रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

ध्येय

माझ्या जीवितांचे ध्येय हाच वणवा ध्येयपूजकाच्या हृदयात पेट घेतो. त्याच्या सर्व जीवनाचा नुसता आगडोंब उडून राहतो. हृदयाची होळी पेटलेली असते. जीवनाचे होमकुंड धडधडत असते. ध्येयासाठीच ध्येय. अतिथी उजवी शरीराची बाजू कर्वतून मागतो म्हणून मयूरध्वज तयार होतो. परंतु डाव्या बाजूचे ते भाग्य नाही म्हणून डावा डोळा भरून येतो ! शिबी राजा कपोताचा सांभाळ करण्यासाठी मांडीचे मांस कापून ससाण्याला देतो, परंतु त्याच्या शरीराचे इतर अवयव आपले असे भाग्य नाही म्हणून दु:खी होतात ! दधीचि असुरसंहार व्हावा म्हणून स्वत:ची हाडे देण्यास तयार होतो व प्राणार्पण करतो ! नायट्रोजनचे गुणधर्म शोधून काढताना मायर या जर्मन रसायनशास्त्रज्ञाचा स्फोट होऊन एक हात तुटला व एक डोळा फुटला; परंतु त्याचक्षणी गुडघे टेकून, “देवा, अजून एक हात व एक डोळा तू ठेवला आहेस- थोर तुझे उपकार” अशी त्याने प्रार्थना केली ! अशा दिव्य कर्मवीरांकडून ‘ कर्म ’ हा शब्द जेव्हा उच्चारला जातो, तेव्हा दुसर्‍यांच्या हृदयात ज्ञानाची चित्कलाच संचारल्याचा भास होतो. असे दिव्य कर्म म्हणजे परमोच्च मोक्षच होय. खरे ज्ञान, खरे कर्म, खरी शक्ती ही अभिन्नच आहेत !

नवभारतातील संन्याशाच्या संन्याशाचा अर्थ दुसर्‍याची सेवा करणे हाच असला पाहिजे. हा नवसंन्यासी वज्राप्रमाणे कठोर, ब्रह्मचर्याप्रमाणे प्रखर तेजस्वी, सागराप्रमाणे विशाल हृदयाचा, सर्वस्व देणार्‍या मेघाप्रमाणे नि:स्वार्थ असा असला पाहिजे. लढावयास उठलेल्या झुंझार हिंदुधर्माला याहून कमी दर्जाचे, याहून कमी सत्त्वाचे पुत्र चालणार नाहीत. ज्याची अशी तयारी असेल तोच खरा धर्मपुत्र.

 

‘संन्यासी’ या शब्दांत आज आपणास नवीन अर्थ दिसेल. या शब्दात नूतन अर्थ आज ओतलेला आहे, या शब्दात नवीन तेज, नवीन विद्युत् संचरली आहे. भगवे वस्त्र ही अत:पर संन्यासाची खूण नसून त्याग ही त्याची खूण झाली आहे. आज संन्यास अनेक ठिकाणी दिसून येईल. शास्त्रसंशोधनातील संन्यासी, ज्ञानपूजक संन्यासी, कारखाने चालविणारी संन्यासी, राजकारण चालविणारे संन्यासी. अनाथालये चालविणारे संन्यासी, शाळा चालविणारे संन्यासी, स्थानिक राज्यातील संन्यासी, गोरक्षण करणारे संन्यासी, विधवांचे अश्रू पुसणारे संन्यासी, पतित स्त्रियांची चिंता वाहणारे संन्यासी, - सर्वत्र संन्याशांची आज जरुरी आहे व ते दिसून येत आहेत. जीवनाच्या सार्‍या क्षेत्रांतून संन्याशांची जरुरी आहे संन्यासाची भावना, त्यागाची भावना परम थोर आहे. जो आजन्म संन्यस्त वृत्तीने राहून ध्येयपूजा करील, त्याचे जीवन तर फारच थोर. त्यागाची क्षणिक चमक, झळकफळक नको. सतत टिकणारी व उत्तरोत्तर वर्धमान होत जाणारी अशी त्यागाची ज्वाळा पाहिजे आहे. जो महात्मा असतो तो शिपाईही असतो व संन्यासीही असतो. कोणती वृत्ती त्याच्या ठिकाणी आधिक्याने असते हे सांगणे कठीण. शिपायांचे शौर्य व साहस आणि संन्याशाची नि:संगता ही त्याच्याजवळ असतात. वाढत्या वयाबरोबर त्याचा उत्साहही वाढत जातो. केस पिकतात, तशी त्याची बुध्दीही परिपक्व होते- परंतु कधी नासत नाही. वृध्दावस्थेचा, अशा महात्म्याच्या बाह्य शरीरावर जरी परिणाम झाला तरी त्याची बुध्दी तरतरीत असते, हृदय ओलेच असते. असा महापुरुष तरुणपणातल्याप्रमाणे वार्धक्यातही ताडाच्याझाडावरून खाली उडी घेण्यास तयार असतो, आकाशात उड्डाण करावयास उत्सुक असतो. संन्यासी खरा, परंतु त्याचा आशावाद अमर असतो. वाढत्या वयाबरोबर त्याची आध्यात्मिक शक्तीही वाढत जाते; त्याची इच्छाशक्ती वाढत जाते. त्याच्या कोणत्याही कार्यात स्वार्थ नसतो व म्हणून त्याला भीती नसते. माझे काय होईल, माझे कसे होईल, मला काय मिळेल, मला किती मिळेल- याची विवंचना करणार्‍याकडून महाकार्ये उठत नसतात. परमोच्च ध्येय सर्व गोष्टींचा स्वाहाकार करण्यास मागेपुढे पाहात नाही. तो महात्मा ध्येयसिध्दीसाठी सारे पणास लावतो. त्याच्या मनात स्वार्थ कधी डोकावतच नाही. ही संस्था मी वाढविली, हिचा होम ज्या हातांनी मी वाढविला त्याच हातांनी कसा करू ? असा क्षणभरही आसक्तीचा विचार त्याच्या मनाला शिवत नाही. ध्येयासाठी वाढलेला सारा संसार- त्याला तो हसत आग लावतो व एक सुस्काराही सोडीत नाही. एकदा कामाला हात घातला की ते काम संपेपर्यंत त्या महापुरुषाचा हात मागे येत नाही, तेथेच तो हात दृढावत जातो. संन्याशाला माघार माहीत नाही. दैन्य व दु:खाची बाधा कधी त्याला होत नाही. दैन्य-दु:ख-निराशा त्याल पाहून दिगंतांत पळून जातात. पराजय म्हणजे    क्षणांत निघून जाणारे ढग असे त्याला वाटते. अंतिम विजयसूर्य तळपणार, ही त्याची दृढ श्रध्दा असते. परंतु त्या विजयाचीही हुरहूर नाही. पराजयाने असा महात्मा होरपळत नाही, यशाने हुरळून जात नाही. जयापजय येवोत. प्रयत्न फळो वा जळो, तो चळत नाही. अभ्रांचा ज्याप्रमाणे गगनाच्या गाभ्याला स्पर्श होत नाही-ती येतात जातात त्या गगनाप्रमाण सुखदु:खाचा, जयपजयांचा साक्षी होऊन असा महात्मा कर्म करीत राहतो.

आणि गुरुभक्ती म्हणजे काय ? तिचाही नवीनच अर्थ. ध्येयसिध्दीसाठी तळमळत असणे, ध्येयासाठी अधीर होणे वेडे होणे म्हणजे गुरुभक्ती. ध्येयसिध्दी कशी सत्वर होईल या तळमळीने नाना साधने, नाना उपाय धुंडाळणे म्हणजे गुरुभक्ती. तसेच मिळविलेली प्रत्येक सिध्दी म्हणजे आत, आध्यात्मिक विजयच. ज्याप्रमाणे गुरु आपला अनुभव शिष्याला देतो. त्याप्रमाणे राष्ट्रही आपले मागील अनुभव भावी पिढीला देत जाईल. भावी पिढीला देता येण्यासारखे अनुभवांचे ठेवे जोपर्यंत आपण मिळवीत नाही, तोपर्यंत आता विश्रांती नाही. त्याचप्रमाणे शिस्त व संयम यांचेही महत्त्व म्हणजे गुरुभक्तीचेच-ते अंग. जो मुमुक्षू आहे, जो आरुरुक्षू आहे, त्याने प्रथम सेवा केली पाहिजे. भरपूर सेवा केल्याशिवाय सत्याचा अंकुर त्याच्या हृदयभूमीत फुटणार नाही. ज्याला वर चढण्याची इच्छा आहे तो भक्त पाहिजे, सेवक पाहिजे. भक्त झाल्याशिवाय मुक्त होता येत नाही. आज्ञा पालनाशिवाय आज्ञा करण्याचा अधिकार मिळत नाही. पूजेशिवाय, निष्ठा व श्रध्दा यांच्याशिवाय पुरुषार्थप्राप्ती होणार नाही. जरा जर तुमच्यात दंभ असेल, अगदी इवलीही जर स्वार्थाची दुर्गंधी असेल, तर ‘ज्याच्यासाठी गुरु तळमळत असतात, तो हा चेला नाही’ असे गुरु पटकन् समजून घेईल. गुरुला त्या चेल्याला दूर करावे लागेल. आपलाच हात, आपलाच पाय तोडून टाकण्यासारखे जरी ते कठोर कर्म वाटले तरी, सडलेला अवयव कापून काढण्याखेरीज गत्यंतर नसते.

प्रेम व तिरस्कार ह्या आता प्रचंड शक्ती झाल्या पाहिजेत. प्रेम जेव्हा नि:स्वार्थ व अनासक्त असते तेव्हा ते अत्यंत बलवान् असते. ते प्रेम दुसर्‍याला जागृती देते, स्फूर्ती, जीवन देते. तिरस्कार म्हणजे तडजोडीसाठी तयार नसणे. क्षुद्रता व असत्य यांची पाळेमुळे उपटून फेकून द्यावयाची; त्यांना बिलकूल थारा द्यावयाचा नाही. जे असत्य आहे, दांभिक आहे, क्षुद्र व नीच आहे त्याच्याशी कसली तडजोड? जे जे सत्य आहे, उत्कृष्ट आहे, तळमळीचे आहे, त्यांच्या पाठीमागे नेहमी एकच हेतू असणार हे प्रेमाला आता समजून येईल. खरा स्वाभिमान हा असत्यावर, पापमय गोष्टीवर उभा राहण्यास तयार नसतो. सत्याच्या पायावर, स्वाभिमान शोभतो. सत्याचीच बैठक खर्‍या स्वाभिमानाला लागत असते. जोपर्यंत मनुष्य प्रत्यक्ष काही करून दाखवीत नाही, तोपर्यंत तो आता मुका राहील; खोटी अहंता तो मिरवणार नाही. खरा स्वाभिमानी मनुष्य केवळ आपल्य पूर्वजांची किंवा आपल्या मित्रांची शेखी मिरवून आपण मोठे आहोत, असे दाखविणार नाही. तो पूर्वजांची किंवा मित्रांची बढाई मारणार नाही; अशा मोठ्यांचा मी म्हणून मोठा, असे सांगणार नाही. खर्‍या स्वाभिमानी पुरुषांच्या महनीय आकांक्षांत उज्ज्वल नम्रता असते, तेजस्वी विनय असतो. नालायक लोकांच्या तोंडची स्तुती म्हणजे सर्वात मोठा अपमान हे तो समजून असतो व म्हणून स्वत: काही करून दाखविल्याशिवाय, पूर्वजांस व स्वत:च्या मित्रांस शोभेसे स्वत:चे जीवन झाल्याशिवाय तो त्यांची पोकळ स्तुतिस्तोत्रे गात बसत नाही.

 

ब्रह्मचर्याचा आपला अर्थ आता निराळा आहे. ब्रह्मचर्य हे फक्त संन्याशालाच आहे असे नाही. ब्रह्मचर्य हे केवळ कायिक नसून ते वाचिक व मानसिकही असते. थोर हेतूशिवाय पाळलेले ब्रह्मचर्य हे अर्थशून्य. असले ध्येयहीन ब्रह्मचर्य म्हणजे आत्मशक्तीचा नाश होय. ब्रह्मचर्यही आज परिणामकारक, दुसर्‍यांच्या जीवनांवर हल्ले चढविणारे, व प्रभावशाली असे करावयाचे आहे, जगातील नारीनरांना परब्रह्माची रूपे म्हणून पाहणे, त्यांच्या ठिकाणी दिव्यत्व पाहणे, केवळ चिन्मयमूर्ती या दृष्टीने त्यांच्याकडे पाहणे, हे ब्रह्मचर्याचे प्रभावी ध्येय असते व या ध्येयासाठी संसारात न पडणे, अविवाहित राहणे हे एक साधन असते. केवळ अविवाहित राहणे याला अर्थ नाही. ते विवाहित राहणे दिव्य ध्येयाचे साधन झाले पाहिजे. विवाह-खरा विवाह-म्हणजे दोन मनांची मैत्री, दोन हृदयांचा संगम, दोन जीवांची भेट एवढाच आहे. विचारांचा विनिमय, आणीबाणीच्या वेळी दोघांनी एकरूप होणे, एकमेकांनी एकमेकांचा विकास होण्यास प्रेमाने व सहानुभूतीने मदत करणे हाच खरा विवाह होय. दोघांनी ध्येयदेवाची पूजा करावी. एकानेच उन्नत न होता उभयतांनी उन्नत होणे, हेच विवाहाचे ध्येय. एकमकांनी एकमेकांस वैषयिक सुख देण्यापेक्षा, परस्परांची भोगसाधने होण्यापेक्षा हे केवढे उदात्त ध्येय ! विवाहात क्षुद्र सुखाला थोडीफार जागा द्या वाटली तर परंतु ते शारीरिक सुख विवाहाचे ध्येय करू नका. या चिखलांत सदैव, रुतून बसू नका. या चिखलांतून ध्येयाची कमळे वर येऊ दे. ती ध्येयकमळे घेऊन पतिपत्नींनी परमेश्वराची पूजा करावी. पतिपत्नींनी एकरूप होणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. एकरूप होऊन सुखदु:ख भोगा, एकरूप होऊन ध्येयपूजा करा. असे झाले म्हणजे मुलेही त्यांच्या पाठोपाठ येतील. आईबाप ध्येयाची पूजा अविरोधाने करीत आहेत, हे नित्य दिसून आल्यामुळे मुलेही ध्येयपूजक होतात. हरिश्चंद्र व तारामती यांच्या पाठोपाठ बाळ रोहिदास निघतो. विवाहाला उन्नत करणे म्हणजे वीरपुरुषाचे ब्रम्हचर्य होय. वीरपुरुषांच्या ब्रम्हचर्यात दुसर्‍याचे कल्याण चिंतलेले असते. खर्‍या ब्रम्हचर्यात पत्नीच्या शिक्षणाचाही अंतर्भाव होतो. केवळ पत्नीपासून दूर राहणे म्हणजे पतीचे ब्रम्हचर्य नव्हे. त्याने पत्नीचा विकास केला पाहिजे. त्या उभयतांचे ब्रम्हचर्य उभयतांच्या उत्कर्षाला कारणीभूत झाले पाहिजे. पतिपत्नींनी परस्परांपासून दूर राहणे एवढ्याने खरी विशुध्दता येत नाही. खरी विशुध्दता ही विचारात, ज्ञानात व अनुभवाच्या एकीकरणात फलद्रूप होत असते. ज्ञानेशिवाय खरी विशुध्दता, खरे पावित्र्य नाही. अशा रीतीने संन्यासिनीच्या ब्रम्हचर्याप्रमाणे पत्नीही ब्रम्हचरिणी होईल.

तपस्येच्या जीवनात उत्साह व प्रकाश उत्तरोत्तर वाढतच असतात. सरस्वतीच्या भक्ताला सर्व काही सोपे व सहज-सुलभ वाटते. तो सुखविलासाला लाथाडतो. त्याच्या जीवनात प्रत्येक क्षणागणिक अमूर्त मूर्तावर विजय मिळवीत असते, चैतन्य जडावर विजय मिळवीत असते, आत्मा देहावर विजय मिळवीत असतो. त्याचे ध्येय प्रज्वलित ज्वालेप्रमाणे सारखे वर वर जात असते, चढत असते. प्रत्येक गिरकी ज्वालेला आणखीनच वर नेते, त्याप्रमाणे त्या पुरुषाचे प्रत्येक पाऊल त्याला वर चढवीत असते. जसजसे वर जावे, तो तो निराळी सृष्टी त्याला दिसते व तो आणखी वर जातो. याप्रमाणे विकास अखंड चाललेला असतो. पतिपत्नींच्या संयममय जीवनात असाच आनंद वाढत जातो. पत्नी पतीच्या ध्येयात समरस होते. पतिसेवा म्हणजे पतीच्या ध्येयाची सेवा, पतिपूजा म्हणजे त्याच्या ध्येयाची पूजा. पतीची ध्येये हीच तिची बाळे होतात. त्यांना ती खेळवते, मांडीवर घेते, सांभाळते, वाढवते. तिला दुसर्‍या मुलाबाळांची मग इच्छा राहात नाही. ह्या ध्येयबाळांना ती सर्वस्व देते. एखादे वेळेस पती जर ह्या ध्येयबाळांवर रागावून त्यांना फेकून देऊ लागला, त्यांना मारून टाकू लागला, तर ती त्या बाळांना आपल्या पदराखाली घेते, त्यांना आपल्या पाठीशी लपविते व पतीचा क्रोध आपणावर ओढवून घेऊन तो शांत करते. पतीचा खचलेला उत्साह, त्याला ती पाणी घालून वाढविते, त्याच्या अस्तास जाणार्‍या आशेला पल्लवित करते आणि अशा रीतीने धीर देऊन त्याला पुन्हा ध्येयाकडे वळविते. श्रियाळाला ऐन वेळी चांगुणेनेच धीर दिला. स्वत:च्या मुलाचे मांस खाण्यास तो कचरत होता व सत्त्व गमावण्याची वेळ आली होती. परंतु धैर्याचे मुसळ हातात घेऊन मुलाला कांडणारी चांगुणा पुढे होते व म्हणते-

नवमास वाहिला म्यां उदरांत । तुम्हां जड नव्हे चौ प्रहरांत ।। मी नऊ महिने पोटात बाळ ठेवला, तुम्हांला चार प्रहर ठेवता येणार नाही का ? तिच्या शब्दांनी श्रियाळाला नवचैतन्य मिळते. तिने पतीचे ध्येयबळ मरू दिले नाही. पतीनेच ते तिला दिले होते. परंतु ते एकदा तिचे झाल्यावर ते ती मरू कसे देईल ? मुलांची जोपासना कशी करावी, हे माताच जाणतात. समाजात पुरुष ध्येये निर्माण करतात, परंतु ती मरू न देण्याचे काम स्त्रिया करीत असतात. पुरुष मिळवून जे आणतील ते नीट जपून ठेवणे, त्याला कीड लागू न देणे हेच तर स्त्रियांचे कर्तव्य. त्या पालन करणार्‍या आहेत, ठेव जिवेभावे सांभाळणार्‍या आहेत. पतीच्या ध्येयाची पूजा करून त्यालाही निजध्येयप्रवण करणारी, ध्येयापासून च्युत होऊ न देणारी, पतीला धीर देणारी पत्नी ही त्याची जणू सांभाळ करणारी माताच होते. उभयतांनी ध्येयाचा कितपत साक्षात्कार करून घेतला, यावरूनच ती उभयतांचे यश कीर्तिमान मापीत असते. दोघांचे पतन वा दोघांचा उध्दार. सावित्री म्हणते, “पतीशिवाय मला मोक्षही नको, मग स्वर्गाचे तर बोलूच नका.” मिळेल ते दोघांचे. त्यात उभय वाटेकरी. अशा रीतीने दोघे यात्रा करीत जातात. जे जे मार्गात भेटेल व दिसेल ते ते “हे नव्हे. हे नव्हे. आपले ध्येय यांच्यापलीकडे आहे. यांच्यापुढे आहे. नेति नेति” अशा रीतीने डावलीत परस्परांस जागवीत हे ध्येयपूजक दांपत्य जात असते. स्वत:चे शारीरिक सुख त्यांना वमनवत् वाटू लागते व ती श्रेष्ठ सुखाचा शोध करीत जातात.

   

आज आपले मन कार्योन्मुख होत आहे. ते दुसर्‍यांच्या हुकुमतीखाली आता राहणार नाही. मनाच्या या बदललेल्या वृत्तीमुळे आपल्या विचारपध्दती व कार्यपध्दती यांच्यातही बदल होईल. आता ध्येयाशिवाय आपणास काहीही दिसेनासे झाले आहे. ध्येयाला गाठण्यासाठी आपण अधीर झालो आहोत. साधनांचीच साध्ये झाली, साध्याची साधने झाली. वैभवाने धर्म मिळवावयाचा, धर्माचे वैभव मिळवावयाचे. किती किंमत द्यावी लागेल, खर्च किती होईल, जावे की न जावे, करावे की न करावे असे आता रडगाणे, हे लंबकाचे हेलकावणे राहिले नाही. काहीही होवो, आता पुढे जावयाचे हे निश्चित. क्षुद्र आशा फेकून देऊन नवीन ध्येयाकडे आपण जाणार; नवीन वस्तू शोधणार, नवीन निर्माण करणार. पुन्हा एकदा भारत महाभारत होऊ दे. भारत शूरांचा व वीरांचा होऊ दे. भीष्मद्रोणांचा, भीष्मार्जुनांचा, कर्णदुर्योधनांचा होऊ दे. मरण म्हणजे खेळ वाटू दे. भूतकाळापेक्षाही भविष्यकाळांत त्यागाला अधिक वाव आहे. शौर्य- धैर्य दाखवावयास भरपूर अवकाश आहे. आमचे पूर्वज मोठे होते, त्यापेक्षा आम्ही भावी पिढी अधिक मोठी करू. आमच्या मुलाबाळांना आमच्या आजोबा-पणजोबांपेक्षा अधिक वैभवशाली करू.

आमची दृष्टी निराळी झाल्यामुळे, मन कार्योन्मुख झाल्यामुळे शब्दांचे अर्थ आता निराळे दिसू लागले आहेत. दिव्य दृष्टीला दिव्य अर्थ, दुबळ्या दृष्टीला दुबळा अर्थ. कर्म याचा अत:पर दैव असा अर्थ नसून ‘कर्म म्हणजे काम करण्यास मिळालेली संधी’ असा अर्थ झाला आहे. मला समाजात अन्याय दिसतो का ? जाऊ दे मला धावून. अन्याय दूर करण्याचा माझा हक्क आहे, तो मला बजावू दे. कर्म करण्याची संधी मला मिळाली आहे. कोण मला मज्जाव करणार ? निर्भय व निष्कंप छातीवर वीराच्या सात्त्वि संतापाला पाहून सारी अवडंबरी माया थरथर कापते व निघून जाते. दैव माझे काय करणार ? माझ्यासमोर दैव दुबळे आहे, हात जोडून उभे आहे. देवावर मी स्वार होईन व त्याला मला वाटेल तेथे दौडवीत घेऊन जाईन. ज्या जीवनाचा आपण सुंदर विकास केला असे विशुध्द व बलवंत जीवन, जरुर पडेल तेव्हा फेकून देण्याची तयारी, यालाच सामर्थ्य म्हणतात. हे सामर्थ्य आता आपणास आले आहे; या सामर्थ्याने संपन्न असे आपण बलभीम आहोत. मारुतीच्या पुच्छांत सारी शक्ती असे व ती त्याला उड्डाण करण्यास स्फूर्ती देई. आपल्याही पाठीमागे अशीच शक्ती उभी राहू दे व ती आपणास पुढे लोटू दे, मग द्रोणागिरी आपण चेंडूसारखे खेळवीत आणू. लीलेने सागर ओलांडून जाऊ, चंद्रसूर्याची फळे फराळास मागू. अशा अभिनव बलाने अजिंक्य झालेले आम्ही पृथ्वी आता पादाक्रांत करू. ज्याला पराजयाचे कधीही स्वप्न पडत नाही, पराजयाची कल्पना ज्याच्या मनाला कधी शिवत नाही, तो अजिंक्य आहे, दुर्धर्ष आहे. त्याला विजयाचीही पर्वा नसते; कारण विजयाच्याही पलीकडचे जग त्याला मिळावयाचे असते. विजयाला तो तृणासमान मानतो. यामुळेच विजय त्याच्या पाठीस लागून येतो. “न मागे तयाची रमा होय दासी-” ज्याला इच्छाच नाही त्याची लक्ष्मी दासी होते. फळ सोडले की ते नेमके जोडले जाते.

आपल्या महत्त्वाकांक्षा आज अमर्याद आहेत, अनंत आहेत. परंतु त्या सार्‍या उदार आहेत; त्या देण्यासाठी आहेत, घेण्यासाठी नाहीत; त्या तारण्यासाठी आहेत, मारण्यासाठी नाहीत; पोषणाच्या आहेत, रक्त शोषणाच्या नाहीत. आपण आनंदाने जिंकू. मोठ्या मोदाने मिळवू. आपल्यापाठीमागून येणार्‍यांना ते देऊन आपण निघून जाऊ. या देण्यासाठी जीव तडफडत आहे. भावी पिढीला काहीतरी दिव्य ठेवा देता यावा म्हणून आपण अधीर झालो आहोत, जीव होमावयासही सिध्द झालो आहोत जोपर्यंत सर्वार्पण करण्याची वेळ जवळ येत नाही, तोपर्यंत अधिकच नेटाने व जोमाने काम करणार- हेतू हा की, येऊ दे लौकर ती धन्य वेळ व सर्वस्व अर्पण करून होऊ दे माझ्या जीविताचे सोने. एक दिवस ते सर्वस्वसमर्पण करता यावे यासाठी आपण आपले काम करीत राहिले पाहिजे, सेवेने उत्तरोत्तर शुध्द होत गेले पाहिजे. जे बलिदान करावयाचे ते शुध्द असले पाहिजे. देवाने आपल्या सेवेने प्रसन्न होऊन त्या सेवेने परिपूत झालेल्या आपल्या जीवनाचा हविर्भाग शेवटी मागितला पाहिजे. आजन्म मरणालाच धुंडीत राहू. मरण म्हणजेच विकास. परिपूर्ण विकास म्हणजे मरण. आपण जी संकटे सोसतो, ज्या लढाया लढतो, जे झगडे करतो, ज्या चळवळी चालवितो, त्या सर्वांशी आपल्याभोवती असलेल्यांचाही परिचय होतो. ते आपली ध्येये पाहतात, आपली तळमळ जाणतात. त्यांच्या कल्याणार्थच आपण झटत आहोत, प्राणांतिक प्रयत्न करीत आहोत, ही गोष्ट ते समजून घेतात. बुध्ददेवांनी यशोधरेचा त्याग केला, परंतु त्या त्यागात तिचेही अपरिमित कल्याण होते. त्यांनी आपल्या त्यागाचे तेजोवलय तिच्या मुखाभोवतीही पसरविले. संन्यासाची देणगी तिलाही मिळाली.