रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

राष्ट्रीय धर्म

हे बंधो ! जरा थांब, तू कामासाठी ना निघालास ? ठीक. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव. आज मातेला आपणा सर्वांची फार जरूरी आहे. अशा वेळेस सवेचे शस्त्र घेऊन कामास जा. कामामध्ये स्वार्थ नको ठेवू. कामामध्ये शरीर व मन विसरून जा. प्रत्येक स्नायू, प्रत्येक अवयव कामात दमू दे, झिजू दे. ध्येयाला गाठण्यासाठी, शारीरिक, बौध्दिक, हार्दिक सर्व शक्तीची जरुरी आहे. हात, हृदय, डोके तिघांना एकत्र कर व मग काम कर. जे काम हातात घेणार आहेस त्याचाच जागृतीत वा सुषुप्तीत विचार चालू ठेव. जा. थांब पण. आणखी एक सांगायचे आहे, तेही लक्षात ठेव. निर्दोष चारित्र्य. त्याची जरुरी फारच आहे. तोच तुझा मार्गदर्शक. निर्दोष सेवा हे तुझे ध्येय. अशा प्रकारे श्रम कर. मग एक दिवस आपोआप ज्ञानप्रभा तुझ्या अंतरंगात फाकेल. भारतवर्षाच्या संतांत आपण नवीन प्रकारच्या संतांची भर घालू. आज शेतात, मळ्यात, कारखान्यात, शाळेत, प्रयोगालयात- सर्वत्र संतांची जरुरी आहे. प्रत्येक कर्म पवित्र आहे हे दाखविण्यासाठी, पटविण्यासाठी समाजसेवेचे कोणतेही लहान वा मोठे कर्म मोक्ष आणून देते हे फिरुन एकदा दाखविण्यासाठी, गोर्‍या कुंभारासारखे व मोमीन-कबीरासारखे, दळणार्‍या जनाबाईसारखे व दुकान चालविणार्‍या तुलाधार वाण्यासारखे- कर्मवीर संत, सेवासाधन संत पुन्हा निर्माण होऊ देत. भारतवर्षाचा हा आजचा संदेश आहे. समाजाच्या हिताचे कोणतेही कर्म- जोडे शिवण्याचे वा सूल हरण करण्याचे, ज्ञानदानाचे वा ज्ञानसंशोधनाचे- पवित्र आहे, मुक्ती देणारे आहे, प्रभूची भेट करविणारे आहे.

 

ख्रिस्ती धर्म विज्ञानाला पचवू शकला नाही. विज्ञानाची गोळी गिळणे ख्रिस्ती धर्माला जड गेले. हिंदुधर्माला तरी अर्वाचीन संस्कृती पचवून टाकण्याची शक्ती आहे का ? होय, आहे. कारण हिंदुधर्मातील शेकडो आचार व रूढी, नाना प्रकारच्या चाली व समजुती यांच्या पाठीमागे आकाशात जाऊन पोचणार्‍या अशा अद्वैताच्या भिंती आहेत. त्या अद्वैतास कोणतीही पध्दती, कोणतेही तत्त्व प्रयोगासाठी घेण्यास कधी हरकत वाटत नाही. अद्वैत तत्त्वज्ञान सर्वांना कवटाळणारे आहे.

घालुनि अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहुनी वाड ।
तेथे कैचे आणिले द्वाड । करटेपण ।

असे अद्वैत सांगत आहे. हिंदुस्थानातील अनेक मतमतांतरांमधून, अनेक वेदांतिक मतांमधून शंकराचार्यांचे अद्वैत हिमालयाच्या शेकडो लहानमोठ्या शिखरांतून वर चमकणार्‍या गौरीशंकराप्रमाणे तळपत आहे व शोभत आहे.लौकरच थोड्या संकुचित ध्येयाला आपणास वाहून घ्यावयाचे आहे. विश्वाला क्षणभर दूर ठेवून भारतमातेची पूजा करावयास शिकावयाचे आहे. लहानातून मोठ्याकडे जावयाचे, हा तर मूर्तिपूजेचा धडा. तो आपण शिकू या. हिंदुधर्माला सद्य:स्थितीत भारतमातेची पूजा हेच नाव देऊ या. हिंदुधर्मभारतसेवा. जुन्या-पुराण्या गोष्टींची पूजा करण्याऐवजी सामुदायिक जीवनाची पूजा आरंभावयाची; धार्मिक व्रतेवैकल्ये व नाना पूजाप्रचार यांच्याऐवजी ज्ञान, सहकार्य, संघटना यांच्यासाठी चिलखत चढवून कंबर कसावयाची. नवीन काळाला नवीन व्रत, नवीन दीक्षा. जीवनाला व्रत तर पाहिजेच. परंतु पूर्वीचीच व्रते पाहिजेत असे नाही. आपण नवीन व्रते व नवीन ध्येये पुजू लागलो म्हणून हिंदुधर्माचा पाया तर पोखरला जाणार नाही ना ?  छे: ! मुळीच नाही. कारण हजारो वर्षांपूर्वी ऋषी सांगून गेले आहेत की, एकं सत्र् । विप्रा बहुधा वदन्ति ।

एकाच परब्रह्माची सारी रूपे. एकाच सतत्त्वाला आपण निरनिराळी नावे देतो.

संध्याकाळी देवदर्शनास जाऊन घंटा वाजविण्याऐवजी एखादा मजुरांसाठी वर्ग चालविला तर ?  यज्ञकुंडे, स्थंडिले, अग्निहोत्रशाळा व होमशाळा बांधण्याऐवजी भारतमातेचे बंदे सेवक झालो तर ? देवाला पंचमहानैवेद्य व नानाभोग अर्पण करण्याऐवजी, दीनांच्या पोटातील जो प्रखर अग्नी त्यात आहुती टाकून तो शांत केला तर ? ‘सर्व खलु इदं ब्रह्म’ हे जर सत्य असेल तर हे सारे मार्ग त्या सत्यसागराकडेच जाणार असणार. देवाला फुले ओतण्याइतकेच श्रमाचे कपाळावरून निथळणारे ते निढळाचे पाणी पूज्य व पवित्र आहे. प्रामाणिक श्रम ही थोर प्रार्थना आहे. उपवासापेक्षा अध्ययन, नवीन ज्ञानार्थ धडधड यांना अधिक महत्त्व व किंमत आहे. अन्योन्यसेवा, सहकार्य व बंधुभाव यांहून थोर दुसरी पूजाच नाही. कोणत्याही समाजोपयोगी कर्मात तल्लीन होणे हे साधन व दिव्य एकत्वाचे- दिव्य अद्वैताचे दर्शन हे साध्य. कोणत्याही साधनाने जा .... काही बिघडत नाही. तद्रूप व्हा व त्याला पाहा. स्वत:ला विसर पाडणारे कोणतेही कर्म कराल, तर भवसागर तराल व परब्रह्माला पाहाल.

 

तथापि काही काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत व त्या ध्यानात धरणे अगत्याचे आहे. ज्या देशांनी आतापर्यंत त्यागाच्या तत्त्वाज्ञानाचा- त्यागाच्या धर्माचा उपदेश केला, ‘दारिद्रय पत्करा, दीनदरिद्र्याची सेवा करा, नम्र व्हा, अहंकार सोडा, सर्वांनी सामुदायिक उपभोग घ्या, भावाभावांप्रमाणे वागून बंधूभाव वाढवा’ असा उपदेश केला, तीच राष्ट्रे जर एकाएकी दुसर्‍यांची रीतसर उघड उघड लूट करू लागली, राजकीय, व्यापारी व आर्थिकदृष्ट्या दुसर्‍यांना कायदेशीर गुलाम करू लागली, तर त्या वेळेस आपण डोळे उघडून व कान टवकारून नीट विचार केला पाहिजे. आचार व उच्चार यांच्यामध्ये जेथे उघड उघड विरोध दिसून येतो, धर्म एक व कर्म निराळेच असे जेव्हा दिसते, तेव्हा आपण उठून बसले पाहिजे व काय प्रकार आहे ते स्पष्ट सांगितले पाहिजे, जाहिर केले पाहिजे.

केवळ एखादे मोठे नीतितत्त्व आपल्याजवळ आहे एवढ्याने काम भागत नसते. घरात अन्न पुष्कळ आहे परंतु आपण जर खात नसू व आपणांस जर ते पचत नसेल किंवा रूचत नसेल तर त्या अन्नाचा काय उपयोग ? मोठमोठे मोह जेव्हा समोर उभे असतात, अशा वेळी महान् नीतितत्त्वाचे शब्दोच्चार आपला बचाव करू शकणार नाहीत. आपले नीतितत्त्व बरोबर असो की चुकीचे असो- या तत्त्वांशी आपला स्वभाव किती मिळून गेला आहे, ते तत्त्व आपल्या जीवनात किती उतरले आहे, त्या तत्त्वाकडे आपला किती आंतरिक ओढा आहे- ही गोष्ट महत्त्वाची आहे. धर्म जर राष्ट्राच्या रोमरोमी भरलेला नसेल, तो रक्तात एकजीव झालेला नसेल, स्वार्थाचे प्रसंग येताच, मोहक आसक्तीचे प्रसंग येताच, ते धर्माचे पांघरुण बिनदिक्कत फेकून देऊन, त्या स्वार्थाला व त्या मोहाला आपण धावत जाऊन मिठी मारू ! हाच संस्कृतीचा र्‍हास, हाच धर्माचा पराजय. जे वेळी उपयोगी पडत नाही, ते असून नसल्यासारखे आहे.

अशा वेळी दुसरीही एक गोष्ट लक्षात येते व ती म्हणजे निरनिराळ्या धर्मांतील विचारांच्या मर्यादा, बुध्दीच्या मर्यादा ही होय. ज्या धार्मिक आज्ञांशी, ज्या धार्मिक विचारांशी व नीतितत्त्वांशी आपल्या बुध्दीचा यत्किंचितही विरोध येत नाही, ज्यांना आपली बुध्दी कुरकुर न करता संमती देऊ शकते, तोच धर्म आपणास लगाम घालू शकतो, आपणास मोहापासून आवरू शकतो; आणि याच्या उलट, जो धर्म आजीबाईंच्या गोष्टींप्रमाणे आपणास केवळ भोळसटपणा व पोरकटपणा वाटतो, तो धर्म आपल्या आचारविचारांवर कधीही हुकमत चालवू शकणार नाही. म्हणून धर्म हा सदैव बुध्दीच्या कसोटीला टिकला पाहिजे. जो धर्म अशा रीतीने टिकतो, त्याचे महत्त्व किती आहे ते सांगण्याची जरूरी नाही. तो धर्म मनुष्याच्या जीवनावर सत्ता गाजवीलच गाजवील. ख्रिस्ती धर्म बौध्दिक कसोटीत न टिकल्यामुळे या विसाव्या शतकात त्याचे वास्तविक महत्त्व उरले नाही. शास्त्राने, विज्ञानाने नानाप्रकारचे शोध लावून ख्रिस्ती लोकांसाठी नवीन जग निर्माण केले आहे, नवीन संसार थाटून दिला आहे. परंतु याच विज्ञानाने जीवनाला वळण देणार्‍या बंधुप्रेम, दीनसेवा, दारिद्र्यातील भाग्य, सामुदायिक समान उपभोग इत्यादी गोष्टी शिकविणार्‍या ख्रिस्ती धर्माला गचांडी दिली आहे. ख्रिस्ती धर्माशिवाय असणारा ख्रिश्चन म्हणजे पिस्तुल, बंदुक व बाँब घेऊन जगाला लुटणारा खुनी डाकूच होण्याचा संभव आहे.

   

भारतवर्ष नवीन संस्कृती निर्माण करीत आहे, पूर्वीच्या संस्कृतीला उजाळा देत आहे, नवरंग देत आहे. पूर्वीच्या संस्कृतीचा विचार करीत आहे. क्षितिजावर नवीन ध्येये, नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन साधने, नूतन कार्यपध्दती- इत्यादींचा उदय होत आहे. नानाविध रीतीने नवीन नवीन कार्यक्षेत्रांत प्रगती करून घेण्यासाठी भारतवर्ष सज्ज होत आहे. नव्या तरुणाप्रमाणे नवभारत पुढे येत आहे. कात टाकलेल्या सर्पाप्रमाणे भारत पुन्हा सतेज होऊन नवीन जोमाने उडी घ्यावयास उठला आहे. अशा वेळेस आजपर्यंतची स्थिर झालेली जी नीती, ती अस्थिर होण्याचाच एक धोका असतो.

सदैव श्रेष्ठ नीती दाखविणे, श्रेष्ठ नीती पाळावयास सांगणे हाच संस्कृतीचा प्रयत्न असतो. संस्कृतीचे हेच ध्येय असते. प्रचंड क्रांतीचा जेव्हा समय येतो मोठमोठ्या घडामोडी व उलथापालथी जेव्हा होत असतात, सारे राष्ट्र खालपासून वरपर्यंत जेव्हा ढवळले जात असते, अशा वेळेस सर्व जुनी बंधने, सार्‍या जुन्या संस्था, सारे जुने आचारविचार व रुढी यांना मोडून तोडून फेकून द्यावे अशी प्रवृत्ती साहजिकच बळावत असते. कारण सारे ढवळल्यामुळे सारे गढूळ वर येते, सारी घाण वसकन् वर येते- आणि ही घाणच आहे, हे सारे सडलेले कुजलेले आहे, अशी वर वर पाहणार्‍याची प्रामाणिक समजूत होते. पाश्चिमात्य संस्कृती हा शब्द आपल्याकडच्या ‘धर्म’ शब्दासारखा आहे. ज्या वेळेस उत्कृष्ट चारित्र्य, निष्कलंक नीती हेच मुख्य सामाजिक किंवा राजकीय ध्येय किंवा साधन राष्ट्राकडून मानले जाईल, त्याच वेळेस राष्ट्राने गतेतिहासाची, गतजीवनाची, भूतकाळातील सार्‍या प्रयत्नांची व धडपडीची किंमत ओळखली असे समजण्यात येईल. नास्तिक व अश्रध्दावान् मनुष्याची योग्य ती किंमत करून समाज ज्या वेळेस त्याला ढकलून देतो, आणि सत्यं शिवं सुंदराकडे हृदय उचंबळून घेऊन जातो, असत्याला दूर करून सत्याचीच पूजा करावयास जेव्हा तो अधीर होतो..... तेव्हा मागील सारा भूतकाळ मातीत न जाता सार्थकीच लागला असे आपण समजू.

आमच्या राष्ट्रीय जीवनात आम्ही सदासर्वदा सत्याचीच पूजा केली, जे थोर आहे, उदात्त आहे त्याचीच कास धरली- असे कोणत्याही राष्ट्राला छातीवर हात ठेवून सांगता येणार नाही. निरनिराळ्या राष्ट्रांची सत्यपूजेत जणू स्पर्धा व शर्यत लागून राहिली आहे. थोड्याथोड्या प्रमाणात कधी याला, तर कधी त्याला यश मिळत आहे. कधी हा देश थोर ध्येयाची पूजा करताना दिसतो, तर कधी तो दिसतो. पूर्णता कोणीच गाठली नाही. अखंड सत्यपूजन कोणीच चालविले नाही. यश हे नेहमी सापेक्ष आहे. राष्ट्राचा दर्जा बाह्य वैभवावरून न ठरविता शेवटी त्या त्या राष्ट्राच्या सामाजिक, राजकीय वगैरे एकंदर राष्ट्रीय कारभारात दिसून येणार्‍या नीतीवरच तो ठरविला पाहिजे. संपत्ती, उद्योगधंदे, कारखाने किंवा सुखे ह्यांवरून राष्ट्राची श्रेष्ठता अजमावयाची नाही. राष्ट्राने नैतिक श्रेष्ठता, ध्येयोदात्तता दाखविली पाहिजे. नैतिक तृषा राष्ट्राला सदैव लागलेली असली पाहिजे.

‘सामाजिक चालीरीती’ एवढाच अर्थ नीतीचा नाही. एखादी जुनीपुराणी रुढी आपण जिवंत ठेवली, पुष्कळ काळ उराशी बाळगली, एवढ्यावरून आपण श्रेष्ठ नीतीचे, श्रेष्ठ सामर्थ्याचे असे ठरत नाही. रुढी चालू ठेवण्यात सामर्थ्य असेल, अथवा दुर्बलताही असेल. रुढी शौर्याने चालू ठेवण्यात सामर्थ्य असेल, अथवा दुर्बताहि असेल. रुढी शौर्याने चालू ठेवण्यात अथवा भीरूतेमुळेही चालू ठेवली असेल, पावित्र्य, चारित्र्य, त्याग व सर्व विरोधांचे पाणी पाणी करून टाकणारी दृढ इच्छाशक्ती या चार सद्गुणांनी खरी नीती तयार होते. राष्ट्राने खरोखर काय कमाई केली ती या सद्गुण चतु:सूत्रीवरून ठरवावी; केवळ बाह्य लखलखाटावरून व दिमाखावरून ती ठरवू नये.