रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

जबाबदारी

सार्वजनिक जीवनात नाना प्रकारचे प्रयोग करण्याचा जो उत्साह, तो काय काय करू शकतो हे पाहावयाचे असेल, तर आपण पश्चिमेकडे वळले पाहिजे. यात कोणाचे दुमत होणार नाही असे वाटते. हिंदुस्थानात विचारांचे दर्शन जास्त सम्यक् कदाचित् होत असेल, परंतु ते विचार कृतीत कसे आणावे, सामाजिक संघटनेत कसे ओतावे, हे पाश्चिमात्यांनाच अधिक माहीत आहे. पाश्चिमात्यांच्या या अनुभवांचा आपण अभ्यास केला पाहिजे, मनन केले पाहिजे. निरीक्षण केले पाहिजे. सत्याचे दर्शन झाल्याशिवाय, सत्यज्ञान झाल्याशिवाय चूक कळून येत नाही व चूक कळलीच नाही, तर दूर कशी करता येणार ? सामाजिक बाबतीत सुधारणा केल्याच पाहिजेत किंवा जुन्यालाच चिकटून बसले पाहिजे असे काही नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे की, डोळे उघडून पहा व नीट समजून घ्या. केवळ नवीन म्हणून उतावीळपणे अविवेकाने ते घेणे, किंवा ‘जुने तेवढे सोने’ असे म्हणून नवीनाकडे ढुंकूनही न पाहणे या दोन्ही वृत्तित आग्रह आहे. जेथे आग्रह आहे. तेथे सत्यदर्शन नाही. बुध्दे फलं अनाग्रह:- कशाचाही आग्रह न धरणे हे तर बुध्दीचे फळ. विचाराला पटेल ते घेतले पाहिजे वस्तुस्थितीचे नीट आकलन होण्यासाठी पूर्वग्रहदूषित दृष्टी घेऊन चालणार नाही. पक्षपातात, निरहंकारी व निरपेक्ष, अशी शांत वृत्ती घेऊन विशाल दृष्टीने नवे व जुने, पौर्वात्य व पाश्चिमात्य पाहिले पाहिजे व जे योग्य वाटेल ते घ्यावयास निर्भयपणे तयार झाले पाहिजे.

युरोपमध्ये निरनिराळे प्रश्न कसे सोडवले जातात, त्याची आपल्या पध्दतीशी तुलना करू या. आणि यापासून काही शिकण्यासारखे असेल, घेता येण्यासारखे असेल तर शिकू या, आनंदाने घेऊ या.

धार्मिक गोष्टीच प्रथम घेऊ. हिंदुस्थानातील पूजा म्हणजे एक यजमान व एक उपाध्याय. हिंदुस्थानातील पूजेत सामुदायिक जीवनाची भावनाच नाही. त्याच्या उलट युरोपमध्ये बघा. तेथील धार्मिक प्रार्थना म्हणजे एक विशाल व भव्य संघटनाच असते. त्या कार्यात अनेकांचे सहकार्य असते. गाणारे, वाजविणारे, सांगणारे, म्हणणारे, प्रवचन करणारे सर्वांमिळून प्रार्थना होते. हिंदुधर्मातील संन्यासी घ्या. तो कोणतीही जबाबदारी न घेता या ठिकाणाहून त्या ठिकाणी असा भटकत राहतो व गुरूपासून मिळविलेले आपले वैयक्तिक ध्येय-त्याला वाढवू बघतो. पुष्कळ वेळा त्याच्या जीवनात दिव्यतेचेही दर्शन होते. कधी कधी तर परमोच्च वेयक्तिक विकास त्याच्या ठिकाणी प्रतीत होतो. परंतु नीट सुसंघटित रीतीने बांधलेले जे समाजरूपी मंदिर- त्या मंदिराचा तो भाग होऊ शकत नाही. कारण समाजाची शिस्त, बंधने व जबाबदारी तो घेऊ इच्छीत नाही, पाळू इच्छीत नाही. ज्याला समाजमंदिरात, समाजघटनेत नांदावयाचे आहे त्याने ‘मेलो तरी हरकत नाही, परंतु ही आज्ञा पाळीन, काहीही होवो ही जबाबदारी पार पाडीन, काहीही नुकसान होवो, मी वेळेवर हजर राहीन’ अशी बंधने पाळावी लागतात. नीट व्यवहार करू, चालरीत पाळू, सभ्यता दाखवू..... या सगळ्या गोष्टी सामाजिक जो घटक आहे त्याला अवश्य असतात. आणि भारतीय संन्यासी तर बंधनातील असणार. त्याला स्वत:ची काय बंधने असतील तेवढीच. समाजाची मानावयास तो तयार नसतो. युरोपमध्ये संन्यास सामाजिक जीवनाशी एकरूप होऊन गेला आहे. सामाजिक हिताहिताशी निगडित झाला आहे. संन्याशांनी लोकहिताच्या व लोककल्याणाच्या मोठमोठ्या चळवळी तिकडे केल्या. शेती करणारे व शेती शिकविणारे सिस्टरशियन् शिक्षणप्रचार करणारे डोमिविकन् व जेसुइट, नीतिप्रसार व भूतदयेचा प्रसार करणारे केवळ सेवामय असे फ्रॅन्सिस्कन हे सारे संन्यासी संघच होते. फ्रॅन्सिस्कन संन्याशांच्या उदाहरणानेच दवाखाने, रुग्णालये, आरोग्यधामे, स्वस्तिकमंडळे, शुश्रूषा करणारी सेविकापथके, रोगप्रतिबंधक संस्था, दुष्काळनिवारणमंडळे वगैरे सारे सेवेचे प्रकार युरोपमध्ये सर्वत्र रुढ झाले व आता सार्‍या जगभर पसरले. तसेच जेसुइट लोकांच्या शिक्षणाच्या कामावरच आजच्या युरोपातील मोठमोठ्या विद्यापीठांची उभारणी झालेली आहे. ही सारी सेवेची बीजे संन्याशांच्या संस्थांनी पेरली व आज त्यांचे विशाल वृक्ष झाले आहेत.

 

आपणांवर सोपविलेले काम, टाकलेली जबाबदारी, पार पाडणे म्हणजे देवाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे होय. ज्या वेळेस आपणांवर काही जबाबदारी सोपविण्यात येते, काही विश्वास टाकण्यात येतो, त्या वेळेस परमेश्वर परीक्षा घेत आहे असे समजावे. जे काम आपणांवर सोपविण्यात आले ते पार पाडण्याची आपण आपली शिकस्त केली पाहिजे. तुकारामांनी म्हटले आहे, “विश्वासाची धन्य जाती.” आपल्यावर सारे विश्वास ठेवतात, याहून भाग्याची व कृतकृत्यतेची दुसरी कोणती गोष्ट ? जे काम आपण पुरे करीत नाही, शेवटास न नेता अर्धवटपणे सोडून देतो, ते अपूर्ण राहिलेल्या यज्ञाप्रमाणे आहे. आणि यज्ञ अर्धवट राहणे म्हणजे स्वत:चा नाश करून घेणे होय. इंद्रजिताच्या भंगलेल्या यज्ञांतून, पुरा न झालेल्या त्या यज्ञांतून विजयरथ बाहेर पडला नाही. अर्धवट यज्ञांतून फलप्राप्ती नाही. त्याप्रमाणे अर्धवट काम करून फायदा नाही. कर्म म्हणजे यज्ञच तो. सामाजिक कर्तव्ये, नागरिकत्वाची किंवा इतर राष्ट्रीय कर्तव्ये करीत असताना आपण आपल्या वैयक्तिक भावना, खाजगी प्रश्न, घरची सुखदु:खे, वैयक्तिक तंटे व विरोध-सारे घरीच ठेवून बाहेर पडले पाहिजे. सार्वजनिक कर्माची जबाबदारी मजवर असताना मी माझा क्षुद्र अहं त्या वेळेस विसरून गेले पाहिजे. माझ्या सार्वजनिक कर्तव्यक्षेत्रात ही घरातील स्वार्थमत्सराची भुते, ह्या उंदीरघुशी बाहेर येता कामा नयेत. सार्वजनिक जबाबदारी शिरावर असताना स्वत:चा स्वार्थच काय तर स्वत:चे आरोग्यही क्षणभर दूर ठेविले पाहिजे. थोर मॅझिनी म्हणत असे, “माझ्या राष्ट्राला माझी जरुरी असताना मी आजारी कसा पडू शकेन !” न्यायमूर्ती रानडयांना त्यांची प्रकृती बरीच बिघडल्यामुळे डॉक्टर लाहोरच्या सामाजिक परिषदेस त्यांना जाऊ देताना; त्या थोर संताच्या, आधुनिक ऋषीच्या डोळ्यांतून घळघळ पाणी आले ! “माझ्यावर ही जबाबदारी आहे-” ह्या विचाराने आपणास पराकाष्ठेचे प्रयत्न करण्यास सामर्थ्य आले पाहिजे; पराकाष्ठेचा त्याग करावयास स्फूर्ती वाटली पाहिजे.  “माझी जबाबदारी पार पडली, आता मी सुखाने मरतो-” असे बाजीप्रभू म्हणाले. “माझे डोके तरी किल्ल्यांत जाऊन पडू दे, नाही तर किल्ला हातात पडू दे-”  असे भीष्म प्रतिज्ञ चिमाजीअप्पा बोलले. “आधी कोंडाण्याचे लगीन, मग माझ्या रायबाचे-’ असे जबाबदारी ओळखणारा नरवीर तानाजी म्हणाला.  “प्रत्येकाने आपल्यावरची जबाबदारी पार पाडावी अशी इंग्लंडची अपेक्षा आहे-”  हा लहानसा संदेश नेल्सनने दिला होता. परंतु त्यात अपार प्रेरणा व स्फूर्ती होती. जबाबदारी पार पाडणे, विश्वासाला पात्र होणे- फार भव्य व दिव्य आहे ही गोष्ट. तुम्ही पडलेत तरी चालेल, परंतु जबाबदारी पार पाडा.

याच्यावर दया दाखववी की नाही, याच्या बाबतीत न्यायाच्या काटा जरा सौम्य करू का- वगैरे प्रश्नांना दुसरे उत्तर नाही. ज्याची अत्यंत आवश्यकता असेल ते करा. जेथे जरूर असेल तेथे दया दाखवा, जेथे सौम्य होणे आवश्यक असेल तेथे जरा सौम्य व्हा. ज्याच्यावर दया करावयाची, त्याला त्या दयेची कितपत जरुरी आहे, तो त्या दयेला मनात किती किंमत देईल- हे पाहिले पाहिजे. श्रीमंतावर दया करण्यात काय अर्थ ? त्याला त्या केलेल्या दयेची आठवणसुध्दा राहणार नाही. “त्यात काय मोठेसे केलेत, नसतेत जरा थांबलेत, तर भरले असते दंडाचे पैसे.”  असे उर्मटपणाने तो खुशाल मागून बोलेल. जबाबदार मनुष्याने या सर्वांचा विचार करून वागावे. त्याच्या वागण्याला स्वार्थाची दुर्गंधी येऊ नये म्हणजे झाले. नाहीतर पुष्कळ वेळा गरिबांच्या बाबतीत अधिकारी कंटक असतात व श्रीमंतांच्या बाबतीत ते मऊ असतात. ‘सार्वजनिक जागेचे अतिक्रमण झाले’ या सबबीवर गरिबाची झोपडी ताबडतोब जमीनदोस्त होते; श्रीमंताची हवेली मात्र उभी राहते. गरिबाने कर भरला नाही तर लगेच जप्ती, परंतु मातब्बरास मात्र वाटेल तितकी सवलत. अशा ज्या गोष्टी सार्वजनिक जीवनात, स्थानिक संस्थांच्या कारभारात होतात याच्या पाठीमागे स्वार्थ, भीती, मानसन्मानाच्या इच्छा- नाना वृत्ती असतात. अंगावर जबाबदारी घेणार्‍याने या वृत्तीपासून दूर राहिले पाहिजे.

सार्वजनिक जीवनात मोठे होण्याची इच्छा, स्वार्थ, सत्तेची व कीर्तीची लालसा ह्या गोष्टी तितक्या प्रेरक असतात. सर्वांत अत्यंत जोरदार प्रेरणा “ही गोष्ट मीच करू शकेन. मला तेथे जाऊ दे-” ही होय. इंग्लंडच्या इतिहासात थोरला पिट म्हणाला, “राष्ट्राला मीच काय तो वाचवू शकेन. दुसरा कोणी ते करू शकणार नाही.”   ज्याला असे म्हणता येईल, त्याच्या भाग्याला सीमा नाही. “ हे काम माझ्यावर सोपवा. मी ते जितके उत्कृष्टपणे करू शकेन तितके दुसरा कोणी करू शकणार नाही. या माझ्या खांद्यावरच ती जबाबदारी शोभेल-” असे अहमहमिकेने म्हणणारे उत्साही, आत्मश्रध्द व कार्यधुरंधर लोक जेथे भरपूर निघतात, त्या देशाचे भाग्य थोर होय. याच विचाराने पहारेकरी, चौकीदार आपापल्या ठिकाणावरून न हालता तेथे जरूर पडली तर मरून जातील. याच ध्येयाने व प्ररणेने आगीचे बंबवाले आगीत घुसतील; हाच विचार झोपाळू जीवांना जागृती देईल, मागे मागे रेंगाळणार्‍यांना पुढे खेचून आणील; आणि हाच धर्म होय.

 

नागरिकांच्या जीवनात कोणकोणत्या गोष्टी येतात, हे जर आपण तपासावयास लागलो तर भिन्न भिन्न वृत्तीचे लोक भिन्न भिन्न गुणांवर व गोष्टींवर जोर देतील. शिष्टाचार, चांगली चालचलणूक, सभ्यता यांना नागरजीवनात महत्त्वाचे स्थान आहे. आपण आपल्याच ओळखीच्या लोकांच्या व आप्तेष्टांच्या सहवासात असताना या गोष्टीत जे काही महत्त्व असते, त्यापेक्षा शतपटीने अधिक महत्त्व शहरात- जेथे हिंदुस्थानातील प्रत्येक भागांतून आलेल्या लोकांचा समुदाय बनलेला असतो तेथे आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. जेथे नाना ठिकाणचे, नाना जातीचे, नाना पंथाचे लोक असतात तेथे सभ्य रीतिरिवाज फारच कसोशीने पाळणे अगत्याचे आहे. सामुदायिक जीवनात, सामाजिक व्यवहारात सभ्य चालचलणुकीस कमी लेखून चालणार नाही. गाडीच्या चाकाला जसे तेलाचे ओंगण, त्याप्रमाणे समाजाच्या गाड्याला सभ्य चालचलणुकीचे, गोड शिष्टाचाराचे ओंगण अवश्य असते. अशानेच गाडी नीट चालेल, नाही तर खटाखट व कुरकुरी सुरू होतील. बरे बोलावयास, बरे चालावयास, बरे बघावयास, बरे हसावयास कोणाचे काही खर्च होते, असे थोडेच आहे ! परंतु ह्या दिसावयास क्षुद्र गोष्टी जरी असल्या तरी त्यांचे परिणाम फार चांगले होतात. जबान मिठास असणे ही गोष्ट फार जरूरीची आहे. या जिभेने, गोड जिभेने जगमित्र होता येते. आणि आपल्या या सभ्यतेच्या पाठीमागे, गोड बघण व गोड बोलणे यांच्या पाठीमागे सुकुमार व कोमल अशा सामाजिक भावनाही जर असतील तर तीच सभ्यता दंभ न राहता सत्यरूप होईल. अशी ही हार्दिक सभ्यता- देखल्या देवा दंडवत नव्हे, वरवरची हस्तिदंती नव्हे- मानवजातीला मिळालेला बहुमोल देणगी होय. आपण बाहेर वागतानाच सभ्यता पाळावी असे नाही, तर घरातसुध्दा ती पाळावी. आपली आई, आपले भाऊ, आपल्या बहिणी, आपली भार्या ही आपली झाली म्हणून काय झाले? त्यांच्याशी का आदराने वागावयास नको ? मर्यादेने वागावयास नको? मी लोकांशी बाहेर चांगले वागावे आणि माझ्याच घरातील माझ्याजवळच्या प्रिय माणसांशी मी पशूसारखे करावे, त्यांच्याशी तुसडेपणाने व तिरस्काराने वागावे, हे बरे आहे का, भले दिसते का? जे माझ्या ओळखीचेही नाहीत, ज्यांचे माझे ना सोहेरसुतक, त्यांच्याजवळ मात्र सुष्टात्मा आणि घरात मात्र मी दुष्टात्मा बनावे का ? बाहेरच्याजवळ साळसूद, घरात मात्र भूत, असे वागावे का ?

दुसरे काही लोक वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, नियमितपणा या गुणांवर जोर देतील. सामुदायिक जीवनात, सार्वजनिक जीवनात वक्तशीरपणा व व्यवस्थितपणा हे गुण अत्यंत आवश्यक आहेत. ते जर नसतील तर फार गोंधळ होतो व अनेकांच्या गैरसोयी होतात. खरोखर नियमितपणा हा आपला धर्म झाला पाहिजे. सूर्य-चंद्र ठरल्या वेळी येतात, ऋतू ठरल्या वेळी येतात. नियमितपणाचा अभाव म्हणजे संयमाचा अभाव होय व संयमाचा अभाव म्हणजे सामर्थ्याचा नाश होय. आपण नियमित नसणे म्हणजे आपण आपल्या आसक्तींना व मोहांना बळी पडणे हाच त्याचा अर्थ होय. दुसर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून, दुसर्‍याचा थोडा विचार म्हणून तरी आपण आपला आळस व इतर सुख दूर ठेवून नियमित व वक्तशीर झालेच पाहिजे.

तिसरी गोष्ट-दुसर्‍याजवळ वागताना सदैव विश्वासार्ह राहिजे पाहिजे. दुसर्‍याने आपणांवर बिनधोकपणे विसंबावे अशी आपली पत व दानत हवी. नाही तर सांगावे एखाद्याला की, टाकतो पत्र पेटीत व पत्र आपल्या कोटाच्या खिशातच महिना महिना पडून राहावे ! ‘आठ वाजता येतो म्हणून सांगावे व दहा वाजले तरी पत्ता नसावा!’  ‘या महिनाअखेर पगार होताच पैसे देतो’ म्हणून कबूल करावे, परंतु पगार होऊन तो खलास होण्याची वेळ आली तरी देण्याची आठवण मात्र होऊ नये ! ‘पुस्तक आठदिशी परत करतो’ म्हणून सांगावे. परंतु महिना महिना घरी ठेवून शेवटी ते आपणच जुन्या बाजारात नेऊन विकावे व त्या पैशांनी नाटक व सिनेमा पाहून घ्यावीत ! आपणास या लहान व क्षुद्र गोष्टी वाटतात. परंतु या बारीक गोष्टींनीच राष्ट्रीय चारित्र्य बनत असते. जो बारीकसारीक व्यवहारात विश्वासार्ह नाही, तो मोठ्या व्यवहारात तरी कसा राहील ? विश्वासभंगासारखे पाप नाही. वचनभंगासारखा दोष नाही, ह्या भरतभूमीत वचन पाळण्याचे महत्त्व सांगण्याची जरुरी पडावी का? हरिश्चंद्र व रामचंद्र यांच्या या भूमीत ‘विश्वासार्ह बना’असे उपदेशण्याची पाळी यावी का ?


   

हिंदुस्थानात नवीन नवीन अर्वाचीन शहरे अस्तित्वात येत आहेत. अविभक्त कुटुंबपध्दतीची संस्था मागे टाकून तिच्याहून अधिक विस्तृत व व्यापक अशी नवीन सामाजिक कुटुंबपध्दती आपण अस्तित्वात आणीत आहोत. शहर म्हणजे मोठ्यातला मोठा संघ. नागरिकांमुळे राष्ट्रे बनतात व राष्ट्रीय वृत्ती नगरांतून शिकावयाची असते. राष्ट्र-देहामधील नगर हा अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे.

पदार्थ अणूंचा बनतो व अणू परमाणूंचा बनलेला असतो. अणुघटनेसाठी सार्‍या परमाणूंची आवश्यकता असते. परमाणूंचा परस्परांशी संबंध असतो व प्रत्येक परमाणूचा सर्वांमिळून होणारा जो अणू त्याच्याशीही संबंध असतो. हातातील हाडांचा परस्परांशी संबंध असतो व शिवाय त्या सर्वांचा संबंध देहाशीही असतो. आजची आपली जी शहरे त्यांच्या बाबतीत असे म्हणता येईल का ? नगरवासीयांचा परस्परांशी जो संबंध असतो तो आंतरिक आहे ? नगरवासियांच्या परस्परांशी एकजीव झालेला आहे का ? ‘या नगरदेहातील आम्ही सारे अविरोधी सहकारी घटक’ अशी सर्व नागरिकांची भावना आहे का ? मध्ययुगातील काशी, लखनौ वगैरे शहरांतील प्रत्येक भागाचा, प्रत्येक मोहोल्ल्याचा सर्व नगरांशी नीट संबंध असे. ते ते धंदेवाले आपापसांत संघटित, सुसंबध्द असत; शिवाय सर्व नगराशीही त्यांचा संबंध जिव्हाळ्याचा असे. नगराच्या संपन्नतेसाठी, सुव्यवस्थेसाठी, सुखासाठी, आरोग्यासाठी, संरक्षणासाठी, सर्वांचा सहकार होई, सारे एक असत. दक्षिण हिंदुस्थानातील कांजीवरमसारखी खेडयांच्या जवळ असणारी जी बाजारांची मोठी गावे तेथे अजूनही असे गुण्यागोविंदाचे संबंध गावातील सर्व भागात सर्व जातींत दिसून येतात. तसे संबंध हल्लीच्या मुंबई, मद्रास, कलकत्ता वगैरे शहरात आहेत, असे म्हणता येईल का ? ‘ हे शहर आपले आहे, याची अब्रू आपण सांभाळू ’ असे तेथे राहाणार्‍यांच्या मनात येते का ? तसे जर नसेल तर ह्या शहरात जे आगंतुक आहेत ते निघून जातील व जे तात्पुरते आहेत ते अदृश्य होतील.

यांत्रिक गुंतागुंतीचे संबंध व जिवंत शरीरांतील गुंतागुंतीचे संबंध यांच्यात फार फरक आहे. सामुदायिक जीवनात जी अंगे महत्त्वाची नसतात, प्राणदायी नसतात, ती टिकत नाहीत; ती निघून जातात. एखादा भाग त्या जीवनात, त्या सामुदायिक घटनेत अत्यंत आवश्यक आहे, हे कशावरून समजावयाचे ? आपल्या पूर्वजांनी त्याला धर्माची कातर लावून पाहिले असते, धर्माची कसोटी लावून बघितले असते. जे राष्ट्रधर्म पाळतात, राष्ट्राची ध्येये ज्यांना पूज्य आहेत व त्यांच्यावर ज्यांची श्रध्दा आहे ते राष्ट्राचे आहेत व असे लोक त्या नगराचे प्राणमय घटक समजावेत. कारण नगरांतूनच-नागरसंस्कतींतूनच- राष्ट्र व राष्ट्राची संस्कृती तयार होत असतात. जे राष्ट्रीय धर्माची अवहेलना करतात, राष्ट्रीय ध्येयाचा अध:पात करतात, नाश करतात, त्यांना निघून जावे लागेल. एवं आपल्या संघटनाची, आपल्या एकीकरणाची राष्ट्रधर्म ही कसोटी आहे; समान ध्येय ही कसोटी आहे. शील, सद्वर्तन, न्यायप्रियता, सचोटी ही आपली कसोटी आहे. अशा नानाविध सूक्ष्म, अतिसूक्ष्म गुणच्छटांनी नागरिक धर्म बनत असतो. विशाल व विस्तृत असा मोठा संघ एकजीव होऊन वाढावयास अशा प्रकारच्या अनेक सद्गुणतंतूचे बनलेले बळकट दोरखंड त्या सर्वांना एकत्र बांधावयास पाहिजे असते.

   

पुढे जाण्यासाठी .......