहकार्याचा अभाव ही तर सर्वांचीच रड आहे. यशाची साधने नाहीत, सामग्री नाही- आणि यशासाठी सार्‍यांची धडपड तर चालली आहे.

अशा निराशेने घेरलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींस आम्ही म्हणू की, धीर सोडू नका. घाबरू नका. धुक्यामधून एकच पाऊल पुढे टाकण्याइतकी जागा दिसत असेल, तर एकच पाऊल टाका. ते टाकल्यावर पुढे आणखी दुसर्‍या पावलास जागा दिसेल. एक पाऊल नीट रोवले तरी पुष्कळ झाले. ‘एक डगलुं बस थाय’  आज एक पाऊल दृढ केले म्हणजे आजचे कार्य झाले. परंतु उद्या अपयश आले तर ? उद्याच्या पडण्याची आज कशाला फिकीर करतोस ? ‘आपण यशस्वी होऊ’ याच विचारात आजची रात्र घालव. तू आपल्या तोफखान्याजवळ गाडून उभा राहा. पळू नको, फसवू नको. ह्या जगात सर्व साधनसामग्री ज्यांच्या पायांजवळ लोळत आहे असा एखादाच हरीचा लाल असतो; असा एखादाच नेपोलियन असतो, की जे पाहिजे ते त्याच्या हाताशी आहे. आणि तरीही त्या नेपालियनला अनंत कष्ट करावे लागले, आल्प्स पर्वत ओलांडावे लागले. आपणा सर्वांजवळ एक भांडवल भरपूर दिलेले आहे. ते म्हणजे काम करण्याचे, भरपूर श्रम करण्याचे, अखंड, अविरत प्रयत्नाचे; आपले कमळ फुलविण्याचा सारखा प्रयत्न करा. स्वत:शी प्रामाणिक राहा.

आणि विसरू नका की, ते कमळ फुलले की भ्रमर गुंजारव करीत येणारच. त्यांना आमंत्रण देण्याची जरूरी नाही. कमळाला त्याची फिकीर नको. त्याची स्तुतिस्तोत्रे गावयास, त्याच्याभोवती रुंजी घालावयास, त्याला प्रदक्षिणा करावयास, त्याचा रस व गंध यांची चव घ्यावयास सहृदय व रसज्ञ भ्रमर आल्याशिवाय राहणार नाहीत. कमळाची केवढी आत्मनिरपेक्ष तपश्चर्या. कमळाला आज व उद्या माहीत नसते. काळवेळ सारे ते विसरून जाते. स्वत:च्या प्रयत्नात, स्वत:च्या साधनेत ते रंगलेले असते. कारण सकाळी आपल्या पाकळ्या पहिल्यानेच उघडल्या, त्याचेही त्याला स्मरण नसते. “अरे कमळा, किती रे सुंदर तू फुललास ! काय रमणीय या तुझ्या पाकळ्या!” अशी बातमी भ्रमरच त्याला येऊन देतात ! किंवा एखाद्या नवशिक्या पहिलवानाला आपणामध्ये ताकत येत आहे, चपळाई वाढत आहे, तोल सांभाळण्याची शक्ती येते आहे, कसब कळत आहे-हे काही माहीत नसते. परंतु एक दिवस उजाडतो की, मोठ्या प्रसिध्द पहिलवानाला तो चीत करतो. आपला विकास झाला आहे, हे त्या वेळेस त्याला कळून येते. तोपर्यंत आजचा डाव चांगला झाला; आजची पकड चांगली बसली होती, आजचा घाव वर्मी बसला, एवढेच तो म्हणत असे. आपणास आपल्या स्वीकृत कार्यात विजयदेव केव्हा व कोठे भेटेल याचा नेम नाही. पुढच्याच क्षणी कदाचित् तो भेटेल. काही असो. आपण काम करावे, आपल्या कार्यात सर्वस्व ओतावे, कर्मात आत्मा रंगवावा, कर्माच्या रणांगणावर अंगात चिलखत असता, हातात ढाल व भाला असता विजयदेवाची गाठ पडू दे- पलंगावर लोळत पडलेले असताना नको.